Tag: चित्रपट परीक्षण

Read More

वजनदार

आपण जसे आहोत तसं स्वतःला स्विकारणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. किंबहुना बहुतेकांना जमत नाही. कुरळे केस असलेल्यांना सरळ केस हवे असतात तर सरळ असलेल्यांना कुरळे. फार गोरा रंग असेल तर सावळी त्वचा आवडते आणि सावळा रंग असेल तर गोरेपणाचं आकर्षण असतं. मला आठवतंय, मला जेव्हा चष्मा लागला तेव्हा चष्मा असणं म्हणजे तुमच्यात काही न्यून आहे असं समजलं जायचं. त्यामुळे मी पहिली काही वर्षं चष्मा न लावता डोळ्यांना भरपूर ताण दिला. म्हणूनच माझ्या मुलींना चष्मा लागल्यावर त्यांच्या पसंतीचाच उत्तम चष्मा घ्यायचा असं मी मनोमन ठरवलं होतं, मग तो जरा महाग असेल तरी चालेल. कारण मी स्वतः अनेक वर्षं चष्मा असल्याचा न्यूनगंड बाळगून होते. निरंजनशी लग्न झाल्यावर माझा तो गंड गेला, रादर त्याच्या नकळत निरंजननं तो घालवला.

Read More

दंगल

एखादा खेळ असो किंवा कला असो, त्यात नैपुण्य मिळवायचं असेल तर फार लहान वयापासून त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आणि या कष्टांमध्ये मुलांच्या आईवडलांचा फार मोठा वाटा असतो. अगदी भीमसेन जोशींचं उदाहरण घेतलं तरी त्यांना त्यांच्या गुरूंच्या घरी किती कष्ट करावे लागले याचे उल्लेख आपण वाचलेले, ऐकलेले आहेत. पण या गोष्टीचा आपण कौतुकानं उल्लेख करतो. सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक खेळांमधली उदाहरणं बघितली तर जगभरात हेच दिसतं की जे प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यांच्या आईवडलांनी लहानपणापासून मुलांकडून अपार कष्ट करून घेतले आहेत.

Read More

आय इन द स्काय

इराकमध्ये किंवा पॅलेस्टाईनमध्ये ड्रोन विमानांच्या हल्ल्यात अमुक इतके ठार, अशा बातम्या आपण किती सहजतेनं आणि निर्विकारपणे वाचत, बघत असतो. पण त्यामागे केवढी मोठी यंत्रणा असते, विचार असतो, संघर्ष असतात याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. शिवाय अमुक इतकी माणसं मरण पावली हे निर्विकार मनानं वाचण्याइतकं आपलं मन मुर्दाड झालेलं आहे. दुस-या महायुद्धात जेव्हा चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले तेव्हा जर्मनीला जर नमवायचं असेल तर युद्ध त्यांच्या दारात नेऊन ठेवल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं आणि जर्मनीवर जोरदार बाँबहल्ले सुरू केले. त्यात ड्रेस्डेन बेचिराख झालं. हजारो माणसं मेली. पण हे करणं भाग होतं कारण हिटलरला पायबंद घालणं आवश्यक होतं. युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य आहे अशी म्हण आहेच. पण चूक काय आणि बरोबर काय हे ठरवणं किती अवघड आहे. एकासाठी चूक असलेली गोष्ट दुस-यासाठी आवश्यक असते. एकासाठी दहशतवादी असणारी व्यक्ती दुस-यासाठी स्वातंत्र्यसैनिक असते. एकासाठी अनैतिक असणारी गोष्ट दुस-यासाठी नैतिक असते. प्रत्येक माणसाला आपल्या मनातल्या या परस्परविरोधी द्वंद्वाला कधी ना कधी सामोरं जावं लागतं. माणसाच्या मनातल्या नैतिक-अनैतिकतेच्या द्वंद्वाचाच ऊहापोह Eye in the Sky या चित्रपटात आहे.

Read More

की आणि का

स्त्री-पुरूष समानता या विषयावरची चर्चा ही अखंड तेवत असलेल्या नंदादीपासारखी आहे. म्हणजे या चर्चेला काहीही अंत नाही. असं का? जग आज एकविसाव्या शतकात असतानाही बायकांना पुरूषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं किंवा मिळतं आहे की नाही यावर अविरत चर्चा घडत असतात. जगात बहुतांश ठिकाणी आजही पुरूषसत्ताक पद्धती आहे. पाश्चिमात्य देशातल्या स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज बायकांची परिस्थिती बरीच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तीही मध्यमवर्गीय घरातल्या सुशिक्षित बायकांची. निम्न आर्थिक स्तरातल्या कितीतरी बायका अजूनही माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळवण्यासाठी झगडत आहेत.