Read More

रूपं पूर्णब्रह्माची

पाचवी-सहावीत असेन तेव्हाची ही आठवण आहे. आम्ही तेव्हा बीडला राहात होतो. माझी आजी कॉफी घ्यायची. ती शाळेत असताना गांधीजींनी प्रत्येकाला स्वतःच्या एका आवडत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला म्हणून तिनं तिला अतिशय प्रिय असलेला चहा सोडला होता. तेव्हापासून ती कॉफी घ्यायची. आजी चिकोरी मिश्रीत कॉफी प्यायची. ही कॉफी तेव्हा पत्र्याच्या लहान गोलाकार डब्यातून मिळायची. तर एका दुपारी मी आजीला उत्साहानं म्हटलं की, मी आज तुला कॉफी करून देते. मी गॅसवर शिस्तीत दूध गरम केलं, त्यात साखर घातली आणि कॉफीच्या डब्यातून कॉफी घालून उकळलं. पण मला कळेना की कॉफीचा वास असा का येतो आहे? मी कॉफी गाळून आजीला नेऊन दिली, तिनं कप नाकाजवळ नेला मात्र, तिनं शांतपणे तो कप बाजूला ठेवला. मी कॉफीच्या रिकाम्या झालेल्या डब्यात ठेवलेला काळा मसाला कॉफी म्हणून घातला होता! तर ही माझी स्वयंपाकाशी पहिली ओळख.

Read More

मावशी आणि मी

माझ्या सासुबाईंना मी मावशी म्हणते. माझं लग्न ठरल्यावर तुम्हाला काय म्हणू? असं मी माझ्या सासुसास-यांना विचारलं होतं. आणि मी आई-बाबा म्हणणार नाही असंही सांगितलं होतं. तर तिनं “मला विजू म्हण,” असं सांगितलं. कारण निरंजन आणि त्याच्या बहिणी तिला विजू म्हणतात. ते तर मला शक्यच नव्हतं. मग मी मावशी म्हणेन असं सांगितलं, त्यावरही तिचा “अगं मावशी म्हण” असा आग्रह होता. पण तेव्हा मी तिला अहो मावशीच म्हणत असे. चार-पाच वर्षानंतर तिच्या एका वाढदिवसाला तिनं “मला आजपासून अगं मावशीच म्हण,” अशी आज्ञा केली! जी पाळण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.
मावशी जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली तेव्हा २००१ मध्ये मी ‘ललित’साठी ‘घरातल्या विजयाबाई’ असा लेख लिहिला होता. तेव्हा माझ्या लग्नाला जेमतेम सहा वर्षं झाली होती. तिच्याशी मैत्री होती खरी पण त्यात काहीसा नवखेपणा होता. त्यामुळे त्यावेळी माझं आणि तिचं जे नातं होतं त्यापेक्षा आज २० वर्षांनंतरचं आमचं नातं खूप बदललेलं आहे. आम्ही आज एकमेकींच्या जास्त जवळ आहोत. सासू-सुनेपेक्षा आज आम्ही फक्त मैत्रिणी आहोत.

कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा भग्नमूर्ती हा काव्यसंग्रह वाचून माझ्या सास-यांनी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर १९३६ मध्ये ते मुंबईला आले असताना मुंबईतल्या एम्पायर हॉटेलमध्ये ते उतरले होते. तेव्हा माझ्या त्यावेळी २३ वर्षांच्या असणा-या सास-यांना त्यांनी भेटायला बोलावलं होतं. १९३६ मध्ये जुळलेला हा बंध कवी अनिलांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८२ पर्यंत कायम होता. माझे सासरे तसे व्यक्तिपूजेच्या अगदी विरोधात होते पण कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे दोघे त्यांच्यासाठी आदरस्थानं होती. भाई (माझे सासरे) आणि विजया आपटे यांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा भाईंनी सगळ्यात आधी आपल्या वहिनीला ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर अनिल आणि कुसुमावतीबाईंना. मावशीनं सांगितलं की जेव्हा लग्नानंतर कुसुमावतीबाईंचं पहिलं पत्र आलं तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की, तुमचं अभिनंदन करू की तुम्हाला आशीर्वाद देऊ?

Read More

आजोबा

आज माझ्या आजोबांचा जन्मदिवस. ते आज असते तर १०४ वर्षांचे असते. मी आता ४४ वर्षांची आहे तरीही आजोबांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आणि ते केवळ माझे आजोबा होते म्हणून नाही तर मी तटस्थपणे जरी विचार करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचं जे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं त्यामुळे असं होतं असं मला वाटतं.
आमचे पूर्वज मूळचे कर्नाटक सीमेवरच्या, अक्कलकोट तालुक्यातल्या चपळगावचे. आजोबांचे वडील कामानिमित्त मराठवाड्यातल्या बीडला आले आणि आम्ही बीडचेच झालो. बरेचसे चुलतमावस चपळगावकर बीड आणि त्याजवळच असलेल्या गेवराईला स्थायिक झाले. आजोबांचे वडील ते लहान असतानाच गेले. त्यानंतर त्यांच्या आईनं भिंतीत पुरून ठेवलेलं थोडं-थोडं सोनं विकून त्यांना शिकवलं. ते दोघे भाऊ. आजोबांनी त्या काळात उर्दूमधून वकिलीची सनद घेतली आणि बीडला वकिली सुरू केली. त्यांचे भाऊ शिक्षक झाले. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळात ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. दीड वर्षं ते तुरूंगात होते. तिथे जे काही खायला मिळायचं त्यामुळे आयुष्यभर पोटाचा त्रास त्यांच्या मागे लागला.
Read More

बाबा आणि मी

माझे बाबा नरेंद्र चपळगावकर हे डिसेंबर २००४ च्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तेव्हा प्रतिष्ठानच्या विशेषांकात प्रकाश मेदककर काकांनी मला त्यांच्याबद्दल लिहायला सांगितलं होतं. तेव्हा लिहिलेला हा लेख. आज हा लेख परत वाचला तेव्हा मला त्यात खूप काही वेगळं लिहिता आलं असतं असं वाटलं. पण तेव्हा तो असा लिहिला होता म्हणून तो तसाच शेअर करते आहे. हा लेख मी नागपुरात धंतोलीतल्या कवी अनिलांच्या घरात बसून लिहिला होता ही अजून एक आठवण. लेख बराच जुना आहे हे लक्षात घेऊनच वाचा.
Read More

इस्त्रायल डायरी २०१७

३० जानेवारी २०१७ –

आपण वेगवेगळ्या प्रकारचं जेवत असतो, वेगवेगळं खाणं खात असतो. आता तर जग इतकं जवळ आलंय की जगाच्या कुठल्याही कोप-यात जगाच्या दुस-या टोकावरचं खाणं सहजरित्या उपलब्ध होत असतं. भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचं खाणं मिळतं.
मला, माझ्या नव-याला आणि माझ्या मुलींना सगळ्या प्रकारचं खाणं आवडतं. वेगवेगळ्या प्रकारचं खाणं चाखून बघण्यात आम्हाला आनंद वाटतो. विशेषतः प्रवास करताना आपण जिथे जातो तिथल्या पद्धतीचं खाणं खाऊन बघायलाच हवं या मताचे आम्ही आहोत. आणि आम्ही जेव्हा बाहेरगावी किंवा परदेशात जातो तेव्हा तिथले पदार्थ आवर्जून खातो.


आम्ही उद्या इस्त्रायलला जातो आहोत. तब्बल १० दिवस इस्त्रायलला असणार आहोत. अर्थातच तिथले वेगवेगळे बाजार बघणार आहोत. इस्त्रायलमधले ज्यू लोक जगभरातून आलेले आहेत त्यामुळे इस्त्रायलमधली खाद्यसंस्कृती बहुढंगी आहे. मध्य आणि पूर्व युरोपातून आलेले अश्केनाझी ज्यू, सिरिया आणि इजिप्तमधून आलेले मिझराही ज्यू, ट्युनिशियन ज्यू, नॉर्थ आफ्रिकेतून आलेले मघरेबी ज्यू, भारतातून गेलेले कोचिन ज्यू, बेने-इस्त्रायली, शिवाय अरब अशा अनेकांच्या मिश्रणातून इस्त्रायलची खाद्यसंस्कृती तयार झालेली आहे. बाजार ही खास अरबी संकल्पना, ज्याला सूक म्हणतात. इस्त्रायलमध्ये जेरूसलेम आणि तेल अवीव अशा दोन्ही शहरांमध्ये त-हत-हेचे बाजार आहेत. ते बघायचे आहेत. मी शाकाहारी असले तरी इस्त्रायलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, सॅलड्स, सुका मेवा, फळं मुबलक प्रमाणात मिळतात. शिवाय फलाफल, हमस, मुहम्मरा, पिटा ब्रेड असे माझे आवडते प्रकारही सहज मिळतात. त्यामुळे खाण्याचा अनुभव उत्तम असणार यात शंकाच नाही. त्याबद्दल वेळोवेळी लिहीनच.
उद्यापासून हे सगळं खायचं आहेच. पण खरं सांगू का, मोठ्या प्रवासाला निघण्याआधी आपलं कम्फर्ट फूड खाल्लं की फार बरं वाटतं. त्यानुसार आज घरातल्या प्रत्येकाला आवडणारे पदार्थ केले. निरंजनला, माझ्या नव-याला सारस्वती पद्धतीची फिश करी आणि गरम भात अतिशय प्रिय आहे. म्हणून त्याच्यासाठी आज पापलेटची आमटी आणि भात केला. मी १० दिवस नाही म्हणून मुलींना आवडणारी तिस-यांची आमटी केली. आणि माझ्यासाठी अर्थातच गरमागरम पिठलं केलं. बरोबर तळलेली मिरची. भातावर मस्त तूप घालून पिठलं कालून त्याचा फडशा पाडला. सगळेजण आपापलं कम्फर्ट फूड खाऊन तृप्त झालेले आहेत.
आता उद्यापासून एका अनोख्या, नवीन संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. तिथल्या लोकांना भेटायची, त्यांच्याशी गप्पा मारायची, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली आहे. भारतातून गेलेल्या ज्यूंचे अनुभव ऐकायचे आहेत. आणि हो, इस्त्रायली कम्फर्ट फूड चाखून बघायचं आहे! तुमच्याशी जमेल तसं बोलत राहीनच. तिथल्या पदार्थांचे फोटोही शेअर करेन. संपर्कात राहूच.
#traveldiary #israeltraveldiary #israelifood #israelfood #mumbaimasala#worldcuisine #israelcuisine #lovetotravel #अन्नहेचपूर्णब्रह्म #इस्त्रायलडायरी#इस्त्रायलखाद्यसंस्कृती

Read More

सुहाग रात – खास भारतीय फंडा

सुहाग रात किंवा लग्नानंतरची पहिली रात्र हा खास भारतीय फंडा आहे. म्हणजे जगात इतरत्र कुठे लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा इतका गाजावाजा कुठे होत असेल असं वाटत नाही. विशेषतः आपल्याकडचे चित्रपट आणि मालिकांमधून सुहाग रात हे फारच महत्त्वाचं प्रकरण बनलं. इतकं की प्रत्यक्ष आयुष्यातही पहिली रात्र साजरी करण्यावर चित्रपटांमधल्या तद्दन फिल्मी सुहाग रात प्रकरणाचा पगडा दिसून येतो.

लैंगिक शुचितेला आपल्या देशात फारच महत्त्व आहे, अर्थातच बाईच्या लैंगिक शुचितेला. शिवाय विवाहपूर्व लैंगिक संबंध आपल्या समाजात उघडउघड अमान्यच आहेत. आता परिस्थितीत थोडा बदल होत असला तरीही तो अति उच्चभ्रू वर्गात किंवा अति निम्न वर्गात. पांढरपेशा मध्यमवर्गात अजूनही विवाहपूर्व लैंगिक संबंध गैरच समजले जातात. या सगळ्यातून या पहिली रात्र प्रकरणाचा उगम झाला असावा.

Read More

कुमार गंधर्व संगीत महोत्सव

देवास, इंदौरजवळचं लहानंसं, टुमदार गाव. गावात एकच मुख्य रस्ता जो सगळ्या गावाला कवेत घेतो. त्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराकडून तुम्ही डावीकडे वळलात की लागतो माताजी का रास्ता. देवासमधल्या चामुंडा मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणून माताजी का रास्ता. हा लहानसा रस्ता जिथे संपतो तिथे जरासं अलिकडे, रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे भानुकुल, पंडित कुमार गंधर्वांचं घर. या घरात कुमारजींचं अनेक वर्षं वास्तव्य होतं. आता त्यांची कन्या आणि प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली आणि नातू गायक भुवनेश कोमकली इथे राहतात. या घरात अजूनही कुमार गंधर्वांचं वास्तव्य असावं असं वाटतं इतकं सुरेख सगळं जतन केलेलं आहे. त्यांची गाण्याची खोली, त्यांचा पलंग, पुस्तकं, टेबललँप सगळं काही तितकंच सुबक रितीनं ठेवलेलं आहे.