मिनिमिलिस्टिक लाइफस्टाइल या विषयावर सध्या जगभर बरीच चर्चा होते आहे. आपण सोसासोसानं बरेचदा नको असलेल्या कित्येक गोष्टी खरेदी करत असतो. वापर न होणा-या कितीतरी गोष्टींचा साठा करत असतो. आमच्या आजुबाजूलाच मी बघते, काही मैत्रिणींच्या सासवा, आया या एखादी गोष्ट केवळ त्यांनी खरेदी केली आहे म्हणून वर्षानुवर्षं काढून टाकू देत नाहीत. घरांचे माळे काठोकाठ भरलेले असतात. एक ओळखीचं कुटुंब अनेक वर्षं परदेशात वास्तव्याला आहे पण त्यांच्या भारतातल्या घरात चाळीस वर्षांपूर्वी घेतलेली क्रॉकरी तुटक्याफुटक्या अवस्थेत पडून आहे.
Category: राहणी

साडीची कहाणी – ३
टस्सर सिल्क हा माझा अत्यंत आवडता कापडाचा प्रकार आहे. एक तर ते नैसर्गिक रंगातही सुंदर दिसतं. शिवाय त्याला अंगचीच अशी सोनेरी झळाळी असते. त्याला काहीही न करता साधा कुडता शिवा आणि एखादा सुरेख दुपट्टा त्यावर घ्या किंवा दुपट्टा न घेता जीन्सवर साधा टस्सर कुडता घाला. फार सुरेख दिसतं. टस्सरमध्ये नैसर्गिक रंगातही फक्त वेगळ्या रंगाच्या काठाच्या साड्या मिळतात. त्याही छान दिसतात. विशेषतः भागलपूर साड्या फार छान दिसतात.

काजळ आणि लिपस्टिक
मी पूर्वीही लिहिलं होतं की काजळ आणि लिपस्टीक वगळता मी दुसरा कुठलाही मेकअप वापरत नाही. काजळ मात्र मी आठवी-नववीत असल्यापासून वापरतेय. सुरूवातीला बरीच वर्षं जाई काजळ वापरायचे. नंतर गाला किंवा लॅक्मेचं आयलायनर काजळासारखं लावायचे. नंतर काही वर्षं शहनाजचं हर्बल काजळ वापरलं. नंतर जेव्हा लॅक्मेच्या आयपेन्सिल आल्या तेव्हा त्या वापरल्या.

फॉर्मल पोशाख
देशात किंवा परदेशात कॉन्फरन्सला गेल्यावर कशा प्रकारचे कपडे घालावेत असा प्रश्न मृदुला देशमुख-बेळे या मैत्रिणीनं विचारला आहे. मृदुला प्राध्यापक आहे. तिला साड्या नेसायला आवडत नाही पण तिला हातमागावरचे कपडे आवडतात. मग ती प्लेन कुडते शिवते आणि त्यावर उत्तम रंगसंगतीच्या सिल्कच्या ओढण्या वापरते.
मृदुलानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही तज्ज्ञ नाही. पण मला जे काही वाटतं आहे ते मी इथे सांगते आहे. सर्वसाधारणपणे कॉन्फरन्सला फॉर्मल कपडे घालावेत असा संकेत आहे. आता जगभर स्त्रियांसाठी फॉर्मल कपडे म्हणजे स्ट्रेट कट ट्राऊजर्स आणि शर्ट, किंवा नी लेंग्थ स्कर्ट आणि शर्ट, वर ब्लेझर, ब्लेझर नको असल्यास सिल्कचा स्कार्फ असं वापरलं जातं.

पांढरे केस आणि मी
आपण चांगलं दिसावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं आणि त्यात काहीही चूक नाही. त्यामुळे बहुतेक सगळी माणसं नेहमी चांगलं दिसण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीची चांगलं दिसण्याची व्याख्या वेगळी असते. त्यामुळे एखाद्याला जे चांगलं वाटतंय ते दुस-याला चांगलं वाटेलच असं नाही.
वाढणारं वय हे वास्तव आहे. आपलं सगळ्यांचंच वय वाढणारच आहे म्हणूनच तर जन्मदिवसाला वाढदिवस असंच म्हटलं जातं. वाढणारं वय आपण कसं स्विकारतो हा खरा प्रश्न आहे. लहान असताना वय वाढावं असं वाटत असतं कारण तारूण्याची कल्पना विलोभनीय वाटत असते. आणि ते खरंही आहे. तरूण असण्यातली मजा काही औरच आहे. या वयात माणूस दिसतोही छान, बेफिकिर असतो, कसल्या चिंता नसतात, आईवडील धडधाकट असतात, त्यामुळे सगळं कसं छान वाटत असतं. पण नंतर जसजसं वय वाढायला लागतं तसंतसं काहींना ते नकोसं वाटायला लागतं. आणि या नकोशा वाटण्यामागे सगळ्यात अग्रक्रमावर असतं ते दिसणं.

कुडते-कुर्ती
तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा पारंपरिक पोशाख म्हणजे साडी आणि परकर पोलकं. मला आठवतंय आम्ही बीडला राहायचो तेव्हा शाळेतल्या तसंच नात्यातल्या मुलींना परकर पोलक्यात बघायची सवय होती. आणि लहानपणापासून मी हे कधीही घालणार नाही असंही मनोमन ठरवलेलं आठवतंय. सुदैवानं आई आणि बाबांनी लहानपणापासून उत्तम कपडे घालायला शिकवलं. बाबा तर पुण्याला गेले की स्कर्ट किंवा फ्रॉक आणायचे. आईसुद्धा टेलरकडून छानसे फ्रॉक किंवा पिनाफोर शिवून घ्यायची. मी अकरावीत गेल्यावर कॉलेजला जाणार म्हणून आईबाबांनी खास पुण्याहून २-३ फ्रॉक, २ स्कर्ट, २-३ पँट आणि १ लखनवी सलवार-कमीज आणलं होतं.