लँडोर. अनेक वर्षं या गावाचं नाव ऐकत होते. रस्किन बाँड इथे राहतात असं वाचत होते. मराठी माध्यमात शिकल्यामुळे इंग्रजी वाचन फारसं नाहीच. त्यामुळे खरं सांगायचं तर रस्किनचं काहीच वाचलेलं नव्हतं. इंग्लंडला जाऊन राहिल्यावर भारताची आठवण येतच राहिली म्हणून ते कायमचे परतले हे माहीत होतं. एखाद्या गावात, जागेत असं काय असतं की माणसाला तिथेच परतावंसं वाटतं? आपलं गणगोत मागे सोडून यावंसं वाटतं? आपली भाषा, आपली संस्कृती सोडून परकी भाषा, संस्कृती आपलीशी कराविशी वाटते? मला हे प्रश्न नेहमी पडतात.
