काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतात केवळ दूरदर्शन होतं आणि झीसारखं एखादं चॅनेल नुकतंच बाळसं धरत होतं तेव्हा अचानक पाकिस्तानी मालिका फार लोकप्रिय झाल्या होत्या. धूप किनारेसारख्या पाकिस्तानी मालिकांनी भारतीय प्रेक्षकांना वेडं केलं होतं. एक प्रौढ वयाचा डॉक्टर आणि त्याच्या प्रेमात पडणारी त्याची विद्यार्थिनी या दोघांच्या संबंधांवर ही मालिका आधारलेली होती.
नंतरच्या काळात भारतात दूरदर्शन व्यतिरिक्त अनेक वाहिन्या सुरू झाल्या. स्टार प्लस, सोनी, झी या हिंदी आणि झी मराठी, स्टार प्रवाह, इटीव्ही म्हणजेच आताचं कलर्स मराठी यासारख्या वाहिन्यांमुळे दैनंदीन मालिकांची एक प्रचंड मोठी लाटच आली. या लाटेनं भारतातलं संध्याकाळचं आयुष्यच बदलून टाकलं. स्त्रिया आणि वयस्कर स्त्रीपुरूष हे आपलं वेळापत्रक मालिकांच्या भोवती ठरवायला लागले. अजूनही तीच परिस्थिती कायम आहे.