ब्लाउज चांगला नसेल तर साडीची मजाच जाते. ब्लाउज कसा आहे, तो कसा बसलाय यावर त्या साडीचं देखणेपण अवलंबून असतं. ब्लाउजच्या अनेक फॅशन्स येतात आणि जातात. पण काही पद्धती मात्र पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि त्या टिकल्याही आहेत.
ब्लाउजचं सगळ्यात पहिलं रूप म्हणजे कंचुकी. एक कपडा उरोजांवरून घट्ट लपेटून त्याची पाठीमागे बांधलेली गाठ हे ब्लाउजचं पहिलं रूप. आम्रपाली किंवा शकुंतला यासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा असलेल्या चित्रपटांमध्ये आपल्याला कंचुकीचे प्रकार बघायला मिळतात. कालानुरूप या कंचुकीत बदल होत गेले. मग आले ते स्लीव्हलेस ब्लाउजच्या स्वरूपातले ब्लाउज ज्यावर उत्तरीय घेतलं जायचं. त्यानंतर मग हळूहळू बंद गळ्यांच्या ब्लाउजची फॅशन आली. म्हणजे मागून बंद गळा आणि समोरून गोल, मटका किंवा व्ही गळा.