ब्लॉगविषयी

3

प्रत्येक व्यक्तीची आपली एक स्टाइल असते. मग ती कपड्यांची असो, केसांची असो, बोलण्या-चालण्याची असो वा हसण्याची. काही गोष्टी उपजतच असतात म्हणजे एखाद्याचं हसणं गोड असतं, एखाद्याला मस्त खळी पडते. काही गोष्टी आपण वयानुसार, अनुभवांनुसार आत्मसात करत जातो. विचार करून बघा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुणाची तरी हेअर स्टाईल आवडते म्हणून आपण तशी करून बघतो. किंवा कुणाचे तरी कपडे आवडतात म्हणून आपण तशा प्रकारचे कपडे घालतो. पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला तितकीच चांगली किंवा शोभून दिसेल असं नाही. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार त्या-त्या गोष्टी ब-या किंवा वाईट दिसतात.

कुठे जाताना कसे कपडे घालावेत, कसं दिसावं याचे काही अलिखित नियम असतात. उदाहरणार्थ, स्विमिंग कॉस्च्यूम बीचवरच घातलेला बरा दिसतो. तो घालून उद्या तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार नाही ना! तर सगळ्याच बाबतीत असे काही अलिखित नियम असतातच. आपण हॉस्पिटलला जाताना भडक रंगाचे, जरीचे कपडे घालून, दागिने घालून, मेकअप करून जात नाही. कॉलेजमध्ये, शाळेत शिकवत असू तरी काहीसा हाच नियम लागू पडतो. पण त्या उलट जर आपण एखाद्या पार्टीला जाणार असू तर तिथे घालायचे कपडे छान ब्राईट रंगाचे हवेत. एखाद्या लग्नाला जायचं असेल तर छान जरीचे, पारंपरिक कपडे हवेत. एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला उच्च प्रतीच्या कापडाचे (म्हणजे चांगली खादी किंवा रॉ सिल्क किंवा सिल्क) पण सौम्य पण डोळ्यात भरणा-या रंगसंगतीचे कपडे हवेत. तर पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमाला जाताना पाश्चिमात्य ढंगाचे कपडे हवेत. अर्थात हे मी ढोबळमानानं सांगते आहे. शेवटी काय तर आपण करू ती फॅशन! उषा उत्थुप नाही का अगदी पारंपरिक पोशाखात, उत्तम पाश्चिमात्य संगीत गाते.
कपड्यांच्या बाबतीत तर आपण भारतीय लोक फारच नशीबवान आहोत. आपल्या देशात इतक्या त-हेत-हेचे, इतक्या पोतांचे, इतक्या विविध रंगसंगतीचे कपडे मिळतात की परदेशी गेल्यावर मला तिथल्या कपडे खरेदीत अजिबात रस वाटत नाही. एक तर आपल्या देशाचा आकार मोठा. शिवाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं ऋतुमान. या सगळ्यामुळे एकूणच फॅशनमध्ये आपल्याकडे किती वैविध्य आहे बघा ना. अगदी दक्षिणेपासून सुरूवात करायची झाली तर केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या चारही राज्यांमध्ये उत्तम रेशमी कपडे, विशेषतः साड्या मिळतात. पुढे महाराष्ट्रात उत्तम दर्जाचं कॉटन आणि बरोबरीलाच रेशमी कपडेही शिवाय पैठणीसारखे साड्यांचे प्रकारही मिळतात. गुजरातेत खादी शिवाय बांधणी, राजस्थानात विविध रंगांची उधळण असलेली बांधणी आणि हँडब्लॉक प्रिंटचे कपडे, मध्यप्रदेशात इंदुरी, चंदेरी, महेश्वरी कपडे, छत्तीसगढ आणि झारखंडमध्ये उच्च प्रतीचं सिल्क, उत्तर प्रदेशात लखनवी काम केलेले कपडे, पंजाबात फुलकारी काम केलेले कपडे, काश्मीरमध्ये काश्मिरी वर्क केलेले कपडे, आसामात मेखला काम केलेले कपडे. जितकं लिहीन तितकं कमीच आहे. आणि हे मी फक्त कपड्यांबद्दल लिहितेय. प्रत्येक प्रांतातले दागिने, केशरचनांच्या पद्धती, राहणीमानाच्या पद्धती हे सगळं तर खूपच मनोरंजक आहे. शिवाय आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमधल्या हवामानाच्या विषमतेमुळे अगदी पातळ मलमलच्या कापडापासून ते अति जाड लोकरी कापडापर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे आपल्याला बघायला मिळतात.
या सगळ्या गोष्टींबद्दल वाचायला, लिहायला मला स्वतःला खूप आवडतं. वेगवेगळ्या रंगांचे, पोतांचे कपडे वापरायला खूप आवडतं. त्यातही पारंपरिक कपडे वापरायला आवडतं. विशेषतः साड्या नेसायला फारच आवडतं. मग याच विषयावर तुमच्याशी बोलावं असं ठरवते आहे. मी काही फॅशन डिझायनर नाही, मेकअप आर्टीस्टही नाही किंवा दागिन्यातली किंवा ग्रूमिंगमधली तज्ज्ञ नाही. इतरांना बघून, आपल्याला वापरायला काय आरामदायी आहे याचा अनुभव घेऊन मी माझी अशी एक राहणीची पद्धत बनवली आहे. शिवाय मी जे वापरत नाही पण मला दुस-यांनी ते वापरलेलं आवडतं अशाही ब-याच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, मी फक्त चांदीचे दागिने वापरते, पण मला दुस-यांनी इतर प्रकारचे दागिने घातलेले बघायला आवडतं. किंवा मी स्वतः नेटच्या साड्या वापरत नाही पण तरूण मुलींना त्या छान दिसतात.

या व्यतिरिक्त मला स्वतःला प्रवास करायला फार आवडतं. माझ्या प्रवासाबद्दलच्या काही पोस्ट्स मी सह्याद्री प्रवास डायरी या ब्लॉगवर टाकल्या होत्या. पण अन्न हेच पूर्णब्रह्म, साडी आणि बरंच काही या दोन ब्लॉग्जबरोबर तिसरा ब्लॉग अपडेट करत राहणं फार कठीण होतं आहे. म्हणून अन्न हे पूर्णब्रह्म हा फूड ब्लॉग वगळता बाकीच्या इतर विषयांवर मी या ब्लॉगवर लिहिणार आहे.
तर या आणि इतरही ब-याच गोष्टींबद्दल मी या पेजवर तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मग ते कधी एखाद्या साडीच्या प्रकाराबद्दल असेल तर कधी एखाद्या कपड्याच्या पोताबद्दल असेल तर कधी एखाद्या दुकानाबद्दलही. कधी घराच्या रचनेबद्दल असेल तर कधी झाडांबद्दल असेल. कधी पाहिलेल्या एखाद्या सुंदर घराचे फोटो शेअर करेन तर कधी साड्यांचे फोटो शेअर करेन. तर कधी दागिन्यांचे फोटो शेअर करेन, कधी दागिन्यांच्या प्रकारांबद्दल लिहीन. कधी प्रवासाबद्दल लिहीन तर कधी आपल्या खास जिव्हाळ्याच्या एखाद्या विषयाबद्दलही लिहीन. तुम्हीही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कळवा. शिवाय तुम्हाला या संदर्भातल्या एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही सुचवा. मला जसं जमेल तशी माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

तर वेलकम टू साडी आणि बरंच काही!

सायली राजाध्यक्ष

Screenshot_2016-03-08-14-08-13-1

मी ब्लॉगर आहे. अन्न हेच पूर्णब्रह्म https://shecooksathome.com/  आणि साडी आणि बरंच काही http://www.sareesandotherstories.blog हे दोन ब्लॉग मी लिहिते. हे दोन्ही ब्लॉग फेसबुक पेजच्या स्वरूपात फेसबुकवर सापडतील.  शिवाय डिजिटल कट्टा (www.digitalkatta.com) हे ऑनलाइन नियतकालिक संपादित करते. डिजिटल कट्टाचा २०१६ चा दिवाळी अंक जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांक आहे. त्याची लिंक आहे – http://www.digitaldiwali2016.com

माझा इ-मेल आयडी आहे – sayali.rajadhyaksha@gmail.com