हॉस्पिटल डायरी

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. काल माझी प्राथमिक ट्रीटमेंट पूर्ण झाली. सुदैवानं माझा कॅन्सर लोकल असल्यानं आणि लवकर कळल्यानं मला किमोथेरपी घ्यावी लागली नाही. मला फक्त रेडिएशन घ्यावं लागलं. या दोन महिन्यांच्या काळात मी वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमधून गेले. सुरूवातीचा धक्का, त्यानंतरचा हताशपणा, नंतरचा सुन्नपणा आणि भीती, हळूहळू आजाराचा अर्थबोध, ट्रीटमेंट घेतानाचे अनुभव हे सगळं माझ्या एरवीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारं होतं. कॅन्सर हा शब्दच तुम्हाला हादरवून टाकतो. या आजाराची अनिश्चितता भेदरवणारी असते. आपल्या रोजच्या आयुष्याकडे, नातेसंबंधांकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. काही नात्यांचं महत्त्व तर उमगतंच पण काही नात्यांमधला फोलपणाही तितक्याच तीव्रतेनं जाणवतो.

या दोन महिन्यांच्या काळात मी काही टिपणं केली. ही टिपणं अर्थातच माझ्या त्या-त्या वेळच्या अनुभवांवर आणि मनात चाललेल्या गोंधळावर आधारित आहेत. ती मी आजपासून पुढचे काही दिवस शेअर करणार आहे. आजाराच्या स्टेजेस, त्यावरचे उपचार यापेक्षाही माणसाचं म्हणजे अर्थातच माझं आणि या आजाराला सामो-या जाणा-या व्यक्तींचं मन कशातून जातं हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे.

आयुष्य हे अनिश्चित आहे हे मला माहीतच आहे. पुढे काय होणार आहे ते मला माहीत नाही तितकंच माझ्या डॉक्टरांनाही माहीत नाही. पण आज मी धडधाकट आहे हे नक्की.

१.
इंग्रजीत एक म्हण आहे – जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हा जे घडतं ते म्हणजे आयुष्य. याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं.
नोव्हेंबर संपत आला होता. नुकतंच साड्यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं. दिवाळी अंकही प्रकाशित झाला होता. त्या गडबडीतून मोकळी झाले होते. आता काही दिवस काहीच करायचं नाही, फक्त आराम करायचा असं मनोमन ठरवलं होतं. नोव्हेंबरच्या शेवटी औरंगाबादला जाणार होते. कलापिनीचं गाणं होतंच शिवाय २ दिवस आईबाबांबरोबर वेळ घालवावा असंही वाटत होतं. डिसेंबरच्या १५ तारखेला निरंजनला गोव्यात एक पुरस्कार मिळणार होता. त्यानिमित्तानं आम्ही दोघे ४ दिवस गोव्यात राहाणार होतो. तिकिटं काढलेली होती. १५ ते २१ जानेवारी काही मैत्रिणींबरोबर आसाम आणि मेघालयला जायचं ठरलं होतं. फ्लाईट तिकिटंही बुक करून झाली होती. एकूण फक्त आरामाचा मूड होता.

२४ ला औरंगाबादला जाणार होते. २३ तारखेला डाव्या ब्रेस्टमध्ये एक लहानशी गाठ लागली. गाठ म्हणावी की नाही इतकी लहान. दोघी मुलींना दाखवली, त्यांना काही ती लागली नाही. आपल्याच मनाचे खेळ आहेत असं म्हणून औरंगाबादला जाऊन आले. आल्यावर ते काही मनातून जात नव्हतं. इतर तपासण्याही करायच्या होत्या म्हणून गायनाकॉलॉजिस्टकडे गेले. त्यांनाही ती लागली नाही. घरी आल्यावर निरंजन आणि मुली म्हणाल्या की गायनाकॉलॉजिस्टनंही सांगितलं ना की काही नाही, मग आता मनातून काढून टाक.

मी मनातून तो विचार झटकून काढायचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण मनावर विचित्र असं मळभ आलं होतं. कशातच आनंद वाटत नव्हता. हे नॉर्मल नाहीये असं मन परत परत सांगत होतं. शेवटी एक दिवस न राहवून माझ्या सासुबाईंची ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी करणा-या डॉक्टरांना मेसेज केला. त्यांनी संध्याकाळी भेटायला यायला सांगितलं. संध्याकाळी त्यांच्याकडे गेले, ते म्हणाले की तुझ्या मनाचे खेळ नाहीयेत, लहानसं काहीतरी आहे, तपासणी तर करायलाच हवी.

दुस-या दिवशी डिसेंबरच्या अवकाळी धो-धो पावसात मॅमोग्राफी करायला गेलो. त्या डॉक्टरबाईंनी व्यवस्थित मॅमो केलीच शिवाय सोनोग्राफीही केली. त्या मला म्हणाल्या की अगदी लहान गाठ आहे पण ती बरी नाहीये. यू आर लकी! ताबडतोब काढून टाका. मी त्यांना विचारलं की मॅलिग्नंट आहे का? त्या हो म्हणाल्या.

त्यांनी जे सांगितलं त्याचा अर्थबोध व्हायला काही वेळ जावा लागला. त्या नेमकं काय म्हणाल्या ते क्षणभर आठवेचना. कॅन्सर झालेला असं कळतं? मी, निरंजन आणि माझी बहीण भक्ती असे तिघे गेलो होतो. काहीही न बोलता घरी परत आलो. कसंतरी जेवले.

संध्याकाळी परत डॉक्टरांकडे गेले. रिपोर्ट बघून ते म्हणाले की सर्जरी करावीच लागेलच. जो रिपोर्ट आहे त्यानुसार अशा गाठींमधल्या १० पैकी ९ गाठी कॅन्सरच्याच असतात. त्यांना मी म्हटलं की कधी करूया सर्जरी? ते म्हणाले की घाई नाहीये, आठवड्यानं केली तरी चालेल. मी त्यांना म्हटलं की, मला अजिबात थांबायचं नाहीये. तुम्ही उद्या म्हणालात तर मला उद्या चालणार आहे. शेवटी ऑपरेशनच्या आधीच्या टेस्ट्स करण्यासाठी आणि इन्शुरन्सच्या कामासाठी २ दिवस जातील हे गृहीत धरून दोन दिवसांनंतर सर्जरी करायची ठरली. तशी शुक्रवारी सर्जरी झाली. शनिवारी मी घरीही
आले.

काल माझ्या सर्जरीला एक महिना झाला. बायॉप्सी रिपोर्टप्रमाणे मला फक्त रेडिएशन घ्यायचं आहे. सर्जरीच्या चौथ्या दिवसापासून मी खाली उतरायला लागले. आठव्या दिवसापासून वॉक घ्यायला लागले. आता मी रोज ५-६ किलोमीटर चालते. व्यवस्थित खाते. बाहेर जाते. घरातली सगळी कामं करते. पुढे काय होईल ते आज मला माहीत नाहीये. किंबहुना ते कुणालाच माहीत नसतं.

मी हे का लिहितेय? माझा धाडसीपणा सांगण्यासाठी? लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी? तर नाही. हे लिहिण्यामागे माझा एकमेव उद्देश हा आहे की कॅन्सर कुणालाही होऊ शकतो. जी गोष्ट झाली आहे ती आपण बदलू शकत नाही. पण त्याला कसं सामोरं जाता येईल याचा विचार तर आपण नक्कीच करू शकतो. मी इथे धैर्यानं सामोरं जा असं म्हणणार नाहीये. कारण हे धैर्य गोळा करणं फार कठीण आहे. पण मी असं नक्की सांगेन खुल्या मनानं सामोरं जा. त्याच्या उच्चाटनासाठी जे काही करणं शक्य आहे ते करा. या आजारात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो उपचारांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन.

#हॉस्पिटलडायरी

२.

सर्जरी ठरली. मध्ये दोन दिवस होते आणि ऑपरेशनच्या आधीच्या सगळ्या टेस्ट्स करायच्या होत्या. चाळीशीनंतर दरवर्षी रक्तातली साखर आणि हिमोग्लोबीन तपासण्याच्या टेस्ट्स सोडल्या तर इतर तपासण्या करायची वेळ आली नव्हती. गेल्या २५ वर्षांत मला ताप आलाय आणि मी २ दिवस झोपलेय असं मला आठवत नव्हतं.

तशी मी ब-यापैकी हेल्थ कॉन्शस आहे. त्यामुळे नियमितपणे चालणं, खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी हे तर नेहमीच करत होते. ज्या दिवशी मला कॅन्सर असल्याचं कळालं त्यादिवशीही सकाळी मी ८ किलोमीटर चालून आले होते. त्याआधी दोन महिने पंचेचाळीशी ओलांडलीय हे लक्षात घेऊन फिटनेस वाढवण्यासाठी रोज ८-१० किलोमीटर चालत होते. रोज ३-४ फळं खाणं, वेळेवर आणि व्यवस्थित जेवणं हे सगळं तर माझ्या जीवनशैलीचाच भाग होतं आणि आहे.

तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मला तपासण्या करायला जायचं हे फार विचित्र वाटत होतं. ऑपरेशनला आवश्यक म्हणून इसीजी आणि 2D Echo केलं, सगळ्या ब्लडटेस्ट्स केल्या, सोनोग्राफी झाली. मी २० वर्षांची असताना माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं, त्यानंतर २ सिझेरियन्स. पण हे सोडलं तर कधी दवाखान्यात राहण्याचा प्रश्न आला नव्हता. आणि आता पुढे काय मांडून ठेवलंय हा विचार पिच्छा सोडत नव्हता.

तुमचा डॉक्टर तुमच्याबरोबर असणं फार महत्त्वाचं असतं. सुदैवानं माझे डॉक्टर सुदेश फणसे हे ऑपरेशनच्या आधीपासून माझ्याबरोबर होते. रिकव्हरी रूममध्ये ठेवलं होतं तेव्हापासून ते माझ्याशी बोलत होते. ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत, हातात हात घेऊन माझ्याबरोबर आले. सर्जरी झाल्यानंतर शुद्धीवर आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा समोर दिसले तेही डॉक्टर फणसेच. त्यामुळे मी निश्चिंत होते. मला सर्जरीची कधीच भीती वाटत नाही. आपल्याला एकदा भूल दिल्यावर काय होतंय ते आपल्याला कळत नाही ही फार उत्तम गोष्ट असते. त्यामुळे त्याचा विचारच करायची गरज नसते.

सर्जरी झाल्यावर दुस-या दिवशी सकाळी घरी आले. नंतर मात्र हळूहळू आपल्याला नेमकं काय झालंय याची जाणीव व्हायला लागली. ऑपरेशन झाल्याचा एक रिलिफ असतो तसा तो मिळाला होता. पण घरी आल्यावर एकटी असताना अचानक इमोशनल आऊटबर्स्ट व्हायला लागले. रडू यायला लागलं. असहाय, हताश वाटायला लागलं.

खरं सांगायचं तर फार काही शारीरिक त्रास नव्हता. घरात फिरत होते. चांगली भूकही लागत होती. घरातले सगळे सतत बरोबर होते, काळजी घेत होते, माझं मन रमवायचा प्रयत्न करत होते. पण मला सगळं काही अनिश्चित आहे असं वाटत होतं. अस्वस्थ वाटत होतं. काय करावं ते सुचत नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. गाणी ऐकाविशी वाटत नव्हती, टीव्ही बघावासा वाटत नव्हता, कुणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. मी सुन्न झाले होते.

एक सांगायला हवं की माझ्या मनात Why me? हा प्रश्न कधीच आला नाही. कारण कॅन्सर कुणालाही होऊ शकतो हे मला माहीत होतं. इतक्या ओळखीच्या लोकांना झालेला माहीत होता की आपण कुणी वेगळे नाही याचीही मला जाणीव होती. मग असं का होत होतं?

डोळे मिटले की परत तेच दिसायचं. मी दवाखान्यात आहे आणि डॉक्टर काहीतरी सांगताहेत. झोपेतही तेच दिसायचं. गाढ झोप लागायची नाही. लागलीच तर दचकून जाग यायची. शेवटी ठरवलं की जे काही विचार मनात येताहेत ते येऊ दे. असा महिना गेला. सारखं इमोशनल होणं, तोचतोच विचार करणं यानं मन शिणून गेलं.

पण आतमध्ये हे जरी होत असलं तरी मी बाहेर जात होते. लोकांना भेटत होते. रोज वॉकला जात होतेच. घरातली कामं करत होते. स्वयंपाक करत होते. लिहावंसं वाटत नव्हतं तरी नेटानं ब्लॉग लिहीत होते. माझा आजार कळण्याच्या आदल्या आठवड्यात संक्रांतीसाठीच्या साड्या डिझाइन केल्या होत्या. त्या तयार होऊन आल्या. मी, सुहिता आणि चिन्मयीनं त्या नेसून फोटो काढले. हे फोटो सेशन आम्ही सर्जरीच्या आठव्या दिवशी केलं. कारण हे केलं नाही तर आपण लवकर बाहेर पडणारच नाही याची जाणीव होती.

मग मनात विचार यायचा की आता या क्षणी आपल्याला काही होत नाहीये ना, आपण ठणठणीत आहोत ना? मग आता काळजी करून काय होणार आहे? पण म्हणतात ना की अनेकदा कळत असतं पण वळत नसतं.
खरं सांगायचं तर माणसाला मरणाची भीती वाटत नसते. पण त्या क्षणापर्यंत पोचताना काही त्रास होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण त्याला घाबरत असतो. आणि दुर्दैवानं ते आपल्या हातात नसतं. कॅन्सरमध्ये सगळ्यात जास्त भीती त्याची असते.

मला कळल्यावर आधी माझे जे जवळचे, ओळखीचे लोक कॅन्सरनं गेले ते डोळ्यासमोर यायला लागले. त्यांच्या यातना, त्यांचं दुःख दुरून बघणा-या माणसासाठीसुद्धा फार अवघड होतं. दोन वर्षांपूर्वी माझी मावसबहीण कॅन्सरनं गेली. त्याच काळात आमच्या कौटुंबिक परिवारातली माझ्याच वयाची एकजण गेली. त्यावेळीच मी हादरून गेले होते.

दुस-या बाजूला ब्रेस्ट कॅन्सरमधून ब-या झालेल्या अनेक मैत्रिणी डोळ्यासमोर दिसत होत्या. त्या अगदी छान आहेत आणि पूर्वीसारखंच आयुष्य जगताहेत हेही माझ्यासमोर होतं. आपण नेमके कुठे असणार आहोत असं सारखं मनात येत होतं. म्हणतात ना की १०० सकारात्मक उदाहरणं दिसत असली तरी १० वाईट उदाहरणंच सतत दिसत राहतात. हे तसंच होतं. असे दिवस जात होते.

#हॉस्पिटलडायरी

३.

दहा वर्षांपूर्वी सगळ्यात पहिल्यांदा मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला गेले होते. मला आठवतंय, आल्यावर मी दोन दिवस अतिशय अस्वस्थ होते. एका जागी इतके कॅन्सर पेशंट्स, तेही देशभरातून आलेले. काही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतले. सगळं बघून हादरून गेले होते. नंतर वेगवेगळ्या लोकांबरोबर टाटाला जाण्याची वेळ अनेकदा आली आणि हळूहळू त्या हॉस्पिटलचं काय महत्त्व आहे हे उमजत गेलं.

देशभरातून टाटाला कॅन्सर पेशंट्स येतात. तिथला सगळा कर्मचारीवर्ग अतिशय संयमानं सगळं हाताळतो. पेशंट्सना जास्तीत जास्त कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करतो. पेशंट्सशी प्रेमानं बोलणं फार महत्त्वाचं आहे हे इथल्या स्टाफला माहीत आहे. इथे प्रचंड प्रमाणात लहान मुलंही पेशंट्स म्हणून येत असतात. त्यांनाही हे कर्मचारी फार प्रेमानं हाताळतात. हे सोपं नाहीये. इतका प्रचंड लोड असलेल्या हॉस्पिटलचं काम खूप सहज सुरू असतं. त्यात फारशा अडचणी येत नाहीत.

टाटा हॉस्पिटलचं नाव घेतल्यावर डॉक्टर राजेंद्र बडवेंचा उल्लेख अपरिहार्य आहे. डॉक्टर बडवे सध्या टाटाचे डायरेक्टर आहेत. ब्रेस्ट कॅन्सर उपचार क्षेत्रात आज डॉक्टर बडव्यांचं नाव देशात अग्रक्रमावर आहे. एका बिनाइन आजारासंदर्भात मी त्यांना गेली दहा वर्षं भेटते आहे. कधीही त्यांच्या चेह-यावर राग, नाराजी, संताप बघितलेला नाही. रोज इतक्या पेशंट्स त्यांना भेटत असतात पण प्रत्येकीशी तितक्याच प्रेमानं, आपुलकीनं बोलणं ते करतात. मुख्य म्हणजे ते सहज असतं त्यात कुठलाही आव नसतो.

मी डॉक्टर फणसेंना दाखवायला गेले तेव्हा पुढे इतकं काही होणार आहे याची कल्पनाच केली नव्हती. गाठ आहे ती दाखवली पाहिजे इतकाच विचार मनात होता. पण जेव्हा तो कॅन्सर आहे यावर शिक्कामोर्तब झालं तेव्हा गांगरून गेले, काहीच सुचेनासं झालं. त्यावेळी डॉक्टर बडव्यांनाही दाखवावं हा विचारच मनात आला नाही. शिवाय डॉक्टर फणसेंनी दोन वर्षांपूर्वी माझ्या सासुबाईंची ब्रेस्ट कॅन्सरचीच सर्जरी केली होती. त्यामुळे त्यांनी निदान सांगितल्याबरोबर लगेचच सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

माझी एक मैत्रीण आणि मी दरवर्षी टाटाला जात होतो. तशी ती यावर्षी गेली आणि तिनं बडवेंना माझ्या सर्जरीबद्दल सांगितलं. त्यांचा मोठेपणा असा की त्यांनी मला लगेचच रिपोर्ट पाठवायला सांगितले. मी त्यांच्याकडे ऑपरेशन केलं नाही याबद्दल त्यांनी कसलाही राग मानला नाही. मी रिपोर्ट पाठवल्यावर त्यांना काय वाटतंय ते त्यांनी सांगितलं, एकदा भेटायला सांगितलं. मी भेटल्यावर मला रिपोर्ट चांगले आहेत हेही सांगितलं आणि पुढे काय काय करायचं ते सांगितलं, काय काळजी घ्यायची तेही सांगितलं. मुख्य म्हणजे जेव्हा मी त्यांना माझी anxiety कमी होत नाहीये असं सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, This is immensely curable disease.

मी बडव्यांना भेटायला जाणार आहे हे मी माझ्या डॉक्टरांना सांगितलं आणि हेही सांगितलं की हे सेकंड ओपिनियन घेणं नसून, मी त्यांना गेली दहा वर्षं भेटते आहे तेव्हा त्यांना सांगायला हवं. त्यावर माझे डॉक्टर शांतपणे म्हणाले, अगं बिनधास्त जा, he is my friend. ते काय म्हणतात तेही बघ. त्यांनी जर ट्रीटमेंट बदलली तर आपण ती देऊ. कसलाही इगो इश्यू न करता डॉक्टर फणसेंनी शांतपणे माझं ऐकून घेतलं. या दोन्ही डॉक्टरांमुळे माझ्या मनावरचा ताण एकदम हलका झाला.

लाइन ऑफ ट्रीटमेंट ठरली होतीच. कॅन्सर लोकल असल्यानं फक्त रेडिएशन घ्यायचं होतं. नंतर प्रिकॉशनरी हिस्टरेक्टोमी करायची, त्याची घाई नव्हती. रेडिएशनसाठी मला सगळ्यात जवळचं हॉस्पिटल होतं हिंदुजा. तिथे डॉक्टर कन्नन हे रेडिएशन ऑन्कॉलॉजीचे हेड आहेत. त्यांना भेटलो. ते इतके गोड आहेत की बस. त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं. रेडिएशनचा काहीही त्रास होणार नाही हेही सांगितलं. फक्त २१ दिवस रोज इथे यावं लागेल आणि निदान तासभर इथे जाईल कारण बरेच पेशंट असतात, हाच एकमेव त्रास आहे असंही ते हसत हसत म्हणाले. त्यांची सगळी टीमच अतिशय संवेदनशील होती.

रेडिएशनला जायला लागले तेव्हा आजुबाजूला जे इतर पेशंट्स बघत होते, त्यांचा त्रास बघितल्यावर आपल्याला फार काहीच झालं नाहीये असं वाटायला लागलं. १६-१६ किमो घेतलेल्या बायका बघितल्या. त्यांचं खचलेलं मनोधैर्य बघितलं, काहीजणी तरीही किती हस-या चेह-यानं सगळं सहन करताहेत हेही बघितलं. हे सगळं सोपं नाही याचीही जाणीव झाली.
मी हिंदुजाला जाताना बरोबर वाचायला पुस्तक घेऊन जायचे. एकदा रिसेप्शनला रिपोर्ट केलं की आपलं नाव पुकारेपर्यंत शांतपणे वाचत बसायचं. तरी आजूबाजूला लक्ष जायचंच. येणा-या पुरूष पेशंटपैकी बहुतांश पेशंट हे तंबाखूमुळे झालेल्या तोंडाच्या कॅन्सरमुळे येत होते. बायकांमध्ये सगळ्यात जास्त अर्थातच ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट होत्या. क्वचित कधीतरी एखादं लहान मूल पण असायचं.

माणूस कुठल्याही परिस्थितीत असला तरी त्याचा मूळ स्वभाव बदलत नाही. एक माणूस तोंडाच्या रेडिएशनसाठी येत होता. त्याला बोलता येत नव्हतं. तो यायचा जो लवाजमा बरोबर घेऊन पुढेमागे एक एक माणूस, एकाच्या हातात टिश्यू पेपरचा बॉक्स, यानं खूण केली त्याच्या हातात लगेचच मिळणार. तिथे समोर बारीक आवाजात टीव्ही सुरू असायचा. एकदा या माणसाच्या मागे बसलेल्या माणसानं चॅनल बदललं. या माणसाला बोलता येत नव्हतं तरी तो गुरगुरायला लागला. माझ्या मनात आलं, आपण कुठे आहोत, कशासाठी आलो आहोत, आजुबाजूला कशा परिस्थितीतले लोक आहेत याची जाणीव कशी होत नाही? शिवाय त्या वेटिंग लाऊंजमध्ये पेशंटसाठी असलेल्या खुर्च्या आपल्या लवाजम्यानं कसे काय अडवतात लोक?

त्याउलट माझ्यानंतर एक तरूण मुलगा असायचा. साधारण तीस ते पस्तीसच्या मधला. अतिशय हेल्दी दिसणारा. टीशर्ट-शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स शूज घालून यायचा. त्याला कशाचा कॅन्सर होता हे मला कळलं नाही. शांतपणे बसून असायचा.

कॅन्सर हा असा आजार आहे की जो तुम्हाला हेलपटावून टाकतो. उपचार करणा-यांच्या मनात पेशंटबद्दल करूणा, प्रेम, सहानुभूती (खरोखर सह-अनुभूती) असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे रूग्णाचा आत्मविश्वास टिकायला मदत होते. सुदैवानं मला सगळे डॉक्टर आणि इतर तंत्रज्ञ फार चांगले मिळाले.

४.

एखाद्याला एखादा गंभीर आजार झाला आहे हे कळल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया हा अभ्यासाचा विषय आहे असं मला वाटतं. खरंच मी हे चेष्टेनं म्हणत नाहीये, पण आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे आत्मसात करणं हे एक कौशल्य आहे आणि दुर्दैवानं ते फार कमी लोकांकडे असतं. मुळातच आपल्याकडे लोकांना दुस-यांच्या गोष्टींमध्ये नको इतकं नाक खुपसायची सवय असते. त्यात अशावेळी काय बोलावं याचा पोच फार कमी लोकांकडे असतो.

तुम्हाला कॅन्सर झालाय म्हटल्यावर, अरेरे, आता हिचे किंवा ह्याचे दिवस भरले ही भावना अनेकांच्या डोळ्यात वाचता येते. किंवा अरे इतका गंभीर आजार होऊनही ही इतकी नॉर्मल कशी असंही काहीजणांच्या डोळ्यात असतं. फक्त रेडिएशनच घ्यावं लागलं म्हटल्यावर, हिचं इतक्यावरच कसं निभावलं असाही एक भाव मी या काळात बघितला. खरोखर मजेशीर प्रतिक्रिया असतात.

खरी काळजी आणि भीतीयुक्त कुतूहल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोकांना खरोखर काळजी वाटत असते आणि ती ते आपल्या वागण्यातून व्यक्तही करतात. पण अनेक लोकांना भीतीयुक्त कुतूहल असतं. विशेषतः कॅन्सरबद्दल तर फारच. म्हणजे आजार कसा कळाला ते तुम्ही घेत असलेल्या उपचारांचा नेमका काय त्रास होतो आहे हे जाणून घेण्यात त्यांना फार रस असतो. काळजीचा भाग समजू शकतो पण विचित्र कुतूहलाचा त्रास होतो. या काळात अशा काही लोकांना मीच समजावलं की मी कशी बरी आहे, किंवा आता उपचार खूप चांगले आहेत, किंवा आता हे खूप कॉमन आहे वगैरे. म्हणजे जे मला कुणीतरी सांगायला हवं होतं ते मीच सांगून त्यांचं सांत्वन करत होते!

काहीजण भेटायला आहे की आपण काय बोलतो आहोत याचं जराही भान न ठेवता आपल्या जवळचं कुणीतरी अगदी याच आजारानं कसं गेलं हे सांगायचे. एकदा नव्हे अनेकदा. तेही सर्जरी करून घरी आल्यावरच्या पहिल्या काही दिवसांत. प्रत्येकाचा आजार वेगळा, प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी, प्रत्येकाचा उपचार वेगळा, प्रत्येकाची सहनशक्ती वेगळी हे कळण्याइतके लोक आता नक्कीच सुशिक्षित असतात. असे काही नमुने मलाही भेटले. पण अशांकडे दुर्लक्ष करायचं आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा असं मी मनोमन ठरवलं होतं. पण नाही म्हटलं तरी असे लोक ज्या थंडपणे बोलतात ते त्रासदायक होतंच. कारण आपणही मनाच्या नाजूक अवस्थेत असतो. नाही नाही ते विचार आपल्याही मनात येत असतात आणि कॅन्सरनं गेलेले लोक आपल्यालाही आठवत असतातच.

आपल्या आजाराचं खरं गांभीर्य तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर कळतं. एका वॉर्डमध्ये एकाच आजाराचे इतके पेशंट्स हे हादरवून टाकणारं असतं. प्रत्येक पेशंट वेगळा, त्याच्या आजाराचं गांभीर्यही वेगळं हे सगळं तत्वतः मान्य असलं तरी ते पचवणं कठीण जातं. अनुराधा सोवनी नावाच्या पुण्याच्या कॅन्सर तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी बहुधा साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता. त्याचं पहिलं वाक्य होतं – कॅन्सर हा २०० रोगांचा समूह आहे. प्रत्येकाचा आजार वेगळा. हे वाक्य लक्षात ठेवून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न मी या काळात केला.

पण त्या वातावरणाला सरावल्यावर आपण किती नशीबवान आहोत हे जाणवायला लागतं. माझा आजार प्राथमिक अवस्थेतला होता. त्यामुळे माझी सर्जरी पण लहान झाली. एकदा मी हिंदुजाला माझ्या टर्नची वाट पाहात होते. माझ्या मागे एक बाई बसली होती. बाईनं डोक्याला स्कार्फ बांधला होता त्यावरून तिनं किमो घेतलेली आहे हे समजत होतं. बराच वेळ मी तिचं आणि तिच्या बहिणीचं बोलणं ऐकत होते. तिचं त्या दिवशी रेडिएशन प्लॅनिंग होतं (प्रत्यक्ष रेडिएशनच्या आधीची प्रोसिजर) आणि तिला त्याची प्रचंड भीती वाटत होती. शेवटी मला राहावलं नाही. मी मागे वळून तिला या प्रोसिजरचा काहीही त्रास होत नाही सांगितलं. तिनं परत परत माझे आभार मानले.

त्या दिवशी निरंजनला बरोबर यायला जमणार नव्हतं, म्हणून मी एकटीच गेले होते. त्यावर ती मला म्हणाली की तू किती शूर आहेस, मला एकटीला असं कधी जमेल, मला सगळ्याची खूप भीती वाटते. तेव्हा मी तिला म्हटलं की तू ज्यातून गेली आहेस त्यात असं वाटणं साहजिकच आहे. तिचा डावा ब्रेस्ट काढून टाकावा लागला होता. शिवाय तिनं सोळा किमो घेतल्या होत्या. (प्रत्येक बाईला संपूर्ण ब्रेस्ट काढून टाकावा लागतो असाही एक समज आहे. पण प्रत्यक्षात असं नसतं. तुमच्या रोगाच्या तीव्रतेवर ते अवलंबून असतं. डॉक्टर शक्यतो ब्रेस्ट वाचवायचा प्रयत्न करतात कारण त्यावर बाईचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं.)

मी असेही पेशंट बघितले की जितके पैसे आहेत तितकीच रेडिएशन सेशन्स त्यांनी घेतली. कारण त्यांना संपूर्ण ट्रीटमेंटचे पैसे परवडत नव्हते. हे बघितल्यावर वाटलं की आपण किती नशीबवान आहोत. मेडिक्लेम तर होताच पण तो नसला तरी सहज ट्रीटमेंट करता येईल अशी आपली परिस्थिती आहे याची जाणीव तीव्रतेनं झाली. एक पेशंट काका पालघरहून ट्रेननं येत. ट्रीटमेंट घेऊन परत जाणं किती जिकीरीचं होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. कारण ब्रेस्ट ट्रीटमेंटला फारसा त्रास होत नाही. पण इतर आजारातल्या रेडिएशनचा ब-याचदा त्रास होतो.

अशाही पेशंट बायका बघितल्या की ज्यांच्याबरोबर येणारे नवरे-मुलगे यांना त्यांच्याबद्दल फार काही प्रेम आहे असं जाणवलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण किती नशीबवान आहोत हे परत परत जाणवत राहीलं.

५.

कुठल्याही आजारात प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या आधाराची गरज असते. जसं की दवाखान्यात बरोबर यायला लागणारा आधार, घरात रोजचे व्यवहार करताना लागणारा आधार. पण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो मानसिक आधार. अवघड आजारांमध्ये माणूस उन्मळून गेलेला असतो. अशावेळी मानसिक आधाराची फार फार गरज असते. तो मिळाला नाही तर आपण सैरभैर होऊन जातो.

बायकांचं एक बरं असतं, त्या मोकळेपणानं एकमेकींशी बोलतात. मागे एकदा मी अभय बंग यांचा एक लेख वाचला होता, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, सार्वजनिक ठिकाणी बघा, दोन अनोळखी बायका भेटल्या तरी लगेचच तुम्ही कुठल्या-आम्ही कुठल्या करून बोलायला सुरूवात करतात आणि थोड्याच वेळात एकमेकींकडे मन मोकळं करायला लागतात. पुरूषांचं तसं होत नाही, ते एकतर पेपर समोर घेऊन वाचत राहातात नाहीतर गप्प बसून राहातात. माझ्या आजारात मला बायकांच्या या स्वभावाचा फार छान उपयोग झाला.

ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या आजुबाजूला कुणी ना कुणी हा आजार झालेलं सापडतंच. मी माझ्या मित्र परिवारातल्या ब्रेस्ट कॅन्सरला खंबीर राहून सामो-या गेलेल्या आणि आता संपूर्णपणे ब-या असलेल्या अनेक मैत्रिणींशी स्वतःहून संपर्क साधला आणि त्यांच्याशी बोलले. त्यांनी या आजाराचा सामना (विशेषतः मानसिक दृष्टीनं) कसा केला ते जाणून घेतलं आणि त्यातून मला माझं मानसिक बळ वाढायला मदत झाली.

जे लोक फालतू सल्ले देणारे असतात किंवा नको असलेलं बोलणारे असतात अशांना मी दूर ठेवलं. जसं की, कसं झालं गं तुला हे! तू तर किती हेल्थ कॉन्शस आहेस! कसं झालं आणि का झालं या प्रश्नाचं उत्तर देताना माझे डॉक्टर मला म्हणाले की याचं उत्तर मलाही माहीत नाहीये. 😊 मी हेल्थ कॉन्शस असण्याचा फायदा हा की माझ्या शरीरानं दिलेल्या सिग्नलकडे मी दुर्लक्ष केलं नाही, माझं मन मला जे सांगत होतं ते मी ऐकलं. दुसरं म्हणजे ऑपरेशननंतर आठव्या दिवशी मी ४-५ किलोमीटर चालायला लागले. हे केवळ माझी इतर तब्येत चांगली होती म्हणूनच शक्य झालं.

कॅन्सरमध्ये बायकांची सपोर्ट चेन असते. जसं मी माझ्या वेगवेगळ्या मैत्रिणींकडून मानसिक आधार मिळवला तसा त्यांनीही त्यांच्या आजारात दुस-या मैत्रिणींकडून मिळवला होता. एका मैत्रिणीनं सांगितलं की, तिनं कधीच लहान केस ठेवले नव्हते. पण किमोनंतर तिचे केस गेल्यावर नंतर हळूहळू केस यायला लागले तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी संकोचल्यासारखं व्हायचं. एकदा ती परदेशी जायला निघाली असताना तिनं तिच्या ब्रेस्ट कॅन्सरमधून ब-या झालेल्या मैत्रिणीला फोन केला आणि माझे केस परत कधी येतील असं झालंय, अशा केसांची सवय नाही असं तिला सांगितलं. तर ती मैत्रीण तिला म्हणाली, हे बघ, तू कधी स्वतःहून बॉयकट करायला गेली असतीस का? तर तू आता वेगळी हेअरस्टाइल केलीय असं समज. या माझ्या मैत्रिणीला, तिच्या या मैत्रिणीनं खूप मानसिक आधार दिला. तिला तिच्या मैत्रिणीनं मानसिक आधार दिला.

एका मैत्रिणीचा ब्रेस्ट कॅन्सर तर खूप अडव्हान्स स्टेजला कळाला. तिला १६ किमो घ्यायला लागल्या शिवाय रेडिएशनही. तिला अजूनही सतत वेगवेगळ्या टेस्ट्स करायला लागतात. पण तिच्याशी बोलल्यावर तिचा पॉझिटिव्ह attitude बघून मी थक्क झाले. दोन लहान मुलं, स्वतःचा व्यवसाय आणि घर हे सगळं सांभाळून तिनं या आजाराचा सामना केला. या सगळ्यात तिच्या नव-यानं तिला फार मोलाची साथ दिली. किमोनं तिचे केस गेले तर त्यानंही तिचे केस परत येईपर्यंत आपले केस काढून टाकले होते. आता ती कौन्सिलर म्हणून काम करते. तिला जेव्हा मी इनबॉक्समध्ये मेसेज केला तेव्हा तिनं स्वतःहून फोन केला आणि ती भरभरून माझ्याशी बोलली. माझी तिची ओळख फक्त फेसबुकवरची. मी तिचे फेसबुकवर फोटो बघितले होते त्यावरून अंदाज करून मी तिला मेसेज केला होता.

माझी एक कॉलनीतली मैत्रीण पाच वर्षांपूर्वी यातून गेली आहे. तिच्या आजाराच्या काळात तिला मी जवळून बघितलं होतं. तिचा शांतपणा आणि ट्रीटमेंट घेतानाचा तिचा पॉझिटिव्ह Attitude मला खूप स्तिमित करतो. ती आज उत्तम आहे. मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय म्हटल्यावर तिनं मला इतका मानसिक आधार दिला की मी त्याचं वर्णनच करू शकत नाही.

या प्रत्येकीशी बोलताना मी अनेकदा रडलेही. पण त्यानंतर त्यांच्याशी जे बोलले त्यातून मला माझं मन खंबीर करायला मदत झाली.

थोडक्यात काय तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ही सपोर्ट चेन मला फार महत्त्वाची वाटते. प्रत्येकीच्या आजाराचं गांभीर्य वेगळं, प्रकार वेगळा असं असलं तरी त्याला सामोरं जातानाची भावना एकच, की मला बरं व्हायचं आहे. मला वाटतं यामागे बायकांचा कणखरपणा असावा. कुठलंही घर हे बाईच्या आधारावर उभं असतं. त्या घराला तिच्यामुळे घरपण असतं. ती सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते. आणि या सगळ्याची तिला आतून जाणीव असते, नव्हे तिला ती आपली जबाबदारी वाटते. त्यामुळे आजाराचा बाऊ न करता ती खमकेपणानं सगळ्या जबाबदा-या पार पाडत राहाते.

कॅन्सरला सामोरं जाताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा Attitude. तो कसा आहे यावर तुमचं well being अवलंबून असतं.

६.

मला कॅन्सर झाला आहे हे मला कुणापासूनच लपवायचं नव्हतं. कारण त्यात न सांगण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. किंबहुना आपण हे सांगितल्यावर मदतीचे अनेक हात पुढे येतात. तसं मी माझ्या जवळच्या आप्तमित्र परिवारातल्या काही लोकांना मेसेज करून सांगितलं.

अशावेळी तुमच्याबद्दल नक्की कुणाला प्रेम, आपुलकी आहे ते कळतं. लहानपणापासून तुम्ही ज्यांच्याबरोबर वाढलात असे लोकही किती अलिप्तपणे वागतात आणि काही वर्षांपूर्वी ओळख झालेले लोक किती जीव टाकतात याचा अनुभव मी या काळात घेतला.

या सगळ्या काळात निरंजन माझ्याबरोबर सावलीसारखा होता. सगळ्या तपासण्या, ऑपरेशन, रेडिएशन या सगळ्यात तो माझ्याबरोबर होता. सर्जरीच्या आदल्या रात्री तोच माझ्याबरोबर दवाखान्यात थांबला. त्यानं महिनाभर त्याचे सगळे कार्यक्रम थांबवून फक्त मला वेळ दिला. माझं मन रमवण्याचा प्रयत्न केला. ४ डिसेंबर ते ८ फेब्रुवारी या दोन महिन्यांत मी शनिवार-रविवार वगळता जवळपास रोज दवाखान्यात जात होते. त्यातल्या बहुतांश वेळेला निरंजन माझ्याबरोबर होता.

माझ्या बहिणी तर माझ्याच आहेत. त्या दोघींनी या काळात माझी जीवापाड काळजी घेतली. आपापली घरं सोडून त्या पूर्णवेळ माझ्या तैनातीत होत्या. फणसेंना पहिल्यांदा दाखवल्यावर मी भक्तीला जेव्हा फोन केला, तेव्हा ती घरचं सगळं आटोपून रात्री ११ वाजता माझ्या घरी आली. दुस-या दिवशी माझ्याबरोबर आणि निरंजनबरोबर तपासण्यांना आली. संध्याकाळी डॉक्टरांना भेटून सगळं ठरल्यावरच घरी गेली. त्यानंतरही रोज येतच होती. मेघन ऑपरेशनच्या आदल्या दिवशी औरंगाबादहून आली आणि त्यानंतर १० दिवस ती सतत माझ्याबरोबर होती. मला चांगलंचुंगलं खायला घालणं, मला एकटं न वाटू देणं हे ती करत होती. तिची पुढेही कितीही दिवस राहण्याची तयारी होती पण तशी गरजच नव्हती. या काळात आम्हा तिघा बहिणींचं नव्यानं बाँडिंग झालं.

राणी आणि रंजनानं घराचा सगळा ताबा घेतला. कधी नव्हे ते त्यांच्या घरच्या लग्नांसाठी त्या सुटी घेणार होत्या पण त्यांनी ती आपापसात बोलून adjust केली. माझ्यापर्यंत काहीही आणलं नाही. राणी तर रोज मला, ताई तुम्ही आधी ब-या व्हा असं म्हणत होती. रंजना गप्प बसून डोळ्यातून पाणी काढत होती. या दोघींनाही सावनीनं माझ्यासमोर रडायचं नाही म्हणून तंबी दिली होती.

सावनी-शर्वरी रॅशनल विचार करणा-या आहेत. त्यांनी सगळं वाचून, बघून मला शांत करण्याचा प्रयत्न केला. माझे आई-बाबा आले होते. ते इमोशनल होतील म्हणून भक्तीनं त्यांना तिच्या घरीच राहायला लावलं. माझ्या ८४ वर्षांच्या सासुबाई, ज्या स्वतः गेल्या १० वर्षांत ३ मोठ्या ऑपरेशन्समधून गेल्या आहेत, त्यांना माझ्याबरोबर येता येत नाही म्हणून खंत वाटत होती.

मेधाताई, शर्मिला, चिन्मयी, सुहिता, सायली मराठे, अपर्णा वेलणकर, गीतांजली या मैत्रिणींनी माझ्याभोवती जणू प्रेमाचं कडं केलं होतं. मला सतत धीर देणं आणि सकारात्मक बोलणं, मला भेटणं, बरोबर राहण्याची तयारी दाखवणं या सगळ्यामुळे मला फार फार धीर आला. माझ्या सर्जरीच्या दिवशी चिन्मयीचा पुण्यात कार्यक्रम होता. तर दुस-या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये जाता येईल म्हणून ती रात्री उशीरा परत आली. तोपर्यंत संध्याकाळी सुमीत आणि दीयानं दवाखान्यात येऊन माझ्याशी गप्पा मारल्या. दुस-या दिवशी सकाळीच सुहिता हजर झाली. त्यानंतर चिन्मयी आली. जराही वेळ मला कंटाळा येणार नाही याची सगळ्यांनी खबरदारी घेतली.

प्रसादनं रेडिएशनला बरोबर यायची तयारी दाखवली. उमेशनंही, माझं ऑफिस जवळच आहे, मी २ मिनिटांत हिंदुजाला येऊ शकतो हे सांगितलंच. शिवाय ऑफिसला जाताना मी तुला हिंदुजाला सोडू शकेन हेही सांगितलं. मीनाक्षी ही माझ्या सासुबाईंची लाडकी विद्यार्थिनी. ती स्वतःही ब्रेस्ट कॅन्सरमधून बरी झाली आहे, तिनंही रेडिएशनसाठी बरोबर यायची तयारी दाखवली. राजीव नाईकचं आताच रेडिएशन घेऊन संपलंय. त्यानं मला फोन केला – एक अनाहूत सल्ला देतोय सांगून खूप पाणी पी म्हणून सांगितलंच. शिवाय कॅन्सरमधून ब-या झालेल्या अनेकांची नावं सांगून, तू हे लक्षात ठेव म्हणाला. वर मी तुझ्याबरोबर रेडिएशनला येईन. आपण दोघं उबर घेऊन जात जाऊ. घरी वाचत बसतो तो तुझ्याबरोबर तिथे वाचत बसेन असं म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. ज्या माणसाचं रेडिएशन नुकतंच संपलंय त्यानं अशी तयारी दाखवणं ही किती मोठेपणाची गोष्ट आहे…

कॉलनीत माझा एक सिनियर मैत्रिणींचा ग्रुप आहे. त्यात वय वर्षं ७५ पासून माझ्या वयापर्यंतच्या मैत्रिणी आहेत. त्यातल्या काही मैत्रिणी रोज चौकशी करत होत्या. एक मैत्रीण या सगळ्यातून गेली आहे, ती तर सतत पाठीशी होती.

हे आभार प्रदर्शन नाहीये, पण कठीण प्रसंगात किती लोक आपलं सगळं काम सोडून तुमच्याबरोबर उभे राहतात हे अनुभवणं फार आश्वासक असतं. आणि त्यांचं ऋण व्यक्त करणं मला महत्त्वाचं वाटतं. एखाद्या दिवशी निरंजनला जमणार नसलं तर शर्वरी बरोबर आली. पण जर तीही नसेल तर प्रसाद, उमेश, मीनाक्षी, राजीव असं कुणालाही हक्कानं सांगू शकते हे मला आतून माहीत होतं.

त्याउलट काही लोकांना माहीत असूनही त्यांनी त्याबद्दल मौन पत्करणं हे फारच बोलकं होतं. कुठलीही व्यक्ती एखाद्या अवघड प्रसंगातून जात असेल तर तिला तू कशी आहेस किंवा तू कसा आहेस हे मनापासून विचारणं हे साधं सौजन्य आहे. पण हे साधं सौजन्यही अनेकांकडे नसतं याचा अनुभव मी या काळात घेतला. यातल्या काही लोकांसाठी मी जीव टाकलेला होता. असो. अशा लोकांना फार महत्त्व देण्याची गरज नसतेच. कारण तुमच्या प्रेमाच्या माणसांची संख्या कितीतरी जास्त असते. आणि अशावेळी या लोकांची हक्कानं मदत घ्यावी असं मला वाटतं. ती मी घेतली आणि मला त्यानं मानसिक बळ मिळालं.

७.

हॉस्पिटल डायरीचं आजचं हे शेवटचं पान. एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचा मी विसरूनच गेले. माझा आजार कळल्यावर मी एक निर्णय घेतला आणि त्याचं तंतोतंत पालन केलं. तो निर्णय म्हणजे मी कॅन्सरबद्दल काहीही गुगल करणार नाही. अनेकांनी मला तुझ्या आजाराची स्टेज कुठली वगैरे प्रश्न विचारले पण खरं सांगते मी एकदाही याबद्दल विचार केला नाही. माझ्या डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास ठेवला. बडव्यांनी मला सांगितलं की हा बरा होणारा आजार आहे. ते मी ऐकलं.

याचं कारण असं की, ब्रेस्ट कॅन्सर हा काही एकच आजार नाही. त्याचे अनेक प्रकार आहेत. सगळ्यांना होणारा सारखा नसतो. सगळ्यांची ट्रीटमेंटही सारखी नसते. त्यामुळे गुगल वापरून केवळ मनाचा गोंधळ करून घेणं आणि नंतर आपलं मनोधैर्य खच्ची करून घेणं हे मी केलं नाही. आणि मला त्याचा फायदाच झाला.

मला अनेकांनी कॅन्सरबद्दलचे लेख वाचायला पाठवले. त्यामागे त्यांचा उद्देश चांगलाच होता. पण मी ते वाचले नाहीत. आपल्या आजाराबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. पण ती आपल्या डॉक्टरांकडून मिळवावी या मताची मी आहे. आपल्या मनातल्या शंका डॉक्टरांना विचाराव्यात. गुगलवरून अर्धवट ज्ञान मिळवू नये.

माझ्या या आजारातून मी काय शिकले?

एकतर हा आजार मला का झाला असावा याचा विचार केला. जरी याचं ठाम उत्तर माहीत नसलं तरी मी विचार केला. घरी कुठल्याही प्रकारची हिस्टरी नाही. बाकी तब्येत उत्तम. डायबेटिस-ब्लडप्रेशर नाही. रोज नियमित व्यायाम, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खाणं असं सगळं असतानाही मला ब्रेस्ट कॅन्सर झाला. खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढलेला वापर, रासायनिक द्रव्यांचा वाढलेला वापर, शहरीकरण, प्रदूषण या सगळ्यांचा कॅन्सरचं प्रमाण वाढण्यात हात आहे असं म्हटलं जातं. हे घटक आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्यांचा विचार करण्यात काही अर्थ नाही.

स्ट्रेस हाही या आजाराला हातभार लावणारा मोठा घटक आहे. मला लहान लहान गोष्टींचा अति विचार करण्याची सवय आहे, जी मी माझ्या आजोबा-बाबांकडून घेतली आहे. घरी म्हटलं तर काहीच ताण नाही. निरंजन आणि मुलींशी माझं आणि माझ्याशी त्यांचं उत्तम पटतं. निरंजनच्या अँजिओप्लास्टीनंतर जाणवणारा ताणही गेल्या काही वर्षांत कमी झाला होता.

गेल्या दोन वर्षांत माझ्या जवळच्या काही माणसांनी असा काही इंगा दाखवला की मी त्यावर अति विचार करत बसले. मी माझ्या मनाला या काळात खूप खाल्लं. आता त्यामुळेच मला कॅन्सर झाला असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण हे घटकही नकळत हातभार लावत असतात.

तेव्हा धडा नंबर पहिला – आपलं कुटुंब आणि अगदी जवळची, प्रेमाची माणसं वगळता इतरांना महत्त्व द्यायचं नाही. अमुक माझ्याशी असं का वागला आणि तमुक माझ्याशी असं का वागला अशा फुटकळ गोष्टींचा विचार करायचा नाही हे मी माझ्या मनाशी पक्कं केलं. आणि मी त्यात काही अंशी यशस्वी होते आहे असं मला वाटतंय.

धडा दुसरा – लेट गो करायला शिकायचं हे मनोमन ठरवून टाकलं. लहान लहान गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत तर आयुष्यात काहीही मोठा फरक पडत नसतो त्यामुळे त्या सोडून द्यायच्या. भाजी अमुकच पद्धतीनं का झाली नाही किंवा आज कपडे नीट इस्त्री का झाले नाहीत यासारख्या गोष्टी फुटकळ आहेत. त्यानं आपल्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही.

धडा तिसरा – आजुबाजूला इतकी अनिश्चितता आहे की आपल्याला जे आवडतं किंवा आवडत नाही ते स्पष्टपणे सांगायला शिकायचं. जवळच्या माणसाची एखादी गोष्ट पटली नाही तर भिडस्तपणा न करता ती त्या माणसाला न दुखावता पण स्पष्टपणे सांगून टाकायची. त्याचबरोबर एखाद्या माणसाची एखादी गोष्ट आवडली तर हातचं न राखून ठेवता ते त्याला सांगून टाकायचं (अर्थात हे मी आधीपासूनच करते. पण आता अधिक प्रमाणात
करणार).

धडा चौथा – भरपूर चांगला प्रवास करायचा. जग सुंदर आहे, त्यामुळे शक्य तितकं जग बघायचं. लोकांना भेटायचं, सिनेमा-नाटकं बघायची. उत्तम वाचायचं-लिहायचं, आपल्या आवडीचं काम करायचं, आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर भरपूर वेळ घालवायचा.

मी मुळात हायपर आहे. मला पटकन राग येतो. तो जातोही लवकर हे खरं असलं तरी राग येतो. आजाराच्या काळात मला जाणवलेली गोष्ट म्हणजे मला राग येणं जवळपास बंद झालं आहे. मला हल्ली फारसा राग येत नाही. कारण अशा परिस्थितीत माझ्या मनात लगेच विचार येतो की आपल्याला राग यावा इतकी ही गोष्ट मोठी आहे का? आणि तो राग थंडावतो.

माझ्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते आज मला माहीत नाही. किंबहुना ते कुणालाच माहीत नसतं. पण तरीही येणारं आयुष्य शक्य तितकं शांतपणे, आनंदात घालवायचं हे मनोमन ठरवलेलं आहे. 😊

८.

मध्यमवर्गीय माणसाला भारतात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत असं म्हणायला हरकत नाही. परदेशांच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार स्वस्त आहेत, ब-यापैकी सहज उपलब्ध आहेत.
गेल्या तीन महिन्यांत माझं आजारपण आणि त्याआधी कुटुंबातली वेगवेगळी आजारपणं यामुळे मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रसंग आले. प्रत्येक हॉस्पिटलची स्वतःची अशी एक सिस्टिम असते आणि ती अनेकदा अतिशय मजेशीर आणि त्रासदायक ठरू शकते.

या सिस्टिममध्ये मी डॉक्टरांचा समावेश करत नाहीये. कारण आजतागायत ज्या-ज्या डॉक्टरांशी संबंध आला त्यातले एक वगळता (काकुच्या आजारपणाबद्दल मागे लिहिलं होतं त्यात त्यांचा उल्लेख होता) सर्व डॉक्टरांचा उत्तम अनुभव आहे. मुळात आमच्या साहित्य सहवासातच ६ उत्तम नावाजलेले, वेगवेगळ्या शाखांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही सगळं काही ठरवतो.
मुंबईतले डॉक्टर खरोखर खूप व्यग्र असतात. एक तर मुंबईतली अंतरं, वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या अटॅचमेंट्स आणि प्रोसिजर्स यामुळे डॉक्टर खूप कामात असतात. त्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनाशी त्यांचा काही संबंध नसतो. आणि निदान मुंबईत तरी हे मान्यच करायला हवं.

पण हॉस्पिटलच्या ज्या सिस्टिम असतात त्या अनेकदा अचंब्यानं तोंडात बोट घालायला लावणा-या असतात. मुंबईतलंच बोलायचं झालं तर सास-यांचं एक जसलोक-दुसरं लीलावती-तिसरं गुरूनानक अशी तीन हॉस्पिटलायझेशन्स, माझ्या बाबांचं बायपास जसलोक, निरंजनची अँजिओप्लास्टी लीलावती, सासुबाईंची ब्रेन सर्जरी आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी रहेजा, माझं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन रहेजा, रेडिएशन हिंदुजा, बडवेंचं कन्सल्टेशन टाटा मेमोरियल आणि माझी हिस्टरेक्टोमी खार हिंदुजा अशा वेगवेगळ्या दवाखान्यांचा माझा अनुभव आहे.
या सगळ्या हॉस्पिटलायझेशन्समध्ये पेशंटखालोखाल माझा मोठा सहभाग होता. त्यामुळे पेशंटबरोबर थांबणं, नर्सिंग स्टाफ आणि इतर स्टाफशी बोलणं, बिलिंग करणं या सगळ्यात माझा आणि निरंजनचा सहभाग होता.

हॉस्पिटलमध्ये पेशंटला ठेवतो कारण त्याला उत्तम विश्रांती मिळावी, त्याची औषधं वेळेवर दिली जावीत, त्याला नीट मॉनिटर केलं जावं, त्याला चांगलं पौष्टिक खायला मिळावं असे उद्देश असतात. मी वर उल्लेख केलेली हॉस्पिटल्स ही मुंबईतली उत्तम हॉस्पिटल्स आहेत. या सगळ्या हॉस्पिटलमध्ये या चारही गोष्टींचा अभाव आहे.

हे असं का होतं? फोर्थ क्लास किंवा आया-वॉर्डबॉय या लोकांच्या कामाच्या पाळ्या सकाळी आठला बदलतात. त्यांच्या युनियन्स आणि त्यांचे आपापसातले अलिखित करार यामुळे पेशंटला सकाळी ६-७ ला स्पंजिंग केलं जातं. कारण पुढचे येणारे कर्मचारी हे करणार नसतात. जर पेशंटची नुकतीच सर्जरी झाली असेल किंवा खूप थकवून टाकणारा आजार असेल तर ही वेळ अतिशय चुकीची आहे. कारण अनेकदा हॉस्पिटल्समध्ये झोप लागत नाही. पण नियम म्हणजे नियम. यात बदल होत नाही.

तुम्ही रूम शेअर करा किंवा स्वतंत्र खोली घ्या. तुम्हाला अजिबात शांतता मिळू द्यायची नाही असा चंग नर्सेस आणि इतर स्टाफनं बांधलेला असतो. रहेजाला मी जेव्हा अडमिट होते तेव्हा पंधरा मिनिटाला एक या हिशेबानं कुणीतरी खोलीत येत असे. बरं माझी सर्जरी मेजर झाली नव्हती. शिवाय मला ब्लडप्रेशर-डायाबेटिस असं काहीही नाही. मला ताप किंवा तत्सम इन्फेक्शन नव्हतं. थोडक्यात सतत मॉनिटरिंगची काहीच गरज नव्हती. पण तरीही सतत कुणीतरी खोलीत येत असे. एक वॉर्डबॉय तर कारण नसताना येऊन उभा राहायचा. शेवटी माझ्या बहिणीनं, मेघननं त्याला झापलं.

नर्सेसमध्ये कोऑर्डिनेशन नसलं की तर फारच त्रास होतो. प्रत्येक नर्स येऊन तेच प्रश्न विचारते. आपण तीच उत्तरं देतो, ती नोट्स करत असेलच की. पण परत थोड्या वेळानं येऊन तेच प्रश्न विचारले जातात. आयव्ही लावलेलं असेल तर ते संपत आलंय का याकडे पेशंटनं किंवा त्याच्या नातेवाईकानं लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण एकदा लावून गेल्या की संपलं तरी त्या फिरकत नाहीत. वेगवेगळे प्रश्न विचारायला येतात पण याकडे लक्ष देत नाहीत. रात्री झोपेतही तुम्हालाच हे मॉनिटर करायला लागतं. यावेळी खार हिंदुजाला तर स्पेसिफिकली सांगितलं होतं की नर्सिंग स्टेशनजवळची खोली देऊ नका. तरी अगदी बाजूची खोली दिली होती. तरीही बेल केल्याबरोबर नर्सेस येत नसत. मग माझ्याबरोबर जे कुणी असेल ते जाऊन बोलावून आणत असत. एकदा तर मी संध्याकाळी नर्सला बोलावून विचारलं की मला आता काही इंजेक्शन्स द्यायची आहेत ना? तर तिच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह! मग मला म्हणाली, थांबा बघून येते. मग बघून आल्यावर तिला साक्षात्कार झाला की द्यायची आहेत. मग तिनं मला ती दिली.

रात्री झोपायच्या आधी मी बोलावून विचारत असे की काही राहिलं नाही ना, मी झोपू ना? ब्लडप्रेशर वगैरे घ्यायचं असेल तर घेऊन टाका, म्हणजे मला शांत झोपता येईल. तेव्हा म्हणायच्या की काही राहीलेलं नाहीये. एक दिवस झोपल्यावर नर्स आली, मी डोळे उघडले तर म्हणाली, Go to sleep!!! येण्याचं कारण काय तर काहीही नाही. खोलीचं दार तर कुणीही नीट बंद करत नव्हतं.

स्पंजिंग माझी बहिण करेल असं सांगून मी तो प्रश्न निकालात काढला होता. सर्जरीच्या दुस-या दिवशी मला आधी तर बराच वेळ झोप आली नाही, नंतर ती अर्धवट लागत होती. तर अचानक खाडकन दरवाजा उघडला गेला. मी कोण आहे विचारलं तर आया सकाळचे कपडे ठेवायला आली होती. मला म्हणते, आप कैसे हो? म्हटलं मै अच्छी हूँ, लेकिन आप इस वक्त यहां क्या कर रही हो? तर मला म्हणते सकाळचे कपडे ठेवतेय. घड्याळात बघितलं तर मध्यरात्रीचा दीड वाजला होता.

दवाखान्यातलं जेवण यावर तर पीएचडीचा प्रबंध होऊ शकतो. डायटिशियन नामक व्यक्ती भेटून जाते. तुम्हाला काही आजार आहेत का हे विचारते, तुम्ही काय खायला हवं याच्या सविस्तर नोंदी घेते. प्रत्यक्षात तुमच्यासमोर येतं ते अत्यंत बेचव पण मसालेदार जेवण. रात्रीच्या जेवणात, सर्जरी झालेल्या पेशंटला कितीही पौष्टिक असेल तरी राजमा कुणी देईल का? पण मला मिळाला होता. रहेजाला असताना मला डायबिटिस आणि ब्लडप्रेशर नाहीये हे पुन्हापुन्हा सांगूनही मला बिनमिठाचं आणि बिनसाखरेचं जेवण मिळत राहीलं. मीठ मागितलं तर पँट्रीमधून ते पाऊण तासानं मिळालं.

परवा खार हिंदुजाला तर पँट्रीची मज्जाच होती. हॉस्पिटल्स बाहेरच्या पदार्थांना परवानगी देत नाहीत, त्यात पेशंटबरोबर थांबणा-या अटेंडंटलाही तिथलंच खावं लागतं. तर खार हिंदुजाला सर्जरी झाल्यावर आणि अनास्थेशियाचा परिणाम कमी झाल्यावर जेव्हा डॉक्टरांनी मला लिक्विड घ्यायला सांगितलं तेव्हा मी खूष झाले. कारण आदल्या दिवशी सकाळी ८ पासून, त्यादिवशी संध्याकाळी ५ पर्यंत काहीही खाल्लं नव्हतं. आदल्या दिवशी डायरियासाठी औषध दिलं होतं, त्यामुळे गळून गेले होते.
तर ५ वाजता सांगितलेलं नारळपाणी ६ वाजता आलं आणि ८ वाजताचं सूप ९.३० ला आलं. ही पेशंटची कथा. पहिल्या दिवशी दुपारी माझी बहिण भक्ती माझ्याबरोबर थांबली होती. तिनं दुपारी १.३० वाजता जेवण ऑर्डर केलं ते ३.३० वाजता आलं. नंतर तिनं चहा ऑर्डर केला तर तो येईचना. तिनं पँट्रीत फोन केला आणि ती म्हणाली, मला चहा करता येतो, मी येऊ का चहा करायला?

डिस्चार्जच्या वेळी फीडबॅक घ्यायला ज्या बाई आल्या होत्या त्यांना हे संगितलं तर त्यांचं म्हणणं की आमचा कॉन्ट्रॅक्टर बदलला आहे, अजून सगळं सेट झालेलं नाहीये. आता यावर पेशंटनी काय करावं? किंवा तुम्ही फूड पासला परवानगी देता हे तुम्ही अडमिशनच्यावेळी सांगायला नको का? पण मग कॉन्ट्रॅक्टरचं भलं कसं होईल?

हॉस्पिटलचं बिलिंग या विषयावर एक स्वतंत्र लेख होईल. माहिमचं हिंदुजा वगळता प्रत्येक हॉस्पिटला इन्शुरन्सचा जो काही घोळ होता तो बस. आमच्याकडे तीन वेगवेगळे इन्शुरन्स आहेत. रहेजाला डिस्चार्जच्या दिवशी इन्शुरन्स कंपनीकडून केवळ ५ हजार मंजूर व्हायला तब्बल ८ तास लागले. सकाळी घरी येणार होतो ती संध्याकाळ झाली. जसलोकलाही बिलिंगचं असंच. माहिम हिंदुजाला मात्र रेडिएशनच्या वेळी इन्शुरन्स कंपनीकडे प्रपोजल पाठवणं आणि नंतर संपूर्ण कॅशलेस इन्शुरन्स मंजूर करणं हे फार फटाफट झालं. तिथे याविषयीच्या विभागात काम करणारे कर्मचारी तत्पर होते. खार हिंदुजाला कॅशलेस होणारच नाही असं सांगितलं. कॅशलेसमध्ये इन्शुरन्स कंपन्या विचित्र अटी घालतात. म्हणजे डॉक्टरला असिस्टंट कशाला हवा अशासारखे प्रश्न विचारतात. शिवाय डॉक्टरांना कमीतकमी मोबदला देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून कॅशलेस नाही हे चांगलंच. पण आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो ते झटपट आणि कुठल्याही अडसराशिवाय उपचार व्हावेत म्हणून. तर ते काही होत नाही. त्यामुळे आता इन्शुरन्स कंपनीला कागदपत्रं सबमिट करणं आलं.

हे सगळं मी लिहितेय ते मुंबईतल्या टॉपच्या हॉस्पिटलमधले अनुभव आहेत. जिथे दिवसाचं खोलीचं भाडं हे पंचतारांकित हॉटेलच्या भाड्यापेक्षाही जास्त आहे. इतके पैसे भरत असताना असे अनुभव येतात तर ज्यांना अशी हॉस्पिटल्स परवडत नाहीत त्यांचं काय?

कुणाला ही पोस्ट वाचल्यावर हा तक्रारींचा पाढा वाटेल. पण तसं नाहीये. तटस्थ दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघण्याचा प्रयत्न आहे. कुठलंही आजारपण काही सुखाचं नसतं. माणूस आधीच गांगरून गेलेला असतो. शक्य तितक्या सहजपणे सगळं पार पडावं असं वाटलं तर त्यात काय चूक आहे? पण मला वाटतं आपल्याकडे एकूणच माणसाला माणूस म्हणून किंमत देण्याकडे उदासीनतेनं बघितलं जातं. पेशंटशी प्रेमानं, आपुलकीनं वागावं ही किमान अपेक्षा आहे. मी वर म्हटलं तसं डॉक्टर ती पूर्ण करतात. पण त्याबरोबर इतर स्टाफनं हे सगळं समजून घ्यायला काय हरकत आहे?

#हॉस्पिटलडायरी

सायली राजाध्यक्ष