साड्यांचे मॅक्सी ड्रेस

उन्हाळा चांगलाच तापलाय. दुपारी बाहेर पडायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. चक्क मुंबईतही चटके बसताहेत. घरात पडदे ओढून शांत बसावंसं वाटतंय. जे कामाला बाहेर पडतात त्यांनाही ऑफिसच्या एसीमध्ये बरं वाटतंय.

आपल्याकडे तीन अगदी विशिष्ट ऋतु असतात. फार कमी देशांमध्ये असे अगदी वेगळे तीन ऋतु बघायला मिळतात. आपण नशीबवान आहोत की आपल्याला इतका छान सूर्यप्रकाश मिळतो. कित्येक देशांमध्ये, विशेषतः युरोपीय देशांमध्ये हिवाळ्यातल्या प्रदीर्घ रात्री नकोशा होतात. नुसत्या रात्रीच अंधा-या असतात असं नव्हे तर दिवसही ढगाळलेले असतात. आपल्याकडे मात्र पावसाचे दिवस सोडले तर छान सूर्यप्रकाश असतो.

हा छानसा सूर्यप्रकाश उन्हाळ्यात जेव्हा प्रखर व्हायला लागतो तेव्हा मात्र जीव नकोसा व्हायला लागतो. समुद्रकिना-याजवळच्या गावांमध्ये आर्द्रतेचा खूप त्रास होतो. जिवाची काहिली होते. मग दिवसभर डोक्यावर पंखे, प्यायला सतत गार पाणी-पन्हं-सरबत, खिडक्यांवर जाड पडदे असं सगळं हवंसं वाटायला लागतं.

या सगळ्याबरोबर उन्हाळ्यात तलम सुती कपडेच घालावेसे वाटतात. या दिवसांमध्ये सिंथेटिक नायलॉनसारखे कपडे नकोसे होतात. पातळ कॉटन, मलमल, लिननचे कपडे हवेसे वाटतात.

माझ्या कपाटात उन्हाळ्यात घालायचे कपडे, पावसाळ्यात घालायचे कपडे आणि हिवाळ्यात घालायचे कपडे वेगवेगळे असतात. उन्हाळ्यात स्लीव्हलेस किंवा शॉर्ट स्लीव्हजचे कॉटन किंवा लिननचे कपडे मी वापरते.

यंदा मी उन्हाळ्यासाठी चक्क ड्रेस (म्हणजे जुन्या भाषेत बोलायचं तर मॅक्सी) शिवून घेतलेत. माझ्याकडे अनेक कॉटन साड्या असतात. त्यातल्या खूपदा नेसून झालेल्या साड्यांचे मी यावेळी ड्रेस शिवून टाकलेत. यातल्या काही साड्या कॉटनच्या, काही महेश्वरी आणि सिल्कच्या तर एक साडी लिननची आहे.

याचा एक फायदा असा की साड्यांचे ड्रेस करताना त्यातल्या पदरांचा छान वापर करता येतो. त्यासाठी वेगवेगळं कापड घ्यावं लागत नाही. पदराची बॉडी आणि खालचा घेर साडीचा करता येतो किंवा बॉडी आणि घेर साडीचा करून पदराच्या बाह्या करता येतात. किंवा फक्त मागच्या बाजूला पदर वापरता येतो. किंवा फक्त बॉडी पदराची करता येते. असे अनेक पर्याय तुम्ही यात वापरू शकता.

ज्या साड्यांचं कापड पातळ होतं, म्हणजे महेश्वरी साडीसारखं, त्यांचे मी घेरदार ड्रेस केले. तर ज्या साड्या सिल्कच्या होत्या त्यांना कमी घेर केला आहे. याचं कारण म्हणजे सिल्कचा धागा जरा जाड असतो. प्रत्येक सिल्क हे कॉटनसारखं अंगासरशी बसत नाही. म्हणून अशा साड्यांना जास्त घेर न देता त्यांचे शक्यतो स्ट्रेट कटमध्ये ड्रेस केलेत.

मला स्वतःला रंगीबेरंगी लेस, नाड्या वगैरे फारसं आवडत नाही. त्यामुळे माझे शिवलेले कपडे साधे सरळसोट असतात. कापडाची पायपिंग मला पुरेशी वाटते. पण यावेळी मी सरसमधून बंजारा स्टॉलवरून काही पॅच विकत घेतले होते. ते वापरून एका बंगाल कॉटन साडीचा केलेला ड्रेस मस्त झाला आहे. महेश्वरी साड्यांचे पदर फार आकर्षक असतात त्यामुळे ते वापरून केलेल्या बाह्या फार उठावदार दिसल्या आहेत.

FB_IMG_1522388949219

माझ्या बहिणीनं मेघननं अनेक वर्षांपूर्वी मला एक पांढरी लखनवी चिकनकारीची कॉटन साडी दिली होती. ती मी अनेक वर्षं वापरली. या उन्हाळ्यात मी तिचा ड्रेस करून टाकलाय आणि तो छान दिसतोय.

या ड्रेसेसचा फायदा असा की ते मोकळेढाकळे आहेत. त्यामुळे त्यात फारसं उकडत नाही. शिवाय आतून पातळ अस्तर लावल्यानं अंगालाही ते सुखद वाटतात. आणि ते कुठेही घालता येतात. अगदी सहज बाहेर फिरायला जाताना घाला किंवा एखाद्या नाटकाला जाताना घाला, ते चांगले दिसतात. या ड्रेसवर एखादं छानसं कानातलं घातलं की झालं. आपण कपड्यांबरोबरच्या अक्सेसरीज बदलल्या की तोच ड्रेस वेगळा दिसतो.

इथे मी घातलेल्या दोन ड्रेसचे फोटो देतेय. शिवाय दोन महेश्वरी ड्रेसचे फोटो देतेय. बाकीचे ड्रेस वापरले की मग त्यांचेही फोटो शेअर करेन.

तुम्हीही आपल्या अनेकदा वापरलेल्या साड्यांचे असे ड्रेस करू शकता किंवा लांब कुडते करू शकता किंवा अस्तर लावून पलाझो करू शकता. मग करून बघा आणि कसं झालं ते नक्की कळवा.

 

#साध्याकल्पना #सोप्याकल्पना #साडीआणिबरंचकाही #साडीड्रेस #साड्यांचावापर #sareesandotherstories #simpleideas #sareemaxi #maxidress

सायली राजाध्यक्ष