मदर्स डे अर्थात मातृदिन

मदर्स डे किंवा मातृदिनाची कल्पना पाश्चिमात्य असली तरी ती मला एक चांगली प्रथा वाटते. किंबहुना असे काही दिवस साजरे करणं ही एक छान पद्धत आहे असं मला वाटतं. मे महिन्यातल्या दुस-या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. वर्षभर घरातल्या इतरांसाठी काहीतरी करत राहणा-या आईला या दिवशी काही तरी भेटवस्तू द्यायची, तिच्या आवडीचं जेवण शिजवायचं अशी छान कल्पना यामागे आहे. माझ्या मुली लहान असल्यापासून मला मदर्स डेला काही ना काही देत आलेल्या आहेत. परवाच शर्वरी मला विचारत होती, आई मी लहान असताना तुला किती भयानक कानातलं दिलं होतं ना, आणि तू ते छान आहे म्हणून कसं घातलंस? याला काय उत्तर देणार! आता तर मुली मोठ्या झाल्या आहेत, त्या माझ्यासाठी काही भेटवस्तू तर आणतातच पण काहीतरी छान स्वयंपाकही करतात.
मदर्स डेच्या निमित्तानं मी माझ्यावर प्रभाव असणा-या दोन बायकांचा विचार करतेय, एक माझी आई आणि दुसरी माझी सासू. माझी आजी, काकू, आत्या या सगळ्यांकडून मी काही ना काही घेतलं आहे. पण माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव आहे तो या दोघींचा.

13139187_1237487822935839_6590372487837460738_n
माझ्या आईचं माहेर अंबेजोगाई हे बीड जिल्ह्यातलं गाव. पण तिचं बरंचसं लहानपण परळी या अंबोजोगाईजवळच्या गावी गेलं. आई हे तिच्या आईवडलांना उशीरा झालेलं अपत्य. तिच्या बहिणीचा मुलगा तिच्याहून दोन वर्षांनी मोठा होता. आई झाली तेव्हा आजोबांना धंद्यात खोट आली होती. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. आई सांगते, कधीकधी ज्वारीच्या कण्या भरडून त्या शिजवून खात असू पण कुणाकडे काही मागायला गेलो नाही. कधीकधी विजेचं बिल भरण्याइतकेही पैसे नसायचे मग कंदील लावून राहावं लागे. आईची आई फार चवदार स्वयंपाक करायची. कोंड्याचा मांडा करण्याची कला तिला अवगत होती. आईनंही तिचा तो गुण उचलला आहे.
आईचं लग्न झालं तेव्हा ती १८ वर्षांची होती. माझे बाबा तेव्हा वकीली तर करायचेच पण बरोबर समाजवादी पक्षाचं काम करायचे, सेवादलाचं काम करायचे, स्त्री-किर्लोस्कर-मनोहर या नियतकालिकांमध्ये लिहायचे. एकूणच लष्करच्या भाक-या भाजण्याची हौस आमच्या घरात आहेच (ती माझ्यातही आली आहे)! हळूहळू आई या सगळ्यात रूळत गेली. आणीबाणीच्या काळात आमच्या घरी भूमिगत झालेले किती तरी कार्यकर्ते राहून गेले, त्यांचं खाणंपिणं तिनं केलं. बीडच्या आमच्या घरी कित्येक लेखक-साहित्यिक येऊन, राहून गेले आहेत. या सगळ्या गोतावळ्याचं तिनं केलं. १९७८ मध्ये वयाच्या चाळीशीत बाबांनी अचानक मुंबई उच्च न्यायालयात वकीलीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आम्हा चौघांना घेऊन ती बीडला राहिली. नंतर १९७९ मध्ये एक वर्ष आम्ही मुलंडला राहिलो. ज्यांनी घर भाड्यानं दिलं होतं ते अचानक परत आल्यानं आईबरोबर आमची रवानगी परत बीडला झाली. या काळात आम्हा चौघांना घेऊन आई बीडला राहिली. १९८२ मध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला आलं आणि आम्ही औरंगाबादला स्थिरावलो.
औरंगाबादला आम्ही भाड्याच्या घरात राहात होतो. बाबांची वकीलीची प्रॅक्टिस जोरदार होती. त्यामुळे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सतत पक्षकार असायचे. चहाचं तर अग्निहोत्रच सुरू असायचं. त्याबरोबरच बरेचदा जेवायलाही माणसं असायची. त्यातून बाबांना आधी न सांगता माणसांना जेवायला घेऊन येण्याची सवय होती (जी अजूनही कायम आहे). त्यामुळे हा ऐनवेळचा पाहुणचारही करावा लागत असे. त्यावरून आईनं कधी त्रागा केल्याचं मला आठवत नाही. पण आई एरवी मात्र शीघ्रकोपी होती आणि आहे. तिला फार लवकर राग येतो आणि खूप राग येतो. राग आला की तिच्या हातचा प्रसादही आम्ही बरेचदा खाल्ला आहे.
या सगळ्यात मला आईचे जे गुण महत्वाचे वाटतात म्हणजे माणसांचा संग्रह करण्याची वृत्ती (जी आमच्या संपूर्ण कुटुंबात आहे) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाहीबद्दल कधीही न वाटलेला मत्सर. आम्ही लहान असल्यापासून आमच्या मैत्रिणी बिनदिक्कत घरी यायच्या. अगदी राहायला, जेवायला अशा कधीही असायच्या. पण मी या का आल्या किंवा या का जेवायला आहेत म्हणून आईच्या कपाळावर कधीही आठ्या बघितल्या नाहीत. उलट माझी मैत्रीण सोनाली आली की तिला आवडते म्हणून दाण्याची चटणी खाण्या आग्रह कर, किंवा लोणचं काढून दे असं ती करायची आणि अजूनही करते. आम्हा तिघाही बहिणींच्या मैत्रिणी सतत घरात असत. त्यांनाही घर आपलंसं वाटत असे. बीडला सुट्यांमध्ये गेलो की चुलत भावंडांना गोळा करून, धपाटे-गरम मुगाची खिचडी करून खंडेश्वरीला (बीडच्या गावाबाहेरचं एक देऊळ) नेण्याची दांडगी हौस आईला होती. बाबांचे मित्र मंगीराज काका त्यांची जीप देत असत. त्या जीपमध्ये सगळ्यांना कोंबून आई आम्हाला खंडेश्वरीला नेत असे. आईचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तिच्याच आपपरभाव अजिबात नाही. आपली मुलं म्हणून झुकतं माप दिलेलं मला कधीही आठवत नाही. माझे आजी-आजोबा आमच्याकडे कायमचे राहायला आल्यावर माझ्या आईनं कधीही त्यांना परकं मानलं नाही.

13177658_1237489026269052_3375302460784500274_n


दुसरा अत्यंत महत्वाचा गुण मी माझ्या आईकडून शिकले आहे तो म्हणजे तिला कुणाहीबद्दल कधीही असूया वाटत नाही. गेल्या काही वर्षांत मला तिचा हा गुण फार प्रकर्षानं लक्षात आला आहे. मी लहान होते तेव्हापासून आईनं कुणाबद्दल असूया, हेवा दाखवलेला मला खरोखर आठवत नाही. कुणाकडे किती काय आहे याची चर्चा केलेली आठवत नाही. कुणाबद्दल मत्सर व्यक्त केलेला आठवत नाही. हा तिचा अतिशय महत्वाचा गुण मला वाटतो. याचा अर्थ असा नाही की मला माझ्या आईचं सगळंच पटतं. आमचे खूप वाद होतात. अगदी लहानपणीच गरिबी भोगावी लागली, किंवा आईवडील लवकर गेले म्हणून असेल कदाचित पण आईमध्ये एक प्रकारची अलिप्तता आहे. ती फार पटकन एखाद्या गोष्टीपासून विलग होऊ शकते. इतकी की कधीकधी आश्चर्य वाटावं. पण त्यामागे हेच कारण असावं असं मला वाटतं.
आईनं वयाची चाळीशी ओलांडल्यावर औरंगाबादमधलं पहिलं पोळीभाजी केंद्र सुरू केलं. आणि आज गेले बावीस-तेवीस वर्षं ती तिच्या मैत्रिणीबरोबर ते यशस्वीपणे चालवते आहे. तिच्या दुकानात ३५-४० बायका काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तिथे उपलब्ध आहेत.
माझं लग्न झालं तेव्हा मी २३ वर्षांची होते. लग्नाच्या वेळी मी जरा दबकूनच होते. राजाध्यक्ष कुटुंबात आपण कशा काय रूळणार याची मला मनात फार भीती वाटत होती. याचं कारण असं की माझ्या माहेरचं कुटुंब हे फार मोठा गोतावळा असलेलं, मोकळंढाकळं, देशस्थी, पसारा वाढवणारं, खूप बोलणारं, केव्हाही आणि काहीही खाणारं असं होतं. तर राजाध्यक्षांचं कुटुंब खूप शिस्त असलेलं (माझा असा समज होता, तो माझ्या नव-यानं पार मोडून काढला आहे), मोजकं बोलणारं, अगदी नीटनेटकं असं होतं. तेव्हा अशा घरात माझा निभाव कसा लागणार असा प्रश्न मला पडलेला होता. या दोन्ही कुटुंबांमधलं सांस्कृतिक वातावरण सारखं होतं, मित्रमंडळी बरचशी समान होती हे खरंच पण तरीही फरक होताच.
13100775_1237489886268966_4690742044785122306_nलग्न करून मी घरी आले आणि माझ्या सासुबाईंनी पहिल्याच दिवशी मला सांगितलं, सून आहेस म्हणून लवकर उठण्याची गरज नाही, तुझ्या रोजच्या वेळेला तू उठत जा. मला स्वयंपाकाची सवय होतीच. पण त्यांनी कधी संपूर्णपणे ती जबाबदारी माझ्यावर टाकली नाही. त्या तेव्हा घराची सगळी व्यवस्था पाहात असत. सुरूवातीची काही वर्षं ते ठीक होतं, पण नंतर मला वाटायचं की सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. पण ती त्यासाठी फारशी आग्रही नव्हती. ती सतत सगळं करत असायची. एकदा ती मला म्हणाली की, माझ्यानंतर तुला माझा रोल करायचा आहे. तेव्हा मी तिला म्हटलं, मी तुझा रोल करणार नाही, यासाठी, की मला तसा तो करणं तत्वतःच मान्य नाही.
माझ्या सासुबाईंना मी मावशी म्हणते. मावशीकडून मी काय शिकलेय? मी मावशीकडून नीटनेटकेपणा शिकलेय. मावशीकडून मी घराची व्यवस्था कशी ठेवावी ते शिकलेय. मी फार रडकी होते पण मावशीकडून मी खंबीरपणा शिकलेय. कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे कसं उभं राहावं ते शिकलेय. माझं माहेरचं घर व्यवस्थित, स्वच्छ असायचं. पण राजाध्यक्षांचं घर फारच नीटनेटकं असायचं आणि मावशी त्यासाठी खूप कष्ट घ्यायची ते मी तिच्याकडून शिकलेय. कुणाच्याही आजारपणात मावशी किती खंबीरपणे उभी राहाते याचा अनुभव मी घेतलाय आणि ते मीही प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करते. सगळ्या नातेवाईकांशी मावशी आवर्जून संबंध ठेवते. स्वयंपाकाची आवड मला होतीच. माझ्या आईकडून ती माझ्यात आलीच आहे आणि माझ्या सासुबाईंकडून ती अजून प्रगल्भ होत गेली आहे.
माझी आई आणि मावशी या दोघी अगदी भिन्न व्यक्तिमत्वांच्या बायका. अगदी परस्परविरोधी म्हणता येतील इतक्या. पण या दोघींमधलं काहीकाही वेगवेगळं मी उचललं आहे. आपण सगळेच उचलत असतोच. पण आज जर मला विचाराल की मी आईसारखी आहे की सासूसारखी तर त्याचं उत्तर देणं मला अवघड होईल इतकी मी त्यांच्यात गुंतलेले आहे.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s