सुरूचीकाकू

माझी काकू ही मूळची सोलापूरची. लग्नापूर्वीची प्रभा आठवले आणि नंतरची सुरूची चपळगावकर. तिचे वडील शंकरराव आठवले हे कामगार नेता होते. ते इंटकचं काम करायचे. कामगार चळवळीच्या राजकारणातच त्यांचा खून झाला. मिस्टेकन आयडेंटीटीचा प्रकार होता तो. काकूची आई अतिशय शांत, समंसज होती. तशीच सुरूची काकूही अतिशय शांत, समंजस होती.
लग्न होऊन काकू बीडला आमच्या घरी आली तेव्हा ती जेमतेम २०-२२ वर्षांची होती. आमच्या घरात देशस्थी कारभार होता. आजोबा, बाबा, काका सगळे वकील. घरात सतत पक्षकारांचा आणि माणसांचा राबता. तिचं लग्न झालं तेव्हा मी अडीच-तीन वर्षांची होते. ती मला खिडकीत बसवून भरवायची. काका नंतर गंमतीनं म्हणायचेही, ‘काम टाळण्याचा अगदी सोपा उपाय होता तो!’ त्यांचं लग्न झालं आणि काका लगेचच मॅजिस्ट्रेट झाले. मग काका-काकू बदलीच्या गावी गेले. पण आमचे सगळे सण एकत्र व्हायचे. महालक्ष्म्या, दिवाळी हे तर एकत्र असायचंच. काकू रांगोळ्या फार सुंदर काढायची. मी रांगोळ्या काढायला तिच्याकडूनच शिकले. आमच्या बीडच्या घराला प्रचंड मोठं अंगण होतं. मी आणि काकू मिळून दिवाळीच्या प्रत्येक दिवशी मोठ्ठी रांगोळी काढत असू. तीही माझ्याइतकीच त्यात गुंगून जायची.


बदल्यांमुळे दर तीन वर्षांनी नवीन गाव, नवीन मित्रमैत्रिणी, नवीन वातावरण. पण काकूनं कधीही त्याची तक्रार केली केली नाही. मुळात तक्रार करणं हा तिचा स्वभावच नव्हता. ती फार मोकळेपणानंही फार कमीदा बोलायची. पण माझं आणि तिचं गूळपीठ होतं. जरा मोठी झाल्यावर सुटी लागली की मी एकटी काका-काकू ज्या गावी असतील तिथे जायचे. गप्पा आणि आवडीचं खाणं हीच तेव्हा गंमतीची कल्पना होती. त्यामुळे कधी वेगळं काही करावंसं वाटलंही नाही. काकू स्वयंपाक फार छान करायची. कोकणस्थ असल्यामुळे गोड पदार्थ तर फारच निगुतीनं करायची. आंब्याचा रस घालून केलेला शिरा किंवा ओल्या नारळाच्या करंज्या, पेरूची भाजी, भरपूर लसूण आणि भरपूर तेल घालून परतलेली मेथीची भाजी असे काही तिचे खास पदार्थ होते.
काका सरकारी नोकरीत आणि शिवाय प्रामाणिक. त्यामुळे अतिशय तुटपुंज्या मिळकतीत ते दोघेही घर चालवायचे. पण घराची व्यवस्था अतिशय चोख असायची. काकूनं कधीही अवास्तव मागण्या केलेल्या मला तरी आठवत नाही. तिन्ही मुलंही विनातक्रार राहायची. पुढे काकांची बदली ठाण्याला झाली. माझं नुकतंच लग्न झालं होतं. नव्यानं मुंबईत आलेल्या मला काका-काकूंचा खूप आधार वाटायचा. पंधरा दिवसातनं एकदा तरी मी ठाण्याला जात असे. पुढे गरोदर राहिल्यावर तर ठाण्याला जायच्या आधी काकूला फोन असायचा की मला हे खावंसं वाटतंय. मग मी गेले की ती ते करून ठेवायची. मला आठवतंय माझं पहाटेचं डोहाळेजेवण तिनं धुंदुरमासात केलं होतं. अगदी सकाळी केळीच्या पानावर बाजरीची तीळ लावलेली भाकरी, मिसळीची भाजी, मुगाची मऊ, आसट खिचडी आणि टोमॅटोचं सार. सावनी झाल्यावरही मी त्यांच्याकडे तिला घेऊनही जात असे. एकदा मी अशीच राहायला गेले होते. सावनी चार महिन्यांची होती. दुपारी गप्पा मारत बसलो होतो. फोन वाजला म्हणून मी फोन उचलला. फोनवर कोर्टातून काका बोलत होते. काकांना सक्तीनं निवृत्त करण्यात आलं होतं. ते तेव्हा ऐकताना माझ्या पोटात जो गोळा आला होता, तोच आता लिहितानाही येतो आहे. काकांची चूक नसताना, राजकारणामुळे त्यांना सक्तीनं निवृत्त करण्यात आलं होतं. महाराष्ट्र टाईम्समधली बातमीही मला आठवते आहे: निस्पृह न्यायाधीश सुधाकर चपळगावकर सक्तीनं सेवानिवृत्त.

11742899_1046048002079823_3719604563144670168_n
सावनीचं बारसं

या सगळ्या प्रकारानंतर काकांचं सगळं घरच मनानं खचून गेलं होतं. पण काकूनं फार खंबीरपणानं परिस्थितीचा स्वीकार केला. माझे बाबा औरंगाबादला होते. साहजिकच काकांचं कुटुंब औरंगाबादला आलं. काही दिवस आमच्या घरी राहून नंतर ते भाड्याच्या घरात राहायला गेले. काकूनं लिक्विड सोप विकले, सावनी सर्जिकल्स म्हणून सॅनिटरी पॅड्सचं युनिट सुरू केलं. स्वतःही पॅड्स तयार करायला बसली. हॉस्पिटल्समध्ये जाऊन ऑर्डर्स मिळवल्या. काकाही हायकोर्टात प्रॅक्टिस करायला लागले होते. त्यांचा मोठा मुलगा नुकताच इंजिनीयरींगला गेला होता. धाकटा शिकत होता. मोठी मुलगी ठाण्याला लॉ करत होती. काकांचा जम बसेपर्यंत काकूनं खूप कष्ट केले. पण कधीही त्याबद्दल बोलून दाखवलं नाही. हळूहळू काकांची प्रॅक्टिस उत्तम चालायला लागली. त्यांनी दोन फ्लॅट्स घेतले. मोठं ऑफिस उभं केलं. धाकटा मुलगाही वकील झाला. तोही काम करायला लागला. मोठा बुद्धिराज इन्फोसिसमध्ये निवडला गेला. मयुरीही काकांना वकीलीत मदत करायला लागली. थोडे स्थैर्याचे दिवस आले. आता सगळं छान होणार असं वाटायला लागलं.
काही वर्षं चांगली गेली. काका-काकू आयुष्यात पहिल्यांदा प्रवासाला गेले. कुलू-मनालीहून येताना मुंबईत माझ्याकडे उतरले होते. आम्ही जेवायला बाहेर गेलो तेव्हा काकू थंडीनं कुडकुडत होती. मला वाटलं हॉटेलमधल्या एसीमुळे असेल. पण तिचा चेहराही कसनुसा झाला होता. मी काकांना म्हटलं, की काकू बरी दिसत नाहीये, औरंगाबादला गेल्याबरोबर डॉक्टरांना दाखवा. लगेचच काकांची साठी होती. आम्ही सगळे औरंगाबादला गेलो होतो. काकू मला बरीच वाटत नव्हती. बुद्धिराजनं काकूला दवाखान्यात नेऊन आणलं. सोनोग्राफीत स्प्लीनवर थोडी सूज दिसली. पण ती म्हणाली, या दिवसाची मी खूप तयारी केलीय, आजाराबद्दल नंतर बोलू. कार्यक्रमानंतर मी परतले. दुस-या दिवशीच काकांचा फोन आला, की काकूच्या पोटात पाणी झालंय आणि आम्ही मुंबईला येतोय.
मुंबईला आल्यावर काकांच्या एका मित्रानं सांगितल्यानुसार आम्ही दादरच्या हिंदू कॉलनीतल्या एका प्रसिद्ध डॉक्टरांना भेटायला गेलो. त्यांनी काही तपासण्या करायला सांगितल्या. मी बांद्र्याला राहाते म्हणून आम्ही लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या केल्या. तिथेच आमचा मित्र अनिरूद्ध फडके गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे. त्याला रिपोर्ट्स दाखवले तेव्हा तो म्हणाला की काकुला लिव्हर डिसीज आहे. त्यानं सीटी स्कॅन करायला सांगितलं. ते केलं तेव्हा टेक्निशियननंच बाहेर येऊन सांगितलं की कॅन्सर आहे आणि कुठलेही उपाय करण्याच्या पलिकडे आहे. हे ऐकल्यावर मी आणि बुद्धी तर हबकूनच गेलो पण काका-काकूंसमोर तसं दाखवायचं नव्हतं. आम्ही अनिरूद्धला रिपोर्ट दाखवला. तो काकूशी पार छान बोलला. तुम्ही तुमचं रूटीन सुरू ठेवा. व्यायाम चालू ठेवा, असं त्यानं सांगितलं. नंतर मला आणि निरंजनला काय परिस्थिती आहे ते सांगितलं.
त्यानंतर काका म्हणाले की आम्ही ज्या डॉक्टरांना पहिल्यांदा दाखवलं होतं त्यांच्याकडे जाऊया. मी त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. कारण एकतर अनिरूद्ध त्याच्या विषयातला नावाजलेला तज्ज्ञ आहे आणि दुसरं म्हणजे उगाचच काकूसमोर चर्चा कशाला असं मला वाटलं. पण काकांना वाटलं की आपण आधी त्यांना भेटलो होतो तर त्यांना सांगणं आपलं काम आहे. आम्ही चौघे म्हणजे मी, काका-काकू आणि बुद्धी त्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी फाइल उघडली आणि त्यांना अनिरूद्धचं प्रिस्क्रिप्शन दिसलं. त्यामुळे बहुधा त्यांचं डोकं फिरलं. ते म्हणाले, या डॉक्टरांकडे का गेलात? मी त्यांना सांगितलं की तो माझा मित्र आहे वगैरे. पण ते नाराजच होते. ते काकूकडे वळाले आणि म्हणाले, “आई, तुम्ही आता फार काळ जगणार नाही. तुमच्याकडे फारसा वेळ नाहीये. मृत्यूपत्र करायचं असेल तर करून घ्या. कुणाला भेटायचं असेल तर तेही करून घ्या. कुणाला अपघातात मृत्यू येतो, कुणाला तापानं तर कुणी ह्रदयविकारानं मरणं पावतं. तसं तुमच्या नशीबात कॅन्सरनं मरण लिहिलेलं आहे. तेव्हा तयारी करा.” (यातला एक शब्दही खोटा नाहीये. किंवा अतिशयोक्ती नाहीये.) त्यांनी हे बोलल्यावर आम्ही चौघेही स्तंभित झालो होतो. कुणालाही काय बोलावं तेच कळेना. काकू तर चकित झाली होती. मला कधीच कुणाचा इतका संताप येत नाही. पण असं वाटलं की त्या डॉक्टरांना जाब विचारावा. असं बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असं त्यांना खडसावून विचारावं. पण गप्प बसले. त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर पडलो. टॅक्सीमध्ये कुणी कुणाशी एक शब्दही बोललं नाही.
टॅक्सीतून उतरल्यावर माझी काकूच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही घरी जा, मी भाजी घेऊन येते. मी तासभर निरूद्देश भटकून घरी आले. काकूनं कधीच याविषयावर चर्चा केली नाही. पण त्यानंतर ती अजूनच अबोल झाली. माझ्या हॉलमध्ये खिडकीजवळ एक दिवाण होता. त्यावर पडून ती बाहेर शून्यात नजर लावून बसलेली यायची. माझ्या पोटात कालवायचं, काय विचार करत असेल ही असं मनात यायचं. तिच्यासमोर न रडता नेहमीसारखं वागणं ही मोठी कसरत होती. तिच्याशी हसून बोलणं-वागणं अवघड होतं. एक आठवडा राहून काका-काकू औरंगाबादला परतले. परतल्यावर शैलेशनं काकूची खूप काळजी घेतली. रोज तिला बाहेर फिरायला नेणं, तिच्याबरोबर वेळ घालवणं हे त्यानं मनापासून केलं. पण काकूची तब्येत बिघडत गेली आणि महिन्याच्या आत ती गेली. जायच्या आधी ३-४ दिवस ती कोमात होती. मी औरंगाबादला गेले. पण काकूशी बोलता नाही आलं.
त्या डॉक्टरांना असं वागून काय मिळालं असेल असं राहूनराहून मनात येतं. कुणाला तरी दुखावल्याचा आसुरी आनंद की आपल्याला न विचारता दुस-या डॉक्टरला दाखवलं याचा सूड? डॉक्टर हल्ली पेशंटला खरी कल्पना देतात म्हणे. पण ती देण्याची काही पद्धत असेलच नं? आज दहा वर्षांनंतरही हे आठवलं की जीवाचं पाणीपाणी होतं. तो काळ रिवांइड करावासा वाटतो. त्या डॉक्टरांची भेट टाळावीशी वाटते.
काकू ही घराचा सगळ्याच अर्थानं आधार होती. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी होती. परवा, १२ तारखेला काकूला जाऊन १० वर्षं होतील. माणसं गेली तरी आयुष्य थांबत नाही. सगळे व्यवहार सुरूच राहतात हे जरी खरं असलं तरी त्या माणसाची आठवण झाल्यावर मन ज्या तीव्रतेनं दुखतं त्याचं काय करायचं?

सायली राजाध्यक्ष