सुखन

उर्दू ही भारतात जन्मलेली भाषा. भारतात जे मुस्लिम आक्रमणकर्ते आले त्यांच्या काळात या भाषेचा जन्म झाला. या भाषेची मूळं संस्कृत आणि प्राकृत भाषेत आहेत. नंतर त्यात पर्शियन शब्दांची भर पडली. आज भारतात उर्दू फारशी बोलली जात नाही कारण ही भाषा मुसलमानांची भाषा असा काहीसा समज आहे. शिवाय उर्दू पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे या भाषेचं भारतातलं महत्त्व कमी कमी होत गेलं आहे.
उर्दू भाषा फार गोड आहे. तिची आपली अशी एक नजाकत आहे, एक खास लहजा आहे. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये उर्दूचा वापर असायचा. काही गीतकार तर फक्त उर्दूतच लिहायचे. साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, राजा मेहंदी अली खान असे गीतकार आपल्या गाण्यांमध्ये उर्दूचा वापर करत असत. शैलेंद्र हा पहिला असा गीतकार, ज्यानं शुद्ध हिंदीत लिहायला सुरूवात केली. मला स्वतःला उर्दू ही भाषा फार रूबाबदार वाटते. तिला आपला वेगळा असा डौल आहे. मध्यंतरी जिंदगी या टीव्ही वाहिनीवर जेव्हा पाकिस्तानी मालिका दाखवत असत तेव्हा त्यातले संवाद ऐकणं ही एक पर्वणी होती.
परवा सुखन हा कार्यक्रम बघितला. पुण्यातली अगदी खास मराठी मुलं हा कार्यक्रम करतात. कार्यक्रमासाठी रवींद्र मिनी थिएटरला पोहोचलो आणि दारातच अत्तर लावण्यात आलं. ते बघितल्यावरच हा कार्यक्रम वेगळा असणार हे कळालंच. आत शिरल्याबरोबर दिसलं की, मंचावर मंद प्रकाशात सगळे कलाकार आपापल्या जागेवर शांतपणे बसलेले होते. कंदीलांचं देखणं पण सौम्य नेपथ्य होतं. जयदीप वैद्यनं गायला सुरूवात केली मात्र, अंगावर रोमांच उभे राहिले. पियुष मिश्रानं अतिशय सुंदर पद्धतीनं गायलेल्या हुस्ना या गाण्यानं जयदीपनं कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यानंतर एकापाठोपाठ एक शेरोशायरी, गझल, नज्म, कथा, कव्वाली, सूफी संगीत या सगळ्यांमधून एक अत्यंत देखणा कार्यक्रम उभा राहिला. अस्खलित उर्दू, बोलण्यातली सहजता, वाचण्यातली लय, अभिवाचनातली अदा या सगळ्यामुळे सुखन दृष्ट लागण्यासारखा सुरेख कार्यक्रम होतो. ओम भूतकर या पुण्यातल्या मराठी तरूणाचे उर्दू उच्चार केवळ ऐकत राहावेत असेच. सर्व कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग, टायमिंगचं अचूक भान, सुरेल संगीत, एकमेकांना दिलेली दिलखुलास दाद, उत्तम गायन, कथांची उत्तम निवड, प्रेक्षकांना सामील करून घेण्याची क्लृप्ती या सगळ्यात तीन तास कसे गेले ते कळलंच नाही.
मध्यंतरात प्रेक्षकांसाठी पान ठेवण्याची कल्पना लाजवाबच. सुखनचं यश यात आहे की सगळे प्रेक्षक भान हरपून कार्यक्रमात सहभागी होतात. कव्वालीवर अख्खं सभागृह टाळ्या वाजवत होतं, गात होतं. शेरोशायरीला मनापासून दाद देत होतं. ओमला कोण कोण आलं आहे याची अचूक माहिती होती. तो त्यांची नावं घेऊन, त्यांची चेष्टा करत होता, त्यांना सामील करून घेत होता.
मनापासून सांगायचं तर सुखनला जाताना मी फारशी उत्साही नव्हते. कारण गेल्या काही दिवसांत काही अतिशय रटाळ कार्यक्रम बघितले होते. पण तीन तासानंतर मी बाहेर पडले ते भान हरपूनच. मी जर हा कार्यक्रम चुकवला असता तर चूक केली असती.
शक्य असल्यास हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.

सायली राजाध्यक्ष