समाजस्वास्थ्य

सेक्सबद्दल, लैंगिकतेबद्दल बोलणं आजही आपल्याकडे टॅबू आहे. सेक्सबद्दल किंवा लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे अश्लील बोलणं असं समजणारे आजही खूप लोक आहेत. आजही आपण शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जावं की नाही याबद्दल अजूनही चर्चाच करतो. एकीकडे आता मुक्त लैंगिक संबंध वाढत चालले आहेत असं म्हणताना आजही अनेक नियतकालिकांमध्ये सेक्सविषयक शंका विचारणारे कॉलम सुरू आहेत. लोकांच्या त्यातल्या शंका आजही बाळबोध आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर रघुनाथ धोंडो कर्वेंनी केलेलं काम किती मोठं आहे याची कल्पना यावी. १९२१ मध्ये त्यांनी भारतातलं पहिलं संततीनियमन केंद्र सुरू केलं, त्याच वर्षी लंडनमध्ये पहिलं संततीनियमन केंद्र सुरू झालं. पाश्चात्य समाज त्याकाळी आपल्यापेक्षा किती पुढारलेला होता हे लक्षात घेता लंडनमध्ये आणि मुंबईत संततीनियमन केंद्र एकाच वेळी सुरू होणं हे विलक्षण आहे. सेक्स ही गोष्ट केवळ प्रजोत्पादनासाठी नाही, सेक्सवर मानसिक स्वास्थ्यही अवलंबून आहे यावर र. धों. कर्वेंनी भर दिला. आज तब्बल ९६ वर्षानंतरही परिस्थिती खूप बदलली आहे असं म्हणता येणार नाही.


र. धों. कर्व्यांच्या या कामाबद्दल आणि त्यांच्यावर वेळोवेळी भरल्या गेल्या अश्लिलतेच्या खटल्यांबद्दल अजित दळवींनी समाजस्वास्थ्य हे नाटक लिहिलं आहे. अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग काल मुंबईत झाला. एका अत्यंत महत्त्वाचं काम केलेल्या पण तुलनेनं दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तित्वाबद्दलचं हे नाटक मला फार महत्त्वाचं वाटतं.
रघुनाथ कर्वे हे स्वतः गणिताचे शिक्षक, पॅरिसमध्ये शिकून आलेले, मुंबईत विल्सन कॉलेजमध्ये गणित शिकवणारे उत्तम शिक्षक. पण केवळ संततिनियमन केंद्र चालवत असल्यानं कॉलेजच्या मिशनरी व्यवस्थापनानं त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. पुढे त्यांनी लैंगिक शिक्षण आणि संततीनियमन या कार्यासाठीच वाहून घेतलं. समाजस्वास्थ्य या मासिकाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचं काम केलं. त्यांच्या पत्नी मालती कर्वे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. या कामाला वाहून घेतल्यामुळे या जोडप्यानं स्वतःला मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. मला आता नक्की आठवत नाहीये, पण मी कुठेतरी वाचलं होतं. स्वतः धोंडो केशव कर्वे मूल न होऊ देण्यासाठी तैलचिंधीचा वापर करायचे आणि ते त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं. आजही जिथे आपल्यासारख्या सुशिक्षित घरांमध्ये मुलांशी आपण या विषयावर मोकळेपणानं बोलत नाही तिथे १०० वर्षांच्याही पूर्वी असं सांगणं किती लोकविलक्षण आहे!
मामा वरेरकरांनी र. धों. कर्व्यांना मदत केल्याचे संदर्भ नाटकात येतात. एका प्रसंगात गांधीजींच्या ब्रह्मचर्याच्या विचित्र कल्पनांबद्दलही संदर्भ येतो. मी स्वतः गांधीवादी घरात मोठी झाले आहे. त्यामुळे गांधीजींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी प्रमाण असं मानणारी मी होते. पण आज वाढत्या वयानुसार आणि बदलत गेलेल्या समजुतींनुसार गांधीजींचे हे प्रयोग किती अघोरी होते याची जाणीव होते. म्हणून गांधीजींचं मोठेपण कमी होत नाही. पण आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचं त्याच्या गुणदोषासकट मूल्यमापन करताच येत नाही. ती चांगली किंवा वाईटच असते.
या नाटकात र. धों. वर अश्लिलतेच्या नावाखाली भरलेल्या तीन खटल्यांचा उल्लेख आहे. त्यापैकी एका खटल्यात खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं प्रतिनिधित्व केलं होतं. पहिले दोन्ही खटले कर्वे हरले. तिस-या खटल्यात त्यांनी वकील न घेता स्वतःच स्वतःची बाजू मांडली, तो खटला ते जिंकले.
नाटकात सगळ्यात महत्त्वाचा सहभाग आहे तो गिरीश कुलकर्णींचा. रघुनाथ कर्व्यांची देहबोली, त्यांचं संयत व्यक्तिमत्व, त्यांची संयमी भाषा, त्यांचा आपल्या कामाबद्दलचा ठामपणा हे सगळं कुलकर्णींनी फार सुरेख उभं केलं आहे. कुलकर्णींची स्वच्छ वाणी आणि उच्चार हे मला त्यांच्या या नाटकातल्या व्यक्तित्वासाठी फार महत्त्वाचे वाटले. मालतीबाई झालेल्या राजश्री वाड यांचा चढा सूर मला सतत खटकत राहिला.
अतुल पेठे आपल्या नाटकांमध्ये अनेक नवख्या कलाकारांना घेतात, ते स्तुत्यच. पण या नाटकात मात्र ते मला मारक ठरलंय असं वाटलं. याचं कारण भाषा आणि संवाद हे या नाटकासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि गिरीश कुलकर्णी वगळता इतर लोक याबाबतीत काहीसा रसभंग करतात.
नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं आहे ते नेहमीप्रमाणे उत्तम आणि सुबक आहे. संगीत, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाश या सगळ्या तंत्रिक बाजूही उत्तम आहेत. नाटकाची संहिता फारच सुरेख आहे आणि तेच या नाटकाचं बलस्थान आहे. आजच्या परिस्थितीचे संदर्भ घेत लिहिलेल्या संवादांनी नाटकाची खुमारी वाढते. नाटकाचा प्रयोगही खूप छान बसवलेला आहे, मला त्यातलं फार कळत नाही पण एक सुबक प्रयोग बघायला मिळतो.
लैंगिक स्वास्थ्य आणि त्या अनुषंगानं मानसिक स्वास्थ्य हे आजही खूप खूप महत्त्वाचे विषय आहेत. किंबहुना ते कायमच महत्त्वाचे राहणार आहेत. त्या विषयावर हे नाटक महत्त्वाचं भाष्य करतं. त्यामुळे हे नाटक प्रत्येकानं नक्की बघितलं पाहिजे.
इथे मुद्दाम उल्लेख केला पाहिजे तो गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८२ मध्ये लिहिलेल्या एका लेखाचा. त्यांच्या या लेखाचं शीर्षक होतं स्त्रीदास्य विमोचन. त्यात त्यांनी तीन मुद्दे मांडले होते. एक म्हणजे बायकांना स्वतंत्र अस्तित्व असून त्या फक्त मुलं जन्माला घालणारं यंत्र नाहीत. दुसरं म्हणजे २-३ मुलं ही कुठल्याही कुटुंबासाठी पुरेशी आहेत आणि तिसरं म्हणजे विज्ञानाची प्रगती होईल आणि लैंगिक सुखाचा आनंद घेणं, मुलं होण्याची भीती न घेता सहज शक्य होईल. हा लेख १३५ वर्षांपूर्वी लिहिलेला आहे हे लक्षात घ्यावं!

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s