वजनदार

आपण जसे आहोत तसं स्वतःला स्विकारणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. किंबहुना बहुतेकांना जमत नाही. कुरळे केस असलेल्यांना सरळ केस हवे असतात तर सरळ असलेल्यांना कुरळे. फार गोरा रंग असेल तर सावळी त्वचा आवडते आणि सावळा रंग असेल तर गोरेपणाचं आकर्षण असतं. मला आठवतंय, मला जेव्हा चष्मा लागला तेव्हा चष्मा असणं म्हणजे तुमच्यात काही न्यून आहे असं समजलं जायचं. त्यामुळे मी पहिली काही वर्षं चष्मा न लावता डोळ्यांना भरपूर ताण दिला. म्हणूनच माझ्या मुलींना चष्मा लागल्यावर त्यांच्या पसंतीचाच उत्तम चष्मा घ्यायचा असं मी मनोमन ठरवलं होतं, मग तो जरा महाग असेल तरी चालेल. कारण मी स्वतः अनेक वर्षं चष्मा असल्याचा न्यूनगंड बाळगून होते. निरंजनशी लग्न झाल्यावर माझा तो गंड गेला, रादर त्याच्या नकळत निरंजननं तो घालवला.

स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे हे खरंच (अर्थात नार्सिसिस्ट न होता!). आणि हेच वजनदार हा सिनेमा आपल्याला सांगतो. आपण आपल्या कुटुंबातल्यांना तसंच इतर अनेकांना वजनाशी झगडताना बघतो. काही दुकानांमधले कपडे बघून मला प्रश्न पडतो की हे नेमके कुणासाठी बनवतात, इतके ते काटेकोर मापाचे असतात. आजच्या काळात चवळीच्या शेंगेसारखं नसाल किंवा पुरूषांची 28 कंबर नसेल तर तुम्ही जाड असता. आपण कुणालाही भेटलो की आपल्या नकळत बारीक झालाय किंवा वजन वाढलंय याच वाक्यांनी सुरूवात करतो. मित्रमैत्रिणींच्या संभाषणात डाएट हा विषय असतोच. हे सगळं करताना आपण कधीतरी आयुष्यातला आनंद घालवून बसतो.

वजनदारमध्ये या सगळ्याची फार छान मांडणी आहे. सई ताम्हनकर मला दिवसेंदिवस जास्त आवडायला लागली आहे. ती दिसते सुंदरच पण कामही मस्त केलं आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि प्रिया बापट पण चांगले आहेत. माझं आवडतं पाचगणी आणि आवडतं प्रॉस्पेक्ट हॉटेल संपूर्ण सिनेमात असल्याचं मला फारच आवडलं. रिच लूक (श्रीमंती नव्हे) हे सचिनच्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. बरेच मराठी सिनेमे अनेकदा कंटेंट चांगला असूनही दरिद्री दिसतात तसं सचिनच्या सिनेमात होत नाही.

उणीव एकच. सिनेमाची सुरूवात जितकी सुरेख होते तितकी त्याची गती पुढे मंदावल्यासारखी वाटते. अघोरी प्रयत्न करून केल्या जाणा-या उपायांवर सिनेमात ठोस काही म्हटलं जात नाही. पण असं असलं तरी तो नक्की बघावासा आहे. उत्तम विषय, देखणी मांडणी, नयनरम्य लोकेशन, चांगलं संगीत ( प्रिया बापटनं गायलेलं ड्यूएट मस्त आहे) या सगळ्यामुळे सिनेमा सुखावह होतो.

सायली राजाध्यक्ष