बाबा आणि बापूकाका

आम्ही १९८२ मध्ये औरंगाबादला कायमचे राहायला आलो. बाबांची बरीच मित्रमंडळी औरंगाबादेत होती. शिवाय त्यांचं शिक्षण म्हणजे एम ए आणि लॉ औरंगाबादला झालं होतं. त्यामुळे बाबांना औरंगाबाद नवं नव्हतं, पण आमच्यासाठी ते सगळं नवं होतं. औरंगाबादला आम्ही नवीन उस्मानपु-यात राहायला लागलो. पहिल्याच दिवशी बाबा मला श्रेयनगरमधल्या त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले, सुधीर रसाळांच्या घरी.
मी बापूकाकांना आधी भेटले होते तेव्हा फार लहान होते त्यामुळे माझ्यासाठी ते नवीनच होते. काका तेव्हा विद्यापीठात जायच्या तयारीत होते. मला पक्कं आठवतंय काका कांदा टोमँटोची कोशिंबीर करत होते, सोनल शाळेत निघाली होती तिच्यासाठी. एका बाजूला त्यांच्या आणि बाबांच्या गप्पा सुरू होत्या आणि खळखळून हसणंही.


त्यानंतर बापूकाकांच्या घरी जाणं किंवा त्यांनी आमच्या घरी येणं हा शिरस्ताच बनून गेला. अर्थात बाबांच्या स्वभावानुसार बाबाच जास्त रसाळांच्या घरी जात असत. त्यांच्याबरोबर आम्हीही. बाबांची आणि बापूकाकांची मैत्री ही फक्त एकमेकांशी नव्हती तर सगळ्या कुटुंबाशी होती. रसाळांच्या घरी गेलं की बापूकाका स्वतः उठून बाबांना हवा तसा चहा करून देत, वरून साय घालून. ते चहा करताना बाबा डायनिंग टेबलाशी बसून गप्पा मारायचे.
नंतर आम्ही अनेक प्रवास बरोबर केले. बाबांची प्रवासात फार शिस्त असायची. रस्त्यावरचे पदार्थ ते आम्हाला खाऊ देत नसत. मग बाबा जरा पुढे गेले की काका आम्हाला खायला घालायचे. इंदौर प्रवासात रस्त्यावर फिरताना गोड मटार खायची किंवा आग्र्याला रस्त्यावरच्या लहान टपरीत खाल्लेली साजूक तुपातली पुरी भाजी या गोष्टी बापूकाकांमुळेच आठवतात.
ते स्वतः उत्तम स्वयंपाक करतात. माझं लग्न झाल्यावर मी माहेरी आले की कधीतरी मला जेवायला बोलावून तव्यावरचं खरपूस पिठलं किंवा थालिपीठं, त्यांची स्पेशल बासुंदी किंवा श्रीखंड करायचे.
आम्ही जे अनेक प्रवास बरोबर केले त्यातला एक लक्षात राहिलेला प्रवास म्हणजे आम्ही वाई-महाबळेश्वरला केलेला प्रवास. त्या प्रवासात बाबा आणि बापूकाकांच्या प्रतिभेला बहर आला होता. पुण्यापासून ते वाईपर्यंत दोघांच्या जणू कवितांच्या भेंड्या चालल्या होत्या. दोघेही उत्स्फूर्त कविता करत होते. एकजण थांबला की ताबडतोब दुसरा सुरू करायचा. अशी जुगलबंदी तब्बल तीन तास चालली होती.
बाबा आणि बापूकाकांच्या स्वभावात खूप फरक आहे. दोघांचीही विनोदबुद्धी अतिशय तरल. आम्ही एकत्र जमलो की एकमेकांची चेष्टा करण्याची, फिरकी घेण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. बापूकाका घरात काम करतात, कुटुंबियांसाठी वेळ देतात, नातवंडांना सांभाळतात म्हणजे वेळेचा अपव्यय करतात असं बाबांना ठामपणे वाटायचं, ते त्यावरून बापूकाकांना बोलायचे. काका शांतपणे, कुठलंही प्रत्युत्तर न देता ऐकून घ्यायचे. कारण आपण जे करतो ते बरोबर आहे अशी त्यांची धारणा होती आणि माझ्या मते ती बरोबर होती. असं असलं तरी दोघांच्या संबंधात कधीही कटूपणा आला नाही.
रोज संध्याकाळी काकांच्या घरी गेल्याशिवाय बाबांना चैन पडत नाही. गेले जवळपास ३५ वर्षं हा शिरस्ता सुरू आहे. त्याआधी पंचवीस वर्षं ते एकमेकांना ओळखत होते. म्हणजे गेली साठ वर्षं ते एकमेकांना ओळखतात. काका बाबांचे एम एला शिक्षक होते. म्हणून बाबा त्यांना गुरू म्हणतात. त्यावर या शब्दात मला निंदेचा वास येतो असं बापूकाका मिस्किलपणे म्हणतात.
या दोघांच्या मैत्रीला साठ वर्षं झाली म्हणून दोघांच्या कुटुंबियांनी मिळून आज औरंगाबादेत एक गेटटुगेदर केलं. दोन्ही कुटुंबं आणि अगदी जवळची मित्रमंडळी यावेळी उपस्थित होती. बाबा आणि काका एकत्र बसून एकमेकांबद्दल बोलले. आधी कुठलीही तयारी न करता ते दोघे इतक्या ताळमेळानं बोलत होते की ऐकणारा थक्क व्हावा. दोघांची विनोदबुद्धी, एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या, एकमेकांना काढलेले चिमटे, एकमेकांचं केलेलं कौतुक आणि एकमेकांविषयी व्यक्त झालेलं प्रेम यातून हा कार्यक्रम अतिशय रंगला.
आवर्जून आलेले सगळे मित्रही या सगळ्या मजेत आनंदानं सहभागी झाले होते. मधूनमधून माझ्या डोळ्यात मात्र पाणी येत होतं. एकमेकांना इतकं समजून घेऊन आणि सर्वार्थानं एकमेकांना स्वीकारून जतन केलेली मैत्री बघायलासुद्धा नशीबच हवं नाही का…

सायली राजाध्यक्ष