रस्किन बाँडचं लँडोर

लँडोर. अनेक वर्षं या गावाचं नाव ऐकत होते. रस्किन बाँड इथे राहतात असं वाचत होते. मराठी माध्यमात शिकल्यामुळे इंग्रजी वाचन फारसं नाहीच. त्यामुळे खरं सांगायचं तर रस्किनचं काहीच वाचलेलं नव्हतं. इंग्लंडला जाऊन राहिल्यावर भारताची आठवण येतच राहिली म्हणून ते कायमचे परतले हे माहीत होतं. एखाद्या गावात, जागेत असं काय असतं की माणसाला तिथेच परतावंसं वाटतं? आपलं गणगोत मागे सोडून यावंसं वाटतं? आपली भाषा, आपली संस्कृती सोडून परकी भाषा, संस्कृती आपलीशी कराविशी वाटते? मला हे प्रश्न नेहमी पडतात.


काही चित्रपटांमधून रस्किनची ओळख झाली होती. जुनून, सात खून माफ आणि ब्लू अम्ब्रेला या चित्रपटांची कथा रस्किनचीच. सात खून माफमध्ये तर त्यांनी एक छोटीशी भूमिकाही केलेली आहे.
गेल्या वर्षी शर्वरीची एक मैत्रीण लँडोरला जाऊन आली तेव्हापासून तिच्या मनात लँडोरला जायचं होतं. शर्मिलानं यावर्षी लोकमत दीपोत्सवसाठी रस्किनची मुलाखत घेतली आहे. त्यासाठी ती खास लँडोरला आली होती. तिचा लोकमतमधला अतिशय तरल लेख वाचल्यावर मी तर लँडोरला जायचंच असं ठरवलं.
लँडोरला डिसेंबरमध्ये जायचं या कल्पनेनं निरंजनला मुंबईतच थंडी भरली. पण त्याला मनवून अखेर लँडोरचं बुकिंग केलं. ऑफ सीझनमध्ये आल्यामुळे अतिशय शांतपणे सुटी घालवता आली.
गेली १७ वर्षं रस्किन बाँड दर शनिवारी दुपारी दोन तास मसुरीच्या केंब्रिज बुक हाऊसमध्ये येऊन बसतात. चाहत्यांना स्वाक्षरी देतात. त्यांच्याबरोबर फोटो काढतात. आम्ही या ट्रीपची आखणी करतानाच त्यात शनिवार येईल असं बघितलं होतं.
आज दुपारी सव्वा तीनलाच आम्ही केंब्रिज बुकहाऊसच्या बाहेर चाहत्यांच्या रांगेत उभे राहिलो. बरोबर ३.३० ला रस्किन बाँड आले (ब्रिटिश सवय!). रांग हळूहळू पुढे सरकायला लागली. आमचा नंबर आल्यावर निरंजननं त्याच्या आईसाठी आणि सावनी-शर्वरीसाठी तीन पुस्तकांवर सही घेतली. मी शर्मिलाचा संदर्भ सांगितला तेव्हा त्यांनी अंक मिळाल्याचं सांगितलं आणि माझेच आभार मानले!
८३ वर्षांच्या या गोड म्हाता-याला भेटून छान वाटलं. भारतालाच आपला देश मानणा-या रस्किनचं गणगोत आता इथेच आहे. खास ब्रिटिश सभ्यता, मृदु बोलणं आणि गोड हसणं हे सारं लोभसच.

 

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s