मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर

मी सध्या औरंगाबादेत आहे. काल आल्यावर रात्री झोपायच्या आधी काही वाचायला शोधत होते. तेव्हा आपले जगचा एक जुना अंक दिसला. मुकुंदराव किर्लोस्कर गेल्यानंतर त्यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त काढलेला अंक. अंक वाचत गेले आणि मुकुंदरावांच्या आठवणी जाग्या होत गेल्या. अंकात त्यांचे वडील शंकरराव, शांताबाई, त्यांची बहिण मालती किर्लोस्कर, सुधीर गाडगीळ,हेमा श्रीखंडे आदींचे लेख आहेत. शिवाय मुकुंदरावांचं एक संपादकीय, त्यांची काही पत्रे आणि अर्थातच त्यांनी काढलेले कित्येक फोटोही.

माझे बाबा कॉलेजमध्ये असताना किर्लोस्करनं ‘ संयुक्त महाराष्ट्रासाठी मी काय करू इच्छितो’ या विषयावर एक लेख स्पर्धा घेतली होती. त्यासाठी बाबांनी पाठवलेल्या लेखाला पहिलं बक्षीस मिळालं. मुकंदरावांचं त्यांचं अभिनंदन करणारं पत्र आलं. त्यानंतर लक्ष्मणराव किर्लोस्कर गेल्यावर बाबा मुकुंदरावांना भेटायला त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या मैत्रीची सुरूवात झाली.प्रभाकर उर्ध्वरेषे हे मुकुंदरावांचे अगदी जवळचे मित्र, बाबांचा त्यांच्याशी परिचय होता. हळूहळू या तिघांच्या गाठीभेटी व्हायला लागल्या आणि बाबा किर्लोस्कर परिवारातलेच झाले. स्त्री, किर्लोस्कर आणि मनोहर या तिन्ही नियतकालिकांसाठी बाबांनी खूप लिहिलं. शिवाय या नियतकालिकांच्या संपादकीय बैठकांनाही अनेकदा हजेरी लावली.

मी अगदी लहान असल्यापासून आम्ही पुण्याला गेलो की, एरंडवणा (आता एरंडवन म्हणतात) भागातल्या मुकुंदराव-शांताबाईंच्या संपादन या बंगल्यात उतरायचो.  अतिशय अभिरूचीपूर्ण असं हे घर मला फार आवडायचं.आम्ही तेव्हा बीडला होतो. बीडच्या मानानं आमचं घर उत्तमच होतं. पण तरीही इतक्या सोफिस्टिकेटेड पध्दतीनं सजवलेलं हे घर मला भारावून टाकत असे. त्यांच्या मोठ्या हॉलमध्ये मुकंदरावांच्या आईनं विणलेले अप्रतिम देखावे फ्रेम करून लावलेले होते. ते पाहताना खरोखर एखाद्या चित्रकारानं जणू चित्रच काढलंय असं वाटे. त्यांच्या हॉलला लागून असलेल्या छोट्याशा व-हांड्यात सकाळचा चहा होई. हा चहा एका ट्रॉलीवरून येई. किटली आणि सुरेखशी क्रॉकरी, खरपूस भाजलेले, लोणी लावलेले टोस्ट असत. मला ते सगळं फारच नवलाईचं वाटे. शांताबाईंकडचं जेवणही अतिशय रूचकर असे. हातसडीच्या तांदळाचा वाफाळता भात, गोडसर आमटी-भाजी, कोशिंबीर आणि गरम फुलके. त्या अगदी साध्या पण गरमागरम जेवणाची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. मला वाटतं मी नववी-दहावीत असेन. एकदामी त्यांच्याकडेच उतरले होते. आंघोळीनंतर पंचा वाळत घालायचा होता. त्यांच्याकडे कपडे खूप वरती काठीवर वाळत घातलेले होते. मला काठीनं कपडे वाळत घालता येत नव्हते. मी त्यांच्याकडे काम करणा-या बाईला सांगितलं. शांताबाईंनी ते ऐकलं आणि स्वतः येऊन मला काठीनं कपडे कसे वाळत घालायचे ते दाखवलं. प्रत्येक काम करता आलं पाहिजे असं त्यामला म्हणाल्या.  त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर पाहुण्यांसाठीची खोली होती. त्या खोलीतल्या चेस्ट ऑफ ड्रॉवर्समध्ये अनेक उत्तम उत्तम पुस्तकं आणि मासिकं ठेवलेली असायची, ही मला मोठी चंगळ वाटायची.

मुकुंदराव आणि शांताबाई आमच्या बीडच्या आणि नंतर औरंगाबादच्या घरातही अनेकदा राहायला आले. ते जेव्हा आमच्या घरी राहात तेव्हा त्या दोघांचंही वागणं अतिशय साधं असे. त्यात कुठलाही बडेजाव नव्हता. माझ्या भावाच्या बारशाला शांताबाई बीडला आल्या होत्या. तेव्हा आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी त्यांनी त्यावेळी नवलाईच्या असलेल्या रंगीत काचेच्या बरण्या आणल्याचं मला आठवतंय.  शांताबाईंचा काहीसा हस्की आवाज आणि मुकंदरावांचा अगदी शांत स्वर अशा रंगलेल्या गप्पाही आठवताहेत. मुकंदरावांनी काढलेले किती तरी फोटो आहेत. अगदी माझं आणि निरंजनचं लग्न ठरल्यावरचाही एक फोटो आहे. मुकंदरावांनी लिहिलेली काही पत्रं आमच्याकडे अजून आहेत. मी एम.ए. ला पहिली आल्यानंतर त्यांनी मला अभिनंदनाचं पत्र लिहिलं होतं तेही माझ्याकडे आहे.

माझं लग्न ठरलं तेव्हा मी आणि निरंजन जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा शांताबाईंनी चांदीच्या ताटांत आम्हाला केळवण केलं होतं. लग्नानंतर माझं पुण्याला जाणं कमी झालं. तरीही मी एक-दोनदा दोघांना भेटायला गेले होते. ते दोघेही थकायला लागले होते म्हणून बाबाही नंतर त्यांच्या घरात न उतरता बाहेर उतरायला लागले. नंतर शांताबाईंना अल्झायमर झाला. त्यातच त्या गेल्या. शांताबाईंसारख्या इतक्या तीक्ष्ण बुध्दीच्या बाईला अल्झायमर व्हावा ही कल्पनाच सहन करवत नव्हती. मुकंदरावही नंतर थकत गेले. त्यांच्या पुण्यातल्या दोन्ही मुली त्यांची उत्तम व्यवस्था बघत. पण ते बंगल्यात काही सहायकांसह एकटेच राहात असत.दोन वर्षांपूर्वी मुकंदरावही गेले. आता पुण्याला गेल्यावर त्या रस्त्यावरून जाताना त्यांच्या घराकडे बघायचा धीर होत नाही.

काल आपले जगचा अंक बघितला,त्यातले लेख वाचले आणि हे सगळं मनात येत गेलं.

सायली राजाध्यक्ष