माझे आजी-आजोबा

माझी आजी जाऊन आज सहा वर्षं झाली. आजीचं खूप वय झालं होतं. गेली तेव्हा ती ९४ वर्षांची होती पण तरीही वयाच्या मानानं तल्लख होती. त्या वयातही तिचे बरेचसे दात शाबूत होते. लहानपणापासून आजी-आजोबांचा सहवास मला सगळ्यात जास्त मिळाला. घरातलं पहिलं नातवंड असल्यानं माझ्या लहानपणी आजी-आजोबा चांगलेच चालते-फिरते होते. त्यामुळे ते दोघे सगळीकडे मला बरोबर घेऊन जात असत, अगदी प्रवासालाही. म्हणून माझ्या भावंडांपेक्षा सगळ्या नातेवाईकांना मी जास्त ओळखते. आम्ही जेव्हा बीडला होतो तेव्हा आजीबरोबर मी मंडईत जायचे. चांगली भाजी कशी पारखायची हे तिनंच मला शिकवलं. आजोबा गांधीवादी असल्यानं राहणी अगदीच साधी होती. अगदी साधं जेवण, साधे कपडे. आजीकडे फारसे दागिने असल्याचंही मला आठवत नाही. फक्त पाटल्या आणि मंगळसूत्र असं ती घालायची. सणावाराला एक चपलाहार, इतकेच दागिने तिच्याकडे होते. आजी-आजोबांचं मिळून एक चार फूट उंचीचं लाकडी कपाट होतं. त्यातच दोघांचे सगळे कपडे मावायचे. हैदराबाद मुक्तीसंग्रामात आजोबा दीड वर्षं तुरूंगात होते तेव्हा आजीनं घर कसं चालवलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. शिवाय माझ्या आजोबांच्या धाकट्या भावाची मुलंही आजीनंच मायेनं वाढवली. कारण या मुलांना सावत्र आई होती, आणि ती गोष्टीतल्या सावत्र आईसारखीच खाष्ट होती. त्यामुळे माझे हे सगळे काका आणि आत्या आजीलाच आई म्हणत असत.
नंतर वयोपरत्वे आजी-आजोबा बीड सोडून आमच्याकडे औरंगाबादला आले. सगळं मागे सोडून येताना त्यांना फार जड गेलं असणार पण दोघांनीही त्याचा कधीही उच्चारही केला नाही. दोघांनीही आपापल्या परीनं जीव रमवला. आजीचे आई-वडील ती लहान असतानाच गेले होते, तिला एकच भाऊ. तोही नंतर टीबीनं गेला. त्यामुळे तिला माहेरच नव्हतं. आजोबांनाही आई आणि धाकटा भाऊ सोडले तर इतर सख्खे नातेवाईक नव्हते. त्यामुळे दोघे एकमेकांशी अक्षरशः एकरूप झालेले होते. आजोबा कायमच अतिशय तंद्रीत असायचे. जेवताना दही भात कालवला की, आजी त्यांना रागावून सांगायची, अहो भाताला मीठ लावा. आजोबा पाणी प्यायला विसरायचे म्हणून मधूनमधून पाण्याचा पेला त्यांच्याजवळ आदळायची आणि म्हणायची, हं, आता पाणी प्या. गंमतीची गोष्ट म्हणजे तिनं सांगितलेलं हे सगळं आजोबा निमूटपणे ऐकायचे.
आजीला फार लवकर ऐकू येईनासं झालं. मला वाटतं तेव्हा ती जेमतेम पन्नाशीत असेल. आजोबांनी आणि बाबांनी जमतील ते सगळे उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. पण ऐकू येत नाही म्हणून तिनं कधी आक्रस्ताळेपणा केल्याचं मला आठवत नाही. आम्ही सगळे जमायचो तेव्हा गप्पांना नुसता ऊत यायचा, आम्ही खिदळत असायचो. आजी तिथे बसलेली असायची, आम्ही हसलो की तीही हसायची पण तिनं कधीही विचारलं नाही की तुम्ही काय बोलताय. आम्ही तिच्या कानाशी जाऊन सांगायचो पण ती कधीच अधीर नसायची. तिला मी गंमतीनं म्हणायचे की, तुझ्याबद्दल बोलतोय. त्यावर ती हसून म्हणायची, बोला, तुम्ही काय बोलताय हे तुम्हीच मला येऊन सांगणार आहात. तिला हा विश्वासही होता. नंतरच्या काळात तिला अजिबातच ऐकू येईनासं झालं, मग दुपारी घरात सामसूम झाल्यावर आजी-आजोबा त्यांचं जे काही खाजगी असेल ते बोलायचे. अर्थात ते इतकं जोरात असायचं की ते जे कुणी घरात असेल त्याला ऐकू यायचंच. एकदा माझ्या आत्याचे यजमान आले होते. आजोबांनी त्यांना सांगितलं की आता आम्ही जे काय बोलणार आहोत ते खाजगी आहे. त्यामुळे तुम्हाला ते ऐकू आलं तरी ऐकू न आल्यासारखं दाखवा! आजोबा कधी तंद्रीत असले आणि त्यांना ऐकू आलं नाही की आजी वैतागायची, यांना ऐकूच येत नाही असं म्हणायची. आजोबा मला जवळ बोलावून हसत म्हणायचे, कोण कुणाला बोलतंय ते बघ. आजोबा जेव्हा खूप थकले तेव्हा त्यांना बिछान्यावरून उठण्याचेही श्रम होईनात. या काळात आजी-आजोबा काकांकडे राहात होते. काकांनी त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली होती. पण मला होईल तोपर्यंत आजोबांना मीच पॉट देणार असा आजीचा आग्रह असायचा.
अखेरच्या काळात आजीला नऊवारी नेसणं कष्टाचं व्हायला लागलं. मग आईनं तिला गाऊन आणले. माझ्या बहिणीला मेघनला तिनं एकदा बोलावलं आणि ती म्हणाली की, आता सोय म्हणून हे ठीक आहे पण मी गेल्यावर मला नऊवारी साडी नेसवा हं. कुठली साडी नेसवायची हेही तिनं तिला दाखवून ठेवलं होतं. आजीचे अंत्यसंस्कार झाल्यावर मी औरंगाबादला पोहोचले. पण एका अर्थी मी तिला तसं बघितलं नाही याचं मला कुठेतरी बरंच वाटतं. त्यामुळे आजीची ही जिवंत प्रतिमाच माझ्या मनात आहे.

सायली राजाध्यक्ष