मंगेश विट्ठल राजाध्यक्ष

भाईंना, माझ्या सास-यांना जाऊन आज पाच वर्षं झाली. माझं लग्न ठरलं तेव्हा ती मी औरंगाबादला दैनिक मराठवाड्यात काम करत होते. माझं लग्न मंगेश विट्ठल राजाध्यक्षांच्या मुलाशी ठरलंय हे कळल्यावर जयदेव डोळेंनी मला विचारलं होतं, “काय गं शालजोडी वाचलं आहेस का? काय अप्रतिम शैली आहे तुझ्या सास-यांची. अगदीच वेगळी.” तोपर्यंत मी भाईंचं काहीही वाचलं नव्हतं फक्त पु. ल. देशपांड्यांच्या लिखाणात त्यांचा उल्लेख वाचला होता. आणि नंतर नेहरूंनी त्यांच्या इंग्रजीचं कौतुक केल्याचं, त्यांना वर्डस्वर्थ पारितोषिक मिळाल्याचंही ऐकलं.
मी निरंजनला भेटायला आले तेव्हा आम्ही साहित्य सहवासात वा. ल. कुलकर्ण्यांच्या घरी उतरलो होतो. संध्याकाळी आमचं घर बघायला या असं मावशीनं, माझ्या सासुबाईंनी सांगितलं होतं. तसे आम्ही संध्याकाळी राजाध्यक्षांच्या घरी गेलो. ती माझी भाईंशी झालेली पहिली भेट. साधा कुडता आणि लुंगी अशा वेशातले भाई अगदी सौम्य, हसरे असे होते. अतिशय शालीनतेनं बोलणारे. मराठवाड्यात असे मुलीकडचे लोक भेटायला आल्यावर फारसं स्वागत करण्याची पध्दत तेव्हा तरी सर्रास नव्हती. त्यामुळे हे नवलाईचंच होतं.


लग्नानंतर मी राजाध्यक्षांच्या घरी आले. माझी घरात निरंजनच्या खालोखाल, सगळ्यात जास्त मैत्री झाली ती माझ्या सासुबाईंशी. भाई हे खूप प्रेमळ होते. पण तरी मला त्यांच्याशी वागताना थोडंसं अंतर जाणवायचं. आता विचार केल्यावर वाटतं की ते जरी माझे सासरे होते तरी वयानं ते माझ्या आजोबांच्या वयाचे होते. त्यामुळे त्यांच्याशी नक्की कसं वागावं असा प्रश्न मला पडायचा. भाईंच्या रूटीनला एक शिस्त होती (बाकी त्यांना कधीही, कसलीही शिस्त आवडली नाही!) सकाळी उठल्यावर ते घरातल्या सगळ्यांचा चहा करायचे, ते जवळपास नव्वद वर्षांचे होईपर्यंत ते रोज सकाळचा चहा करत. नंतर ते फिरायला जायचे. फिरून आल्यावर दोन टोस्ट आणि जॅम हा त्यांचा ठरलेला नाश्ता होता. मग निवांत पेपर वाचन. जेवणानंतर थोडी विश्रांती. मग परत वाचन. संध्याकाळचं फिरणं. आल्यावर ठरलेलं अर्ध्या पेगचं ड्रिंक. रात्री वेळेवर झोपणं. या सगळ्याबरोबरच अतिशय शांत, समजुतदार स्वभाव. मला वाटतं हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असावं.
निरंजन सांगतो की भाईंनी तिघाही मुलांवर कधीही हात उगारला नाही की आवाज चढवला नाही. तो म्हणतो, पण म्हणूनच त्यांचं मन दुखवावं किंवा त्यांच्या मनाविरूध्द वागावं असं एकदाही वाटलं नाही. मुलांना एखादी गोष्ट योग्य-अयोग्य का हे ते समजावून सांगायचे पण नंतर परत त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करायचे नाहीत. मुलांवर त्यांचा इतका जीव होता की, आमच्या लग्नानंतरही ते फिरायला गेले की निरंजनसाठी चॉकलेट्स आणायचे! राधाला आवडतात म्हणून कच्चे पेरू आवर्जून आणायचे. घरातली खरेदी पुरूषांनी करायची असा सारस्वतांच्या घरातला अलिखित नियम असतो. भाईही त्याला अपवाद नव्हते (निरंजन मात्र आहे!). निरंजन सांगतो की लहान असताना तो भाईंबरोबर भाजी आणि इतर सामानाच्या खरेदीसाठी जायचा. मग परतताना दादरच्या शोभा रेस्टॉरंटमध्ये मसाला डोसा आणि पियूष अशी मेजवानी त्याला मिळायची. भाई रिटायर झाल्यावर मावशी बरीच वर्षं कार्यरत होती. ती कामासाठी बाहेरगावी जायची. ती परत येणार असेल तेव्हा भाई स्वतः खोली नीटनेटकी करत असत. सगळं छान आवरून ठेवत असत.
निरंजन आणि भाईंची विशेष मैत्री होती. रोज संध्याकाळी भाई ड्रिंक घ्यायचे तेव्हा तिथे बसून गप्पा मारणं हा आमच्या घराचा परिपाठ होता. निरंजन रोज त्यांना दिवसभरात काय झालं याबरोबरच काय वाचतो आहे याबद्दल तर सांगायचाच पण त्यांच्या गप्पांचा खास जिव्हाळ्याचा विषय म्हणजे क्रिकेट. एकूण साहित्य सहवासातले लोकच क्रिकेटवेडे आहेत आणि आमच्या घरातले तर दुप्पट क्रिकेट वेडे. त्यामुळे मुक्ता, निरंजन आणि भाई हे सतत क्रिकेटबद्दल बोलायचे. मग अगदी १९३० च्या दशकातल्या सामन्यांपासून ते अगदी अलिकडच्या सामन्यांपर्यंत बोलणं सुरू असायचं. नवीन पुस्तकं, नवीन लेखक, नवीन प्रवाह याबद्दल त्यांना आणि मावशीलाही कायम आपुलकी होती. त्यांना मी कधीच आमच्याकाळी असं होतं असं म्हणताना ऐकलं नाही.
पु. ल. देशपांडे, द. ग. गोडसे, शांताराम सबनीस, शा. शं. रेगे, कवी अनिल, दीनानाथ दलाल हे भाईंचे खास मित्र. आमच्याकडे नेहमी या मित्रमंडळींच्या मैफली रंगायच्या (मला त्या बघायला मिळायला नाहीत याची मला कायम खंत राहणार आहे). भाईंना वेगवेगळ्या प्रकारचं खायला खूप आवडायचं. पुस्तकं आणि वाचन हा तर जीव की प्राण. शिवाय रेल्वे हा त्यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय. निरंजन आणि त्यांच्या रेल्वेवरही खूप गप्पा रंगायच्या. निरंजनच्या दर वाढदिवसाला त्यांनी आणि मावशीनं दिलेली कित्येक पुस्तकं आमच्या संग्रहात आहेत.
लहान मुलांबद्दलचं अतोनात प्रेम हाही आमच्या घराचा एक खास गुणविशेष. त्यामुळे कॉलनीतली लहान मुलं सतत आमच्या घरी असायची. पाटलांची नात गागी आणि पुरोहितांची नात संजना या तर अगदी खास लाडक्या. या दोघीही भाईंना औषधं देण्याचं काम मोठ्या आवडीनं करायच्या. संजना भाईंना आणि मावशीला गोष्टी सांगायला लावायची.
नव्वद वर्षांचे होईपर्यंत भाईंची तब्येत अगदी उत्तम होती. पण नंतर ते घरातच पडले आणि त्यांचं हिप रिप्लेसमेंट करावं लागलं. या ऑपरेशननंतर ते काहीसे अबोल झाले. मधेमधे असा काळ होता की ते दिवसेंदिवस कुणाशीही बोलायचे नाहीत. तोपर्यंत आम्हीही स्वतंत्र राहायला लागलो होतो. पण निरंजन रोज संध्याकाळी जाऊन त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करायचा. पण कधीकधी ते नुसते बसून असायचे. मग एकदा निरंजननं त्यांना एक चिठ्ठी लिहून दिली. इंग्रजीत लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यानं मुद्दाम काही तरी चूक ठेवली होती. भाई त्याच्याशी काही बोलले नाहीत पण खुणेनं त्यांनी पेन मागितलं आणि ती चूक दुरूस्त केली! असंच एकदा मुलींच्या प्रोजेक्टसाठी काही मराठी कवींच्या फोटोंचे प्रिंटआउट काढले होते. त्यांना ते दाखवल्याबरोबर त्यांनी भराभर नावं सांगितली. बोरकरांचा फोटो दाखवल्यावर निरंजन त्यांना म्हणाला, ‘He was your friend na?’ त्यावर भाई म्हणाले, ‘He was a good acquaintance but not a friend.’
म्हणजे त्यांची विनोदबुध्दी आणि स्मरणशक्ती दोन्ही शाबूत होतं पण त्यांना काहीसं डिप्रेशन आलं होतं. मग हळूहळू त्यांना कॅरम खेळायला प्रवृत्त केलं आणि ते त्यातून बाहेर आले. त्या वयातही ते तासनतास उत्तम कॅरम खेळत असत आणि जिंकतही असत. शेवटची काही वर्षं माझी आणि भाईंची जरा जास्त जवळीक झाली. आम्ही दोघे रोज संध्याकाळी त्यांना भेटायला जायचो. ते वाट बघत असायचे. मी गेले की माझा हात हातात घेऊन बसायचे. तू जाऊ नकोस म्हणायचे. कधी निरंजन एकटा गेला की, मी का आले नाही हे विचारायचे. कधी नाव आठवलं नाही तर ती रे, तुझ्याबरोबर येते ती, खूप बोलते ती असंही म्हणायचे! मी त्यांना बरेचदा सकाळचा नाश्ता पाठवत असे त्याचं आवर्जून कौतुक करायचे. ते त्यांना बरोबर लक्षात राहायचं.
शेवटी शेवटी मात्र ते कंटाळले होते. वॉर्डबॉईज ठेवणं भाग होतं. त्यामुळे ते ठेवले होते. भाईंना आतून ते कुठेतरी आवडायचं नाही. त्यांना वाटायचं की आपल्याला कुणीतरी अडकवून ठेवलंय. मग निरंजनकडे तक्रार करायचे. पण मुख्य बाब म्हणजे त्यांना कसलाही आजार नव्हता. फक्त वय हाच भाग होता. शेवटचे पंधरा दिवस सोडले तर ते एकदम चांगले होते. ते गेले तेही झोपेत शांतपणे.
ते त्यांचं आयुष्य अगदी शांतपणे, समाधानानं जगले. कुणाशीही कसली स्पर्धा नाही की कुणाबद्दलही कसली असूया नाही. ते गेल्यावर कुमार केतकरांनी लोकसत्तेत अग्रलेख लिहिला होता , ज्याचं शीर्षक होतं पुराणपुरूष, मला वाटतं तेच त्यांचं यथार्थ वर्णन आहे.

सायली राजाध्यक्ष