फिडेलचा मृत्यू आणि साम्यवाद

कम्युनिझम किंवा साम्यवाद ही अशी विचारसरणी आहे की जी कालानुरूप कालबाह्य ठरत गेली, तिच्यातला फोलपणा सिद्ध होत गेला तरीही अजूनही लोकांना या विचारसरणीबद्दल कमालीचं आकर्षण आहे. कम्युनिझम किंवा साम्यवादी राज्यपद्धतीचा स्वीकार करणारं पहिलं राष्ट्र रशिया. त्यानंतर जगातल्या अनेक देशांनी या राज्यपद्धतीचा स्वीकार केला. साम्यवादी राज्यपद्धती असलेल्या अनेक देशांमध्ये वस्तुतः हुकूमशाहीच होती. या विचारसरणीमुळे भारून गेलेल्या अनेकांचा पुढे काळाच्या ओघात भ्रमनिरासच झाला. ज्या देशांमध्ये अनेक वर्षं कम्युनिस्ट राजवटी होत्या तिथे गरीबी, लाचखोरी, नागरिकांवरचे अत्याचार, राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार अशा गोष्टी सर्रास घडल्या. आणि एका देशात नव्हे तर बहुतेक सर्व देशांमध्ये. पण असं असलं तरी या विचारसरणीला मानणारे लोक याकडे कानाडोळा करतात. भारतातले कम्युनिस्ट तर त्यात अग्रभागी आहेत. साम्यवादाबद्दल आपला भ्रमनिरास झाला हे कबूल करणारी कुमार केतकरांसारखी एखादीच व्यक्ती. नाहीतर इतर वेळी अतिशय तर्कशुद्ध बोलणारे कम्युनिझमवर बोलण्याची वेळ आली की त्यांना काय होतं कोण जाणे.


ज्या रशियानं कम्युनिझमचा सर्वप्रथम स्वीकार केला. त्या रशियात स्टॅलिननं अनन्वित अत्याचार केले. पुढे या राज्यपद्धतीतला फोलपणा कळून चुकल्यावर रशियानं ती नाकारली आणि सोविएत रशियाचं विभाजन झालं. चीनमध्येही माओच्या काळापासूनच नागरिकांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार हे सातत्यानं सुरूच राहिलेलं आहे. माओच्या ग्रेट लीपच्या काळात ३ कोटी लोक मरण पावले. तिएनामेन चौकातलं विद्यार्थी आंदोलन किती निष्ठुरपणे चिरडून टाकण्यात आलं ते तर सगळ्यांनाच आठवत असेल. आज हा देश कम्युनिस्ट आहे तो फक्त लोकांवर बंधनं घालण्यापुरता. वास्तवात भांडवलशाहीला पर्याय नाही हे या देशानं मान्य केलेलं आहे. म्हणूनच नावापुरता का होईना पण तो साम्यवाद टिकवून आहे. उत्तर कोरियाचं उदाहरण तर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. पॉल पॉट सारखा कंबोडियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा साम्यवादाचाच पुरस्कर्ता. काल या विषयावर बोलत होतो तेव्हा निरंजननं एक वाक्य सांगितलं, ते कुणाचं आहे ते त्याला आठवत नव्हतं. पण लोकांच्या स्थलांतरावरून काय योग्य आहे ते ठरवावं अशा आशयाचं ते वाक्य होतं. जर्मनीचं विभाजन झालं असताना लोक पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत पळून जात होते. पश्चिम जर्मनीतून पूर्व जर्मनीत नव्हे. त्यामुळे काय योग्य आहे हे लोकांच्या या कृतीवरूनच कळून येतं अशा आशयाचं ते वाक्य होतं.
हे सगळं लिहायचं कारण म्हणजे फिडेल कॅस्ट्रो गेल्यानंतरच्या लोकांच्या प्रतिक्रिया. लाल सलाम वगैरे. फिडेल कॅस्ट्रो जेव्हा सत्तेवर आला तेव्हा क्यूबाला खरोखर नवीन नेत्याची गरज होती. त्या आधीच्या हुकूमशहा बाटिस्टानं लोकांचा छळ चालवला होता. त्यामुळे क्यूबातली क्रांती ही काळाची गरज होती. पण पुढे काय झालं? कॅस्ट्रो हुकूमशहा बनला. अनेक वर्षं क्यूबावर निरंकुश सत्ता गाजवली. मध्यंतरी मी वाचलं होतं की त्याच्या मुलीलाही जीवाची भीती वाटत होती. कॅस्ट्रोनं देशाची वाट लावली. गरीबी, भ्रष्टाचार, अत्याचार, हत्या हे सगळं क्यूबामध्ये होतं आणि आहे. त्यामुळे क्यूबा हे नंदनवन होतं असं समजायचं कारण नाही. काल आनंद करंदीकरांचा लोकसत्तेत लेख आहे. त्यात फिडेलनं त्यांना कसं प्रभावित केलं त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. त्यात त्यांनी एक प्रसंग लिहिला आहे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी आपण मराठवाड्यात गेलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. तेव्हा नोकरी कशी सोडायची असा पेच त्यांच्यासमोर होता. तेव्हा त्यांच्या पत्नीनं नीलम गो-हे यांनी “फिडेल आणि चेला होडीत बसताना काय सगळी उत्तरं ठाऊक होती?” असं विचारलं. आणि त्यांनी मराठवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला असं लिहिलं आहे. नीलमताईंनी शिवसेनेत जाताना काय विचार केला असावा?
करंदीकरांच्या लेखात ह्युगो चावेझ आणि फिडेल कॅस्ट्रो या दोघांनी मैत्री करार करून एकमेकांना कशी मदत केली ते लिहिलं आहे. दोघेही हुकूमशहा होते आणि एकमेकांना मदत करणं दोघांच्याही फायद्याचं होतं की. फिडेल कॅस्ट्रोच्या कारकीर्दीत क्यूबानं आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम काम केलं हे खरंच. पण त्याच काळात कोस्टा रिकानंही या क्षेत्रात तितकंच उत्तम काम केलं. कोस्टारिकात लोकशाही आहे. त्यामुळे त्यात कम्युनिझमचा हात किती हेही लक्षात घेतलं पाहिजे.
फिडेल कॅस्ट्रोनं क्यूबात क्रांती घडवून त्या देशाला नवीन आशा दिली हे खरंच. पण त्यानंतर त्यानं त्या देशाची वाट लावली हेही खरं. त्यामुळे लाल सलाम करताना त्याचं मूल्यमापनही केलं गेलं पाहिजे. आणि फिडेल कॅस्ट्रो आणि चे गवेरा हे त्या काळाची गरज होते. आता काळ बदलला आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे.

सायली राजाध्यक्ष