पॅरिसच्या विदूषकांना श्रद्धांजली

पॅरिसमधल्या शार्ली हेब्दो या नियतकालिकाच्या कार्यालयावर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर माझ्या नव-यानं निरंजननं लिहिलेल्या इंग्रजी पोस्टचा हा स्वैर अनुवाद.


धर्माभिमानापेक्षाही जगाला उपहासात्मक लेखनाची जास्त गरज असते.
राजदरबारातल्या विदूषकामध्येच राजसत्तेला सत्य सांगण्याची धमक होती. आपल्या विनोदानं राजाला आव्हान देणारा विदूषक हा राजसत्तेचा अनादर करणारा नाही तर तो माणसाच्या शहाणपणाचा आतला आवाज आहे. झेकोस्लेव्हाकियातल्या स्टॅलिनवाद्यांना सगळ्यात जास्त भीती विनोदाची वाटत असे असं ख्यातनाम झेक लेखक मिलन कुंडेरानं म्हटलं आहे. कार्टूनिस्ट शंकर यांनी त्यांच्या उपहासात्मक साप्ताहिकातून आपल्यावर टीका करणं कधीही सोडू नये असं पंडित नेहरूंनी त्यांना याच कारणासाठी सांगितलं होतं. जुन्या काळातल्या विदूषकाची जागा आता कार्टुनिस्ट, स्टँड-अप कमेडियन आणि टॉक शोच्या सूत्र संचालकांनी घेतली आहे असं देवदत्त पटनायक यांनी अलिकडेच एका लेखात म्हटलं आहे आणि जे अगदी योग्य आहे. उपहासाच्या माध्यमातून हे लोक समाजाच्या मूर्खपणाकडे लक्ष वेधतात असं त्यांनी म्हटलं आहे. जेव्हा विदूषकाचा मृत्यू होतो तेव्हा समाजही मरणपंथाला लागतो. पॅरिसमध्ये झालेल्या हत्यांमधून आपण हाच बोध घ्यायचा आहे.