दंगल

एखादा खेळ असो किंवा कला असो, त्यात नैपुण्य मिळवायचं असेल तर फार लहान वयापासून त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आणि या कष्टांमध्ये मुलांच्या आईवडलांचा फार मोठा वाटा असतो. अगदी भीमसेन जोशींचं उदाहरण घेतलं तरी त्यांना त्यांच्या गुरूंच्या घरी किती कष्ट करावे लागले याचे उल्लेख आपण वाचलेले, ऐकलेले आहेत. पण या गोष्टीचा आपण कौतुकानं उल्लेख करतो. सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक खेळांमधली उदाहरणं बघितली तर जगभरात हेच दिसतं की जे प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यांच्या आईवडलांनी लहानपणापासून मुलांकडून अपार कष्ट करून घेतले आहेत.

इथे तीनचार उदाहरणं वानगीदाखल सांगते स्टेफी ग्राफ, व्हीनस-सेरेना विल्यम्स, सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल. स्टेफी ग्राफच्या वडलांनी वयाच्या तिस-या वर्षी तिच्या हातात रॅकेट दिली. तेव्हापासून ते निवृत्त होईपर्यंत ती दमेपर्यंत खेळली. तिच्या आयुष्यावर तिच्या वडलांचा इतका पगडा होता की, तिच्या वडलांना पापा मर्सिलेस असंच म्हटलं जायचं. नंतरच्या काळात त्यांचे संबंध इतके बिघडले की स्टेफीनं त्यांना स्वतःच्या आयुष्यातून हद्दपार करून टाकलं. व्हीनस आणि सेरेना विल्यम्स या दोन्ही बहिणींची तीच कथा. त्यांचे वडीलच त्यांचे पहिले कोच. त्यांनीही मुलींना खेळण्याची सक्ती केली. सानिया मिर्झाच्या करियरमध्ये तिच्या वडलांचा मोठा हातभार आहे. सायना नेहवालच्या ट्रेनिंगसाठी वडील हरियाणातली नोकरी सोडून हैदराबादला स्थायिक झाले. चित्रपटसृष्टीत मधुबाला, मीनाकुमारी, सारिका यांचीही अशी उदाहरणं आहेत. पालकांनी मुलांच्या करियरसाठी त्यांच्यावर दबाव आणणं, त्यांना राबवून घेणं या गोष्टीचं मी अजिबात समर्थन करत नाहीये. ते बरोबर आहे असंही माझं म्हणणं नाहीये. पण कुठल्याही गोष्टीत नैपुण्य मिळवताना पालकांचा चांगला-वाईट सहभाग त्यात असतोच हे फक्त सांगायचं आहे. लहान वयात जेव्हा फारसं कळत नसतं तेव्हा आईवडलांचं म्हणणं मुलं ऐकत जातात, त्यांच्या कलेतलं सातत्य टिकवण्यासाठी आईवडलांचा पुश महत्त्वाचा ठरतो. परत तेच सांगते हे चूक की बरोबर मला माहीत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे.
भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्त्री-पुरूष गुणोत्तर (Sex Ratio) व्यस्त आहे. अर्थात स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेत कमी आहे. पुरूषांच्या प्रमाणात स्त्रियांची संख्या ज्या राज्यांमध्ये फार कमी आहे त्यात हरियाणाचा क्रमांक अग्रभागी आहे. गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भातच मुलींना मारून टाकणं किंवा मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मारून टाकणं हे हरियाणात सर्रास चालतं. इतकं करून मुलीला जिवंत ठेवलंच तर तिला न शिकवणं, तिचं लहान वयात लग्न करून देणं यात काहीच नवल नाही. या पार्श्वभूमीवर, चार मुलींना जिवंत राहू देणं, त्यांना कुस्तीसारख्या खेळासाठी प्रवृत्त करणं, त्या ध्यासानं जंगजंग पछाडणं हे निश्चितच उल्लेखनीय. स्वातंत्र्य आणि achievement या दोन गोष्टी त्या-त्या परिस्थितीत बघितल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे. एखाद्या कट्टर मुस्लिम देशात एखाद्या बाईवर बुरखा घालण्यासाठी तिच्या कुटुंबानं दबाव न आणणं तिच्यासाठी मोठं स्वातंत्र्य असू शकतं, ते तुम्हा-आम्हांसाठी काहीच महत्त्वाचं नसू शकतं. किंवा एखाद्या आदिवासी मुलानं graduation करणं ही त्याच्यासाठी मोठी achievement असू शकते, जी माझ्या मुलीसाठी अगदीच मामुली गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक बाबीला असे अनेक पदर असतात. त्या-त्या संदर्भात आणि त्यांचा विचार करून या गोष्टींकडे बघितलं गेलं पाहिजे.

दंगलमधला बाप हा आपल्या इच्छा आपल्या मुलींकडून पूर्ण करू पाहतो, त्यासाठी त्यांना वेठीला धरतो, त्यांच्याकडून प्रचंड मेहनत करून घेतो. आणि शेवटी आपलं उद्दीष्ट पूर्ण होताना पाहतो. तो खेळाद्वारे करतो. आपल्यापैकी अनेकजण करियरमधून करून घेत असतात. मी असे आईबाप बघितलेले आहेत. किंबहुना आपण सगळेच बघतो. माझ्या मुलीच्या वर्गातल्या एका मुलाची आई ओपन हाऊसला पेपर मिळाल्यावर त्याला २ मार्क कमी मिळाले तर सगळ्यांसमोर चिमटे काढायची. एक आई १०० पैकी ९८ च मार्क का मिळाले म्हणून बोलबोल बोलायची. म्हणून दंगलमधल्या बापाचं वागणं समर्थनीय ठरतं असं मला म्हणायचंच नाहीये. पण हरियाणातल्या एक बाप आपल्या आकांक्षांसाठी का होईना पण आपल्या मुलींना कुस्तीसारख्या खेळात प्रवीण करतो. त्यासाठी त्यांना मुलांच्या बरोबरीनं लढायला लावतो, त्यांचं खाणंपिणंराहणं बदलतो हे मला खूप आश्वासक वाटतं.

आमीर खान मला माणूस म्हणून भंपक वाटतो. पण यात त्यानं अभिनेता म्हणून कमाल केली आहे. आपल्या वयाला शोभेलशी भूमिका केल्याबद्दल त्याचं अभिनंदन. यातल्या चारही मुली आपापली भूमिका अक्षरशः जगल्या आहेत. त्यांच्या मेहनतीला, धाडसाला सलाम. कुस्ती शूट करण्यासाठी या सगळ्यांनाच किती मेहनत करावी लागली असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. आई झालेली साक्षी तन्वर आणि चुलत भावाचं काम करणारे दोन्ही अभिनेते लाजवाब.
आणि शेवटी, सिनेमा आहे यार! थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊ द्या की. इतर चित्रपटांमध्ये बायकांना शोभेची बाहुली म्हणून दाखवतात ते आवडीनं आणि निर्विकारपणे बघतोच की. या सिनेमात मेलोड्रामा आहे पण तो तितका चालतो. प्रीतमच्या संगीतानं दंगल केली आहे. दलेर मेहंदीचं शीर्षक गीत रोमांचक. एकूण काय तर सगळे इझम्स बाजूला ठेवून हा चित्रपट बघितलात तर उत्तम अनुभूती नक्की घ्याल.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s