घरातल्या विजयाबाई

मावशीच्या आणि माझ्या लग्नापूर्वीच्या आयुष्यात बराच सारखेपणा आहे. आम्ही दोघीही मुंबईत येण्यापूर्वी लहान शहरांमधे राहत होतो. तिचं माहेर कोल्हापूरचं तर माझं माहेर औरंगाबादचं. त्यामुळे शहरातल्या, विशेषतः मुंबईतल्या लोकांना ज्या गोष्टी माहितही नाहीत आणि अनुभवयालाही मिळत नाहीत अशा ब-याच गोष्टी आम्ही दोघींनी अनुभवल्या आहेत. लहान गावातली संस्कृती, तिथल्या लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध, तिथली जीवनपध्दती हे मुंबईपेक्षा खूप वेगळं असतं आणि ते आम्हा दोघींनाही माहीत आहे. त्यामुळे असेल कदाचित पण मला तिच्याबद्दल पहिल्यापासून आपलेपणा वाटला.

मावशीचा कामाचा उरक प्रचंड आहे. तिला जवळून ओळखणा-या प्रत्येकाला तो माहीत आहे. कुठलंही काम नियोजनबध्द पध्दतीनं, वेळेतच झालं पाहिजे असा तिचा कटाक्ष असतो. या विषयावर ती विरूध्द आम्ही घरातले बाकी सर्व असतो.कुठल्याही कामासाठी इतरांची वाट पाहणं हा तिचा स्वभावच नाही. सकाळी भांड्यांची बाई येण्याआधी तिची अर्ध्याहून अधिक भांडी घासून झालेली असतात. स्वयंपाकाची बाई येण्यापूर्वी तिनं डाळ-तांदूळ काढलेले असतात, उसळ करायची असेल तर कडधान्य शिजवून ठेवलेलं असतं, बटाटे उकडलेले असतात, पालेभाजी निवडलेली असते. मग आपण कामाला बायका का ठेवल्या आहेत असं विचारल्यावर ती मला म्हणते, जाऊ दे गं, काम एकदा हातावेगळं केलं की मला बरं वाटतं. सकाळी लवकर उठून सगळ्या घराची व्यवस्था नीट लावल्याशिवाय मावशीला तिचं लेखन करायला स्वस्थता मिळत नाही. तिची सकाळची अर्ध्याहून अधिक तयारी रात्रीच झालेली असते. विरजण लावणं, चहाची भांडी काढून ठेवणं, सकाळचे डाळ-तांदूळ काढून ठेवणं, मुक्ताचा उपास असेल तर खिचडीची तयारी करणं याशिवाय दुस-या दिवशीच्या मेन्यू ठरवणं हे ती आदल्या दिवशीच करते.

काही दिवसांपूर्वीच आम्ही स्वतंत्र घर केलं. आम्ही स्वतंत्र राहायचा निर्णय घेतल्यानंतर मावशीनं त्यातले फायदे आणि तोटे दोन्हीही सांगितले पण आम्ही घर करायचं ठरवल्यावर ते घर लावताना पुढाकार घेऊन मला सर्वतोपरी मदत केली. नव्या घरात सगळ्या वस्तू असल्या पाहिजेत, आपल्याकडे एखादी वस्तू नाहीये असं मुलींना वाटता कामा नये असा मावशीचा आग्रह होता, त्यासाठी घरात लागणा-या गोष्टींच्या पुन्हापुन्हा याद्या करणं, त्याबरहुकूम सामान आलंय की नाही हे तपासणं हे ती उत्साहानं करत होती.

सावनी-शर्वरीवर, माझ्या मुलींवर तिचा अतिशय जीव आहे. केवळ त्या दोघीच तिचं ठरवलेलं काम ठरवलेल्या वेळेत पार पाडू न देण्याचं काम इमानेइतबारे करत असतात. त्या दोघी लहान असल्यापासून त्यांचं सगळं काही ती आनंदानं करत असते. सावनी मराठी छान बोलते, आता शर्वरीही बोलायला लागलीय. मराठीतले वेगवेगळे शब्द कसे वापरावेत याची सावनीला उत्तम जाण आहे. नवनवे शब्द, वाक्प्रचार माहीत करून घेण्याची जिज्ञासा तिला आहे, याचं संपूर्ण श्रेय मावशीचं आहे. सावनी-शर्वरीला वेगवेगळी गाणी शिकवणं, कविता म्हणून दाखवणं, गोष्टी सांगणं हे आम्हा दोघांपेक्षाही तिनं अधिक केलंय.परवाच मी शर्वरीला झोपवताना मावशी म्हणते ते गाणं म्हणत होते तर ती पटकन म्हणाली, तू म्हणू नकोस ते गाणं फक्त आजीलाच येतं. सावनी-शर्वरी जेव्हा आजीकडे राहायला असतात तेव्हा सकाळी उठल्याबरोबर त्या दोघींची आजीबरोबर एक छोटीशी सहल असते. खाली बागेत जाऊन वेगवेगळी फुलं गोळा करणं, पक्षी पाहणं, कुत्री-मांजरं बघणं, येणा-या-जाणा-यांशी बोलणं आणि मुद्दाम कोप-यावरच्या उकिरड्यावर जाऊन डुकरं बघणं हा शर्वरीच्या आनंदाचा कळस असतो. तिला ती डुकरं बघायला मिळावीत म्हणून मावशी आणि ती जवळपासच्या कच-याच्या ढिगांना भेटी देत असतात. एकदा मी आणि मावशी कुठेतरी जात होतो. वाटेत खूप डुकराची पिल्लं दिसली. शर्वरी बरोबर हवी होती म्हणून तिला खूप हळहळ वाटली. नंतरही किती तरी वेळ ती हळहळत होती. ब-याचदा संध्याकाळी दोघी आजीबरोबर शेजारच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् च्या हॉस्टेलच्या बागेत जातात. तिथं खेळून झाल्यावर कोप-यावरच्या दुकानातून काहीतरी खायला घेऊन सोसायटीत कट्ट्यावर बसून खाणं हा त्यांचा मोठा कार्यक्रम असतो. सावनीला वाटतं की आजी घरी बसून काम करते म्हणजे अगदी सोपं आहे. त्यामुळे मोठी झाल्यावर मी आजीसारखी घरी बसून गोष्टी लिहिणार आहे असं ती सांगते.

P1030444.JPG
शर्वरी आणि आजी

मावशीची कुठलीही कथा सगळ्यात आधी मी वाचते. अर्थात ही गेल्या पाच-सहा वर्षांतली गोष्ट झाली. तिच्या डोक्यात लेखनाविषयी काय नवे प्रकल्प आहेत, कल्पना आहेत याविषयी ती मला सांगत असते. तिला स्वतःला दागिने-साड्या यांसारख्या गोष्टींत अजिबात रस नाही, पण लग्नात आणि आता लग्नानंतरही तिनं मला कितीतरी उत्तम वस्तू दिलेल्या आहेत. ती प्रवासाला जाते तेव्हा माझ्यासाठी साडी किंवा कुडत्याचं कापड असं काही ना काही ती आणत असते. मी जेव्हा जेव्हा माहेरी जाऊन परत येते तेव्हा तिनं माझ्यासाठी माझी आवडती काळ्या वाटाण्यांची आमटी केलेली असते. मी कुठेही बाहेर जाताना किंवा कामाला जाताना मुलींना तिच्यावर सोपवून निर्धास्तपणे जाऊ शकते. अगदी फालतू विषयांवरही आम्ही खूप गप्पा मारतो ज्याला निरंजन, माझा नवरा गॉसिपिंग म्हणतो.माझ्या लग्नाला सहा वर्षं झाली. या सहा वर्षांत माझ्यात आणि मावशीत एकही मोठा खटका उडालेला नाही आणि याचं बहुतांश श्रेय तिला आहे. माझं लग्न होऊन घरात आल्यानंतर तिनं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मी कुठलं काम केलं नाही म्हणून मला टोकलं नाही किंवा आता सून आलीय म्हणून संपूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकून ती मोकळी झाली नाही. एकदा अंबिका सरकार घरी आल्या होत्या, त्या मला बघून मावशीला म्हणाल्या की, अगं ही तर मुक्ता-राधासारखीच दिसते, तेव्हा ती म्हणाली होती की, मग ती माझी तिसरी मुलगीच आहे. आणि मला वाटतं की गेल्या सहा वर्षांत माझ्याशी असलेल्या तिच्या वागणुकीतून मला तेच जाणवलेलं आहे. आणि म्हणूनच माझ्या या लेखाची पहिली वाचकही तीच असणार आहे.

(माझ्या सासुबाई विजया राजाध्यक्ष या २००१ मध्ये इंदूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. ललित मासिकानं त्यानिमित्तानं साहित्य संमेलन विशेषांक काढला होता. या अंकात मी घरातल्या विजयाबाई या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यातलाच हा काही भाग. (हा लेख २००१ मध्ये लिहिलेला आहे. माझ्या सासुबाई आता ८३ वर्षांच्या आहेत. आणि गेल्या बावीस वर्षांत आमच्यातलं नातं अजूनच घट्ट झालं आहे.)

सायली राजाध्यक्ष