गुलजार!

गुलजार हा तसा कॉलेजपासूनचा जिव्हाळ्याचा विषय. गुलजारांच्या कविता, गुलजारांचे चित्रपट आणि गुलजारांनी इतर चित्रपटांसाठी लिहिलेले संवाद आणि गाणी, सगळंच प्रिय होतं आणि अजूनही आहे. निरंजनला पहिल्यांदा भेटले तेव्हा पटकन् आपलेपणा वाटण्यात गुलजार हा महत्वाचा भाग होताच. ज्या बांद्रा वेस्ट भागात गुलजार राहतात तिथे बाजुलाच माझं आवडतं फॅब इंडिया आहे. जेव्हा जेव्हा फॅबला जायचे तेव्हा दोन मिनिटं थांबून गुलजार दिसतात का ते पाहात राहायचे. एकदा अशीच फॅबला गेले होते. रिक्षातनं उतरले आणि पाहातच राहिले. समोर पांढ-या शुभ्र वेशातले गुलजार त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभे राहून ड्रायव्हरला गाडी बाहेर काढण्याबद्दल मार्गदर्शन करत होते. असं पाहात राहणं हे असभ्यपणाचं आहे हे कळत असूनसुध्दा मी ते गाडीत बसून निघून जाईपर्यंत बघत राहिले.
मंगल केंकरेशी तेव्हा नुकतीच मैत्री होत होती. तिला मी बोलताबोलता हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली इतकंच ना, मी तुला त्यांना भेटायला घेऊन जाते. मी उडालेच, तू त्यांना ओळखतेस? मी अविश्वासानं विचारलं. तेव्हा ती म्हणाली की, अगं खूप चांगलं ओळखते, मी त्यांच्या हूतूतू चित्रपटात काम केलं होतं. एकदा फॅबला गेलो असताना ती मला घेऊन गुलजारांच्या बंगल्यावर गेली, गुलजार तेव्हा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला गेले होते. आम्ही त्यांच्या सचिवांकडून त्यांची अपाँइटमेंट घेऊन ठेवली. ठरलेल्या दिवशी मी आणि निरंजन मंगलबरोबर गुलजारांकडे गेलो. जाताना गाडीत मी मंगलला म्हटलं की, अगं पण आम्ही त्यांच्याशी बोलणार काय? मला तर काहीच सुचत नाहीये. ती म्हणाली, काळजी करू नकोस ते अगदी आपलेपणानं बोलतात. आम्ही बोस्कियानात पोचलो. गुलजारांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आम्ही त्यांच्या त्या सुप्रसिध्द स्टडीत बसलो. टेबलावर त्यांच्या जीवलग मित्राचा आर.डी.बर्मनचा प्रसन्न फोटो ठेवलेला होता. आणि कोप-यात मिर्झा गालिबचा पांढराशुभ्र बस्ट. आम्ही त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दुर्लक्षित व्यक्तिमत्वांबद्दल असलेलं अनसंग हिरोज हे पुस्तक नेलं होतं. त्यांनी त्यातल्या कवी नीरज, आर.डी.चे सहायक बासू चक्रवर्ती आणि मनोहारी सिंग यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं. कुसुमाग्रजांच्या कवितांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे, त्याबद्दलही ते बोलले. ते म्हणाले की, मी जरी पाकिस्तानातून आलो असलो तरी महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी स्वतःला महाराष्ट्रीय मानतो. मला महाराष्ट्रानं खूप काही दिलं आहे. त्यांनी आम्हाला त्यांची बरीच पुस्तकं दिली. तब्बल दीड तासानं आम्ही निघालो. पाय निघता निघत नव्हता. मंगलमुळे मला माझ्या आयुष्यातला हा एक सर्वोत्तम अनुभव मिळाला आहे जो मी माझ्या मनात कायमचा जपून ठेवलाय.

जिंदगी गुलजार है आणि गुलजार ही जिंदगी है! (१८ ऑगस्ट २०१७)

जिंदगी गुलजार है और गुलजार ही जिंदगी है! 😊

कळायला लागल्यापासून गुलजार कधी जिव्हाळ्याचे बनले ते कळलंच नाही. कॉलेजमध्ये असताना उर्दू शायरी आणि हिंदी कवितांचा नाद लागला. त्यात अर्थातच चित्रपट गीतंही आली. त्यामुळे गुलजार वाचायला लागले. पुढे अजून मोठं झाल्यावर सिनेमा कुणी तरी लिहितं, त्याचे संवाद कुणी तरी लिहितं हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा चित्रपटाची श्रेय नामावली काळजीपूर्वक वाचायला लागले. बिमल रॉय आणि हृषीकेश मुखर्जी हे फार आवडीचे दिग्दर्शक. त्यांच्या चित्रपटांच्या श्रेय नामावलीत गुलजार हटकून असायचेच. मग कथा असो, पटकथा किंवा गीतं, गुलजारांचा सहभाग ठरलेलाच.
पुढे आर. डी. बर्मन हे फारच लाडके संगीतकार झाले. त्यांची गाणी रेडिओवर ऐकताना “और गीतकार है गुलजार,” हे ऐकण्याचा जणू छंदच लागला.

पर लगे आंखो को देखा है कभी उडते हुए,
एक बार वक्त से लम्हा गिरा कही,
लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कहीं,
इन रेशमी राहों में इक रात तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है, इस मोड से जाती है,
सावन के कुछ भीगे भीगे दिन रख्खे है, और मेरे इक खत मे लिपटी रात पडी है,
सुखे सावन बरस गये कितनी बार इन आंखों से,
जो गुजर गयी कल की बात थी, उम्र तो नही इक रात थी,
जब भी खयालों में तू आये, मेरे बदन से खूशबू आये
या गुलजारांच्या ओळींनी भारावून जाण्याचं स्वप्नाळू वय होतं ते…

चुपके चुपके या चित्रपटाची कितीदा पारायणं केली असतील त्याला अंतच नाही. त्यात सगळ्यांनी कामं उत्तम केली आहेत यात वादच नाही. पण गुलजारांचे चपखल संवाद हे त्या चित्रपटाचं बलस्थान आहे हेही कुणीच नाकारणार नाही.
पुढे निरंजनला पहिल्यांदा भेटले तेव्हा गुलजार हा दोघांच्या संभाषणातला समान दुवा होता. फारसा कधी भारावून न जाणारा निरंजन, गुलजारांना मात्र एकदा भेटायचंय असं म्हणायचा. माझं अत्यंत लाडकं दुकान फॅब इंडिया पाली हिलवर होतं. त्या दुकानात पहिल्यांदा गेले आणि बाजूच्या बंगल्यावरचं नाव बघितलं ‘बोस्कियाना’. हरखूनच गेले. फॅबला गेल्यावर त्या बंगल्याकडे बघत राहण्याचा छंदच लागला. एकदा रिक्षातनं उतरले आणि समोर पांढ-याशुभ्र कपड्यांमधले गुलजार ड्रायव्हरला गाडी बाहेर काढण्याबद्दल मार्गदर्शन करत होते. खिळून तिथेच उभी राहिले. असं पाहत राहणं असभ्यपणाचं आहे हे माहीत असूनसुद्धा. एकदा मंगलला बोलताना हे सांगितलं तर तिनं गुलजारांना भेटायला अपॉइंटमेंटच घेतली.

ठरलेल्या दिवशी मी आणि निरंजन मंगलबरोबर गेलो. त्या बंगल्यात आत जाताना अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं. गुलजारांनीच अत्यंत प्रेमानं आमचं स्वागत केलं. मंगलनं त्यांच्या हुतूतूमध्ये काम केलेलं होतं. पुढचा दीड तास म्हणजे आयुष्यभर जपून ठेवावा असं अविस्मरणीय ठेवा होता. ते अनेक विषयांवर, पुस्तकांवर, गीतकारांवर, संगीतकारांवर बोलले. त्यांच्या बोलण्यातली ऋजुता लक्षणीय आहे. त्यांचा खर्जातला आवाज, त्यांची ती ऊबदार स्टडी, टेबलावरचा आर. डी. बर्मनचा हसरा फोटो, कोप-यातला मिर्झा गालिबचा पांढराशुभ्र बस्ट, बसण्याची साधीच पण देखणी व्यवस्था, सगळं सगळं आता बघते आहे असं लख्ख स्मरणात आहे. ते स्वतः निरोप द्यायला दरवाज्यापर्यंत आले. मला फक्त भरून येत होतं. मोबाइल हातात असूनही फोटो काढण्याचं
काही लक्षात राहीलं नाही. आजही त्याबद्दल हळहळ वाटते.

नंतर एकदा बांद्रा वेस्टला वॉक घेत असताना, गुलजार आपल्या नातवाला एका लहानशा बागेत झोका देताना दिसले. आजुबाजुच्या इतर आजी-आजोबांसारखेच ते वागत होते. त्यात कसलाही अभिनिवेश नव्हता. आणि मी परत एकदा त्यांच्याकडे पाहात तिथेच खिळून उभी राहिले.
परवा अनुपम खेर शोमध्ये ते आले होते तेव्हा अनुपम खेरनं त्यांना विचारलं की, “आपण एक उत्तम लेखक आहोत याचा साक्षात्कार तुम्हाला कधी झाला?” त्यावर गुलजार म्हणाले, “तो अजूनही झालेला नाही! पण जेव्हा तुमच्यासारखे लोक कार्यक्रमाला बोलावतात म्हणजे मी बरा लिहीत असेन असं वाटतं,” आणि त्यांची ही विनम्रता खोटी नाही. त्यांना नवीन लेखकांबद्दल आस्था आहे. नवीन पिढीतले लोक फार धाडसी आहेत, ते उत्तम लिहितात असं ते वेळोवेळी म्हणतात. त्यांच्यातला हा ताजेपणा कायम आहे म्हणूनच ते रात दिन तारों में जीना विना इजी नही असं लिहून जातात. अजूनही त्यांच्या कार्यक्रमाला तरूण मंडळीही प्रचंड गर्दी करतात. दरवर्षी जयपूर लिटफेस्टमध्ये गुलजारांच्या मुलाखतीला अभूतपूर्व गर्दी होते. याचं कारण म्हणजे त्यांच्यातलं कायम असलेलं माणूसपण. आपल्यासाठी इतकी गर्दी होते याचा त्यांना गर्व होत नाही. ते अस्खलित बंगाली बोलतात. सतार वाजवतात. अजूनही रोज टेनिस खेळतात. खार जिमखान्यातल्या टेनिस खेळणा-या मित्रांना आपल्या गुलजारपणाचं कौतुक नाही हेही तितक्याच विनयानं सांगतात. एक्याऐंशीव्या वर्षीही टेनिस टूर्नामेंट जिंकतात.

कारण जिंदगी गुलजार है आणि गुलजारही जिंदगी है!

सायली राजाध्यक्ष