कलाकार आणि चारित्र्य

लेखक, कलाकार अशा सार्वजनिक जीवनात वावरणा-या व्यक्तींचं वैयक्तिक चारित्र्य आणि त्यांचं कर्तृत्व या दोन गोष्टींची सांगड घालावी का हा नेहमीच पडत आलेला प्रश्न आहे. इथे चारित्र्य म्हणजे अर्थातच लैंगिक चारित्र्य इतकाच मर्यादित अर्थ आहे. कारण आपल्या देशात लैंगिक चारित्र्याशी नैतिकतेचा संबंध जोडला जातो.
व्हॅन गॉग हा चित्रकार नियमितपणे वेश्यांकडे जात असे. आइनस्टाइन हा बाहेरख्याली होता. आपल्या या नादापायी त्यानं आपल्या बायकोला खूप त्रास दिला. जेम्स बाँडच्या भूमिकेमुळे अजरामर झालेला शॉन कॉनेरी हा आपल्या बायकोला मारत असे. बायकांनी ऐकलं नाही तर त्यांना एखादी थोबाडीत ठेवून देण्यात काहीही गैर नाही असं त्याचं मत आहे. ख्यातनाम लेखक रोआल्ड डाल हा कट्टर ज्यूविरोधी होता. वॉरेन बेट्टी, जॅक निकल्सन, जॉर्ज क्लूनी यासारखे हॉलिवूड अभिनेते बायकांबरोबरच्या संबंधांबद्दल बदनाम आहेत. पाब्लो पिकासो हा चित्रकार, इयन फ्लेमिंग हा लेखक हे त्यांच्या रंगेलपणाबद्दल प्रसिद्धच आहेत.


आपल्या लेखनातून करूणेचं प्रदर्शन करणारा टॉलस्टॉय हा आपल्या आजुबाजुच्यांना कायम दहशतीत ठेवायचा. त्यातून त्याची बायकोही सुटली नाही. हीथ लेजर, रॉबिन विल्यम्स, व्हिटनी ह्यूस्टन यासारखे असंख्य हॉलिवूड अभिनेते ड्रग्जच्या विळख्यात होते. फिडेल कॅस्ट्रो हा बाहेरख्याली आहे. हेमिंग्वेचं बायकांबद्दलचं प्रेम जगविख्यात आहेच.
सांगायचा मुद्दा असा की माणसामाणसांमधले संबंध हे फार गुंतागुंतीचे असतात. माणूस एकाशी जसा वागतो तसाच तो दुस-याशी वागेल असं नाही. शिवाय वरच्या यादीतली माणसं ही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा त्यांच्या कामामुळे अधिक प्रसिद्ध आहेत. नव्हे त्यातली काहीतर जगविख्यात आहेत. त्यांच्या खाजगी जीवनाबद्दलही चर्चा होतेच. पण त्यांना एखादा पुरस्कार मिळाला किंवा त्यातल्या कुणाचं निधन झालं तर त्यांच्या कामाबद्दल जास्त बोललं जातं त्यांच्या लैंगिक चारित्र्याबद्दल नाही.
पण आपल्या देशात एकूणच कधी काय बोलावं आणि कशा भाषेत बोलावं याचं ताळतंत्र सुटलेलं आहेच. त्यामुळे अश्लाघ्य भाषा वापरली की आपण आपला मुद्दा ठासून सांगितला आणि तो लोकांना पटलाही असा समज होत चालला आहे. दुर्दैवानं सोशल मीडियावर हो ला हो म्हणणा-यांची संख्या कमी नाही. त्यामुळे असे लोक शेफारतात. जे हो ला हो करतात त्यांना प्रत्यक्षात काय अनुभव असतो?
एखाद्या व्यक्तिबद्दल प्रत्येक माणसाचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे त्याची प्रतिक्रियाही वेगवेगळी असू शकते आणि त्यात गैर काहीच नाही. माझ्याशी चांगला वागणारा माणूस दुस-याशी खुनशीपणानं वागूच शकत नाही असं माझं म्हणणंच नाही. पण माणूस गेल्यानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आपल्या बोलण्यानं, लिहिण्यानं काय त्रास होऊ शकतो निदान याचं तारतम्य बाळगता आलं तरच स्वतःला माणूस म्हणता येईल…

सायली राजाध्यक्ष