एसडी आणि आरडी बर्मन

एकाच क्षेत्रातल्या बाप-मुलानं किंवा आई-मुलानं (मुलीनंही) तोडीस तोड कर्तृत्व गाजवण्याचे प्रसंग फार विरळा असतात. याचं कारण असं नव्हे की मुलामध्ये कर्तृत्व नसतं. पण बापानं असा काही बेंचमार्क स्थापित केला असतो की पुढची पिढी तेवढं नाव मिळवेलच असं होत नाही. या गोष्टीला काही अपवाद आहेतच. एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन हे दोघे बापलेक तोडीस तोड होते.


एसडी त्रिपुरातल्या राजघराण्यातले. शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. फिल्मिस्तानचे शशधर मुखर्जी यांनी त्यांना मुंबईला बोलावलं. सुरूवातीच्या काही चित्रपटांमध्ये संथ गतीचं संगीत दिल्यानंतर त्यांना बाजी हा चित्रपट मिळाला. त्यातली गाणी अफाट गाजली. तदबीर से बिगडी हुई तकदीर बना दे या साहिरच्या गजलला त्यांनी चक्क कॅब्रे साँगचं रूप दिलं कारण गुरू दत्तला जरा चटपटीत चाली हव्या होत्या. एसडी बर्मन यांचं अभिजात शास्त्रीय संगीतावरचं प्रभुत्व तर त्यांच्या संगीतात दिसतंच पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या संगीतात पाश्चिमात्य संगीताचाही वापर केला. रूप तेरा मस्ताना हे seductive गाणं आठवून बघा. अकोर्डियनचा मोठा वापर असलेल्या या गाण्यात किशोरकुमारचा आवाज काय लागला आहे! हे गाणं ज्या गाण्यावर बेतलं आहे ती बंगालीतली नर्सरी राइम आहे! पण पाश्चिमात्य वाद्यमेळामुळे त्या गाण्याचा चेहरामोहरा कसा बदलून गेला आहे ते बघा.

हे सगळं मी ऐकलं ते एसडी बर्मन ते आरडी बर्मन या अंबरीश मिश्र यांनी सादर केलेल्या अप्रतिम कार्यक्रमात. अंबरीश मिश्र यांची किस्से सांगण्याची हातोटी, त्यांचं वेगवेगळ्या भाषांवरचं प्रभुत्व, त्यांच्याकडे असलेली प्रचंड माहिती, स्वतःच्याच ज्या बंगाली गाण्यांवर एसडी आणि आरडींनी हिंदी गाणी केली ती गाणी या सगळ्यामुळे हा कार्यक्रम फार सुंदर झाला.
एसडी हे स्वभावतः काहीसे आखडू होते. त्याचे काही किस्से मिश्र यांनी सांगितले. पंडित हरिप्रसाद चौरासिया हे एसडींकडे बासरी वाजवत. ते मूळचे पहिलवान. त्यामुळे खाण्यापिण्याची जबरदस्त आवड. एकदा ते कुठलासा कार्यक्रम आटोपून एसडींकडे गेले. मीरा बर्मन यांनी त्यांना काही खाल्लं आहे का असं विचारलं. त्यांनी काही खाल्लं नाहीये असं कळल्यावर त्यांनी नुकताच कलकत्त्याहून आलेला रसगुल्ल्यांचा डबा काढला. सगळ्यांनी एखादा दुसरा रसगुल्ला खाल्ला. तर हरिप्रसाद चौरासियांनी १२ रसगुल्ले खाल्ले. एसडी हे सगळं निरखत होते पण काही बोलले नाहीत. दुस-या दिवशी रेकॉर्डिंग झाल्यावर लता मंगेशकरांनी हरिप्रसादांना फारच मधुर वाजवलंत तुम्ही असं सांगितलं. त्यावर एसडी चटकन म्हणाले, मधुर ना बजाने को क्या हुआ, कल १२ रसगुल्ले जो खाए है! महमूद जेव्हा भूतबंगला बनवत होता तेव्हा त्याचं संगीत आरडीनं करावं असं त्याला वाटत होतं. तो त्यांच्या घरी गेला. दरवाजा एसडींनी उघडला आणि इकडे कुठे अशी विचारणा केली. त्यावर महमूदनं आपण चित्रपट करत असल्याचं सांगितलं. मग संगीत मी देणार ना असं एसडींनी विचारलं. संगीत तुमचं नकोय तर आरडीचं हवंय असं सांगितल्यावर पंचमला काही येत नाही असं ते म्हणाले! गंमतीचा भाग सोडा, पण जेव्हा एकदा ते फिरून येत असताना कुणीतरी त्यांच्याकडे बोट दाखवून हा आरडीचा बाप आहे असं सांगितलं तेव्हा ते मनोमन आनंदून गेले.

एसडी बर्मन हे वटवृक्षासारखे आहेत. त्यांची सावली अजूनही आपल्याला मिळते आहे असं मिश्र म्हणाले आणि ते खरंच किती समर्पक आहे. देव आनंद या व्यक्तीचा पर्सोना तयार करण्यात एसडींच्या संगीताचा फार मोठा भाग आहे. एसडींचं संगीत देवआनंदच्या चित्रपटांना नसतं तर देव आनंद हा द देव आनंद झाला असता का? विजय आनंदचं दिग्दर्शन आणि एसडींचं संगीत यामुळे ते शक्य झालं. काला बाजार, टॅक्सी ड्रायव्हर, गाईड, मुनीमजी, पेईंग गेस्ट, नौ दो ग्यारह यातली गाणी नुसती आठवून बघा.
एसडींनी आयुष्यभर काही गोष्टी पाळल्या. त्यांनी लोकप्रियतेच्या आहारी जाऊन किंवा स्पर्धेत उतरून कधीही चित्रपट केले नाहीत. वर्षाला ५-६ चित्रपटांपेक्षा जास्त काम घेतलं नाही. त्यामुळे त्यांचं काम कायम दर्जेदार राहिलं.
आरडी बर्मन हा बापसे बेटा सवाई म्हणावा असा संगीतकार. त्यानंही शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं. असं म्हणतात की सर जो तेरा चकराये हे प्यासामधलं गाणं एसडींनी त्याच्याकडून ऐकलेली धून वापरून केलं होतं. सुरूवातीच्या काळात आरडीवर मदनमोहन आणि रोशनचा प्रभाव दिसतो. हा प्रभाव झुगारून त्यानं संगीत द्यावं असं एसडींनी त्याला सुचवलं. शिवाय वडलांबरोबर सहायक म्हणून काम करत असल्यामुळे त्यांचाही प्रभाव त्याच्यावर होताच. पण या सगळ्यांतून तो बाहेर आला. आरडीनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, वेगळी ओळख बनवली. वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजाचा वापर करून त्यानं अफलातून संगीत निर्मिती केली. मग तो कंगवा असो, बियरच्या बाटल्या किंवा फरशी पुसताना येणारा आवाज. ज्या ताकदीनं त्यानं इस मोड पे आते है सारखी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी केली त्याच ताकदीनं चुरा लिया है तुमने किंवा दम मारो दमही केलं. पाश्चिमात्य वाद्यं, वाद्यमेळ यांचा वापर करून आरडीनं केलेली गाणी अप्रतिम आहेत.

पण स्वभावतः आरडी हा भोळा होता असं मिश्र म्हणाले. त्यानं वडलांच्या दोन गोष्टींकडे कानाडोळा केला. एक म्हणजे वर्षाला भरमसाठ चित्रपट स्विकारले आणि इंटरल्यूड म्युझिकचा कालावधी १०-१५ सेकंदांपेक्षा जास्त असू नये हा वडलांचा सल्ला मानला नाही. त्यामुळे नंतरच्या काळात तो अपयशी ठरला. त्यानं आपली किंमत कमी करून घेतली.
मिश्रांनी या कार्यक्रमात काही अप्रतिम बंगाली गाणी ऐकवली. शिवाय ब्लॅक आऊटमध्ये एसडी आणि आरडी या दोघांची काही गाणी ऐकायलाही मजा आली. एसडींच्या गाण्यांवर राधिका आपटे आणि सहका-यांनी केलेला मेडले आणि आरडीच्या गाण्यांवर रोहन फणसे आणि सहका-यांनी केलेलं नृत्य स्वतंत्र कार्यक्रम म्हणून चांगले होते. पण या कार्यक्रमात त्याचं प्रयोजन नव्हतं असं माझं वैयक्तिक मत आहे.

सायली राजाध्यक्ष