एक शून्य तीन – १०३

सस्पेन्स थ्रिलर हा नाट्यप्रकार मराठी नाटकांमध्ये फार क्वचितच आढळतो. आणि सस्पेन्स थ्रिलरच्या नावाखाली जी नाटकं येतात ती तितकीशी परिणामकारक नसतात. म्हणूनच जेव्हा मराठीत थ्रिलर नाटकांच्या जाहिराती बघते तेव्हा त्या नाटकांना जावंसं वाटत नाही. पण एक शून्य तीन या नाटकाच्या जाहिराती यायला लागल्या तेव्हा मात्र उत्सुकता चाळवली गेली. याचं कारण हे नाटक गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू या गाजलेल्या स्वीडीश क्राइम नॉव्हेलवर आधारलेलं आहे असं कळालं. याच नावाचा ब्रिटिश चित्रपटही काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट बघितला होता आणि तो आवडलाही होता.


काल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि तो खिळवून ठेवणारा होता. मूळ कादंबरीत आणि चित्रपटातही इतकी action आहे की रंगमंचावर ती कशी दाखवणार याचं कुतूहल होतंच. कारण जी थ्रिलर नाटकं मराठीत आलेली आहेत ती बहुतेकदा अगाथा ख्रिस्ती पद्धतीची असतात जी मुख्यत्वे ड्रॉइंग रूममध्ये घडतात. पण या नाटकाची रंगावृत्ती करताना सुदीप मोडक यांनी ती चपखलपणे केली आहे हे जाणवतं. शिवाय रंगमंचावर सातत्यानं वेगवेगळी ठिकाणं उभी करणं हेही उत्तम त-हेनं केलं जातं. मूळ पुस्तकात बायबलमधल्या उता-यांचा वापर गुन्ह्यांसाठी होतो असं सूचित केलेलं आहे. मराठी रंगावृत्तीत यासाठी मनुस्मृतीचा फारच खुबीनं वापर केलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीच्या शुचितेला, पावित्र्याला अति महत्त्व दिलं जातं. या गोष्टीचा मराठी नाटकात योग्य रितीनं उपयोग करून घेतला आहे. कारण मुळात पावित्र्याच्या पाश्चिमात्य आणि भारतीय कल्पना फारच वेगळ्या आहेत. आणि हे नाटक मूळ स्वीडिश कादंबरीपेक्षा इथेच वेगळं ठरतं.
सुमीत राघवन हा माझा आवडता अभिनेता आहे. आणि तो माझा आवडता आहे म्हणून नव्हे तर तो खरोखरच उत्तम अभिनेता आहे. रिसर्च जर्नलिस्टच्या त्याच्या भूमिकेत तो चपखल बसला आहे. त्या पत्रकाराची शोध घेण्याची वृत्ती, त्याची रहस्याचा मुळाशी जाण्यासाठीची अधीरता सुमीतनं उत्तम दाखवली आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीला फास्टर फेणेसारख्या वयानं लहान डिटेक्टिव्हची भूमिका साकारणा-या सुमीतनं ही भूमिका करून एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. चित्रपटात रूनी मारानं इतकं अप्रतिम काम केलेलं आहे की ती भूमिका दुसरं कुणी कसं करेल याची शंका मनात येतेच. पण स्वानंदी टिकेकरनं ती भूमिका छान केली आहे. त्या पात्राचा विक्षिप्तपणा, तुसडेपणा, असुरक्षितता या सगळ्या भावना तिनं फार मनापासून दाखवल्या आहेत. इतरांची कामंही चांगली आहेत.
नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक या दोघांनी मिळून हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. नाटक खरोखर थ्रिलर वाटतं यातच त्या दोघांचं यश आहे. अतिशय वेगळ्या जातकुळीचं हे नाटक रंगमंचावर आणल्याबद्दल सर्व संबंधितांचं मनापासून अभिनंदन!

सायली राजाध्यक्ष