इंदौर-महेश्वर डायरी

१२ जानेवारी २०१७

महेश्वरच्या रस्त्यावर आहे. इंदौरहून महेश्वरपर्यंतचा संपूर्ण रस्ता चौपदरी आहे. मी 88-89 मध्ये गुजरात आणि राजस्थान रोड ट्रिप केली होती. येताना मध्य प्रदेशातून परतलो होतो. तेव्हाही राजस्थान आणि गुजरातमधले रस्ते उत्तम होते. मला वाटतं दोन्ही राज्यांमध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. खरंतर कुठल्या पक्षाचं सरकार सत्तेवर आहे याचा या गोष्टीशी संबंध नाही. पण महाराष्ट्रात सगळेच पक्ष दुस-या पक्षानं कसं काम केलं नाही हे हिरीरीनं सांगत असतात म्हणून हा उल्लेख. मध्य प्रदेशात गेली पंधरा वर्षं शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल सामान्य माणसाचं मत चांगलं आहे. इंदौर शहरही स्वच्छ दिसतंय. स्वच्छ भारत अभियानाचे फलक जागोजागी आहेत.


हे सगळं बघितल्यावर महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती केविलवाणी वाटते. माझं माहेर औरंगाबादचं. या ऐतिहासिक शहराला कळा आली आहे. माझ्या लग्नाला 22 वर्षं झाली. 22 वर्षात शहरात सुधार तर सोडाच पण बकालपणा प्रचंड वाढला आहे. गेली अनेक वर्षं महानगरपालिकेत शिवसेनेचं सरकार आहे. रस्त्यांची हालत अतिशय वाईट आहे. खड्ड्यांची संख्या अमाप आहे. जागोजागी कच-याचे ढीग आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा हलवायचा नाही म्हणून फ्लाय ओव्हर विभागून बांधला आहे.
गेली 22 वर्षं मुंबईत राहातेय. मुंबईतही तीच परिस्थिती. राज्यात काँग्रेसचं सरकार असो, आघाडी सरकार असो, भाजप सरकार असो, मराठी माणसाला काही अच्छे दिन नजिकच्या काळात दिसतील असं वाटत नाही. आमच्या बांद्रा इस्ट भागात रामदास आठवले राहतात. ते बंगल्यात राहतात. आता तर तो संपूर्ण रस्ता त्यांच्या कौतुकाच्या होर्डिंग्जनं अजागळ करून टाकलेला आहे.
आपल्या राज्यातले सर्व नेते जोपर्यंत बोट वर करून एकमेकांना आव्हान देणं थांबवत नाहीत तोपर्यंत काही काम होईल असं वाटत नाही.

१३ जानेवारी २०१७

कालचा एक प्रसंग. काल मी आणि माझी आई महेश्वरला गेलो होतो. मी कॉलेजमध्ये असताना आम्ही महेश्वरला आलो होतो. त्यानंतर इतक्या वर्षांनी काल परत आलो. अहिल्याबाईंचा वाडा (तो इतका साधा आहे की त्याला किल्ला म्हणणं चुकीचंच) बघायला गेलो. अनेकांनी त्या वाड्यात आता सुरू झालेलं हेरिटेज हॉटेल बघायला आणि तिथे जेवायला सुचवलं होतं. तर गेल्यागेल्या माहिती मिळाली की अपॉइंटमेंटशिवाय तिथे जेवता येत नाही. पण तरीही निदान हॉटेल तरी बघता यावं असं वाटत होतं. सिक्युरीटीवाल्याला विचारलं तर तो काहीच उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. हॉटेलचं दार बंदच होतं. त्यानं एका बाईंकडे बोट दाखवलं आणि त्यांच्याशी बोलायला सांगितलं. त्या बाईंशी बोलायला गेले तर त्याही उत्तर द्यायला नाखुश होत्या. त्यांनी जेवायला आत येऊ द्यायला तर सपशेल नकार दिला. नंतर मी सांगितलं की मी फूड ब्लॉगर आहे. त्यावर त्यांनी आमचा आजचा स्वयंपाक झालाय असं सांगितलं, वर म्हणाल्या की पर पर्सन ३५०० रूपये लागतील. मला हसावं की रडावं तेच कळेना. तुम्ही आधी जेवायला किती पैसे लागतील ते सांगून लोकांना आत घेता का? आणि दुसरं म्हणजे हे तुम्ही ज्याला सांगता आहा तो किंवा ती तितके पैसे भरू शकणार नाही हे तुम्ही कसं ठरवता? या सगळ्या प्रकारानंतर तिथे जेवण्याचा उत्साह संपलाच. मग आई आणि मी महेश्वरचा संपूर्ण घाट फिरलो. तिथल्या सगळ्या वास्तू निवांतपणे बघितल्या.

आमच्या गाइडनं जेवायला देवराज नावाचं हॉटेल सुचवलं. तिथे गेलो तर पनीर टिक्काच. त्या वेटरला विचारलं की मध्य प्रदेशातले खास पदार्थ काय मिळतील तर तो म्हणाला हेच आहेत. कलापिनीनं मला एका साडीच्या दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर दिला होता. त्यांना आम्ही जेवून येतो असं सांगितलं होतं. त्यांना मी फोन केला की आम्हाला खास मध्य प्रदेशातले पदार्थ कुठे खायला मिळतील ते सांगा. तेव्हा नीरजनं (साडीच्या दुकानदारानं) मी पाच मिनिटांत फोन करतो असं सांगितलं. त्यानं पाच मिनिटांनी फोन करून सांगितलं की मी घरी स्वयंपाक करायला सांगितलं आहे, तुम्ही आधी दुकानात या, तुम्हाला काय हवं ते बघा, तोपर्यंत स्वयंपाक होईल आणि आपण घरी जाऊ. तसं आम्ही दुकानात गेलो, साड्या खरेदी केल्या आणि नीरजबरोबर घरी गेलो.

नीरजच्या आईनं गरमागरम दाल बाफले, मटार बटाट्याचा रस्सा आणि शिरा असं अत्यंत चवदार जेवण आम्हाला वाढलं. त्या साध्यासुध्या घरानं ज्या अगत्यानं आमचं स्वागत केलं त्यानं भारावून गेले. खरं सांगायचं तर आम्ही तसेही साड्या घ्यायला त्याच दुकानात जाणार होतोच. त्यांना घरी स्वयंपाक करून आम्हाला जेवायला घालायची काय गरज होती? पण केवळ आपुलकीनं त्यांनी ते केलं. त्यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं होतं, तरीही त्यांनी फक्त आमच्यासाठी परत स्वयंपाक केला. वर आग्रहानं जेवायला घातलं. नंतर त्यांचे साड्यांचे लूम्स दाखवले.

15965532_1525970054087613_8782546174861138471_n.jpg

त्यामुळे अहिल्या हेरिटेज हॉटेलमध्ये न खाता आम्हाला इथे जेवायला मिळालं याचा मनोमन आनंदच झाला. अहिल्या हेरिटेजमध्ये दोघींच्या जेवणासाठी जे ७००० रूपये खर्च करणार होते ते साडी खरेदीत खर्च केले हे काय वेगळं सांगायला हवं!

१३ जानेवारी २०१७

मध्य प्रदेशात राज्यव्यापी स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे. पुढच्या महिन्यात राज्यातलं सगळ्यात स्वच्छ शहर जाहीर केलं जाणार आहे. इंदौरमध्ये सगळीकडे स्वच्छ भारत अभियानाची पोस्टर्स लागलेली आहेत. हिंदीत वाचायला जरा विचित्र वाटतं पण जागोजागी शौचालयं, मूत्रालयं आणि स्नानगृहं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरात कुठेही नेत्यांची बोट वर केलेली पोस्टर्स नाहीत, किंबहुना एकही पोस्टर नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काहीही करून दाखवल्याचा दावा करताना कुठेही आढळले नाहीत.
सरकार स्वच्छतेसाठी प्रयत्न करतंय म्हटल्यावर सामान्य लोकही आपल्या परीनं प्रयत्न करताहेत.
मुंबईत संजय मांजरेकरनं पुढाकार घेतल्यावर नो होर्डिंगची एक चळवळ मध्यंतरी झाली होती. त्याचं पुढे काय झालं असावं? बांद्रा ईस्ट, धारावी या भागात माणसांपेक्षा जास्त होर्डिंग्ज आहेत.
मनात विचार केला महाराष्ट्रात स्वच्छता सर्वेक्षण घेतलं तर कुठलं शहर पहिला क्रमांक पटकावेल? शेवटचा क्रमांक औरंगाबादचा नक्की.

सायली राजाध्यक्ष