आय इन द स्काय

इराकमध्ये किंवा पॅलेस्टाईनमध्ये ड्रोन विमानांच्या हल्ल्यात अमुक इतके ठार, अशा बातम्या आपण किती सहजतेनं आणि निर्विकारपणे वाचत, बघत असतो. पण त्यामागे केवढी मोठी यंत्रणा असते, विचार असतो, संघर्ष असतात याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. शिवाय अमुक इतकी माणसं मरण पावली हे निर्विकार मनानं वाचण्याइतकं आपलं मन मुर्दाड झालेलं आहे. दुस-या महायुद्धात जेव्हा चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले तेव्हा जर्मनीला जर नमवायचं असेल तर युद्ध त्यांच्या दारात नेऊन ठेवल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं आणि जर्मनीवर जोरदार बाँबहल्ले सुरू केले. त्यात ड्रेस्डेन बेचिराख झालं. हजारो माणसं मेली. पण हे करणं भाग होतं कारण हिटलरला पायबंद घालणं आवश्यक होतं. युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य आहे अशी म्हण आहेच. पण चूक काय आणि बरोबर काय हे ठरवणं किती अवघड आहे. एकासाठी चूक असलेली गोष्ट दुस-यासाठी आवश्यक असते. एकासाठी दहशतवादी असणारी व्यक्ती दुस-यासाठी स्वातंत्र्यसैनिक असते. एकासाठी अनैतिक असणारी गोष्ट दुस-यासाठी नैतिक असते. प्रत्येक माणसाला आपल्या मनातल्या या परस्परविरोधी द्वंद्वाला कधी ना कधी सामोरं जावं लागतं. माणसाच्या मनातल्या नैतिक-अनैतिकतेच्या द्वंद्वाचाच ऊहापोह Eye in the Sky या चित्रपटात आहे.

नैरोबीतल्या एका लहानशा घरातलं लहानसं कुटुंब. सोमाली दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या भागात राहणारं. आई-वडील आणि ९-१० वर्षांची मुलगी. मुस्लिम अतिरेक्यांनी बायकांना अबाया घालण्याची सक्ती केलेली आहे. पण वडील मुलीला घराच्या आवारात ती सक्ती करत नाहीत. इतकंच नव्हे तर चोरून तिला वाचायला शिकवतात. आईनं केलेले पाव मुलगी रोज बाहेर जाऊन विकतेय. लंडनमध्ये लष्कराच्या एका तळावरच्या अधिकारी स्त्रीला नैरोबीतल्या एका घरात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली आहे. ती माहिती ड्रोन कॅमे-यांच्या साह्यानं तपासून घेण्यात आली आहे. ती खरी आहे. या घरात अतिरेकी आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार होताहेत. त्यांनी तो हल्ला करण्याच्या आधीच त्यांना मारणं क्रमप्राप्त आहे, नाहीतर मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत नेवाडा इथल्या लष्करी तळावर ड्रोन पायलट आणि क्षेपणास्त्रं हाताळणारे तज्ज्ञ बसलेले आहेत. लंडनमध्ये लष्करी अधिकारी आणि मंत्री हा सगळा प्रकार समोरच्या पडद्यावर बघत याविषयी काय निर्णय घ्यावा याची चर्चा करताहेत. शेवटी अतिरेकी लपलेल्या घरावर बाँब टाकण्याचा निर्णय घेण्यात येतो. आजुबाजूला किती नुकसान होईल याचाही अंदाज घेतला जातो. बाँब टाकण्याच्या क्षणीच नेवाडातला पायलट माघार घेतो कारण ती लहान मुलगी पाव विकायला त्याच घराच्या बाहेर येऊन उभी असलेली त्याला दिसते. तो बाँब टाकू धजावत नाही. परत सगळी चर्चा होते. नैरोबीतल्या त्यांच्या माणसाला ते सगळे पाव खरेदी करायला पाठवलं जातं. पण सोमाली दहशतवादी त्याच्या मागे लागतात. ती मुलगी पुन्हा तिथेच उभी आहे. त्या मुलीचा जीव वाचवला तर आत्मघातकी हल्ला करून दहशतवादी मोठा उत्पात घडवणार हे नक्की आहे. नक्की काय करायचं ही द्विधा मनस्थिती या ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे.
त्या मुलीचा जीव जाणार त्याबद्दल एकीकडे वाईटही वाटतंय. पण दुसरीकडे अनेक दिवसांपासून हवे असलेले अतिरेकी मिळाले आहेत. दिग्दर्शकानं ही द्विधा मनस्थिती अतिशय उत्तम टिपली आहे. संपूर्ण चित्रपटात फक्त वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललेली चर्चा आहे. कुठलीही जबरदस्त action नाही. पण असं असतानाही हा चित्रपट आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. एक क्षणही इकडेतिकडे विचार करायची उसंत देत नाही.
युद्ध आणि मानवी हक्कांचं उल्लंघन हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. युद्धात काही कठोर, कटू निर्णय घेणं भाग असतं कारण त्याशिवाय पर्याय नसतो. पण तेव्हा मानवी हक्कांची पायमल्ली ठरलेलीच असते. चूक काय आणि बरोबर काय हे ठरवणं अवघड होऊन बसतं. चित्रपटाच्या शेवटी ब्रिटिश लष्करी अधिकारी या हल्ल्याला विरोध करणा-या मंत्री बाईला म्हणतो, तुम्ही इथे कॉफी आणि केक खात तिथे काय चूक झाली हे सांगू शकत नाही. Never tell a soldier that he does not know the cost of war. किती खरं आहे हे.
हा चित्रपट बघायच्या आधीच निरंजननं मला त्याच्या मित्राचा एक किस्सा सांगितला. त्याचा हा मित्र आर्मीमध्ये होता. आता निवृत्त झाला आहे. तो एका कार्यक्रमाला गेला असताना एक बाई त्याच्या बाजूला येऊन बसल्या. या बाई चांगल्या उच्चभ्रू, उत्तम रेशमी साडी नेसलेल्या, मानवी हक्कांसाठी काम करणा-या NGO च्या सदस्य होत्या. परिचय झाल्यावर त्यांनी या अधिका-याला सांगितलं की मला भारतीय लष्कराची घृणा आहे. पुढे त्यांनी त्याला, तुम्ही पंजाबात आणि काश्मीरमध्ये काम केलं आहे का ते विचारलं. तो हो म्हणाल्यावर या बाई म्हणाल्या, मग तर मला तुमच्या बाजूलाही बसायची इच्छा नाही. त्यावर हा अधिकारी शांतपणे म्हणाला, मी तुम्हाला एक घटना सांगतो, मग तुम्ही ठरवा.
पंजाबमधल्या दहशतवादाच्या अखेरच्या काळात हा अधिकारी तिथे काम करत होता. त्या काळात दहशतवाद्यांनी अपहरण सत्रं अवलंबली होती. ते लहान मुलांचं अपहरण करायचे. एका मोठ्या ड्रममध्ये त्यांना कोंडायचे आणि तो ड्रम जमिनीत पुरून ठेवायचे. ड्रम पुरल्यावर पालकांना फोन करून खंडणीची मागणी करायचे आणि ३-४ तासांत जर ती पूर्ण झाली नाही तर मूल मरून जाईल अशीही धमकी द्यायचे. मुलाच्या जीवाच्या भीतीनं पालक पोलिसांकडे तक्रारही करायचे नाहीत. एकदा असाच प्रकार घडला. अपहरण झालेल्या मुलाच्या पालकांनी बँकेतून सगळी रक्कम काढली, शेजा-यापाजा-यांनीही तसंच केलं, दागदागिने विकायला नेले. बँकेच्या मॅनेजरनं ही माहिती लष्कराच्या अधिका-यांना सांगितली की काही तरी गडबड वाटते आहे. ही माहिती कळल्यावर हा अधिकारी पालकांवर लक्ष ठेवून आपल्या तुकडीसह तिथे गेला. तिथे त्यांनी दोन दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या. दोन दहशतवाद्यांना पकडलं आणि सांगितलं की जो माहिती देईल त्याला जिवंत ठेवू. शेवटी दोघांनीही माहिती दिली. त्यानंतर त्या मुलाला जमिनीतून बाहेर काढलं. हा किस्सा त्या बाईला सांगितल्यानंतर हा मित्र त्यांना म्हणाला, तिथे जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही माझ्याशी या पद्धतीनं बोलला नसता.
हे सगळं बघितल्यावर, ऐकल्यावर माझीही द्विधा मनस्थिती झाली आहे. मला वाटतं आपल्या प्रत्येकाचीच ती होते. बरं-वाईट, योग्य-अयोग्य, चूक-बरोबर हे कुणी आणि कसं ठरवायचं?

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s