आजोबांची आठवण

माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्रामात ते दीड वर्ष तुरूंगात होते. हैदराबादला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मागे पडलेल्या वकिलीला परत एकदा सुरूवात केली. बरोबरीनं त्यांचं सामाजिक काम चालूच होतं. गांधीवादी असलेल्या माझ्या आजोबांची राहणी अतिशय साधी होती. आयुष्यभर त्यांनी खादीचे कपडे घातले. बीडला तेव्हा सायकल रिक्षा होत्या. आजोबा वयाची सत्तरी उलटेपर्यंत रिक्षात बसले नाहीत कारण त्यांना माणूस रिक्षा ओढतो हे पटायचं नाही. आमच्याकडे पूजेसाठी एक मुलगा येत असे, त्याला टीबी झालाय असं कळल्यावर माझे आजोबा रोज त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला ताजं दूध नेऊन देत असत.
आम्ही औरंगाबादला आल्यानंतर काही वर्षं ते बीडला राहात होते. नंतर आजारी पडल्यावर ते आमच्याकडे औरंगाबादला आले. आपलं इतक्या वर्षांचं वास्तव्य असलेलं गाव कायमचं सोडून येताना त्यांना नक्कीच त्रास झाला असणार पण त्यांनी कधीही त्याचा उच्चार केला नाही. आजी-आजोबा औरंगाबादला आले तेव्हा आम्ही सगळे आपापल्या आयुष्यात मग्न होतो. बाबांची वकिलीची प्रॅक्टिस धो-धो सुरू होती. आम्ही भावंडं आपापल्या शाळा-कॉलेजात आणि मित्रमंडळींमध्ये मग्न होतो. आजी-आजोबांबरोबर वेळ घालवायचो, नाही असं नाही पण तरीही आजोबांना वाटायचं की आम्ही त्यांच्याबरोबर अजून वेळ घालवावा. ते म्हणायचे की, सायल्या बस अजून थोडा वेळ माझ्याजवळ. आपणही त्या वयात आपल्याच विश्र्वात रमलेले असतो, आता वाटतं की बसायला हवं होतं का अजून थोडा वेळ त्यांच्याजवळ?
शेवटची काही वर्षं आजी-आजोबा माझ्या काकांकडे होते. तोपर्यंत आम्हा सगळ्यांची लग्नं झाली होती. मी औरंगाबादला गेले की रोज संध्याकाळी आजोबांना भेटायला काकांकडे जायचे. शेवटी ते इतके थकले होते की त्यांना आंघोळीचे श्रम सहन व्हायचे नाहीत म्हणून काका आणि शैलेश त्यांना स्पंजिंग करत असत. एकदा मी अशीच गेले आणि त्यांच्या कॉटवर बसून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले, तेव्हा ते मला म्हणाले की, सायली तू जरा लांब बस. मी त्यांना विचारलं की असं का म्हणताय. तेव्हा ते म्हणाले की, मी दोन दिवस आंघोळ केली नाहीये. मी म्हटलं मग त्यानं काय फरक पडतो. तर ते म्हणाले की तुला इन्फेक्शन होईल. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मी त्यांना म्हटलं की, अहो आजोबा, आम्ही बाहेर इतक्या वाईट वातावरणात फिरतो की तिथेच इन्फेक्शनची शक्यता जास्त आहे.
आज स्वातंत्र्य दिन म्हणून आजोबांची आठवण आली. आणि म्हणूनच या सगळ्याचीही आठवण झाली. माणसाचं वय वाढायला लागलं की त्याला जुन्या आठवणी जास्त तीव्रतेनं यायला लागतात का?

सायली राजाध्यक्ष