मावशी आणि मी

माझ्या सासुबाईंना मी मावशी म्हणते. माझं लग्न ठरल्यावर तुम्हाला काय म्हणू? असं मी माझ्या सासुसास-यांना विचारलं होतं. आणि मी आई-बाबा म्हणणार नाही असंही सांगितलं होतं. तर तिनं “मला विजू म्हण,” असं सांगितलं. कारण निरंजन आणि त्याच्या बहिणी तिला विजू म्हणतात. ते तर मला शक्यच नव्हतं. मग मी मावशी म्हणेन असं सांगितलं, त्यावरही तिचा “अगं मावशी म्हण” असा आग्रह होता. पण तेव्हा मी तिला अहो मावशीच म्हणत असे. चार-पाच वर्षानंतर तिच्या एका वाढदिवसाला तिनं “मला आजपासून अगं मावशीच म्हण,” अशी आज्ञा केली! जी पाळण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.
मावशी जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली तेव्हा २००१ मध्ये मी ‘ललित’साठी ‘घरातल्या विजयाबाई’ असा लेख लिहिला होता. तेव्हा माझ्या लग्नाला जेमतेम सहा वर्षं झाली होती. तिच्याशी मैत्री होती खरी पण त्यात काहीसा नवखेपणा होता. त्यामुळे त्यावेळी माझं आणि तिचं जे नातं होतं त्यापेक्षा आज २० वर्षांनंतरचं आमचं नातं खूप बदललेलं आहे. आम्ही आज एकमेकींच्या जास्त जवळ आहोत. सासू-सुनेपेक्षा आज आम्ही फक्त मैत्रिणी आहोत.


मावशी जशी आग्रही आहे तसेच माझे बाबाही आग्रही आहेत. आमचं लग्न वैदिक पद्धतीनं व्हावं असं बाबांना वाटत होतं तर ते नोंदणी पद्धतीनं व्हावं असं राजाध्यक्षांचं म्हणणं होतं. जेव्हा यावर बोलणं झालं, तेव्हा मावशीनं लग्न केव्हा आणि कशा पद्धतीनं होणार हे इतकं ठासून सांगितलं की बाबांना काही बोलताच आलं नाही आणि नोंदणी पद्धतीनं आमचं लग्न पार पडलं!
माझं लग्न झालं तेव्हा मावशी SNDT ला प्रोफेसर एमिरेटस होती. ती तेव्हाही नियमितपणे ट्रेननं प्रवास करत असे. इतकी वर्षं शिकवूनही ती तयारी केल्याशिवाय शिकवायला उभी राहात नसे. माझं माहेर औरंगाबादचं. त्यामुळे मला मुंबईच्या धकाधकीची सवय नव्हती शिवाय मला तेव्हा इथे मित्रमंडळी नव्हती. म्हणून ती मला आठवड्यातून निदान एकदा तरी SNDT ला घेऊन जायची. तिच्या विद्यार्थ्यांशी ओळख करून द्यायची. डिपार्टमेंटचा काही कार्यक्रम असेल तर मला आवर्जून न्यायची.
आमचं लग्न झालं तेव्हा मावशी रोज रात्री सकाळची तयारी करून ठेवायची. म्हणजे तिनं चहाची भांडी, दुधाची भांडी, चिमटा, गाळणी, चहा-साखरेचे डबे असं सगळं ओट्यावर काढलेलं असायचं. टेबलावर कपबशा काढलेल्या असायच्या. सकाळी उसळ करायची असेल तर कडधान्य भिजवलेलं असायचं. बटाटे उकडायचे असतील तर ते कुकरच्या भांड्यात घालून तयार असायचे. मला तेव्हा वाटायचं की काय एवढी घाई असते हिला सगळ्याची? पण आता वाटतं की तिनं इतकं मिनिटामिनिटाचं नियोजन केलं म्हणून ती किती तरी काम करू शकली आणि तेही घराची उत्तम व्यवस्था ठेवून. माझ्या सास-यांच्या आणि तिच्या वयात २० वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे ते निवृत्त झाले तेव्हा तिन्ही मुलं लहान होती, शिकत होती. तिनं त्या काळात घर चालवलं, शिकवलं, आपलं पीएचडी पूर्ण केलं, अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या, समीक्षा लिहिली, सेन्सॉर बोर्डाचं काम केलं, उत्कृष्ट स्वयंपाक करून लोकांना जेवायला घातलं. तेव्हा प्राध्यापकांचे पगार काही फारसे नव्हते. पण निरंजन मला सांगतो की एका पगारातही आमचं घर नेहमी साधं पण नीटनेटकं असायचं. घरात अभिरूचीपूर्ण गोष्टी असायच्या.
त्या काळातली लिहीत बसलेली मावशी माझ्या डोळ्यासमोर आहे. पहाटे लवकर उठून, त्या नीरव शांततेत, स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर मावशी लिहीत बसायची. कारण त्यावेळी कसलाही व्यत्यय नसायचा.

Nagao Feb 2010 014.jpg
स्वयंपाकाची, विशेषतः नवनवीन गोष्टी करून बघण्याची आवड मावशीला होतीच आणि आज ८२ व्या वर्षीही ती कायम आहे. निरंजन सांगतो की त्या काळातसुद्धा ती स्पॅनिश राईस, रशियन सॅलड, रशियन चिकन पुलाव, बेक्ड फिश यासारखे पदार्थ करत असे. बाहेर रेस्टॉरंटमध्ये कुठला पदार्थ खाल्ला की त्यात कुठले घटक पदार्थ असतील याचा अंदाज घेऊन घरी ती ते पदार्थ करत असे आणि ते उत्तम होत असत.
लग्नानंतर पहिले काही दिवस मी लवकर उठायचे. तेव्हा मावशीनं मला सांगितलं की, सासरी आली आहेस म्हणून लवकर उठायची काही गरज नाही. तुला ज्यावेळी उठायची सवय असेल त्यावेळी उठत जा. लग्न झालं तेव्हा मी २३ वर्षांची होते. मला माहेरी सगळ्या स्वयंपाकाची सवय होती. पण मावशीला वाटायचं की लहान आहे अजून. त्यामुळे मी काहीही केलं की सगळेजण अगदी भरभरून कौतुक करायचे. राजाध्यक्षांच्या घरातला हा एक फार मोठा गुण आहे की कुठल्याही अन्नाला कुणीही नावं ठेवत नाही. मावशी नॉनव्हेज खाते पण लग्नानंतर मला परकं वाटायला नको म्हणून तिनं माझ्यासाठी वर्षभर नॉनव्हेज सोडलं होतं कारण मी व्हेजिटेरियन आहे.
ब-याच घरांमध्ये सासू-सासरे आहेत म्हणून मित्रमंडळीला घरी बोलावलं जात नाही कारण त्यांना ते आवडत नाही. पण आमच्या घरात आमच्या मित्रमंडळीलाही कायम मुक्तद्वार होतं.
ती अतिशय शिस्तीची आहे. तिला ओळखणारे लोक आणि तिचे विद्यार्थी यांना ते चांगलंच माहीत आहे. तिला वेळेबद्दल बेशिस्त अजिबात चालत नाही. न सांगता अचानक कुठलेही कार्यक्रम ठरवलेले आवडत नाहीत. स्वयंपाकाचं पक्कं नियोजन लागतं. कुणी येणार असेल तर त्याची पूर्वतयारी चोख लागते. माझं माहेर देशस्थ. देशस्थ आणि बेशिस्त अशी एक म्हण आहेच! पण मुळात मी कधीच फारशी बेशिस्त नव्हतेच आणि आता तिच्या तालमीत मी तिच्यासारखीच तयार झाले आहे.
आमचं नातं नवीन असताना आमच्यात अजिबात मतभेद झाले नाहीत किंवा सगळं गोडगोड होतं असं अजिबातच नाही. कारण आम्ही दोघीही स्ट्राँग हेडेड बायका आहोत. पण यात मावशी माझ्यापेक्षा वरचढ आहे! हे तीही मान्य करेल. आमच्यात मतभेद बरेचदा झाले पण आम्ही दोघींनीही ते कधीही वाढू दिले नाहीत. लहानलहान गोष्टीत व्हायचेच. म्हणजे कधी न सांगता बाहेरून जेवून आलो किंवा न सांगता उशीरा आलो की मावशी आपली नापसंती दाखवायची. ती काही बोलली नाही तरी तिच्या चेह-यावर ती लगेचच दिसते. तशी ती दिसायची. मग पुढचा एखादा दिवस जरा संभाषणात तुटकपणा येत असे. पण आम्ही दोघींनीही वाद घालतानाही कधीही एकमेकींना अपशब्द वापरले नाहीत की आवाज चढवला नाही. आज मलाही माझ्या मुली न सांगता बाहेर जेवून आल्या की तसंच होतं. माझा आक्षेप बाहेर जेवायला नसतो पण निदान त्यांनी ते कळवावं असं मला वाटतं. तेव्हा मावशीला तसंच वाटत असणार. तू आई झालीस की तुला कळेल हा घिसापिटा वाक्यप्रयोग उगीचच नाही झालेला!

_ABH0030
आपल्याकडे पहिल्या गरोदरपणात डोहाळेजेवण करतात ते तर तिनं केलंच पण तिनं दुस-या वेळेलाही माझं डोहाळेजेवण केलं होतं. माझ्या बहिणींची, चुलतबहिणींचीही केळवणं केली. माझ्या बहिणी आल्या की आवडीचे पदार्थ करणं, मी बाहेरगावाहून येणार असेन की माझ्या आवडीची काळ्या वाटाण्याची आमटी करणं हेही तिनं मनापासून केलं. परवासुद्धा मी कॉलनीत मैत्रिणींबरोबर खाली गप्पा मारत बसले होते तेव्हा तिचा फोन आला. “तुमच्याकडे मिसळ केली आहे असं शर्वरीनं सांगितलं, मी आजच ताजा चिवडा केलाय तर तू जाताना घेऊन जा.”
सावनी लहान असताना आमच्या कॉलनीला एफएसआय मिळाला. ते काम सुरू असताना आम्ही मुक्ताच्या, माझ्या नणंदेच्या जवळच असलेल्या फ्लॅटमध्ये राहायचो. सावनी खूप वर्षानंतर घरात आलेलं लहान मूल होती. त्यामुळे अर्थातच सगळ्यांचा जीव होती. मावशीला त्या काळात बहुतेक भीती वाटायची की आम्ही परत आलो नाही तर? म्हणून तिनं आम्ही रोज संध्याकाळी साहित्य सहवासातल्या घरी जेवायला यावं असं सांगितलं. आणि मला रोज उठून यायचा कंटाळा यायचा. कधीकधी घराबाहेर पडणं नकोसं व्हायचं, तेही केवळ जेवणाकरता. त्यावरून आमचे कधीतरी लहानसहान वाद झाले. शेवटी काही काळानंतर मी तिकडेच स्वयंपाक करायला लागले.
मुली लहान असताना आम्ही स्वतंत्र राहायला लागलो. कुठलंही भांडण नव्हतं पण सहा मोठी माणसं आणि दोन लहान मुली यांना ते घर लहान पडायला लागलं. निरंजननं कंपनीला विचारलं आणि आम्ही शेजारच्याच पत्रकारनगरमध्ये राहायला गेलो. आम्ही स्वतंत्र राहावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं. त्यावरून तिच्यात आणि माझ्यात वादावादीही झाली. पण एकदा स्वतंत्र राहायचं ठरल्यावर मावशीनं सगळी म्हणजे सगळी मदत केली. अगदी भांडी विकत घेण्यापासून, फ्रीज, वॉशिंग मशीन, डायनिंग टेबल हे सगळं तिनं विकत घेऊन दिलं. मुलींना कुठलीही कमतरता भासता कामा नये असा तिचा आग्रह होता.
आमच्या लग्नानंतर तिची जी काही लहानसहान हॉस्पिटलायझेशन्स झाली त्यावेळी मी तिच्या बरोबर होते. शर्वरीच्या वेळी गरोदर असताना आठव्या महिन्यात मावशीचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तेव्हा रात्री तो डोळा बंद करून ठेवावा लागे. तो डोळा स्वच्छ करून बंद करण्याचं काम माझं होतं. कारण मुलांपेक्षाही मी ते जास्त नीट करेन असा विश्वास तिला होता.
सावनी-शर्वरी जन्मल्यापासून मावशीनं त्यांचं सगळं म्हणजे सगळं केलं. त्यांना आंघोळ घालणं, भरवणं, फिरवणं, त्यांच्यासाठी रात्ररात्र जागणं, त्यांना कविता म्हणून दाखवणं. सावनी लहान असताना आमच्या कॉलनीच्या बाजुच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या हॉस्टेलच्या बागेत ती तिला घेऊन जात असे. तिथे बसून दोघी गप्पा मारायच्या, कुत्री-मांजरं-पक्षी बघायच्या, त्यांच्या गोष्टी तयार करायच्या, कविता म्हणायच्या, घरून नेलेला खाऊ खायच्या. शर्वरी लहान असताना तिला डुकरं बघायला फार आवडायचं. तर मावशी रिक्षा करून एका उकिरड्यावर तिला डुकरं बघायला घेऊन जायची! मुली अगदी लहान असल्यापासून वीकेंडला आजीबरोबर राहायला जायच्या. आजी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं जेवायला करायची. मग त्यांचे खास कार्यक्रम ठरलेले असायचे. त्यात एखादा सिनेमा किंवा नाटक बघणं, बाहेर जेवायला जाणं, श्रीपु भागवतांकडे जाणं असं काहीतरी असायचं. श्रीपुंकडे तूप कुणी खायचं नाही म्हणून मावशी त्यांच्याकडे गेली की विमलताई तुपाची बरणी द्यायच्या. एकदा ती सावनीला घेऊन गेली होती. त्या दिवशी त्यांनी तुपाची बरणी दिली नाही, दारात सावनीनं त्यांना आठवण करून दिली, “आज तूप नाही देणार का?”

DSC01400
मुली लहान आहेत म्हणून मी कधी बाहेर जाऊ शकले नाही असं एकदाही झालं नाही. कारण मावशी कधीही त्यांना सांभाळायला तयार असायची. त्यामुळे मी निर्धास्तपणे बाहेर जायचे, सिनेमा, नाटकं बघायचे. याचं कारण त्यांची आजी त्यांची पूर्ण काळजी घेते, नव्हे माझ्यापेक्षा जास्त घेते याची मला कायम खात्री होती आणि अजूनही आहे. आज ब्याऐंशीव्या वर्षीसुद्धा ती शर्वरीला दादरला आणायला जायला तयार असते! दोन वर्षांपूर्वी आम्ही स्पेनला गेलो होतो. शर्वरी क्लासला गेली होती. रात्री मी फोन केला तर मावशी आणि सावनी शर्वरीला आणायला रात्री ९ वाजता टॅक्सीनं जात होत्या. आणि त्यावेळी ती ८० वर्षांची होती. मुलींना घेऊन एकदा परदेश प्रवास करायची मावशीची इच्छा होती. तसं २००८ मध्ये ती दोघींना घेऊन सिंगापोर आणि विएतनामला जाऊन आली. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी तिनं हे धाडस केलं.
जसजशी वर्षं जात गेली तसतसं आमच्यातलं सासू-सुनेचं नातं हळूहळू विरत गेलं आणि मैत्रीचं नातं घट्ट होत गेलं. कारण आम्ही दोघीही ब-यापैकी सारख्या प्रकारचं वाचन करतो, आम्हाला दोघींना स्वयंपाक करण्याची नुसती आवडच नाही तर सोस आहे, लोकांना घरी जेवायला बोलावणं आम्हा दोघींनाही मनापासून आवडतं, आम्ही दोघीही लहान शहरांमधून मुंबईला आल्यामुळे आमच्या दोघींचा दृष्टिकोन मूळ मुंबईकरांपेक्षा वेगळा आहे कारण आम्ही इतर गावांमधल्या जीवनपद्धतींशी रिलेट करू शकतो. आम्हा दोघींनाही नाटकं-सिनेमा बघायला खूप आवडतं. माझ्या डिजिटल अंकासाठी तिला मी कविता निवडायला सांगते. आताही नवीन अंकासाठी नवीन कवी तीच मला सुचवणार आहे. अंकाबद्दल तिला कुतूहल असतं, ती तो प्रयत्नपूर्वक बघते आणि वाचतेही. मी माझ्या सास-यांबद्दल लिहितानाही उल्लेख केला होता. मावशी आणि भाई हे दोघेही काळाबरोबर चालणारे आहेत. स्मरणरंजनात रमणारे नाहीत. साहित्यातले नवीन प्रवाह त्यांना आवडतात, आश्वासक वाटतात. आमच्या वेळी असं होतं हे चुकूनही दोघांच्या बोलण्यात मी कधी ऐकलेलं नाही. म्हणूनच कौशल इनामदारसारखे तरूण लोकही तिच्याशी मित्रत्वानं बोलतात.
विद्यार्थ्यांशी असलेलं जवळीकीचं आणि मित्रत्वाचं नातं हेही तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज तिचे काही विद्यार्थी सत्तरीला आलेले आहेत. पण अजूनही तिच्या वाढदिवसाला आवर्जून येणं, तिला अधूमधून येऊन भेटणं, काही कार्यक्रम असेल तर तिला बोलावणं, घ्यायला येणं हे ते सगळे करत असतात. याचं कारण विद्यार्थ्याशी आपलं नातं हे फक्त शिकवण्यापुरतं आहे असं मावशीनं कधीही मानलं नाही. त्यांचे वैयक्तिक प्रश्न, खाजगी समस्याही तितक्याच आपुलकीनं सोडवल्या. आम्ही दोन वर्षांपूर्वी तिचा ऐंशीवा वाढदिवस केला तेव्हा तिचे पंचाहत्तर विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आले होते.
आता गेली काही वर्षं ती माझ्यावर अधिकाधिक विसंबून राहायला लागली आहे. म्हणजे तिला पर्स हवी असेल किंवा कपडे घ्यायचे असतील तर ती मला ते आणायला सांगते. तिला दवाखान्यात जायचं असेल तर तेही सांगते. किंवा काही खावंसं वाटलं तर तसं सांगते. मी तिला गरज नसताना एकटी बाहेर जाऊ नकोस म्हणून दमही देते आणि आता ती ते ऐकतेही. सहा वर्षांपूर्वी मी आणि निरंजन बेल्जियमला गेलो होतो. मावशी दादर-माटुंगा सभागृहात एका कार्यक्रमाला गेली होती. ती घाईघाईनं तिथून निघताना पडली. तिचा खांदा फ्रॅक्चर झाला. आमचा डॉक्टर मित्र श्रीरंग पुरोहितनं आम्हाला न कळवता सर्जरीची व्यवस्था केली. आम्ही परत आल्यावर महिन्यानंतर तिला उजव्या हातात काहीच धरता येईना. चालता येईना. तिला डिलेड सबड्युरल हॅमरेज झालं होतं. लगोलग तिची ब्रेन सर्जरी केली. सर्जरीच्या आधी डोक्यावरचे सगळे केस काढतानाही ती अतिशय शांत होती. त्यानंतर सर्जरी झाली. मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबायचे. एक दिवस रात्री परत निघाले तेव्हा तिनं मला सांगितलं, “तू मला भरवून, बाथरूममध्ये नेऊन आणून आणि औषधं देऊन मगच घरी जा. हे सगळं तूच कर. मला विश्वास वाटतो.” मला वाटतं आमच्या बदललेल्या नात्याचं हेच खरं यश आहे.
कुठल्याही नात्यात चढ-उतार, राग-लोभ हे असतातच. पण आपण त्यातल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवतो हे नातं फुलण्यासाठी महत्वाचं ठरतं. चांगल्या गोष्टींना झुकतं माप दिलं तर ते नातं घट्ट होत जातं. मावशीमध्ये हा महत्वाचा गुण आहे आणि आता तो मी तिच्याकडूनच शिकले आहे.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी!

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s