बाबा आणि मी

माझे बाबा नरेंद्र चपळगावकर हे डिसेंबर २००४ च्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तेव्हा प्रतिष्ठानच्या विशेषांकात प्रकाश मेदककर काकांनी मला त्यांच्याबद्दल लिहायला सांगितलं होतं. तेव्हा लिहिलेला हा लेख. आज हा लेख परत वाचला तेव्हा मला त्यात खूप काही वेगळं लिहिता आलं असतं असं वाटलं. पण तेव्हा तो असा लिहिला होता म्हणून तो तसाच शेअर करते आहे. हा लेख मी नागपुरात धंतोलीतल्या कवी अनिलांच्या घरात बसून लिहिला होता ही अजून एक आठवण. लेख बराच जुना आहे हे लक्षात घेऊनच वाचा.

बाबा आणि मी
माझ्या लग्नाला आता दहा वर्षं होतील. पण अजूनही माझा आणि बाबांचा रोज एक फोन असतोच. बरं आम्ही फोनवर बोलतो ते काही महत्त्वाचे विषय नसतात, अगदी, आज तुम्ही काय जेवलात? कुठे गेला होता? दिवसभरात काय घडलं? अशा अगदी साध्या बाबींवर आमचं बोलणं होतं. पण रोज एक फोन हा व्हायला हवाच! निरंजन तर म्हणतो की, तुम्ही एक फॅमिली न्यूजलेटर का काढत नाही, कारण रोज एकमेकांशी तेच ते बोलत असता. पण खरं सांगायचं तर दहा वर्षं झाली तरी अजून रोज बाबांशी बोलल्याशिवाय करमतच नाही.
आमचं मूळ गाव बीड. एखाद्या व्यक्तीच्या विकासाला अशा लहान गावात मर्यादा पडू शकतात. त्या बाबांनी मात्र कधी पडू दिल्या नाहीत. म्हणजे घरी तसं वातावरण अगदी चांगलंच, पोषक होतं. पण आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि नंतरही विशिष्ट तत्वांशी इमान राखून वकिली करणारे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम होती अशातला भाग नाही. नंतर बाबाही काही काळ प्राध्यापकी करून वकिलीकडे वळले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीसाठी जायचं ठरवलं, कुठलंही पाठबळ नसताना ते यशस्वी झाले आणि नंतर न्यायमूर्तीही. बाबा मुंबईला असताना आम्ही बीडलाच होतो. मला आठवतं, दर वेळेला ते बीडला यायचे तेव्हा आमच्यासाठी काही तरी नवलाईच्या गोष्टी घेऊन यायचे. जाताना आम्ही त्यांना एसटी स्टँडवर सोडायला जायचो ते दृश्य अजून मला लख्ख आठवतं आहे. मुंबई-बीड असा एसटीचा प्रवास कुणी मला करायला सांगितला तर आता मी करू नाही शकणार, पण बाबा हा दिव्य प्रवास महिन्यातून किमान एकदा तरी करत असत (सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे ही. एक्सप्रेस हायवे नव्हता. घाटातले प्रचंड ट्रॅफिक जॅम आठवा.)
नंतर उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला स्थापन झालं आणि आम्ही औरंगाबादला आलो. इथेही बाबांनी अनेक अडचणींमधून उत्तम यश मिळवलं.आता विचार केला की वाटतं, आज आपण मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे असं म्हणत असतो. आजकालचे पालक त्याविषयी जागरूकही असतात, पण आम्ही लहान असताना, अशा प्रकारची कुठलीही संकल्पना प्रचलित नसताना आईबाबांनी नकळत आम्हाला असा वेळ निश्चितच दिला. लहान असल्यापासून आजूबाजूला कायम पुस्तकं बघितल्यानं आम्हाला वाचनाची सवय लागली. घरात माणसांची कायम वर्दळ असल्यानं किती तरी सुसंस्कृत आणि असंस्कृतही माणसांना बघायची संधी मिळाली. कुठलीही नवीन व्यक्ती घरी आली तर आम्ही बाहेर येऊन तिच्याशी बोललंच पाहिजे असा बाबांचा कटाक्ष असायचा. आणि हे खूप महत्त्वाचं आहे हे आज मला जाणवतं. घरी माणसांचा कायम राबता असायचा आणि अजूनही असतो. पूर्वसूचना न देता घरी जेवायला आमंत्रण देण्यात बाबांचा हात कुणीही धरू शकणार नाही. बिचारी आई होती म्हणूनच तिनं कित्येकदा नापसंती व्यक्त करून का होईना पण आगंतुक पाहुण्यांना जेवायला घातलं आहे.
खाण्याच्या बाबतीत बाबांच्या अतिशय खोडी आहेत (सॉरी, ते चोखंदळ आहेत!) साधं वरण इतपच गोड हवं किंवा त्यात हिंग किती असावा अशा गोष्टींसाठी बाबा नेहमी कटकट करत असतात. त्या एका बाबतीत आला त्यांनी नेहमीच धारेवर धरलंय. रोज जेवताना भाजीत मीठ जास्त आहे, वरणात गूळ कमी आहे वगैरे तक्रारी ते करत असतात. एकदा गोव्यात त्यांचं सिटिंग असताना दिवसभराचा प्रवास करून आम्ही संध्याकाळी गोव्यात पोहोचलो. बरोबर आई नव्हती. खानसाम्यानं जे काही सामान आणलं होतं त्यातून मी खिचडी केली, ती अर्थातच बाबांना पसंत पडली नाही! त्यांनी विचारलं की, दुसरं काही मिळेल का? मी बाबांना सांगितलं की, नाही मिळणार, कारण मी खूप थकले आहे आणि मी आई नाहीये. वर असंही म्हणाले की, मी आईच्या जागी असते तर केवळ या मुद्द्यावर घटस्फोट घेतला असता. त्यामुळे बाबा माझ्याबरोबर जेवताना घाबरतात. ते जेव्हा मुंबईला माझ्याकडे येतात तेव्हा कुठलीही टीका न करता पानात पडेल ते खातात. बिचारे!
बाबा अतिशय हळवे आहेत. त्यांना कुठलंही दुःख अजिबात सहन होत नाही. आजोबांचं आजारपण असो की अगदी नातवंडांपैकी कुणाला साधा ताप असो, ते काळजी करत बसतात. प्रत्यक्षात दुस-यांना सांगतात की, त्यात काय आहे काळजी करण्यासारखं, पण स्वतः मात्र पुन्हा पुन्हा चौकशी करत बसतात. किती तरी लोकांना बाबांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत केली आहे. मला आठवतं, औरंगाबादला असताना एक अतिशय म्हातारा पक्षकार आला होता. अगदी हलाखीची परिस्थिती असलेला. बाबांनी त्याच्या राहण्याजेवण्याची व्यवस्था आमच्या घरीच केली होती. त्या माणसाच्या मुलीला सासरच्यांनी जाळून मारलं होतं. बाबांनी त्याच्याकडून आपली फीही घेतली नाही. अर्थात बाबांकडून हक्कानं, हवी ती मदत घेणा-या काही माणसांनी त्यांना चांगलाच इंगाही दाखवला आहे. पण बाबा ते लक्षात न ठेवता, सगळं विसरून त्या माणसाशी पुन्हा त्या माणसाशी नेहमीसारखे वागतात आणि मला त्यांचा हा स्वभाव अजिबातच आवडत नाही. न्यायमूर्ती म्हणून काम करताना प्रामाणिकपणे काम करण्यासाठी बाबांनी कित्येकदा मनस्तापही सहन केला. या गोष्टी त्यावेळी त्यांनी आमच्यापर्यंत येऊ दिल्या नसल्या तरी आता त्या मला जाणवतात.
मुलांमध्ये बाबांशी सर्वाधिक भावनिक गुंतवणूक माझी आहे आणि त्यांचीही माझ्यात आहे. निदान मी तरी तसं समजते! त्यांनी नेहमी माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या. मी मेरीटमध्ये यावं, मी स्पर्धा परीक्षा द्याव्यात असं त्यांना नेहमी वाटायचं. मी एमएला विद्यापीठात पहिली येऊन निदान त्यांची एक अपेक्षा तरी पूर्ण केली. मी फारशी महत्वाकांक्षी कधीच नव्हते आणि आजही नाही. आज माझं हस्ताक्षर चांगलं आहे याचं कारण दहावीत बाबांनी माझ्याकडून नियमितपणे शुद्धलेखन लिहून घेतलं. तोपर्यंत माझं अक्षर म्हणजे कुत्र्याचे पाय मांजराला असं होतं. बाबा माझ्या आजोबांपेक्षाही पारंपरिक आहेत. म्हणजे मी डिझायनर, चित्रकार किंवा ब्युटीशियन असा काही मार्ग निवडला असता तर त्यांना ते रूचलं नसतं. म्हणजे ते प्रत्यक्ष तसं बोलून दाखवणार नाहीत पण मला मनातून ते माहीत आहे. मी मुलांशी मैत्री केलेलीही त्यांना रूचायची नाही. माझे मित्र घरी आले किंवा मी त्यांच्याबरोबर बाहेर गेले तर ते अस्वस्थ असायचे. नंतर मेघना आणि भक्ती कॉलेजला गेल्यावर त्यांचे मित्रही घरी यायला लागले आणि बाबा हळूहळू लिबरल होत गेले!
प्रवासाला जाणं ही बाबांची अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. मग त्यात सामाजिक कार्यक्रमांसाठीप्रवास असोत, सदिच्छा भेटी असोत वा कौटुंबिक सहली असोत, बाबा अतिशय उत्साहानं प्रवासाची आखणी करत असतात. माझ्या लग्नापूर्वी आम्ही भारतातली किती तरी राज्यं बघितली. प्रत्येक प्रवासापूर्वी प्रवासाच्या ठिकाणांची माहितीपत्रकं गोळा करायची, नकाशे जमवायचे इथून आमच्या सहलींच्या आखणीला सुरूवात व्हायची. औरंगाबाद ते आग्रा असा प्रवास आम्ही कारनं केलाय! राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी असतानाही सकाळी पाचला प्रवासाला सुरूवात झालीच पाहिजे असा बाबांचा आग्रह असायचा. कितीही चिडचिड झाली तरी शेवटी त्यांचंच ऐकावं लागे. पंधरा दिवसांत तेरा गावं अशी यात्रा कंपन्यांनाही लाजवेल अशी आमची सहल असायची. माझा नवरा तर बाबांबरोबर प्रवास करायला घाबरतोच. मी कधी कधी कंटाळून म्हणायचे की मला प्रवासाला यायचं नाहीये. तेव्हा बाबा म्हणायचे की हौस नसलेला नवरा मिळाला तर मग प्रवासच होणार नाही. आणि त्यांचं म्हणणं खरं झालं आहे, निरंजनला अजिबात प्रवास आवडत नाही.
अतिउत्साह आणि कुठल्याही गोष्टीत प्रमाणापेक्षा जास्त गुंतणं, या दोन्ही बाबींवरून त्यांच्यात आणि माझ्यात खूप खटके उडतात (खरं तर माझाही स्वभाव तंतोतंत असाच आहे तरीही). कुठल्यातरी माणसाला बरं वाटावं म्हणून त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला तीनशे किलोमीटरचा प्रवास करून जावं असं मला वाटत नाही आणि बाबांना ते नैसर्गिक वाटतं. बाबांनी निदान आता तरी आपले प्राधान्यक्रम बदलावेत असं मला वाटतं. त्यांनी जास्तीत जास्त वेळ लेखनाला आणि घराला द्यावा असं आम्हा सर्वांना वाटतं आणि त्यांना ते अजिबातच मान्य नाही. म्हणून हल्ली गावाला जाताना ते मला सांगतच नाहीत. मग २-३ दिवस त्यांचा फोन आला नाही की समजावं की ते कुठेतरी दौ-यावर आहेत. बरं तिथून फोन करावा तर मला सांगावं लागणार की ते कुठे आहेत! मग परत आल्यावर मी त्यांना विचारते की, झाल्या का लष्करच्या भाक-या भाजून. ते मग काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देतात. दुस-यांना अनाहूत सल्ला देणं हेही बाबांकडूनच आपोआपच होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ कुणी प्रवासाला जाणार असेल की त्यांनी त्याची आखणी कशी करावी हे बाबा आपणहूनच सांगतात (अर्थात हा अनाहूत सल्ला नाही, कारण त्यात त्यांचा हात कुणीच धरू शकणार नाही!) यातला गंमतीचा भाग सोडा. पण समोरच्या माणसाला ते आवडत नाही तर तुम्ही का सांगता असं मी त्यांना विचारते. पण त्यांच्याकडून ते नकळत होत असतं, त्यांचा इलाजच नसतो.
बाबांच्या लेखनाविषयी मी काय लिहिणार? निवृत्त झाल्यानंतर ख-या अर्थानं त्यांना आताच लेखनाला वेळ मिळतोय. स्वामी रामानंद तीर्थांवरच्या पुस्तकासारखी आणखी पुस्तकं त्यांनी लिहावीत असं मला वाटतं. प्रकाश मेदककर काकांचा जेव्हा या लेखासाठी फोन आला तेव्हा मला वाटलं की आपण बाबांविषयी तटस्थपणे कसं लिहिणार? पण नंतर विचार केल्यावर असं वाटलं की तशी कोणाचीच अपेक्षा नसते. त्यानिमित्तानं आपल्याला त्यांच्या आणि आपल्या नात्याविषयी विचार करायची संधी मिळते आहे आणि आपण ती घेतली पाहिजे.
सायली राजाध्यक्ष