कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा भग्नमूर्ती हा काव्यसंग्रह वाचून माझ्या सास-यांनी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर १९३६ मध्ये ते मुंबईला आले असताना मुंबईतल्या एम्पायर हॉटेलमध्ये ते उतरले होते. तेव्हा माझ्या त्यावेळी २३ वर्षांच्या असणा-या सास-यांना त्यांनी भेटायला बोलावलं होतं. १९३६ मध्ये जुळलेला हा बंध कवी अनिलांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८२ पर्यंत कायम होता. माझे सासरे तसे व्यक्तिपूजेच्या अगदी विरोधात होते पण कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे दोघे त्यांच्यासाठी आदरस्थानं होती. भाई (माझे सासरे) आणि विजया आपटे यांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा भाईंनी सगळ्यात आधी आपल्या वहिनीला ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर अनिल आणि कुसुमावतीबाईंना. मावशीनं सांगितलं की जेव्हा लग्नानंतर कुसुमावतीबाईंचं पहिलं पत्र आलं तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की, तुमचं अभिनंदन करू की तुम्हाला आशीर्वाद देऊ?


कुसुमावतीबाई आकाशवाणीत अधिकारी होत्या. दिल्लीला असताना त्यांचं मीनाबागेत आकाशवाणीनं दिलेलं घर होतं. हे घर म्हणजे माझं दुसरं घरच होतं असं भाईंनी या दोघांबद्दल लिहिलेल्या लेखात नमूद केलेलं आहे. या लेखात भाई म्हणतात, “अनिलांचे बोलणे अघळपघळ, गमतीच्या आठवणींनी सजवलेले आणि विलंबित लयीत डुलणारे. त्यांच्या कवितेइतकाच त्यांच्या पान खाण्याने लौकिक मिळवलेला आहे. तोंडात पान असले आणि तमाखूची तार असली की, माणूस बोलतो कमी ही त्या व्यसनाची एक चांगली बाजू नेहमी वाखाणली जाते. किंवा तो बोललाच तर अवघडून बोलतो. अनिलांना मात्र तोंडात ते ब्रह्म सगुण होत असताना नेहमीसारखेच, किंबहुना नेहमीहूनही स्वच्छपणे बोलण्याची सिद्धी प्राप्त झाली आहे. ते बैठक हमखास रंगवतात – श्रोते कसलेही असोत. त्यांच्याकडून पूर्वी ऐकलेल्या विनोदी कथेतील गंमत ती पुन्हा ऐकतानाही ओसरत नाही असे श्रोत्याला वाटते, आणि ती सांगताना कवींनाही तशीच गंमत वाटत असते.”
पुलंनी माझ्या सास-यांविषयी जो लेख लिहिलेला आहे त्यात ते म्हणतात, “वास्तविक अनिल आम्हा सर्वांच्या मानाने सर्वार्थानं ज्येष्ठ! पण त्यांनाही आमच्या उटपटांग गटाविषयी प्रेम निर्माण झाले होते. साहित्यातल्या गहिवर संप्रदायाच्या तेही विरूद्ध. अनिल कवी झाले नसते तर उत्तम विनोदी लेखक झाले असते. त्यांनी मुक्तछंद लिहिला आणि मराठी काव्यमंदिरात ‘अब्रह्मण्यम्’ असा आक्रोश जाहला. पण पुढे मुक्तछंदाने मराठीत ठाण मांडले. ह्या काव्यप्रकाराचा अनिलांनाही पस्तावा व्हावा इतका आता तो माजला आहे.”
कवितेत मुक्तछंदाचा वापर करणारे पहिले मराठी कवी म्हणजे अनिल. शिवाय दशपदी हा काव्यप्रकारही त्यांनी लोकप्रिय केला. माझ्या सासुबाईंनी सांगितलं की दशपदीची गंमत अशी की अनिलांना सर्वात आधी शेवटची म्हणजे दहावी ओळ सुचत असे आणि नंतर ते बाकीची कविता लिहीत.
राजाध्यक्ष कुटुंब साहित्य सहवासात येण्याआधी कुलाब्याला राहात असे. अनिल तेव्हा त्यांच्या घरी पुष्कळदा येत असत. बरोबर त्यांचा पान-तंबाखूचा जामानिमा असायचाच. त्यांनी एक जुनीपुराणी अटॅची होती त्यात ते बीयरच्या दोन बाटल्या घेऊन येत असत. अजूनी रूसूनी आहे आणि आज अचानक गाठ पडे ही दोन अत्यंत लोकप्रिय झालेली त्यांची गाणी कुमार गंधर्वांनी गायलेली आहेत. या गाण्यांच्या एलपी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा अनिल मुंबईत आले असताना रिदम हाऊसमधून ही एलपी आणि ती ऐकणं सेलिब्रेट करण्यासाठी बीयरच्या बाटल्या घेऊन आमच्या कुलाब्याच्या घरी आले होते. आज अचानक गाठ पडे हे गाणं त्यांच्या दिवंगत मुलाची अचानक आठवण आल्यानंतर त्यांना सुचलं किंवा हे गाणं त्यांनी कुसुमावतींना उद्देशून लिहिलं आहे असे दोन समज लोकप्रिय आहेत. गाण्यांच्या कार्यक्रमांमधून ते रंगवून सांगितलेही जातात. पण प्रत्यक्षात ते खरं नाही.
अनिलांचा एक मुलगा किशोर हा हवाई दलात होता आणि विमान कोसळून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. साहजिकच अनिल आणि कुसुमावतीबाई फार खचून गेले. मी दहा वर्षांपूर्वी नागपूरला गेले असताना मी अनिलांच्या धंतोलीतल्या घरी उतरले होते. फार सुंदर झाली होती ही ट्रीप. कारण अनिलांच्या घरी राहणं. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या आठवणी ऐकणं, महेश एलकुंचवारांबरोबर नागपूर आणि आनंदवन फिरणं हे सगळं न विसरण्यासारखं आहे. तर त्यावेळी शिरीष देशपांडेंनी (अनिलांचे चिरंजीव) किशोरची बारशाची कुंची, त्याचा हवाई दलाचा गणवेश असं सगळं दाखवलं होतं. फार प्रेमानं हे सगळं त्यांनी जतन केलं आहे. अनिल बसायचे तो सोफा (ज्याला आज पण रिक्लायनर म्हणतो) तोही त्यांनी अजून ठेवलेला आहे. ते स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांनी जुन्या घराचा डौल नवीन सुखसोयींनी युक्त करून कायम ठेवलेला आहे. ( हे थोडं इथे गैरलागू आहे. पण नागपूरच्या विमानात आमच्याबरोबर मराठी टेलिव्हिजनवर काम करणारी एक अभिनेत्री होती. तिची एक सिरियल त्यावेळी गाजत होती. ती नागपुरात शिकलेली, वाढलेली होती. तर अनिलांच्या घरी जातो आहोत हे सांगितल्यावर तिनं प्रश्नार्थक चेहरा केला. तिला अनिल कोण हे माहीत नव्हतं!)
याच प्रवासात त्यांनी अनिलांच्या अनेक आठवणी सांगितल्या. अनिल नेहमी अंगणात कॉट टाकून मच्छरदाणी लावून झोपायचे. नागपूरला थंडी खूप असते तर त्या थंडीत ते रमच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये गरम पाणी भरून त्या बाटल्या अंथरूणावर घेऊन झोपत असत. पण घरात झोपा म्हटलं तर ते त्यांना मान्य नसे. त्यांना भग्नमूर्ती कसं सुचलं तेही शिरीष देशपांडेंनी सांगितलं होतं. अनिलांना झालेला तो साक्षात्कार होता. त्यानंतर ते मंदिरही त्यांनी बांधलं होतं.
निरंजन साधारणपणे ६-७ वर्षांचा होता तेव्हा तो नागपूरला गेला असताना अनिलांचा नातू उन्मेष आणि निरंजन या दोघांना घेऊन ते बाहेर कॉटवर झोपायचे. पुढे निरंजन थोडा मोठा झाल्यावर एकदा भाई-मावशी, अप्पासाहेब (अनिलांना अप्पासाहेब म्हणत) आणि निरंजन असे कोल्हापूर आणि पुणे प्रवासाला गेले होते. तेव्हा निरंजन त्यांच्या खोलीत राहिला होता. संध्याकाळी रोज त्यांच्याकडे कवितेबद्दल बोलायला लोक येत पण मला तेव्हा त्यातलं काही समजत नव्हतं म्हणून मी कॉमिक्स वाचत बसायचो असं निरंजननं सांगितलं. त्याच प्रवासात मावशीनं त्यांच्याशी गप्पा मारताना टिपणं काढली. प्रामुख्यानं दशपदी या प्रकाराबद्दल या वेळेला बरंच बोलणं झालं. पुढे या टिपणांवरून मावशीनं अप्पासाहेबांची मुलाखत तयार केली. ती दशपदीमध्ये प्रस्तावनेबरोबर आहे.
आमच्याकडे अनिलांनी स्वतः सही करून दिलेले त्यांचे सगळे काव्यसंग्रह आहेत. निर्वासित चिनी मुलास या पुस्तकावर कॅमलिंगमध्ये जेवल्यानंतर सगळ्यांनी सह्या केल्या होत्या. त्यात मं. वि. राजाध्यक्ष, पु.आ. चित्रे, द. ग. गोडसे, पु. शि. रेगे आणि श्री.बा. रानडे यांच्या सह्या आहेत.
या पुस्तकातल्या ओळी वाचताना आज सीरीयातली मुलंच डोळ्यासमोर आली. तीच परिस्थिती, त्याच वेदना फक्त संदर्भ वेगळे इतकंच.
अरे, पोरक्या चिनी बालका!
घरादारांना पारखी झाली
सोडून दिली आईबापांनी
ताटातूट झाली अशी ही किती
आहेत बालके तुझ्यासारखी
भटकत वणवण निर्जनात!
सहस्त्रांनी आहे गणना त्यांची
कित्येक बिचारी अन्नपाण्यावीण
आक्रंदत आणि तडफडत
रडत मेली!!
किशोर गेल्यानंतर अनिल आणि कुसुमावतींनी पाठवलेलं, कुसुमावती गेल्यानंतर अनिल, शिरीष आणि आशा देशपांडेंनी पाठवलेलं आणि अनिल गेल्यावर शिरीष आणि आशा देशपांडेंनी पाठवलेलं अशी तीनही कार्डं अजूनही माझ्या सासुबाईंनी जपून ठेवलेली आहेत.
आज अनिलांचा जन्मदिवस. आज माझ्या सासुबाईंनी आणि नव-यानं मला त्यांच्याबद्दल बरंच सांगितलं. आम्ही त्यांनी लिहिलेली सुंदर गाणी ऐकली. संध्याकाळ छान गेली. माणूस गेल्यावर त्याचं नक्की काय उरतं? या आठवणीच ना?

सायली राजाध्यक्ष