इस्त्रायल डायरी २०१७

३० जानेवारी २०१७ –

आपण वेगवेगळ्या प्रकारचं जेवत असतो, वेगवेगळं खाणं खात असतो. आता तर जग इतकं जवळ आलंय की जगाच्या कुठल्याही कोप-यात जगाच्या दुस-या टोकावरचं खाणं सहजरित्या उपलब्ध होत असतं. भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचं खाणं मिळतं.
मला, माझ्या नव-याला आणि माझ्या मुलींना सगळ्या प्रकारचं खाणं आवडतं. वेगवेगळ्या प्रकारचं खाणं चाखून बघण्यात आम्हाला आनंद वाटतो. विशेषतः प्रवास करताना आपण जिथे जातो तिथल्या पद्धतीचं खाणं खाऊन बघायलाच हवं या मताचे आम्ही आहोत. आणि आम्ही जेव्हा बाहेरगावी किंवा परदेशात जातो तेव्हा तिथले पदार्थ आवर्जून खातो.


आम्ही उद्या इस्त्रायलला जातो आहोत. तब्बल १० दिवस इस्त्रायलला असणार आहोत. अर्थातच तिथले वेगवेगळे बाजार बघणार आहोत. इस्त्रायलमधले ज्यू लोक जगभरातून आलेले आहेत त्यामुळे इस्त्रायलमधली खाद्यसंस्कृती बहुढंगी आहे. मध्य आणि पूर्व युरोपातून आलेले अश्केनाझी ज्यू, सिरिया आणि इजिप्तमधून आलेले मिझराही ज्यू, ट्युनिशियन ज्यू, नॉर्थ आफ्रिकेतून आलेले मघरेबी ज्यू, भारतातून गेलेले कोचिन ज्यू, बेने-इस्त्रायली, शिवाय अरब अशा अनेकांच्या मिश्रणातून इस्त्रायलची खाद्यसंस्कृती तयार झालेली आहे. बाजार ही खास अरबी संकल्पना, ज्याला सूक म्हणतात. इस्त्रायलमध्ये जेरूसलेम आणि तेल अवीव अशा दोन्ही शहरांमध्ये त-हत-हेचे बाजार आहेत. ते बघायचे आहेत. मी शाकाहारी असले तरी इस्त्रायलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, सॅलड्स, सुका मेवा, फळं मुबलक प्रमाणात मिळतात. शिवाय फलाफल, हमस, मुहम्मरा, पिटा ब्रेड असे माझे आवडते प्रकारही सहज मिळतात. त्यामुळे खाण्याचा अनुभव उत्तम असणार यात शंकाच नाही. त्याबद्दल वेळोवेळी लिहीनच.
उद्यापासून हे सगळं खायचं आहेच. पण खरं सांगू का, मोठ्या प्रवासाला निघण्याआधी आपलं कम्फर्ट फूड खाल्लं की फार बरं वाटतं. त्यानुसार आज घरातल्या प्रत्येकाला आवडणारे पदार्थ केले. निरंजनला, माझ्या नव-याला सारस्वती पद्धतीची फिश करी आणि गरम भात अतिशय प्रिय आहे. म्हणून त्याच्यासाठी आज पापलेटची आमटी आणि भात केला. मी १० दिवस नाही म्हणून मुलींना आवडणारी तिस-यांची आमटी केली. आणि माझ्यासाठी अर्थातच गरमागरम पिठलं केलं. बरोबर तळलेली मिरची. भातावर मस्त तूप घालून पिठलं कालून त्याचा फडशा पाडला. सगळेजण आपापलं कम्फर्ट फूड खाऊन तृप्त झालेले आहेत.
आता उद्यापासून एका अनोख्या, नवीन संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. तिथल्या लोकांना भेटायची, त्यांच्याशी गप्पा मारायची, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली आहे. भारतातून गेलेल्या ज्यूंचे अनुभव ऐकायचे आहेत. आणि हो, इस्त्रायली कम्फर्ट फूड चाखून बघायचं आहे! तुमच्याशी जमेल तसं बोलत राहीनच. तिथल्या पदार्थांचे फोटोही शेअर करेन. संपर्कात राहूच.
#traveldiary #israeltraveldiary #israelifood #israelfood #mumbaimasala#worldcuisine #israelcuisine #lovetotravel #अन्नहेचपूर्णब्रह्म #इस्त्रायलडायरी#इस्त्रायलखाद्यसंस्कृती

२ फेब्रुवारी  २०१७-

इस्त्रायलला जाणं हे माझं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. या देशाच्या इतिहासानं माझ्या मनावर गारूड केलेलं आहे. जगभरात वेगवेगळ्या कारणानं हेटाळणी झालेल्या ज्यूंनी आपली हक्काची मातृभूमी मिळवली. Palestine आणि इस्त्रायल यांच्यातल्या वादाबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये कारण हा प्रश्न एका वाक्यात शेरा मारावा इतका साधा नाही तर अतिशय गुंतागुंतीचा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट एकच आहे की यात दोन समूहांच्या भावना गुंतलेल्या आहेत, त्यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे.


काल जेरूसलेमचं जुनं शहर बघितलं. अतिशय वेगळंच शहर आहे हे आणि इथलं आर्किटेक्चर तर अफलातून आहे. पिवळसर झाक असलेल्या पांढ-या दगडांत बांधलेल्या इमारती अतिशय सुंदर दिसतात. या एका शहरात केवढा इतिहास आहे… जुन्या शहरात फिरताना एका किलोमीटरच्या परिसरात ज्युईश, मुस्लिम, ख्रिश्चन, अरब आणि आर्मेनियन क्वार्टर्स आहेत. प्रत्येकाचा इतिहास वेगळा पण तरीही येशू ख्रिस्तामुळे एकमेकांशी जोडलेला आहे.
पलेस्टाइन आणि इस्त्रायलमध्ये मोठी भिंत उभी केलेली आहे. ती योग्य की अयोग्य हे ठरवणारे आपण कोण… पण दोन्ही बाजूंबद्दल कणव वाटते हे खरं. इतकं अस्थिर वातावरण असलेल्या पलेस्टाइनमधले रस्ते उत्तम आहेत, लोक उबदार आहेत.
काल जेरूसलेममध्ये फिरताना निदान १० जणांनी तुम्ही भारतीय का असं विचारलं आणि हो म्हटल्यावर प्रेमानं अभिवादन केलं. इथे आणि पॅलेस्टाइनमध्ये भारतीय मालिका लोकप्रिय आहेत.


केवळ उन्मादापोटी संपूर्ण ज्यू जमात संपवायला निघालेल्या हिटलरला त्यात यश तर आलं नाहीच पण त्यानं त्यात आपल्या देशाची होरपळ केली. या सगळ्या भयानक प्रकाराला तोंड देऊन ज्यू मात्र आज ताठ मानेनं उभे आहेत. या सगळ्या इतिहासाचं एकत्रीकरण करून उभ्या केलेल्या Yad Vashem या Holocaust museum ला आज जाणार आहोत. ते बघण्यासाठीचं धैर्य गोळा करते आहे…

#Israeldiaries #Israeltravel #Jerusalemdiaries #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास#जेरूसलेमडायरी

IMG_0523
वेलिंग वॉल – जेरूसलेम

३ फेब्रुवारी २०१७ –

आम्ही काही वर्षांपूर्वी Amsterdam ला गेलो होतो तेव्हा अँन फ्रँकचं घर बघायला गेलो असताना एका बाईनं मला तिचा फोटो काढायला सांगितला. घरासमोर ती उभी राहिली तेव्हा मी तिला म्हटलं स्माइल, तेव्हा ती मला फटकन म्हणाली I can’t smile here. कुणीतरी झापड देऊन भानावर आणावं तसं मला झालं. ती बाई ज्यू होती.
आज जेरूसलेममधलं याड वाशेम हे होलोकॉस्ट म्युझियम बघितलं. दुस-या महायुद्धात हिटलरच्या उन्मादापायी ज्यूंच्या ज्या नृशंस हत्या झाल्या त्या स्मरणार्थ हे म्युझियम उभं करण्यात आलेलं आहे. जेरूसलेममध्ये ज्या गोष्टी बघायच्या होत्या त्यात हे म्युझियम माझ्या यादीत पहिल्या क्रमांकावर होतं. म्युझियम पाहताना काय झालं याचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. सतत डोळे पाझरत होते. म्युझियमच्या माहिती पुस्तकातला उल्लेखही लक्षणीय – दुस-या महायुद्धात ज्यूंवर जे बेतलं ते ज्यूंच्या दृष्टिकोनातून इथे दाखवलेलं आहे असं म्हटलं आहे…

IMG_0875
१९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आल्यापासून ते इस्त्रायलच्या निर्मितीपर्यंतच्या घटनांचं डॉक्युमेंटेशन इथे आहे. हिटलर सत्तेवर आल्यापासून वंशशुद्धतेच्या नावाखाली त्यानं पद्धतशीरपणे ज्यूंच्या विरोधात आघाडी उघडली. त्याच्या या वेडेपणात त्याला गोअरिंग, गोबेल्स, हिमलरसारख्या लोकांनी साथ दिली. शिवाय जर्मन नागरिकही चेकाळले, इतकंच नव्हे तर युरोपभर ज्यूंच्या विरोधात वातावरण तापलं. जेव्हा ज्यूंच्या हत्या व्हायला लागल्या, ज्यू लोक अचानक गायब व्हायला लागले तेव्हा ज्यूंनी निर्वासित होणं पत्करलं. दुर्दैवानं इथेही त्यांना कुणीही स्वीकारलं नाही. त्यांना परतावं लागलं आणि पुढे जे काही घडलं ते वेगळं सांगायला नको.
या सगळ्या नरसंहारातून जे बचावले त्यांच्या कहाण्या जेव्हा जगासमोर आल्या तेव्हा माणुसकीला मान खाली घालावी लागली. आधी घेट्टोंमधलं एकाकी आयुष्य, तिथली उपासमार, आजार आणि मृत्यू. त्यानंतर त्यातून बचावल्यावर छळछावण्यांमध्ये रवानगी, तिथले अपरिमीत कष्ट, असहायता, जीवलगांचे डोळ्यांदेखत झालेले मृत्यू, पोटच्या मुलांच्या हत्या या सगळ्यांमधून चिवटपणे तगून राहिलेल्यांच्या कहाण्या ऐकताना मन सुन्न होतं, पोटात खड्डा पडतो, हातापायातलं त्राण जातं. एका माणसानं सांगितलेली कहाणी अशी – त्यानं थंडीपासून बचाव करण्यासाठी युनिफॉर्मखाली गोणपाट घातला. ते कळल्यावर नाझी सैनिकांनी त्याला उणे १०-१२ तापमानात तारेच्या दोन कुंपणांच्यामध्ये उभं केलं. कुंपणामधून वीजपुरवठा वाहात होता. त्या माणसानं सांगितलं – अंगावर एक पातळ युनिफॉर्म घालून मी त्या कडाक्याच्या थंडीत उभा होतो. अशी शिक्षा झाल्यावर थंडी असह्य होऊन समोरच्या तारेला स्पर्श करून स्वतःहून मृत्यूला कवटाळलेले लोक मी बघितले होते. पण मला तसं करायचं नव्हतं. मी डोळे मिटले आणि लहान असताना माझ्या वडलांच्या उबदार बिछान्यात शिरायचो ते पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला, मनातल्या मनात बुद्धिबळ खेळलो. काही वेळानंतर थंडीनं मला लघवी लागली, पण मनाचा निग्रह म्हणून मी ती धरून ठेवली. पण मी फार काळ ती धरून ठेवू शकलो नाही. ती माझ्या पायांवरून खाली ओघळली तेव्हा त्या थंडीत तो उष्ण स्पर्श मला हवाहवासा वाटला. पण पुढच्याच क्षणी त्याचा बर्फ झाला…
एका माणसानं सांगितलं की घेट्टोमध्ये इतकी उपासमार सुरू होती की मी घराच्या मागच्या अंगणातून पळ काढला आणि कच-याच्या ढिगात खाणं शोधलं, त्यात मला पावाचा तुकडा मिळाला. तो घेऊन मी घरी आलो. माझे वडील उपासमारीमुळे संपूर्ण सुजले होते. काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला…
या वानगीदाखलच्या दोन घटना मी नमूद करते आहे. अशा अनेक घटना सांगणारे या नरसंहारातून वाचलेले इथे भेटतात. एका माणसाच्या मुलाखतीत तो म्हणाला – अनेक लोक म्हणतात की इतकं भोगल्यावर तू अजून कसा हसू शकतोस, त्यावर मी त्यांना सांगतो की तसं केलं नाही तर मी आयुष्यभर केवळ रडतच बसेन…
या कहाण्या सांगताना या लोकांचे डोळे असहायता, अपमान आणिही कितीतरी कायकाय सांगतात…
महायुद्धाच्या आधीपासून ते इस्त्रायलच्या निर्मितीपर्यंतच्या सगळ्या घटनांचं अतिशय वास्तव डॉक्युमेंटेशन इथे आहे. त्या काळाची वातावरण निर्मिती कमालीची आहे. ज्यूंना ट्रेनमधून भरून नेतानाच्या काळातल्या घटना ज्या दालनात आहेत तिथे रेल्वेचे रूळ, लँपपोस्ट, रेल्वेचा तो डबा हे सगळं आहे. शिवाय पार्श्वभूमीवर रेल्वेचा आवाजही. छळछावण्यांची मॉडेल्स आहेत, कैद्यांचे गणवेश आहेत, त्यांचे टुथब्रश आहेत, कंगवे आहेत, मग्ज आहेत. असंख्य फोटो आहेत. जगभरातून ज्यूंच्या नातेवाईकांनी दिलेल्या वस्तू आहेत.
ऑस्ट्रियातल्या इमॅन्युअल रिंगेलब्लम या माणसाला हिटलर काहीतरी भयानक करतोय याची जाणीव झाली आणि त्यानं गुप्तपणे त्याविरोधातले पुरावे गोळा करायला सुरूवात केली. शिवाय लहान मुलं, माणसं या सगळ्यांनी कथा, कविता, डाय-या, चित्रं यामधून या नोंदी केल्या. काहीजणांनी फोटो काढले. या सगळ्या गोष्टींमधून जगाला निदान झालेल्या भयाण प्रकाराची माहिती मिळाली. तोपर्यंत सगळ्यांनी डोळ्यांना झापडं लावलेली होती. जगातल्या महासत्ताही मूग गिळून गप्प होत्या.
जगात अनेक संघर्ष होत असतात, यादवी होत असतात, वंशसंहारही होत असतात. पण एका जमातीचं उच्चाटन करण्यासाठी पद्धतशीरपणे त्यांना संपवण्याची योजना आखणं आणि ती तडीला नेण्याचा प्रयत्न करणं ही मानवी क्रौर्याची परिसीमाच. म्युझियमधले फोटो बघताना जर्मन आणि इतरही देशांतल्या नागरिकांच्या डोळ्यांमधला उन्माद, ज्यूंना त्रास देतानाचा क्रूर आनंद बघताना हताश वाटतं. जगातले इतके लोक एकाच वेळी इतके वेडे कसे काय झाले असतील याचं राहूनराहून आश्चर्य वाटत राहातं.
एका उथळ हौदात छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्यांच्या चपलांचा खच आहे. ते बघितल्यावर हमसून हमसून रडायला यायला लागलं म्हणून तोंडावर रूमाल धरला. बाजूला एक बाईही रडत होती. तिचा ११-१२ वर्षांचा मुलगा तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसत होता. माझं रडणं बघितल्यावर तिनं मला टिश्यू पेपर देऊ केला. मी तिला Thank you म्हटलं आणि ती कुठल्या देशाची आहे हे विचारलं. ती अर्जेंटिनाची होती. तिनंही मला तोच प्रश्न विचारला. जगाच्या दोन टोकांवरून इस्त्रायलमध्ये भेटलेल्या आम्हा दोघींची भावना तेव्हा किती सारखी होती…
#Israeldiaries #Israeltravel #Jerusalemdiaries #Yadvashem#holocaustmuseum #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास #जेरूसलेमडायरी #याडवाशेम

 

३ फेब्रुवारी २०१७ –

आपण परदेशात जातो आणि तिथले अनुभव घेऊन समृद्ध होत असतो.
आज शबाथचा दिवस. जेरूसलेममध्ये सगळं सगळं बंद आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी आणि निरंजन काही खायला मिळेल का ते बघायला बाहेर पडलो होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. एखादा माणूस दिसत होता. अचानक एक माणूस आमच्याजवळ आला आणि निरंजनला विचारायला लागला – Are you Jew?
नाही म्हटल्यावर त्यानं आम्ही त्याच्याबरोबर घरी येऊ शकू का असं विचारलं. त्याच्या फ्रीजचा काहीतरी प्रॉब्लेम होता. आम्हाला कळेना की त्यात आम्ही काय करणार? पण तरी आम्ही त्याच्याबरोबर निघालो. मी निरंजनला मराठीत विचारलं की या माणसाबरोबर जाणं सुरक्षित आहे ना? (क्राइम पेट्रोलचा परिणाम!) अनोळखी शहर, रस्त्यावर शुकशुकाट आणि एक अनोळखी माणूस तुम्हाला मदतीसाठी घरी बोलावतोय.
आम्ही त्याच्याबरोबर गेलो. गल्लीच्या तोंडाशी अजून एक माणूस उभा होता, तो त्याला म्हणाला -Oh! You found someone!
तर झालं असं होतं – त्या मित्राच्या घरी शबाथ डिनर होतं. २५-३० लोक आले होते. आणि त्याच्या फ्रीजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो बंद करायचा होता. तर शबाथच्या दिवशी ज्यूंना electricity ची बटन्स लावणं आणि बंद करणं मना आहे. त्यामुळे तो रस्त्यावर नॉन ज्यू माणसाला शोधत होता!
बटन बंद केल्यावर त्या कुटुंबानं अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. निरंजनला वाईन दिली आणि जेवायचा आग्रह केला. आम्ही थांबलो नाही ते सोडा. पण भारताबद्दल ते प्रेमानं बोलत होते आणि तिथे आम्हाला भारतातून आलेला एक बगदादी ज्यू मुलगा भेटला.
काय सुंदर अनुभव होता हा!
#Israeldiaries #Israeltravel #Jerusalemdiaries #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास#जेरूसलेमडायरी

५ फेब्रुवारी २०१७ –

काल आम्ही डेड सी अर्थात मृत समुद्र बघायला गेलो होतो. आम्ही जेरूसलेमहून taxi घेऊन डेड सीला गेलो आणि तिथून आम्ही तेल अवीवला परतणार होतो. इथे नव्यानेच झालेल्या एका मैत्रिणीनं तिच्या ओळखीचा taxi driver सुचवला होता. त्यानंच आम्हाला एअरपोर्टहून जेरूसलेमला सोडलं होतं. त्याचं नाव शाय.
तर शायशी आमची आता मैत्रीच झाली आहे. इथल्या taxi driver चं वैशिष्ट्य म्हणजे इथे या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. त्यामुळे यात उच्च नीच असा भेदभाव नाही.


डेड सीला जाताना वाटेत आम्ही नाश्ता केला तेव्हाही शाय आमच्याबरोबरच होता. डेड सीमध्ये पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप जास्त असल्यानं पाण्याची घनता जास्त आहे. त्यामुळे माणूस पाण्यात न बुडता तरंगत राहतो. हे पाणी त्वचा विकार असलेल्यांसाठी औषधी असतं. पाण्यात हात घालून बघितला तर हे पाणी मस्त तेलकट होतं. मला स्वतःला पाण्यात जायला आवडत नाही त्यामुळे मी उतरणार नव्हतेच. शर्मिलाला स्पामध्ये जायची इच्छा होती. शायनं आम्हा तिघींनाही विचारलं की तुम्ही बरोबर शॉर्ट्स आणल्या आहेत का? नाही म्हटल्यावर त्याला चिंता पडली की आम्ही आता स्पामध्ये कसं जाणार? त्याचा सतत प्रश्न की तुम्ही आता काय कराल? काही लोकांसाठी इथे मुद्दाम सांगायला हवं की इथे बायकांना उघडं बघण्यात लोकांना अजिबात रस नसतो. इथे तोकड्या कपड्यातल्या बायकांकडे कुणीही निरखून बघत बसत नाही. त्यामुळे शायला असा काही रस असणं शक्य नव्हतं.
तर आम्हाला शॉर्टस मिळवून देण्यासाठी त्यानं परोपरीनं प्रयत्न केले. शेवटी बिचारा निरागसपणे म्हणाला की माझ्याकडे एक शॉर्ट आहे ती मी तुमच्यापैकी एकाला देऊ शकतो! नंतर त्यानं सुचवलं की, तुम्ही इथे आतल्या कपड्यांवर जरी पाण्यात उतरलात तरी हरकत नाही! आम्ही तिघी त्यावर खुसुखुसु हसत होतो आणि त्याला कळत नव्हतं की यात हसण्यासारखं काय आहे ते. त्याला कळकळीनं वाटत होतं की आम्ही इथपर्यंत आलोय तर पाण्यात उतरण्याची संधी घालवू नये.
हा किस्सा लिहिण्याचा उद्देश एकच. भारतात असं झालं असतं तर ते आम्ही तरी कसं घेतलं असतं? आपल्याकडे ही गोष्ट इतक्या स्वच्छपणे, सरळपणे घेता येईल का?
श्रमाला प्रतिष्ठा असली की माणसामाणसातली विषमताही कमी होते का?
#Israeldiaries #Israeltravel #Telavivdiaries #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास

६ फेब्रुवारी २०१७ –

इस्त्रायलमध्ये भारताबद्दल खूप प्रेम आहे. रस्त्यावर कितीतरी माणसं तुम्ही भारतीय आहात का विचारतात आणि हो म्हटल्यावर नमस्ते करतात. जेव्हा युरोपमध्ये ज्यूंचा प्रचंड द्वेष केला जात होता तेव्हा भारतात मात्र त्यांना चांगली वागणूक मिळाली याची कृतज्ञता त्यांच्या मनात आहे. आपण भारतीय आहोत याचा मला अभिमान आहेच पण अशावेळी तो दुणावतो.
भारतीय चित्रपटसृष्टीनं तर आपल्यावर प्रचंड उपकार केलेले आहेत! इथे आम्हाला बघितल्यावर किती लोकांनी राज कपूरची गाणी गायला सुरूवात केली. अमिताभ बच्चन, शाहरूख खान इथे लोकप्रिय आहेत. काल फ्ली मार्केटमधल्या एका दुकानदारानं मला सनी देओल धर्मेंद्रचा मुलगा आहे, ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनची बायको आहे अशी बहुमोल माहिती दिली. त्याच्याकडे हिंदी चित्रपटांच्या ५०० DVD आहेत असंही त्यानं सांगितलं.
फ्ली मार्केटमध्ये दोन म्हातारे सोंगट्या खेळत होते. त्यांनीही तुम्ही भारतातनं आलाय का हा प्रश्न विचारलाच. वर यू लुक ब्युतिफुल असं म्हणून माझ्याबरोबर एक फोटो काढून घेतला 😊😊
आज अको नावाच्या एका जुन्या गावात गेलो होतो. तिथे अरबांची संख्या जास्त आहे. एका दुकानदारानं थांबवून भारतातनं आलाय का विचारलं, हो म्हटल्यावर मुलाला बोलावलं आणि याला भारत बघायचाय असं सांगितलं. वर भारतात किती धर्म आहेत अशी चौकशी केली. मी आपल्या धर्मांची लांबलचक यादी वाचल्यावर तो म्हणाला, नो अरब? म्हटलं नो. मनात म्हटलं बाबा, हे कमी आहे का? त्याचा पुढचा प्रश्न – ऑल लिव पीसफुली? मी हो म्हटल्यावर तो अचंब्यात पडला.
मुस्लिमांबद्दलची नाखुशी इथेही आहेच. आज आमचा ड्रायव्हर मुस्लिम वस्ती दाखवून म्हणाला, लुक, हाऊ मुस्लिम्स लिव इन अवर कंत्री. लुक अत देम इन सीरिया, लेबनन, अफगानिस्तान. बत दे स्तील अनहँपी.
आज हैफाला बहाई गार्डन्स बघायला गेलो. त्यांच्या देवळात जाताना गेटवरच्या माणसानं सांगितलं की, धिस इज होली प्लेस, डोंट स्मोक इनसाइड. मी त्याला म्हटलं, मोस्ट इंडियन वीमेन डोंट स्मोक. तो म्हणाला, इन पब्लिक? म्हटलं नो, युज्वली मोस्ट ऑफ देम डोंट स्मोक at all! त्यांना याचं प्रचंड आश्चर्य वाटतं.
मी नॉनव्हेज खात नाही, स्मोक करत नाही, दारू पित नाही, मग मी नेमकं काय करते असा प्रश्न आमच्या ड्रायव्हरला पडला आहे. 😊😊
#Israeldiaries #Israeltravel #Telavivdiaries #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास

९ फेब्रुवारी २०१७ –

आज इस्त्रायलमधल शेवटचा दिवस. बघता बघता ८ दिवस कसे गेले ते कळलंच नाही आणि अजून किती तरी गोष्टी बघायच्या राहिल्या आहेत. आजच्या दिवसात जमेल तेवढं करायचं आणि मनात जमेल तितकं साठवून घ्यायचं आहे. या विलक्षण देशाच्या मी प्रेमात पडले आहे. या देशाचा इतिहास, इथली माणसं, त्यांना एकत्र बांधून ठेवणारे सांस्कृतिक बंध, वाळवंटात कष्टानं फुलवलेलं नंदनवन या सगळ्यासह अरब देशांच्या घोळक्यात ताठ मानेनं आपलं अस्तित्व टिकवणारा हा देश आपल्याला भारावून टाकतो.
जेव्हापासून इस्त्रायलला यायचं ठरवलं तेव्हापासून अगदी मुंबईतल्या कॉन्सुल जनरलपासून ते सामान्य इस्त्रायली नागरिकापर्यंत सगळ्यांनी आम्हाला अगदी मनापासून मदत केली. या देशात काय बघावं, कसं बघावं, काय खावं हे सगळं सांगितलं. इथे नव्यानं झालेल्या सिबिल या मैत्रिणीनं अगदी टॅक्सीवाला बघून देणं, घरी जेवायला बोलावणं, किबुत्झ दाखवायला नेणं हे सगळं प्रेमानं केलं. इथे अनोळखी लोकांनी नमस्ते करून स्वतःहून संभाषणाला सुरूवात केली. गेले आठ दिवस फार फार मजा आली. इस्त्रायलला परत यायला मला तरी नक्कीच
आवडणार आहे.
#Israeldiaries #Israeltravel #Telavivdiaries #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास

१२ फेब्रुवारी २०१७ –

शिमॉन पेरेझ हे इस्त्रायलच्या निर्मितीला हातभार लावणा-या प्रमुख नेत्यांपैकी एक. पेरेझ वयाच्या सतराव्या वर्षी पॅलेस्टाइनमध्ये आले. ते मूळचे पोलिश. पोलंडमधून त्यांचे आजोबा वगळता सगळं कुटुंब पॅलेस्टाइनला स्थलांतरित झालं. ते त्यांच्या आजोबांच्या फार जवळ होते. पोलंडहून निघताना त्यांच्या आजोबांनी त्यांना एकच गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे, तू ज्यू आहेस याचा कधीही विसर पडू देऊ नकोस. आजोबांची ही शिकवण पेरेझ यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या आजोबांना पोलंडमध्येच सिनेगॉगमध्ये जाळून मारण्यात आलं.
इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांचे पेरेझ हे पट्टशिष्य. बेन गुरियन यांच्याकडून मी खूप काही शिकलो असं ते म्हणायचे. पेरेझना ब-याच भाषा अस्खलितपणे बोलता यायच्या. पोलिश, फ्रेंच, यिडिश, रशियन, इंग्लिश आणि हिब्रू अशा सगळ्या भाषा ते उत्तमपणे बोलत असत. शिवाय ते कवी होते. पेरेझ यांनी लष्करात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. त्यानंतर ते सरकारमध्ये जवळपास ७० वर्षं वेगवेगळ्या पदांवर काम करत राहिले. इस्त्रायलमधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरही त्यातले काहीजण मंत्रिमंडळात इतर पदांवर काम करत राहिले.
पेरेझ यांच्या कामाचा आवाका बघितला तर थक्क व्हायला होतं. १९७६ मध्ये पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी एअर फ्रान्सचं विमान अपहरण करून युगांडातल्या एन्टबी इथं नेलं तेव्हा लष्कराला पाठवून लोकांची सुटका करण्याची योजना आखण्यात पेरेझ आघाडीवर होते. नंतर १९८५ मध्ये आर्थिक सुधारणांना चालना देण्यातही ते आघाडीवर होते.
तेल अवीवमध्ये निरंजनला पेरेझ यांचा मुलगा खेमी पेरेझ यांना भेटायची संधी मिळाली. खेमी पेरेझ हे वेंचर कॅपिटलिस्ट आहेत. इस्त्रायलमधल्या सगळ्यात मोठ्या वेंचर कॅपिटलिस्ट संस्थेचे ते संचालक आहेत. त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमधून निरंजनला बरीच माहिती कळली. पेरेझ आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत गेले असं खेमी पेरेझ यांनी सांगितलं. पहिला टप्पा ज्यू असल्याची ओळख बाळगण्याचा. आजोबांनी सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी झायोनिस्ट चळवळीत भाग घेतला. इस्त्रायलच्या निर्मितीपर्यंत ते त्यासाठी लढले. दुस-या टप्प्यावर ते राजकीय नेते झाले. इस्त्रायलच्या भल्यासाठी जे काही करावं लागेल ते त्यांनी केलं. तिस-या टप्प्यावर मात्र ते इस्त्रायलपुरता मर्यादित विचार न करता जगाच्या भल्याकरता काय करता येईल याचा विचार करत राहिले. ऑस्लो पीस अकॉर्ड ही याचीच परिणीती. या कराराद्वारे इस्त्रायलनं पॅलेस्टीनी सरकारला मान्यता दिली तर पॅलेस्टिनी सरकारनं इस्त्रायल राष्ट्राला मान्यता दिली. या करारासाठी इस्त्रायलचे तत्कालीन पंतप्रधान यिटझॅक रॅबिन यांच्यासह शिमॉन पेरेझ तसंच पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे नेते यासर अराफत यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.


इस्त्रायलमध्ये अनेकांना ऑस्लो करार मान्य नव्हता. खेमी पेरेझ यांनी सांगितलं की एके दिवशी त्यांचं कार्यालय असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर मोठा बाँबस्फोट झाला. स्फोटानं त्यांची इमारतही हादरली. ते लगोलग खाली उतरले. तेव्हा त्यांचे वडील कुठल्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय तिथे मदत कार्यावर देखरेख करत होते. आणि आजूबाजूचा जमाव त्यांना – You are a murderer असं म्हणत शिव्या घालत होता. पण त्याचा तसूभरही परिणाम न होऊ देता, लोकांना प्रत्युत्तर न करता ते शांतपणे आपलं काम करत होते. मला त्यावेळी खूप संताप आला, इस्त्रायलसाठी आपलं आयुष्य देणा-या माझ्या वडलांना लोक विखारी बोलत होते, असं खेमी निरंजनला म्हणाले. पण मी गुपचुप परत कामाकडे वळलो. संध्याकाळी घरी गेल्यावर जेव्हा मी वडलांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले – जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनात असता तेव्हा तुम्हाला हे सगळं सहन करता आलं पाहिजे. कधी तुम्ही लोकांच्या गळ्यातले ताईत असता तर कधी त्यांना तुम्ही डोळ्यासमोर नकोसे होता. हे दोन्हीही तुम्हाला पचवता आलं पाहिजे.
खेमींनी आपले वडील कसे बदलत गेले हे सांगितलं. जेव्हा इस्त्रायल अस्तित्वात नव्हतं तेव्हा त्यांनी इस्त्रायलच्या निर्मितीचा ध्यास घेतला. स्वतंत्र राष्ट्र झालं तेव्हा चहुबाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या आणि कुठलेही स्त्रोत उपलब्ध नसलेल्या इस्त्रायलच्या प्रगतीसाठी सर्जनशीलतेचा आणि विज्ञानाचा आधार इस्त्रायलनं घ्यावा यासाठी त्यांनी आग्रह धरला. आणि शेवटी ते म्हणायचे – Divorce the past because you can not change it, but you can change the future with ideas.
नंतरच्या काळात ते अधिकाधिक व्यापक दृष्टीनं प्रश्नांकडे बघायला लागले असं खेमींनी सांगितलं. इस्त्रायलचा जो भूतकाळ आहे तो आहेच. पण नवीन पिढीनं आता तो विसरला पाहिजे आणि भविष्याकडे बघितलं पाहिजे असं शिमॉन पेरेझ म्हणायचे.
Israeli children should be taught to look to the future, not live in the past. I would rather teach them to imagine than to remember. – Shimon Peres
या महान माणसाचा मुलगा निरंजनला जेवायला भेटला. निरंजन बरोबरच्या एका पत्रकार मित्रानं त्यांना विचारलं की, आम्ही इस्त्रायलच्या भावी पंतप्रधानांना भेटतो आहोत का? त्यावर त्यांनी हसून काही बोलायचं टाळलं (ते राजकारणात यायचा विचार करताहेत). आणि जेवण झाल्यावर कुठल्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय ते टॅक्सीला हात करून टॅक्सीत बसून निघून गेले.

#Israeldiaries #Shimonperes #Telavivdiaries #इस्त्रायलडायरी #इस्त्रायलप्रवास#तेलअवीवडायरी #शिमॉनपेरेझ

१५ फेब्रुवारी २०१७ –

16641067_1565474013470550_199989051431345511_n

Ruth and I first met at the Holocaust museum in Jerusalem. We were both crying after seeing the museum. Ruth offered me a tissue. We both were feeling the same pain, anger, helplessness.
Around three days later, I was roaming around alone in Tel Aviv. I found a beautiful lane, and in that lane a beautiful house. So as usual I stopped and took picture of that house. I felt that somebody was beside me. I saw and that was Ruth! She also took the picture of the same house! And that day both of us were smiling. Both of us were so happy after experiencing the Israeli spirit and their warmth. We smiled at each other with love and affection.
Ruth is from Argentina and she was there with her family on a vacation. We hugged each other and her son took our picture.
Soulmates can meet anywhere, anytime…
#israeltravel #israeldiaries #telavivdiaries

सायली राजाध्यक्ष