आजोबा

आज माझ्या आजोबांचा जन्मदिवस. ते आज असते तर १०४ वर्षांचे असते. मी आता ४४ वर्षांची आहे तरीही आजोबांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आणि ते केवळ माझे आजोबा होते म्हणून नाही तर मी तटस्थपणे जरी विचार करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचं जे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं त्यामुळे असं होतं असं मला वाटतं.
आमचे पूर्वज मूळचे कर्नाटक सीमेवरच्या, अक्कलकोट तालुक्यातल्या चपळगावचे. आजोबांचे वडील कामानिमित्त मराठवाड्यातल्या बीडला आले आणि आम्ही बीडचेच झालो. बरेचसे चुलतमावस चपळगावकर बीड आणि त्याजवळच असलेल्या गेवराईला स्थायिक झाले. आजोबांचे वडील ते लहान असतानाच गेले. त्यानंतर त्यांच्या आईनं भिंतीत पुरून ठेवलेलं थोडं-थोडं सोनं विकून त्यांना शिकवलं. ते दोघे भाऊ. आजोबांनी त्या काळात उर्दूमधून वकिलीची सनद घेतली आणि बीडला वकिली सुरू केली. त्यांचे भाऊ शिक्षक झाले. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळात ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. दीड वर्षं ते तुरूंगात होते. तिथे जे काही खायला मिळायचं त्यामुळे आयुष्यभर पोटाचा त्रास त्यांच्या मागे लागला.

आजोबा स्वातंत्र्य चळवळीत होते. त्यांच्या पहिल्या दोन्ही बायका कॉलराच्या साथीत गेल्या. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यानंतर आजोबांचं लग्न माझ्या आजीशी झालं. माझे बाबा-नरेंद्र चपळगावकर, काका-सुधाकर चपळगावकर आणि आत्या उषा देशपांडे अशी त्यांची तीन मुलं. आजोबांचे जे भाऊ होते त्यांच्याही दोन्ही बायका अशाच आजारात मरण पावल्या. त्यांना तीन मुलं होती. त्या आजोबांनी (बाबा आजोबा) तिसरं लग्न केलं. त्या आजी म्हणजे गोष्टीतल्या सावत्र आईसारख्याच होत्या. म्हणून त्यांची पहिली तिन्ही मुलं बराच काळ आमच्याच घरी होती. ती माझ्या आजीला आईच म्हणायची आणि आजोबांना काका. म्हणून माझे वडील, काका आणि आत्याही वडलांना काकाच म्हणत असत.
१९५२ मध्ये आजोबांनी बीडच्या बाहेर २०००० स्क्वेअर फुटांचा एक प्लॉट विकत घेतला आणि त्यावर लहानसं घर बांधलं. बाकी जागेवर मोठी बाग केली. गावातले लोक या घराला बंगला म्हणत. आमच्या गावातल्या वाड्यातले लोक तिथे यायचं असेल तर बंगल्यावर जाऊन येतो असं म्हणत. खरं तर हे घर इतकं साधं होतं. बाहेर एक पत्रे घातलेला व-हांडा, त्याच्या आत एक बैठक (तेव्हा लिव्हिंग रूम नव्हत्या), तेच ऑफिस आणि तोच दिवाणखाना, त्यावर लाकडी माळवद होतं. त्यानंतर मधली खोली, त्यावर मंगलोरी कौलं होती, आतमध्ये एक लहान ओसरी, तिथे जातं, उखळ आणि चुलीवर पाणी तापवण्यासाठीची लाकडं ठेवलेली असत, शिवाय शेगडीचे कोळसे. त्याच्या बाजूलाच स्वयंपाकघर. वर पत्रे घातलेले. लहानसा ओटा. त्यावर कोळशांची शेगडी. मी लहान असल्यापासून एका शेगडीचा का होईना पण आमच्या घरी गॅस होता. कारण बायकांची गैरसोय होता कामा नये हे आजोबांचं तत्व होतं.
माझ्या वडलांचं लग्न झालं तेव्हा हुंड्याची पद्धत सर्रास होती. माझ्या आईच्या माहेरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. पण माझ्या आजोबांनी तिच्या वडलांकडे कसलीही मागणी केली नाही. अगदी साध्या पद्धतीनं हे लग्न झालं. लग्नात माझी आई १८ वर्षांची होती. आमचं घर इतकं गावाबाहेर होतं की मागच्या बागेला लागून शेतीच होती. त्यामुळे सगळं सुनसान असायचं. घरात आजोबा, आजी, आई, बाबा आणि काका अशी पाच माणसंच. जर सगळे बाहेर गेले असतील आणि आई स्वयंपाक घरात असेल तर आजोबा मधूनमधून जाऊन “बाळ, तू ठीक आहेस ना?” असं विचारायचे. मधूनमधून जाऊन तिचा पदर विस्तवाजवळ तर नाहीये ना याकडे लक्ष ठेवायचे. आईला स्वयंपाक येत नव्हता. तरीही तिनं केलेलं कुठलीही नावं न ठेवता खायचे.
आमच्या घरी पूजा करण्यासाठी एक मुलगा येत असे. त्याला टीबी झालाय असं कळल्यावर आजोबा रोज छोटा तांब्याभर दूध द्यायला त्याच्या घरी जायचे. तेव्हा बीडला सायकल रिक्षा होत्या. ते सत्तरी ओलांडेपर्यंत कधीही रिक्षात बसले नाहीत कारण माणूस रिक्षा ओढतो हे त्यांना अजिबात पटायचं नाही. कितीही दूर जायचं असो ते चालत जायचे. आजोबा गांधीवादी असल्यामुळे राहणी अगदी साधी होती. मधल्या घरात एक लहानसं लाकडी कपाट होतं. त्यात आजोबा-आजींचे सगळे कपडे ठेवलेले असत. सगळे मिळून त्यांच्याकडे ४ जोड कपडे असावेत. आजोबा एरवी खादीचं धोतर आणि कुडता वापरत. त्याखाली बंडी घालत तीही खादीचीच. कोर्टात जायचे तेव्हा पांढरा शर्ट आणि वुलनची पँट आणि काळा कोट. अर्थातच गांधी टोपीही घालायचे.
आजोबा अस्पृश्यता निवारणाचं काम करायचे. त्यासाठी ते त्यांच्या दलित मित्रांच्या घरी जाऊन चहा प्यायचे किंवा जेवायचे म्हणून त्यांना काही काळ वाळीतही टाकलं होतं. ही गोष्ट ७० वर्षांपूर्वीची आहे. आजोबा फारसे देवधर्म न मानणारे, कर्मकांडावर अजिबात विश्वास नसलेले तर आजी ब-यापैकी देवावर विश्वास असलेली. आपण व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे आजही बोलतो. माझ्या आजोबांनी कधीही आजीला तू करतेस हे चुकीचं आहे किंवा मला आवडत नाही असं सांगितलं नाही पण स्वतःही कधी तिच्यासारखे वागले नाहीत. मला आठवतं एकदा कॉलेजमध्ये असताना मी रागानं आजोबांना म्हटलं होतं की आजीचं हे मला अजिबात आवडत नाही. तेव्हा ते म्हणाले होते, बब्या, तुला काय करायचं आहे ते तू कर आणि तिला काय करायचं आहे ते तिला करू दे. मी तिला काय कर हे सांगणार नाही. मला तेव्हा ते आवडलं नव्हतं पण आज विचार केल्यावर वाटतं की किती बरोबर होतं ते. ते आजीला बरं वाटतं म्हणून घरच्या गणपतीत-महालक्ष्म्यांमध्ये सामील व्हायचे. अर्थात आमच्या घरी कधीच कसलं कर्मकांड फारसं नव्हतंच.
आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून माझे बाबा आणि काका हे दोघेही वकील झाले. काही काळानंतर काका जज झाले. बाबा बीडलाच वकिली करायला लागले. तेव्हा ऑनलाइन काहीही नव्हतं. त्यामुळे दर महिन्याला ऑल इंडिया रिपोर्टरची जर्नल्स घरी यायची. अर्थात ती शेकड्यांनी घरी होती. आजोबा नव्वदीत असतानाही, बाबांना काही अडलं तर कुठल्या जर्नलमध्ये संबंधित केस आहे हे अचूक सांगत. एवढंच नव्हे तर ते पान काढून देत असत. बाबा जज असतानाही आजोबांशी बरेचदा चर्चा करायचे. बाबांच्या निःपक्षपाती निर्णयांमध्ये आजोबांच्या या संस्कारांचा मोठा भाग आहे असं मला वाटतं. जज म्हणून निस्पृहपणे काम करायला जे मानसिक बळ लागतं ते घरच्यांच्या पाठबळाशिवाय मिळत नाही.
मी लहान असताना बीडच्या आमच्या घरात शिवाजी महाराजांचं एक ब्लॅक अँड व्हाइट चित्र लावलेलं होतं. आजोबा मला शिकवायचे, शिवाजी म्हणतो दाणे खा. कारण त्यांना शेंगदाणे खूप आवडायचे. ते मलाही खायला द्यायचे.
आजोबांचे चार जवळचे वकील मित्र आणि ते असे पाचजण मिळून आठवड्यातून एकदा गीतेचं वाचन करायचे. अध्याय वाचून नंतर त्याचा अर्थ सांगणं असं त्याचं स्वरूप होतं. आजोबांना ते मनापासून आवडायचं. ते बीडच्या सार्वजनिक वाचनालयाचे ट्रस्टी होते. त्या वाचनालयाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. बीडच्या मानानं ते वाचनालय खरोखर उत्तम होतं. शिवाय चंपावती शाळेचंही ते काम करायचे.
आजोबा माझ्या बाबांपेक्षाही जास्त खुल्या विचारांचे होते. माझ्या मधल्या बहिणीनं ती अकरावीत असतानाच आजोबांना आपण कुठल्या मुलाशी लग्न करणार आहोत ते सांगितलं होतं (तोच आज तिचा नवरा आहे). ती त्याला घेऊन बीडला आजोबांना भेटायला गेली होती. आजोबांनी अत्यंत प्रेमानं तिचा तो निर्णय मान्य केला. तो आपल्यापुरताच गुपित म्हणून राखलाही. आणि ते वेळोवेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आजोबांचा तिच्यावर सगळ्यात जास्त जीव होता आणि तिचाही त्यांच्यावर. माझी आत्या पीएचडी होईपर्यंत आजोबांनी तिचं लग्न केलं नाही. ती सव्वीस वर्षांची होईपर्यंत तिचं लग्न केलं नाही म्हणून आजूबाजूचे लोक बोलत, विचारत राहिले पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ठामपणे तिला तिचं शिक्षण पूर्ण करू दिलं.
आजोबा-आजींची सगळ्यात मोठी कमाई मला ही वाटते की त्यांनी सगळ्या नातवंडांबरोबर आपलं स्पेशल नातं तयार केलं. त्यामुळे प्रत्येकाला ते आपल्या खूप जवळ आहेत असं वाटे आणि ते खरंही होतं. माझ्या दहावीच्या-बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर त्यांनी पाठवलेली पत्रं अजूनही माझ्याकडे आहेत. मला एम. ए. ला सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्यांनी जे कौतुकानं लिहीलं होतं ते अजूनही मला आठवतं. नातवंडांचं काय चाललंय, ते काय शिकताहेत, ते काय वाचताहेत, ते काय करताहेत यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं, पण त्यांनी कधीही कशातही हस्तक्षेप केला नाही. अमुक गोष्ट करू नकोस असं कधीही सांगितलं नाही.
त्यांना पंचाहत्तरीत प्रोस्टेट कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर ते बीडहून आमच्याकडे औरंगाबादला राहायला आले. पण त्यांनी त्याबद्दल कधीही खेद व्यक्त केल्याचं मला आठवत नाही. त्यांनी इथल्या आयुष्यात स्वतःला रूळवून घेतलं. नवीन एक-दोन मित्र केले. वाचनात, बातम्या ऐकण्यात स्वतःला रमवून घेतलं. आम्ही त्यावेळी कॉलेजात होतो. त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवायचो. पण कधीकधी ते म्हणायचे, सायल्या अजून बस माझ्याजवळ. तेव्हा नेमकी मला घराबाहेर जायची ओढ असायची. मी म्हणायचे, आजोबा आल्यावर बसते. आता वाटतं अजून थोडावेळ बसायला हवं होतं त्यांच्याबरोबर. पण ते वय तसंच असतं आणि त्यात काही चूकही नाही.
ते जेव्हा फारसे घराबाहेर पडेनासे झाले तेव्हा आम्ही नातवंडांनी त्यांना रमी खेळायला शिकवलं. त्यांचा वेळ जावा असा त्यामागचा उद्देश. हा स्वातंत्र्यसैनिक माणूस आमच्यासाठी तेही शिकला. नंतर नंतर ते आम्हालाच हरवायला लागले. कुठल्याही गोष्टीकडे खुलेपणानं बघण्याचा त्यांचा हा मोठा गुण होता. शर्वरी तीन महिन्याची असताना मी तिला घेऊन औरंगाबादला गेले होते. ती रात्रभर जागायची आणि मला झोप अनावर व्हायची. तेव्हा आजोबांना तिला उचलताही यायचं नाही इतके ते थकले होते. पण तिला बेडवर माझ्या बाजूला टाक. मी गप्पा तर मारू शकतो तिच्याशी, तू झोप, असं मला सांगायचे.
कॅन्सरमधून ते पूर्ण बरे झाले ९६ वर्षांपर्यंत जगले. पण ते बाबांना स्वतःच्या औषधांचे पैसे द्यायचे. त्यांना काही हवं असलं तर पेन्शन अकाऊंटमधून पैसे काढून द्यायचे. कधी काढायचे राहिले तर बाबांकडे मागायचे आणि काढले की देतो सांगायचे. बाबा म्हणायचेही, काका, मी विचारलं आहे का? पण त्यांनाच ते पटायचं नाही.
पुढे ते थकत गेले. आमची लग्नं झाली. बाबांची बायपास झाली. ते काकांकडे राहायला गेले. काकांकडे त्यांची उत्तम व्यवस्था होती. बाबा न चुकता रोज त्यांना भेटायला जायचे. मी मुंबईहून गेले की रोज संध्याकाळी आधी आजोबांबरोबर जाऊन बसायचे आणि नंतर इतरांना भेटायला जायचे. एकदा अशीच गेले होते. जवळ गेले आणि त्यांच्या कपाळावरून हात फिरवायला लागले. तेव्हा ते मला म्हणाले की, तू दूर बस. मी म्हटलं का? तर ते म्हणाले की मी दोन दिवस आंघोळ केलेली नाही (त्यांना रोज आंघोळीचे श्रम सहन व्हायचे नाहीत). मग काय होतं असं मी विचारल्यावर ते म्हणाले, सायल्या तुला इन्फेक्शन होईल. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मी म्हटलं काही होत नाही आजोबा. हे लिहिताना आताही माझ्या डोळ्यात त्या आठवणीनं पाणी आलं आहे.
ते ९६ वर्षांचे झाले तेव्हा माझ्या धाकट्या चुलत भावाचं लग्न होतं. मी त्याठी औरंगाबादला गेले होते. त्यांनी जवळपास जेवण बंद केलं होतं. त्यांना बळजबरी खायला घालायचो. तेव्हा ते शक्ती नसतानाही फटका मारायला बघायचे. कारण शरीर थकलेलं असलं तरी त्यांचं मन तल्लख होतं. मग बाबापुता करून एखादा-दुसरा घास खायचे. देवब्राह्मणाची पूजा आमच्या घरी होती. ती झाली आम्ही सगळे जेवून गप्पा मारत असतानाच काकांचा आजोबा गेल्याचा फोन आला. तेव्हा बाबा सत्तर वर्षांचे होते. तरी मी आजच नेमका त्यांना कसा भेटायला गेलो नाही म्हणून त्यांना हळहळ वाटत राहिली.
आयुष्यात आपण लोकांचे बरेवाईट अनुभव घेतोच. आणि त्यातून आपली समज वाढत जाते. आज माझं वय वाढल्यावरही मी जेव्हा आजोबांचा विचार करते तेव्हा त्यांच्यासारखं वागणं आपल्याला का जमत नसेल याची खंत वाटत राहाते.
सायली राजाध्यक्ष