कुमार गंधर्व संगीत महोत्सव

देवास, इंदौरजवळचं लहानंसं, टुमदार गाव. गावात एकच मुख्य रस्ता जो सगळ्या गावाला कवेत घेतो. त्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराकडून तुम्ही डावीकडे वळलात की लागतो माताजी का रास्ता. देवासमधल्या चामुंडा मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणून माताजी का रास्ता. हा लहानसा रस्ता जिथे संपतो तिथे जरासं अलिकडे, रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे भानुकुल, पंडित कुमार गंधर्वांचं घर. या घरात कुमारजींचं अनेक वर्षं वास्तव्य होतं. आता त्यांची कन्या आणि प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली आणि नातू गायक भुवनेश कोमकली इथे राहतात. या घरात अजूनही कुमार गंधर्वांचं वास्तव्य असावं असं वाटतं इतकं सुरेख सगळं जतन केलेलं आहे. त्यांची गाण्याची खोली, त्यांचा पलंग, पुस्तकं, टेबललँप सगळं काही तितकंच सुबक रितीनं ठेवलेलं आहे.

यंदा १२ जानेवारीला कुमार गंधर्वांची पंचविसावी पुण्यतिथी होती. दरवर्षीच त्यांच्या स्मरणार्थ संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जातंच पण यावर्षी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. १४ तारखेला या महोत्सवाची सुरूवात ख्यातनाम लेखक आणि नाटककार महेश एलकुंचवार यांच्या मनोगतानं झाली. माझ्या भावाला अभिजात शास्त्रीय संगीताचा षौक होता. तो वेगवेगळ्या गायकगायिकांच्या रेकॉर्ड्स आणत असे. विशेषतः अब्दुल करीम खान आणि केसरबाई केरकर या दोघांचं गाणं आमच्या घरात सतत ऐकलं जात असे. एकदा त्यानं कुमार गंधर्वांची रेकॉर्ड आणली. ते गाणं ऐकतानाच जाणवलं की हे काही वेगळंच आहे. माझे वडील कधीही आमच्याशी मोकळेपणानं बोलत नसत.. किंबहुना तेव्हा मोठ्यांशी अंतर राखून वागण्याचीच पद्धत होती. पण कुमारांचं गाणं ऐकल्यावर त्यांनी हे काही विलक्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली असं एलकुंचवारांनी सांगितलं.

IMG20170114174137

मला संगीतातलं फारसं काही कळत नाही पण गाणं ऐकायला आवडतं, त्यामुळे कुमार गंधर्वांच्या गाण्याबद्दल मी फारसं काही सांगू शकणार नाही असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. देवासमध्ये कुमार गंधर्व म्युझियम उभारण्यात येईल तसंच कुमारजींच्या स्मरणार्थ राज्याच्या सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. शिवराज सिंग चौहान बोलताना जणू काही अटल बिहारी वाजपेयी बोलताहेत असं वाटावं इतकी त्यांनी हुबेहुब वाजपेयींची शैली उचलली आहे. ते कुमार गंधर्वांबद्दल पूर्ण माहिती घेऊन आले होते. सुसंगत आणि प्रांजळपणे बोलले आणि मुख्य म्हणजे अस्खलित हिंदीत बोलले.

त्यानंतर महोत्सवाला सुरूवात झाली. भारतात समूहगान किंवा कॉयरला फारसं महत्त्व दिलं जात नाही. किंबहुना आपल्याकडे हा प्रकार अजिबातच लोकप्रिय नाही. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या गांधर्व वृंदानं या संगीत महोत्सवाची बहारदार सुरूवात केली. एकूण २६ स्त्रीपुरूष, तीन तबलजी, तीन हार्मोनियन वादक यांनी बनलेल्या या वृंदांचा आपसातला ताळमेळ बघण्यासारखा होता. कुमार गंधर्वांचे शिष्य आणि संगीतज्ज्ञ मधुप मुद्गल यांनी या वृंदाचं संयोजन केलं होतं. संस्कृत श्लोकांच्या स्वस्तिगानानं या वृंदानं सुरूवात केली आणि उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. विशेषतः बंगाली, राजस्थानी, गोवन रचना तसंच अमीर खुस्त्रोच्या रचनेचं कव्वाली ढंगात केलेलं सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण होतं. पंचम नावाची एक रचना मला विशेष आवडली. या रचनेत अर्थातच पंचम या स्वराचा अधिकातअधिक वापर केलेला होता.

या सत्राची अखेर कुमार गंधर्वांच्या एका दुर्मीळ ध्वनीचित्रफितीनं झाली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या १९८५ मधल्या एका खासगी मैफिलीची ही चित्रफित होती. बागेश्री आणि गारा अशा दोन रागांमधल्या रचना या चित्रफितीत समाविष्ट होत्या. सभामंडपातला काळोख, मंचावर मधोमध लावलेल्या पडद्यावर साक्षात कुमार गंधर्व गाताहेत, त्यांच्या मागे तानपु-यावर लहान वयातली कोवळी कलापिनी बसलेली आहे. आणि मंडपातले शेकडो लोक उत्स्फूर्त दाद देत गाणं ऐकताहेत हा अनुभव विलक्षण होता.

IMG_1199

दुस-या दिवशी सकाळीच मी आणि सचिन कुंडलकर लवकर भानुकुलला पोहोचलो. आम्हा दोघांना कुमारांचं घर तर बघायचंच होतं पण तो सगळा परिसर शांतपणे अनुभवयाचा होता. त्यानुसार कुमारांची खोली बघितली. त्याच खोलीत कलापिनी त्या दिवशी जे काही गाणार होती त्याची तिच्या साथीदारांबरोबर तयारी करत होती. सकाळची प्रसन्न वेळ, खिडकीतून येणारा कोवळा सूर्यप्रकाश, कुमार गंधर्वांची खोली, तानपु-यांची जुळवाजुळव, कलापिनीचे सूर… मी वर्णन नाही करू शकणार त्या अनुभवाचं. १०-१५ मिनिटं शांतपणे बसून ते सगळं बघणं हा विलक्षण अनुभव होता.

हे दुसरं सत्र मुद्दाम उभारलेल्या मोठ्या मंडपात होणार नव्हतं. तर भानुकुलच्या आवारात होणार होतं. हे सत्र दहा वाजता सुरू होणार होतं. ९ वाजून ५८ मिनिटांनी कलापिनी सगळ्या तयारीनिशी मंचावर होती. बरोबर दहा वाजता तिनं षड्ज लावला आणि मैफिलीला सुरूवात झाली. रामकलीच्या सुरांनी आसमंत भरून गेला. रामकलीनंतर कलापिनीनं देसीतली एक बंदिश गायली. त्यानंतर कुमारांचं एक निर्गुणी भजन आणि एक माळव्यातलं लोकगीत गायलं. या संपूर्ण कार्यक्रमातलं हे सत्र मला सगळ्यात आवडलं. एकतर कुमारांची लाडकी कन्या त्यांच्याकडून जे काही शिकली ते तिनं इतरांबरोबर शेअर केलं. शिवाय भानुकुलच्या आवारातले वृक्ष, त्यावर टांगलेली कुमारांची दुर्मीळ छायाचित्रं, पक्ष्यांचं कूजन, झाडांवर मनसोक्त भिरभिरणा-या खारी या सगळ्यामुळे या सत्राला एक वेगळीच आपुलकी होती.

IMG20170115095840

कलापिनीच्या गाण्यानंतर कुमारजींचे मित्र आणि शिष्य त्यांच्याबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल बोलले. कुमार गंधर्वांचं गाणं हे मार्गी आहे असं हिंदीतले प्रसिद्ध लेखक उदयन वाजपेयी यांनी सांगितलं. मृगया म्हणजे शिकार. पण मृगया शब्दाचा अर्थ असा की शिकार करणारा एका मार्गावरून पाठलाग करतो आणि भक्ष्य दुस-या मार्गाकडे पळत असतं. म्हणून शब्द झाला मृगया. मार्गी संगीत म्हणजे ज्या संगीताला असंख्य शक्यता आहेत, अनेक मार्ग आहेत. कुमारांचं गाणं हे म्हणूनच मार्गी संगीत आहे असं मला वाटतं असं उदयन वाजपेयी म्हणाले. रामुभैय्या दाते हे कुमारांचे निस्सीम चाहते आणि मित्र. त्यांचे पुत्र आणि संगीतकार रवी दाते हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी कुमारांचे अनेक किस्से यावेळी सांगितले. एकदा पंडित नेहरू इंदौरला आले होते आणि त्यांना संध्याकाळचा वेळ मोकळा होता. तेव्हा त्यांच्यासाठी एखादी मैफल करावी असं ठरलं. कुमार तेव्हा नुकतेच त्यांच्या मोठ्या आजारातून उठले होते. डॉक्टरांनी त्यांना एका वेळी फक्त २० मिनिटं गाण्याची परवानगी दिली होती. रामुभैय्यांनी त्यांचं आणि भानुताईंचं गाणं करायचं ठरवलं. वर रामुभैय्या पंडित नेहरूंना म्हणाले, हा मुलगा गाण्यातला पंडित नेहरू आहे. तो मोठ्या आजारातून नुकताच उठला आहे, पहिल्यांदाच गाणार आहे, त्याला प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे जरी तुम्हाला गाणं आवडलं नाही तरी त्याला दाद द्या! तसं झालं नाही आणि नेहरूंना कुमारांचं गाणं आवडलं ही गोष्ट अलाहिदा. पण कुमारांच्या प्रेमापोटी नेहरूंना असं जाऊन बोलणं धाडसाचंच की नाही!

सत्यशील देशपांडे हे कुमार गंधर्वांचे पट्टशिष्य. कुमारांनी गाण्यातल्या शक्यता पडताळून बघायला शिकवलं असं त्यांनी सांगितलं. माझ्या गाण्यावर ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार होते ते पुसून गाण्याचा नव्यानं विचार करायला कुमारजींनी शिकवलं असंही ते म्हणाले. एकदा एका बंदिशीतल्या द्रुत तानांचं नोटेशन लिहून कुमारांना दाखवलं. आता ते कौतुक करतील असं वाटलं, त्यांनी कौतुक तर केलं पण तू या ताना गाऊ नकोस असंही सांगितलं! ख्यातनाम साहित्यिक आणि कुमार गंधर्वांचे जवळचे मित्र अशोक वाजपेयी हेही यावेळी आले होते. कुमारांनी कबीर, तुलसी, मीरा या संतांच्या रचना गायल्या होत्या. कालिदासाच्या रचना मात्र तोपर्यंत कुणी गायलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी कालिदासाच्या रचना संगीतबद्ध करून गाव्यात असं मी त्यांना सांगितलं. बरेच दिवस ते काही झालं नाही. मी कुमारांना परत परत आठवण करून देत असे. एकदा अशीच परत आठवण केल्यावर कुमार म्हणाले, मी कालिदासाच्या रचना गायलो नाही तर कालिदासाच्या प्रतिष्ठेत काही फरक पडणार आहे का? त्याचं जे स्थान आहे ते अबाधितच आहे ना? त्यावर मी हो म्हणालो. मग ज्या व्यक्तीच्या स्थानात माझ्या रचनेनं फरक पडेल अशा व्यक्तीच्या रचना मी गाईन असं उत्तर त्यांनी दिलं असं अशोक वाजपेयींनी सांगितलं.

संध्याकाळच्या सत्राची सुरूवात पंडित दिनकर कैकिणी यांचे पुत्र आणि तबलानवाज पंडित योगेश समसी यांच्या एकल तबलावादनानं झाली. तबला सोलो हा प्रकार असा आहे की त्यातलं कळत नसेल तर थोड्या वेळानं त्याचा कंटाळा येतो. पण तसं झालं नाही. समसी यांनी विस्तारानं तीन ताल वाजवला. त्यातले तुकडे, रेले समजावून सांगत त्यांनी वादनात रंगत आणली. पंजाब घराण्यातल्या वेगवेगळ्या उस्तादांच्या रचना त्यांनी ऐकवल्या.

या संगीत महोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे उस्ताद अमजद अली खान यांचं सरोदवादन. यावेळी सभामंडप खच्चून भरला होता. उस्तादजींनी स्वतःच रचलेला राग गणेशकल्याण त्यांनी सुरूवातीला वाजवला. त्यानंतर झिंझोटीतली आलापी ऐकवली. हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला तो त्यांनी मालकंस वाजवायला सुरूवात केल्यावर, मालकंसमधली एक बंदिश आणि तराना त्यांनी वाजवला. शेवटी त्यांची आवडती रवींद्रनाथ टागोरांची रचना एकला चलो रे ऐकवून त्यांनी या कार्यक्रमाची सांगता केली. या वयातही त्यांच्या बोटांमध्ये असलेलं चापल्य थक्क करण्यासारखं आहे. त्यांचं वादन हा ऐकण्यासारखा नव्हे तर बघण्यासारखाही अनुभव असतो. ते देखणे तर आहेतच पण वाजवताना ते अधिक देखणे दिसतात. अधूनमधून नखं फाइल करणं (सरोद वाजवण्यासाठी ते आवश्यक असतं), थोडंसं गाणं आणि तल्लीन होऊन वाजवणं हे सगळं बघणं सुंदर असतं.

हा संगीत महोत्सव नुसता सुश्राव्य नव्हता तर देखणाही होता. सभामंडपाची नेटकी सजावट, कुमारांचं रघु राय यांनी काढलेलं श्वेतश्यामल छायाचित्र, त्यासमोर मोठ्या रांजणांमध्ये ठेवलेली ग्लॅडिओलाची फुलं, लालबुंद गुलाबाच्या परड्यांनी केलेली सजावट, नेटका मंच, पाहुण्यांचं गुलाबांच्या परड्यांनी केलेलं स्वागत हे सारं काही देखणं होतं. संजय पटेलांचं अतिशय सुरेख आणि मोजकं निवेदन या सगळ्याला साजेसं होतं. एकूण काय तर दोन दिवस विलक्षण भारलेल्या अवस्थेच गेले.

सायली राजाध्यक्ष

छायाचित्रं – सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s