हिवाळ्यातली त्वचेची काळजी

हिवाळा आला की मला माझ्या आजोबांची आठवण येते. पाय फुटायला लागले की ते खादी ग्रामोद्योगाच्या दुकानातून आमसुलाचं तेल आणायचे. मग रात्री झोपण्याआधी ते तेल गरम करून ते पायाच्या भेगांमध्ये भरून मग झोपायचे. माझ्या बहिणीला मातीची एलर्जी होती. तिचे पाय फारच फुटायचे. मग ते गरम पाण्यानं तिचे पाय स्वच्छ धुवून त्यात आमसुलाचं तेल भरायचे.

आता थंडीत पाय इतके फुटत नाहीत. याचं कारण आपला मातीशी संपर्क कमी झालेला आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक घरातही स्लीपर्स वापरतात. शिवाय थोड्या अवेअरनेसमुळे आपण वर्षभर मॉइश्चरायझर वापरत असतो. घरात सतत व्हॅसलिन असतं. त्यामुळे आता आमसुलाचं तेल फारसं बघायला मिळत नाही. पण आमसुलाचं तेल फार मस्त काम करतं.

हिवाळ्यात त्वचेची काय काळजी घ्यावी याबद्दल आता वर्तमानपत्रात बरंचसं लिहून येतं. त्यामुळे आपल्यापैकी सगळ्यांनाच थोडीफार माहिती आहेच. पण तरी हिवाळ्यात, विशेषतः जिथे थंडी खूप असते तिथे काय करता येईल याबद्दल मी थोडंसं लिहिणार आहे.

हिवाळ्यात हवा कोरडी व्हायला लागते. मुंबईत एरवी हवेत चांगलीच आर्द्रता असते. पण हिवाळा आला की हवा कोरडी व्हायला लागते. अशा हवेत दिवसातून दोनदा आंघोळ केली तर त्वचेतला ओलावा कायम राहायला मदत होते. आंघोळ करताना अंगाला झेपेल इतपत कोमट पाणी वापरा. अति कडक पाण्यानं त्वचा अजून खराब होते. आंघोळ झाल्याझाल्या अंग टिपून लगेचच मॉइश्चरायझर लावा. कुठलाही कृत्रिम वास न येणारे पण उत्तम काम करणारे अनेक मॉइश्चरायझर्स बाजारात उपलब्ध आहेत. मेडिकल स्टोअरमधून मॉइश्चरायझर आणल्यावर आधी थोडंसं वापरून बघा. त्रास झाला नाही तर मग निश्चिंतपणे वापरा. चेह-यावर लावण्याचे आणि शरीरावर लावण्याचे मॉइश्चरायझर्स वेगळे असतात. चेह-याची त्वचा जास्त नाजूक असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच विकत घ्या.

आंघोळीसाठी सौम्य साबणाचा किंवा बॉडी वॉशचा उपयोग करा. जास्त तीव्र वापराल तर त्वचा अजूनच कोरडी होईल. चेह-यासाठी फेसवॉशचा वापर करा. तोही सौम्य असावा. दुकानातून मनानं फेसवॉश घेण्याऐवजी डॉक्टरांना विचारून घ्या. प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाला एकच गोष्ट चालेल असं नाही. हिवाळ्यात ओठ फुटतात. त्यावर सारखी जीभ फिरवली तर मग फारच फुटतात. त्यामुळे त्यावर जीभ फिरवू नका. ओठांना व्हॅसलिन लावा. व्हॅसलिननं ओठ पटकन भरतात. त्यासाठी पर्समध्ये व्हॅसलिनची छोटीशी डबी ठेवाच ठेवा. नाहीतर तूप लावा. तुपाचाही उत्तम उपयोग होतो.

रात्री झोपताना पायाला भरपूर मॉइश्चरायझर चोळा. टीव्ही बघता बघता दहा मिनिटं चोळत राहा. पायाला साधं व्हॅसलिनही चालेल. असा मसाज झाला की मग मोजे घालून टाका. रात्रभर मोजे ठेवलेत तर पाय फुटणार नाहीत. हातावरही मॉइश्चरायझर घेऊन थोडावेळ हलक्या हातानं मसाज करा. जसं वय वाढत जातं तशी हाताची त्वचा कोरडी होते. त्यामुळे बरेचदा तळहाताला खाज सुटते. असा मसाज केलात तर हाताला खाज येणार नाही. अर्थातच, स्वयंपाकघरातली सगळी कामं आवरल्यावर हे करा.

या दिवसात हवा छान सुखकर असते. त्यामुळे शक्यतो तलम कॉटनचे कपडे घालून मग हवं असल्यास त्यावर वुलनचे कपडे घाला. अनेकांना प्युअर वुलनच्या कपड्यांमुळे अंगाला खाज येते (मला होतं असं). त्यामुळे त्याखाली कॉटनचे तलम कपडे घातलेत तर त्रास कमी होईल. जिथे खूप थंडी असते तिथे पायाचं रक्षण होईल असे वॉर्मर्स किंवा पायजमे वापरा.

हिवाळ्यात केसही तडतडतात. त्यामुळे केस धुतल्यावर थोडंसं सिरम लावायला विसरू नका. केसांवरही अति गरम पाणी घेऊ नका.

जिथे खूप थंडी असते (मी परदेशातल्या लोकांबद्दल बोलत नाहीये. कारण त्यांना थंडीपासून रक्षण कसं करायचं हे चांगलंच माहीत असतं) त्यांनी घरात थंडीची थोडी तयारी करावी. हल्ली आपल्याला गावोगावचं तापमान कळतं. नाशिक, नगर, परभणी अशा गावांमध्ये डिसेंबर-जानेवारीत खूप थंडी असते. आपल्याकडचा मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडचं हवामान विषम असल्यानं आणि वेगवेगळे ऋतु असल्यानं आपल्या घरांमध्ये हिटींगची सोय नसते. त्यामुळे आपल्याला थंडीपासून रक्षण करण्यासाठी प्रामुख्यानं कपडे आणि पांघरूणं यावरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे घरातल्या प्रत्येक माणसाकडे थंडीपासून बचाव करण्याचे भरपूर कपडे हवेत. शिवाय चांगली जाड पांघरूणंही हवीत. परदेशात या सोयी उत्तम असतात. शिवाय तिथे बाथरूममध्येही हिटींग असतं. नळाला २४ तास गरम पाणी असतं.

काही साध्या गोष्टी करा. घराच्या, विशेषतः बेडरूमच्या खिडक्या घट्ट लागताहेत ना हे बघा. नसतील तर त्या दुरूस्त करून घ्या. हिवाळ्याच्या सुरूवातीला थंडीचे कपडे स्वच्छ धुवून हवेला ठेवा. कारण या कपड्यांना वर्षभर ठेवल्यानं कुबट वास येतो. पांघरूणंही स्वच्छ धुवून ठेवा. आपल्याकडे खोलीत ठेवायचे हीटर्स मिळतात. ते वापरत असाल तर झोपण्याआधी ते खोलीत लावून ठेवून खोली पुरेशी उबदार झाली की बंद करून झोपा. हे हीटर्स रात्रभर चालू ठेवू नयेत. काही ठिकाणी घुसमटून माणसं गेल्याचे प्रकार घडलेले आहेत.

थंडीत भूकही छान लागते. भाज्या-फळं उत्तम आणि भरपूर मिळतात. तेव्हा रोज गरमागरम सूप्स घ्या. शक्यतो गरम, पहिल्या वाफेचं जेवा. भरपूर चहा-कॉफी-दूध प्या. या दिवसात गरमागरम आमट्या, मांसाहार करणा-यांना गरमागरम कालवण, गरम पोळ्या हे सगळं खाण्याची मजा काही औरच असते.

मला लहानपणापासून हिवाळ्याचं फार आकर्षण वाटतं. विशेषतः खूप थंडी असताना घरातली सगळी माणसं घरात असावीत असं वाटतं. सगळं घर उबदार करावं, सगळं आवरून हातात हॉट चॉकलेटचा कप घ्यावा, दुलईत गुंडाळून आरामखुर्चीवर पाय पसरून बसावं, हातात आवडतं पुस्तक असावं, म्युझिक सिस्टिमवर छान गाणी लागलेली असावीत! मस्त वाटतं की नाही! फक्त या स्वप्नात एक त्रुटी राहाते – खिडकीबाहेर बर्फ भुरभुरत असावं आणि घरात फायर प्लेस पेटलेली असावी. पण हे स्वप्न पूर्ण करायला आपली परदेशातली मित्रमंडळी आहेत की. त्यांच्याकडे जायचं आणि हे स्वप्न पूर्ण करायचं असं मी ठरवलेलं आहे!

हॅपी हिवाळा!

सायली राजाध्यक्ष

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s