मुलांना वाढवताना

मुलांना एका विशिष्टच पद्धतीनं वाढवायचं अशा काहीही कल्पना मनात नव्हत्या आणि अजूनही नाहीत. याचं कारण मी आणि माझा नवरा निरंजन आपापल्या घरी मोकळ्या वातावरणात वाढलो आहोत. माझ्या माहेरी मला मुलगी म्हणून कधी वेगळी वागणूक मिळाली नाही किंवा कुठलीही बंधनं नव्हती. नाही म्हणायला माझ्या वडलांना मी मुलांशी मैत्री करणं थोडं इनसिक्युअर करायचं खरं पण म्हणून त्यांनी कसलीही बंधनं घातली नाहीत. बाबांना मी academic काही करावं असं वाटायचं. कारण त्या काळात ठराविकच करियर चॉइसेस होते आणि त्यातही academic करियर अधिक महत्त्वाचं मानलं जायचं. त्यामुळे मी राज्यशास्त्रात एमए केलं. त्यात गोल्ड मेडल्सही मिळाली. पण आता वाटतं की कदाचित मी डिझायनिंग सारखं काहीतरी करायला हवं होतं.

आम्हाला दोन मुली आहेत. वर म्हटलं तसं त्यांना वाढवताना काहीही विशिष्ट चौकट डोळ्यासमोर नव्हती. त्यांनी फक्त चांगलं माणूस व्हावं इतकी आणि इतकीच अपेक्षा होती आणि आहे. आम्ही दोघांनीही मुलींना कधीही त्यांनी काय करावं हे सांगितलं नाही. मोठी मुलगी सावनी शाळेत असताना अतिशय उत्साही होती. ती स्वतःहून परीक्षांना बसायची. तिला गणिताची प्राविण्य आणि सातवीची स्कॉलरशिप मिळाली. त्यांनी अशा परीक्षा दिल्या तर त्यांना त्याचा फायदा होईल इतकं सांगण्याचं काम आम्ही केलं पण त्या नाही म्हणाल्या तर अजिबात आग्रहही केला नाही. धाकट्या शर्वरीनं मी काहीही करणार नाही असं आधीच जाहीर केलं होतं त्यामुळे तिला कधीच आग्रह केला नाही.

आम्हा दोघांनाही मुलींना चांगले गुण मिळावेत असं वाटायचं पण त्यासाठी मुलींवर दबाव आणणं आम्हाला चुकीचं वाटतं (आमच्या मुलीही दबाव घेणा-या नाहीत ते सोडा!) त्यामुळे कधीही इतरांच्या मार्कांची चौकशी, तुला इतकेच का मिळाले, तू अमक्या नंबरात आलं पाहिजेस अशी चर्चा आमच्या घरी झाली नाही. सावनीनं बारावीनंतर आर्ट्सला जाणार हे बारावीच्या सुरूवातीलाच सांगितलं. त्यानुसार तिनं तिची शाखा बदलली. पण तो तिचा निर्णय होता. सायन्सला जाण्याचा निर्णयही तिचाच होता. धाकट्या शर्वरीनं पहिल्यापासूनच आर्ट्सला जाणार हे नक्की केलं होतं.

Sawan-sharu babies 072

मला नेहमी असं वाटतं की आपल्या अवतीभवती वेगवेगळ्या संधी उपलब्ध असताना आपल्याला नेमकं काय आवडतंय, कशात रस आहे हे जाणून घेण्यासाठी निदान त्यांच्याशी ओळख करून घेतली पाहिजे. त्या संधी एक्स्प्लोअर करून बघितल्या पाहिजेत. त्यानुसार दोन्ही मुलींना सुचवत गेलो पण त्यांनी निरूत्साह दाखवल्यावर अजिबातच आग्रह केला नाही. मला स्वतःला अजूनही वाटतं की पर्याय उपलब्ध असताना त्यांचा वापर करून बघितला पाहिजे. पण दोघीही आता मोठ्या आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं ठरवायचं आहे.

आपल्या मुली या स्वतंत्र व्यक्ती आहेत हे आम्हा दोघांनाही सुरूवातीपासूनच मान्य होतं. माझ्यापेक्षाही माझ्या नव-याला ते फारच मान्य आहे. एक प्रसंग सांगते – शर्वरी लहान होती, साधारण ६-७ वर्षांची. आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि तिनं स्वतःचे कपडे स्वतः निवडले. ते माझ्या मते मॅचिंग नव्हते. वाईट दिसत होते. मी तिला ते बदल असं सुचवल्यावर निरंजन मला म्हणाला, तुला कधीतरी कळलंच ना की कसे कपडे घालावेत, कशावर काय घालावं? तसंच तिलाही एक दिवस कळेल. आता तिला काय घालायचं ते ठरवू दे. दोघीही मुली लहानपणापासून खूप वाचतात. सावनीचं वाचन आता पुस्तकांपेक्षा इंटरनेटवर अधिक होतं. पण शर्वरी भरपूर पुस्तकं घेत असते आणि त्यांचा अक्षरशः फडशा पाडत असते. या बाबतीत आम्ही मुलींना प्रोत्साहनच दिलं कारण आम्ही दोघेही पुस्तकवेडे आहोत. आता त्या दोघींकडून नवीन लेखक, संगीतकार, नवीन संगीत, नवीन अभिनेते याबद्दल आम्हाला कळत असतं.

P1030477.JPG

माझी आणि मुलींची मैत्री आहेच. पण निरंजनची आणि मुलींची घट्ट मैत्री आहे. आमच्या घरात एकही गोष्ट अशी नसते की आम्हा चौघांपैकी एखाद्याला माहीत नसते. त्यात आम्हा दोघांची मित्रमंडळी, त्यांच्याबरोबरचे आमचे संबंध, मुलींची मित्रमंडळी, त्यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध या सगळ्याची एकमेकांना माहिती असते. मी मित्रमंडळींमध्ये जास्त गुंतते, मग काही अप्रिय अनुभव आले तर मुलीच मला कसं वागावं हे सांगत असतात. आम्ही चौघेही एकमेकांशी याबाबतीत बोलत असतो. आता तर मुलींना घरातल्या आर्थिक निर्णयांचीही माहिती असते. निरंजनला मुली काय वाचतात, काय ऐकतात, काय बघतात याची इत्यंभूत माहिती असते, त्याच्या आणि मुलींच्या तासनतास गप्पा होतात. कारण मुलींशी सतत संवाद असला पाहिजे असं आम्हा दोघांनाही वाटतं.

वर म्हटलं तसं मुलींना विशिष्ट नियमांच्या चौकटीत वाढवायचं कधीच ठरवलं नव्हतं. पण एक गोष्ट मी कटाक्षानं पाळली आणि पाळतेही. माझ्या पिढीतले लोक जेव्हा लहान होते तेव्हा पालक नकळत का होईना पण मुलांमध्ये डावंउजवं करायचे. हे अनेक घरांमधून मी बघितलेलं होतं. आपल्या मुलांबद्दल आपण ही एक गोष्ट कधीच करायची नाही हे मी फार पूर्वीपासून मनाशी ठरवलेलं होतं. कारण पालकांच्या अशा वागण्याचे आघात मनावर कायमचे राहतात. त्यामुळे दोन्ही मुलींमध्ये कसलाही भेदभाव करायचा नाही ही गोष्ट मी फार कटाक्षानं पाळली आणि पाळते असं मला वाटतं. आणि जेव्हा सावनी – फक्त आई Impartial आहे असं म्हणते तेव्हा मला बरं वाटतं. सावनी लहान असताना एकदा मी तिला रागानं थप्पड मारली. तेव्हा तिनं केविलवाणेपणानं – आई, मारू नकोस गं असं म्हटलं त्याक्षणी ठरवलं की हे पुन्हा कधीही घडता कामा नये. त्यादिवसानंतर पुन्हा कधीही मी मुलींवर हात उगारला नाही. कारण मला कायम सावनीचा तो असहाय चेहरा आठवत राहिला.

मुलींच्या परीक्षा, त्यांची आजारपणं अशावेळी आम्ही दोघेही कायम त्यांना उपलब्ध होतो. पण मी अशी आई नाही की जी वयानं वाढलेल्या मुलांना हातात ताट देईल. १३-१४ वर्षांच्या झाल्यापासून मुली मुंबईत एकट्या फिरायला लागल्या. त्यांच्या क्लासेसना, मित्रमंडळीकडे एकट्या जायला लागल्या. त्यांचा बाबा त्यांना बरेचदा आणायला-सोडायला जायचा, लाडानं त्यांना अजूनही कधीतरी आणायला जातो. पण त्या अवलंबून नाहीत. भूक लागली तर हातानं करून खाण्याइतक्या त्या स्वतंत्र आहेत. लहान असल्यापासून आईवडलांचंही एक वेगळं स्वतंत्र आयुष्य असतं हे त्यांना मान्य आहे. थोडं कळायला लागल्यापासून कधीही त्यांनी बरोबर बाहेर येण्याचा आग्रह केला नाही किंवा तुम्ही बाहेर कुठे जाताय याची चौकशी केली नाही. आमच्या चौघांचे वेगळे कार्यक्रम असतातच. आम्ही सिनेमांना एकत्र जातो किंवा अनेकदा जेवायला जातो, प्रवास करतो. पण याच गोष्टी कधीतरी फक्त आईबाबा करणार आहेत हे त्यांना फार लवकर उमगलं होतं. आणि मला त्याचा आनंद आहे. अनेक मैत्रिणींना मी माझ्या मुलींकडे पुरेसं लक्ष देत नाही असं वाटतं, पण अशांकडे मी लक्ष देत नाही!

IMG_6187

लवकरच सावनी २१ तर शर्वरी १८ वर्षांच्या होतील. आता जगाबद्दल त्यांच्याकडून आम्हाला कळत असतं. आमच्या मुली अजिबात जजमेंटल नाहीत (किंबहुना ही पिढीच जजमेंटल नाही). त्यांचे विचार इतके मोकळे आहेत की कधीकधी मी स्तिमित होते. त्यांच्यामुळे माझे विचारही अजून मोकळे झाले आहेत. जगाकडे बघण्याची दृष्टी अधिक खुली झाली आहे. मुली आता नवीन चित्रपटांबद्दल सांगतात, आम्ही बाहेर निघालो तर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जावं ते सुचवतात. वागण्यात काही चुकलं तर सौम्यपणे आमची चूक लक्षात आणून देतात. घरात काम करणा-या सहका-यांशी अतिशय आपुलकीनं, आदरानं वागतात. कुठलीही गोष्ट खायला आणली तर आवर्जून त्यांच्यासाठी ठेवतात. आपल्या आजीबरोबर रोज वेळ घालवतात. बाहेर गेलो तर आठवणीनं तिच्यासाठी खायला आणतात. तिचं काही काम असेल तर करतात. मी नसेन तर तिला दवाखान्यात घेऊन जातात. मला वाटतं एक पालक म्हणून माझ्यासाठी हे पुरेसं आहे.

सायली राजाध्यक्ष

(हा लेख युनिसेफच्या वतीनं चालवल्या जाणा-या नवी उमेद या पेजच्या प्रवास पालकत्वाचा या सदरासाठी लिहिलेला आहे.)

मुली लहान असतानाचे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी काढलेले आहेत.