साड्यांचं व्यवस्थापन

माझ्या लग्नाला २२ वर्षं झाली आहेत. आणि गेल्या २२ वर्षांपासून मी साड्या जमवते आहे. मला कॉलेजच्या अगदी सुरूवातीपासूनच साडी नेसायला फार आवडायला लागलं. त्यामुळे तेव्हा आईच्या साड्या आणि आईचेच टाचून घातलेले ब्लाऊज असं चालायचं. लग्न झालं तेव्हा माझ्याकडे खास माझ्या अशा ५-६ साड्या होत्या. त्याही लग्नात घेतलेल्या. त्यातली १ पैठणी, १ चंदेरी, १ बनारसी, १ नारायणपेठ, १ गीतांजली आणि १ इंदुरी अशा होत्या. लग्न रजिस्टर पद्धतीनं झालं. लग्नासाठी मी जी चंदेरी नेसले होते ती ६०० रूपयांची होती.

लग्नानंतर स्वतःच्या अशा साड्या घेतल्या जायला लागल्या. त्यातली पहिली साडी होती संक्रांतीची. सुंदर काळी म्हैसूर सिल्क. तलम पोतावर नाजुक सोनेरी बुट्टी असलेली ही साडी मला फार प्रिय होती. दुर्दैवानं ती फाटली. नंतर घेतली गेली ती कांजीवरम. माझ्या डोहाळजेवणासाठी साडी घ्यायला मी आणि माझ्या सासुबाई गेलो होतो. माटुंग्याच्या नल्लीमध्ये मला ही हिरवी कांजीवरम फार आवडली. गुलमोहराच्या पानांचा काळपट हिरवा रंग, त्यावर सेल्फ बारीक पट्ट्या आणि गुलबक्षी मरून रंगाचे काठ आणि तसाच पदर. साडी मनात भरली होती. पण लग्नाला फक्त सव्वा वर्षं झालं होतं, साडी होती ५००० रूपयांची. २२ वर्षांपूर्वी ही किंमत खूप जास्त होती. त्यामुळे मी संकोच करत होते. पण माझ्या सासुबाईंनी मला सांगितलं, आवडलीय ना तुला? मग घेऊन टाक. अशी ही माझी पहिली महाग साडी. त्यानंतर किती साड्या घेतल्या. पण त्या साडीचं स्थान अढळ आहे.

5-1-1
हीच ती डोहाळजेवणाची कांजीवरम. गेल्या वर्षीचा फोटो आहे हा.

परवा साड्या आवरायला काढल्या आणि अशा किती तरी आठवणी मनात पिंगा घालत राहिल्या. लग्नातल्या दोनच साड्या आता शिल्लक आहेत. एक पैठणी आणि दुसरी बनारसी. पैठणी क्वचित तरी नेसली जाते, पण बनारसी केवळ आठवणीसाठी ठेवली आहे. लग्नानंतर पहिल्या १०-१२ वर्षांत फारशा साड्या घेतल्या गेल्या नाहीत. कारण मुली लहान होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर जीन्स कुडते किंवा सलवार कमीज बरे वाटायचे. पण गेल्या १० वर्षात मात्र मी भरपूर साड्या घेत गेले आणि मुख्य म्हणजे त्या नेसतेही. मी गाण्याच्या कार्यक्रमांना, कुणाकडे जेवायला जाताना, कुठल्याही समारंभाला, अगदी पार्ट्यांनाही साडीच नेसते. साडी हा पेहराव मला सगळ्यात ग्रेसफुल आणि आरामदायी वाटतो.

बघा! पुन्हा आठवणींमध्ये गुंगलेय. तर साड्या आवरल्या. साड्यांचं व्यवस्थापन करणं फारसं अवघड नाहीये. काही गोष्टी नियमित केल्यात तर साड्या उत्तम टिकतात आणि उत्तम राहतात असा माझा अनुभव आहे.

एखादी साडी नेसल्यावर, घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही ती बदलता तेव्हा घडी घालण्याआधी निदान १० मिनिटं तिला वारा लागू द्या. याचं कारण असं की काखेजवळ आणि नि-या घालतो तिथे अनेकजणींना घाम येतो. वारा लागला की साडी कोरडी होते.

कॉटन साडी दिवसभर नेसली असेल आणि ती ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी नेसली असेल तर ती लगेचच धुवा. पण थोड्या वेळासाठी नेसली असेल, जिथे मळण्याची फारशी शक्यता नाही अशा ठिकाणी नेसली असेल तर मग लगेच धुवू नका. नुसती इस्त्री करून ठेवा. काही कॉटन साड्यांना हलका स्टार्च केला तर त्या चांगल्या दिसतात.

सिल्कची साडी निदान ३-४ वेळा नेसल्यावर मग ड्रायक्लिनिंगला द्या. साडी सिल्कची असो की कॉटनची की दुस-या कुठल्याही पोताची – साडी नेसून झाल्यानंतर ती इस्त्री करून मगच कपाटात जाऊ द्या. तशीच घडी करून साडी कपाटात कोंबू नका. इस्त्री केलेल्या साड्या नीट राहतात.

साड्या कपाटात लावताना नीट सॉर्टिंग करून लावा. मी जरीच्या, कॉटनच्या, साध्या सिल्कच्या, समारंभांना नेसता येतील अशा, लिननच्या, महेश्वरी, बंगाली असे वेगवेगळे गठ्ठे करते. एकसारख्या पोताच्या साड्या एका गठ्ठ्यात ठेवल्या तर सापडायलाही सोप्या होतात आणि ते गठ्ठेही नीट राहतात.

साड्यांसाठी माझ्याकडे वेगळे कप्पे आहेत. त्यात फक्त साड्याच ठेवते. परकर आणि ब्लाऊज वेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवते. मी साड्या एकावर एक ठेवते. त्यासाठी वेगळ्या पिशव्या, होल्डर्स वापरत नाही. फक्त काही जॉर्जेट किंवा क्रेपच्या साड्या आहेत त्या मी हँगरवर ठेवते. बाकी माझं घर लहान आहेच आणि बेडरूम इतकी लहान आहे की त्यात हँगरवर सगळं लावणं अशक्य आहे. त्यामुळे ओव्हरहेड कपाटात मी साड्या ठेवते.

साड्या ठेवलेल्या कप्प्यांमध्ये एअर फ्रेशनरचे सॅशे ठेवते म्हणजे साड्यांना कुबट वास लागत नाही. घड्यांमध्ये साड्या उत्तम राहतात. फक्त चंदेरी किंवा तत्सम मटेरियलच्या साड्या कधीकधी घड्यांमध्ये चिरल्या जातात. त्यामुळे त्या घड्या अधूनमधून बदला. कलमकारी साडीचा मेंटेनन्स मात्र मला जमलेला नाही. हँड पेंटेंड कलमकारी साडीला मुंबईच्या हवेत बुरशी लागते. ती अगदी ड्रायक्लिन करून ठेवली तरीही.

माझ्याकडे मुख्यत्वे कॉटन, रॉ सिल्क, भागलपूर, बंगाली कॉटन, महेश्वरी, चंदेरी, कांथा, बनारसी, लिनन, बांधणी या प्रकारांमध्ये साड्या आहेत. गेल्या काही वर्षात तर मला जर नसलेल्या थिक सिल्कच्या साड्या आवडायला लागल्या आहेत. शिवाय लिनन हा प्रकारही मला खूप आवडतो. या साड्या कुठल्याही हवेत नेसायला उत्तम असतात. या साड्यांना फारसा मेंटेनन्सही लागत नाही.

कॉटन आणि लिनन साड्या घरी सहज धुता येतात. धुताना थंड पाण्यात, हातानं साड्या धुवा. त्या भिजवताना वेगळ्या भिजवा. हलक्या पिळून, झटकून मग वाळत घाला. कॉटन साड्यांना स्टार्च करायचं असेल तर एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा त्यात साबुदाण्याचं १-२ टेबलस्पून पीठ घाला. पाणी चांगलं उकळा. साडी धुवून पिळल्यानंतर त्यात बुडवा आणि निथळून वाळत घाला. (एकेकाळी मी माझे सगळे कुडते स्वतः धुवून स्टार्च करत असे).

बाकी इतर सगळ्या पोतांच्या साड्या लाँड्रीत ड्रायक्लिनिंगला द्या. हा मार्ग काहींना महाग वाटू शकेल. पण साड्या नेहमी ड्रायक्लिन कराव्या लागत नाहीत. एक साडी निदान ३-४ वेळा नेसल्यावर मगच ड्रायक्लिन करावी लागते. त्यामुळे हा पर्याय वापरायला हरकत नाही. ड्रायक्लिन केल्यामुळे साड्यांचा पोत, त्यांचे रंग आणि चमक टिकायला मदत होते.

चला तर मग, या वीकेंडला आपापली कपाटं उघडा आणि साड्या आवरायला काढा. बघा, साड्या आवरता आवरता त्या साड्यांच्या आठवणींमध्येही गुंगून जाता की नाही ते!

#साड्यांचंव्यवस्थापन #साड्यांचीव्यवस्था #कपाटाचंव्यवस्थापन #कपाटाचीव्यवस्था #साडीआणिबरंचकाही #sareemanagement #sareemaintenance #sareelove #wardrobemanagement #sareesandotherstories

सायली राजाध्यक्ष