महेश्वरी – रॉयल साड्या

महेश्वरी साड्या रॉयल दिसतात. राजघराण्यातल्या बायका जुन्या काळात ज्या प्रकारच्या साड्या नेसत असत तशा या साड्या दिसतात. छान मऊसूत स्पर्श आणि सुरेख रंगसंगती यामुळे या साड्या देखण्या दिसतात. शिवाय रूपाच्या मानानं साड्यांची किंमत फार जास्त नसते.

परवाच इंदौर, महेश्वर आणि देवास अशी ट्रीप करून आले. त्यातला महेश्वरचा एक किस्सा मी याआधी लिहिलाच होता. आजची ही पोस्ट फक्त महेश्वरी साड्यांबद्दल आहे. महेश्वरच्या साड्या या सुती आणि रेशमी धाग्याच्या मिश्रणानं बनवल्या जातात. आता टिश्यूच्याही साड्या मिळतात. टिपिकल महेश्वरी साडी म्हणजे प्लेन साडी आणि त्याला लहानसे जरीचे काठ किंवा अंगभर सेल्फ व्हिविंग आणि जरीचे काठ अशी असते. आता काळानुसार काठांच्या डिझाइनमध्ये बरीच वेगवेगळी डिझाइन्स बघायला मिळतात. शिवाय अंगातल्या डिझाइनमध्येही बदल दिसतो.

या साड्यांना लागणारा कच्चा माल बंगलोर आणि सूरतहून येतो. म्हणजे धाग्यांची बंडलं या ठिकाणांहून येतात. नंतर इथले हातमागवाले त्या धाग्यांवर प्रक्रिया करतात, त्यांना रंगवतात. हे धागे सुकल्यानंतर ते बॉबिनवर भरले जातात. ही बॉबिन्स हातमागावर लावली जातात आणि त्यातून साडीचं विणकाम होतं. जितकं डिझाइन जास्त तितकी बॉबिन्स जास्त आणि साडी विणायला लागणारा वेळही जास्त. म्हणूनच साडीची किंमत तिच्या डिझाइनवरून ठरते.

महेश्वरी साड्यांचे रंग अतिशय ब्राइट असतात. साडी बघितली की घ्यावीशीच वाटते असे दिसतात. विशेषतः काळ्या, सोनेरी पिवळ्या, हिरव्या, गुलबक्षी अशा रंगांची या साड्यांमध्ये चलती आहे. या साड्यांमधलं जे डिझाइन असतं ते अतिशय पारंपरिक असतं. नर्मदेच्या घाटावरच्या अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या ज्या वास्तू आहेत त्यातल्या कलाकुसरीवरून ही डिझाइन्स केली जातात असं आमच्या गाइडनं आम्हाला सांगितलं. म्हणजे या वास्तूंमधले खांब, पाय-यांवरची कलाबूत, कोनाडे, देवळ्या या सगळ्यांमधून या साड्यांचं डिझाइन उभं राहातं.

आम्ही ज्या महिमा साडी सेंटरमध्ये गेलो होतो त्या अर्जुन चौहानजींचे स्वतःचे माग आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यांनी विणकर म्हणून काम केल्यावर आता गेली काही वर्षं त्यांनी स्वतःचे लूम्स सुरू केले आहेत. आम्ही गेलो तेव्हा प्रख्यात डिझायनर कृष्णा मेहता यांच्या ऑर्डरचं काम सुरू होतं. बिबा या ब्रँडसाठी ते कपडे बनवतात. शिवाय फॅब इंडियाची एक मोठी ऑर्डर तयार होती. महिमा साडी सेंटरमधून मी स्वतःसाठी एकच साडी घेतली, शिवाय मैत्रिणींसाठी काही साड्या घेतल्या. माझ्या आईनं तिच्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी साड्या घेतल्या. नंतर आम्ही अर्जुनजींच्या घरी दाल बाफल्याचं सुंदर जेवण करून आलो.

महेश्वर हे अतिशय लहानसं गाव आहे. अहिल्याबाईंच्या वाड्याकडे जातानाच ही साड्यांची सगळी दुकानं लागतात. त्यामुळे घाट बघून झाला की इथे साडी खरेदी करता येते. हंसा हँडलूम हे साड्यांचं दुसरं प्रचंड स्टॉक असलेलं दुकान आहे. तिथे त-हत-हेची डिझाइन्स बघायला मिळतात. मी तिथून ४ साड्या घेतल्या! शिवाय मैत्रिणींसाठी ओढण्या आणि स्टोल्सही घेतले.

अनेक मैत्रिणींनी महिमा साडी सेंटरचा फोन नंबर विचारला होता. तो खाली शेअर करते आहे.

अर्जुन चौहान/नीरज चौहान – ८९६२२०३४३३

महेश्वरला जाणार असाल तर महिमा साडी सेंटरमध्ये नक्की जा आणि साड्यांची लूट करा!

#sareeshopping #saree #maheshwarisaree #maheshwarshopping #silksaree #sareeinfo #ethnicwear #ethnicsaree #traditionalsaree #traditionalwear #पारंपरिकसाडी #महेश्वरीसाडी #महेश्वरीसिल्क #सिल्कसाडी #साडीआणिबरंचकाही #महेश्वरशॉपिंग #sareesandotherstories

या पेजवरची पोस्ट शेअर करताना पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष