जगात न्याय आहे!

आई झालीस की तुला कळेल किंवा बाप झालास की तुला कळेल ही आपल्याकडे घरोघरी ऐकू येणारी वाक्यं आहेत. म्हटलं तर अगदी घिसीपिटी किंवा म्हटलं तर खूप अर्थपूर्ण. कारण खरोखरच भूमिका बदलली की या वाक्यांचा अर्थ लागतो.

माझ्या पिढीत (माझं वय ४५ आहे) आईला काय बोअर स्वयंपाक केलाय असं म्हणायची टाप नव्हती. म्हणजे भीती वाटायची असं नाही. पण आईबाबांशी या स्वरात, या अधिकारानं बोलायचं नाही असं मनोमन मान्यच केलेलं होतं. आणि जर आईला ही भाजी मला आवडत नाही असं चुकून म्हटलंच तर माझी आई फटकन म्हणायची, तुला जे काही हवं असेल ते तुझं तू करून घे. त्यामुळे फालतू लाडाची सोयच नव्हती. आई आवडीचं करायची. पण चौघं भावंडं. मग रोज प्रत्येकाच्या आवडीचं शक्यच नव्हतं. आज मी जेव्हा आईच्या भूमिकेत असते तेव्हा मी तसंच वागते. किंबहुना जेव्हा मी मुलींना काही सांगते तेव्हा कधीकधी मी आईसारखीच बोलते आहे असं माझं मलाच जाणवतं.

आता आपल्या मुलांशी आपलं मैत्रीचं नातं असतं. आणि मुलं तर हे फारच गंभीरपणे लक्षात ठेवतात! म्हणजे आईला तू खायला कसं चांगलं करत नाहीस पासून तू किती जुनाट विचार करतेस असं काहीही मुलं बोलू शकतात आणि जे की चांगलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे आपल्याला कळतं. त्यांनाही आपल्याला सगळं येऊन सांगावसं वाटतं.

पण कधीकधी रागाचा कडेलोट होतो. म्हणजे मला एखादं काम तातडीनं करायचं आहे आणि जेव्हा माझी मुलगी आपल्याला चिल हो असं म्हणते तेव्हा गार पडायच्या ऐवजी माझा पारा पार चढतो. पण ती तिच्या कानातले इयरफोन न काढता शांतचित्तानं इकडून तिकडे फिरत असते. शिवाय आपली बडबड ऐकू येत नसल्यामुळे चेह-यावर शांत भाव असतात. खरा स्थितप्रज्ञ कोण असं विचारलं तर मी माझ्या मुलीच्या या अवस्थेकडे बोट दाखवेन. किंवा कामाची मदतनीस बाई आलेली नसते, मी चिडचिड करत भांडी घासत असते तेव्हा येऊन आई, एक दिवस भांडी तशीच ठेवलीस तर काय होणार आहे असं जेव्हा ऐकवलं जातं तेव्हा खाऊ की गिळू असं होतं. किंवा तू फारच हायपर होतेस गं आई, जरा शांत हो असं म्हटलं की मूग गिळून गप्प बसावं लागतं. लेक्चर सुरू व्हायला पंधरा मिनिटं उरलेली असताना माझी मुलगी ज्या शांतपणे बसलेली असते तेव्हा माझा संताप संताप होतो आणि बाई म्हणतात, आई, मी पाच मिनिटात रूईयाला पोचेन. ट्रॅफिक नसतानाही वांद्र्याहून रूईयाला पाच मिनिटांत पोचणं केवळ अशक्य आहे. पण तिचं म्हणणं ती पोचते!

स्तंभलेखक रमा बिजापूरकर यांनी काही वर्षांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सच्या ब्रंच या पुरवणीत एक अफलातून लेख लिहिला होता. त्यात त्यांनी मुलीबरोबरचं आपलं नातं कसं होतं आणि आता कसं बदललं आहे हे फारच नर्मविनोदी शैलीत लिहिलं होतं. तो लेख वाचताना मला जणू आमच्याच घरातली दृश्यं दिसत होती. रमा बिजापूरकरांची मुलगी जेव्हा कॉलेजला होती तेव्हा मी वर लिहिलेलीच परिस्थिती असे. म्हणजे त्यांना कामावर जायची घाई असे आणि कामवाल्या बाईचा येत नाही म्हणून फोन आलेला असे. यावर आता काय करावं असा विचार करत असताना मुलगी अम्मा यू चिल! असं म्हणत असे. किंवा इतकी काय सगळ्या गोष्टींची आधी तयारी करतेस असंही ऐकवत असे.

नंतर परिस्थिती बदलली, भूमिकाही बदलल्या. रमा बिजापूरकरांची मुलगी लग्न होऊन आपल्या घरी गेली. नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत करायला लागली. घरात काय काय करायचं आहे याचं नियोजन करायला लागली. नंतर जेव्हा रमा तिच्या घरी दिल्लीला राहायला जात असत, तेव्हा ऐन थंडीच्या दिवसात मुलगी पहाटे कॉलवर असे आणि रमा अंथरूणात मस्त रजई ओढून झोपलेल्या असत! किंवा मुलगी कामाला निघाल्यावर जेव्हा कामवाल्या बाईचा फोन येई की, येत नाहीये, तेव्हा मुलगी हायपर होत असे. आणि मग रमा तिला सांगत असत , चिल हो! इतकं काय त्यात! आणि मग मुलीचा संताप होई. रमांनी लेखाचा शेवट करताना फार छान लिहिलं होतं – देवाच्या घरी न्याय आहे याची मला खात्री पटली आहे!

आता मीही रमानं घेतलेला अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे! माझ्या मुली २० आणि १७ आहेत, त्यामुळे दिल्ली अब दूर नही!

सायली राजाध्यक्ष