१०० साडी पॅक्ट

केवळ साडी नेसण्याच्या आवाहनामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बायकांचं आयुष्य इतकं बदलून जाईल याची दोन वर्षांपूर्वी कुणीही कल्पना केली नव्हती. १०० साडी पॅक्ट म्हणजे काय हे अनेकांना माहीत आहेच. पण काही नवीन वाचकांनी त्याबद्दल थोडी माहिती द्यायला सांगितली आहे म्हणून परत सांगतेय. एली मॅथन आणि अंजू मौद्गल्य-कदम या दोघी मैत्रिणींनी २०१५ या वर्षाच्या सुरूवातीला १०० साडी पॅक्ट या चळवळीला सुरूवात केली. यात सामील होण्याचं आवाहन त्यांनी सोशल मीडियावरच्या बायकांना केलं. हा पॅक्ट सोपा आहे. एका वर्षात शंभरदा साडी नेसायची. शंभर साड्या हव्यात का? तर नाही. तुम्ही एक साडी कितीदाही नेसू शकता. फक्त वर्षातून शंभरदा साडी नेसायची त्या साडीमागची कहाणी सांगायची आणि आपले त्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.

या साध्याशा आवाहनामुळे काय झालं? तर अनेक बायका, ज्या कधीही साडी नेसत नव्हत्या त्या उत्साहानं साड्या नेसायला लागल्या. त्यावर वेगवेगळ्या प्रकारांचे, फॅशनचे ब्लाऊज घालायला लागल्या. त्यावर शोभतील असे विविध प्रकारचे दागिने घालायला लागल्या. यातून अनेक बायकांना स्वतःचं एक वेगळं व्यक्तित्व गवसलं. या चळवळीतून फेसबुकवर अनेक क्लोज्ड ग्रुप तयार झाले. त्यात बायका मोकळेपणानं आपल्या त्या साडीबद्दलच्या आठवणी शेअर करायला लागल्या. प्रत्येक साडीमागे काहीतरी कहाणी असतेच. ती त्या शेअर करायला लागल्या. त्यातून त्यांना अनेक नवीन मैत्रिणी मिळत गेल्या. त्यांची गेटटुगेदर्स व्हायला लागली. यात परदेशात राहणा-या अनेक बायकाही सामील झाल्या. त्यांचं खरं कौतुक, कारण तिथल्या हवामानात साडी नेसणं हे खरोखर एक आव्हानच. पण त्यांनी चिकाटीनं पॅक्ट पूर्ण केला. त्या भारतात येणार असल्या की आपल्या साडी सख्यांना कळवायला लागल्या. त्यामुळे त्यांच्या भेटी व्हायला लागल्या. यातून साड्यांची मागणी वाढली. हँडलूम साड्यांना तर फारच उठाव आला.

अशाच एका साडी पॅक्टर्सच्या ग्रुपचं एक गेट टुगेदर पुण्यात हल्लीच झालं. या साडी पॅक्टमध्ये सामील असलेली अस्मिता जावडेकर हिनं पुढाकार घेऊन तिच्या घरी हे आयोजित केलं होतं. अस्मिता स्वतः उत्तम ज्युलरी डिझायनर आहे. आत्मन या तिच्या ब्रँडखाली ती फार सुंदर दागिने तयार करते. त्यात विशेषत्वानं चांदीच्या दागिन्यांचा उल्लेख करावा लागेल. तिनं तिच्या घरी पुण्यातल्या साडी पॅक्टरना आमंत्रण दिलं. त्यात मलाही कुणीतरी टॅग केलं होतं. खरं तर मी मुंबईत राहाते. पण तरीही मी या गेट टुगेदरला जायचं ठरवलं. याचं कारण मला अस्मिताला कधीतरी प्रत्यक्ष भेटायचं होतं. मी बारा वाजता पुण्याला पोहोचले आणि सरळ अस्मिताच्या घरी गेले. तिथेच साडी नेसले. नंतर एक एक जण यायला लागली. सगळ्याजणी सुरेख साड्या नेसून आल्या होत्या. (साडी सुरेख असण्यासाठी ती महाग असावी लागत नाही, किंवा त्यावर जे दागिने घालतो तेही महागाचे लागत नाहीत.) अस्मितानं आणि तिच्या सासुबाईंनी, कल्पना मावशींनी खास मराठमोळा उत्तम स्वयंपाक केला होता. त्याच्यावर ताव मारताना सगळ्याजणींनी आपापला परिचय करून द्यावा असं ठरलं. प्रत्येकीकडे सांगण्यासारखं इतकं काही होतं की वाटलं अरे काय काय करत असतात लोक! सोनाली प्रताप नायर ही मूळची कॉस्मेटॉलॉजिस्ट. पण ती आता आध्यात्मिकतेकडे वळली आहे. ती तिच्या नव-याच्या व्यवसायात मदत करते. चिन्मयी काळे ही मोठ्या एकत्र कुटुंबात राहाते, आपल्या दोन लहान मुली सांभाळून ती लहान मुलींसाठीच्या पारंपरिक कपड्यांचा सोयरा कलेक्शन हा ब्रँड चालवते. अनिका पेडिएट्रीशियन आहे. तिला पुढे NGO किंवा तत्सम संस्था सुरू करायची आहे. राधिका श्रीनिवासननं आपल्या उत्तम नोकरीतून ब्रेक घेतला आहे. ती नुकतीच ४० वर्षांची झाली म्हणून त्या वर्षात तिनं जगभरातली (त्यात भारतातलीही आली) ४० ठिकाणं बघितली. रूपा आडगावकर ही डेंटिस्ट आहे पण ती आता स्वतःची दोन रेस्टॉरंट्स चालवते. सुखदा चव्हाण आणि नीलू या दोघी फॅशन डिझायनिंग करतात. दीप्ती आचार्यही फॅशन डिझायनर आहे पण सध्या ब्रेक घेऊन ती नवीन काय करता येईन याचा विचार करते आहे. शेफाली वैद्य लिहिते, भरपूर प्रवास करते, अजूनही बरंच काही करत असते. सुगंधा सिंग ही डॉक्टर आहे. अर्चना झा – थावरे हिचं स्वतःचं बुटिक आहे. शीतल आरे ही एका संस्थेत काम करते शिवाय मॉडेलिंगही करते. मीनल झाडे हिनंही आता स्वतःचा क्विलिंग ज्युलरीचा व्यवसाय सुरू केला आहे. अस्मिता फार सुंदर ज्युलरी बनवते. तिच्या सासुबाई, कल्पना मावशी यांनी आपल्या नव-याला लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी लिव्हरचा भाग डोनेट केला आहे. त्याबद्दल त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे.

या सगळ्याजणी एकमेकींच्या कहाण्या ऐकण्यात इतक्या रमून गेल्या होत्या. जणू काही त्या महिनो न महिने एकमेकींना ओळखत असाव्यात असं वाटत होतं. मला हल्ली बरेचदा वाटतं की आपल्याला जे फार पूर्वीपासून ओळखत असतात त्यातले फार कमी लोक त्याच प्रेमानं कायम संबंध ठेवतात. त्यामुळे या वयात अशी नवीन झालेली मैत्री कधीकधी जास्त जिव्हाळ्याची ठरते.

बघा ना, साडी हा एक बंध. त्या बंधानं जगात वेगवेगळ्या ठिकाणी राहणा-या आम्ही सगळ्याजणी एकमेकींशी किती घट्ट बांधल्या गेलो आहोत. इथे स्पर्धा नाही, चढाओढ नाही तर शेअरींग आहे. कदाचित ज्या कहाण्या आपल्याला इतर कुठे सांगता येत नसतील त्या इथे सांगता येतात. इथे आपलं कौतुक करणा-या किती मैत्रिणी आहेत हे पाहूनच मस्त वाटतं.  जर मी या पॅक्टमध्ये सामील झाले नसते तर मी कशाकशाला मुकले असते!

अस्मिताचे विशेष आभार! कारण इतक्या लोकांना घरी बोलावण्याचा घाट घालणं, त्यांच्याशी को-ऑर्डिनेट करणं, त्यांना न कंटाळता मेसेज करणं, पत्ता समजावून सांगणं, सगळ्यांची उत्तम बडदास्त राखणं, उत्तम खायला घालणं आणि मुख्य म्हणजे त्याचा कसलाही बडेजाव न मिरवणं! शिवाय अस्मितानं, वैष्णवी आणि सचिन या तिच्या दोघा सहायकांना फोटो काढण्यासाठी बोलावलं होतं. त्यामुळे सगळ्याजणी सुंदर दिसणार याची खात्री होतीच! अस्मिता मनापासून आभार!

सायली राजाध्यक्ष