साडीची कहाणी – ३

टस्सर सिल्क हा माझा अत्यंत आवडता कापडाचा प्रकार आहे. एक तर ते नैसर्गिक रंगातही सुंदर दिसतं. शिवाय त्याला अंगचीच अशी सोनेरी झळाळी असते. त्याला काहीही न करता साधा कुडता शिवा आणि एखादा सुरेख दुपट्टा त्यावर घ्या किंवा दुपट्टा न घेता जीन्सवर साधा टस्सर कुडता घाला. फार सुरेख दिसतं. टस्सरमध्ये नैसर्गिक रंगातही फक्त वेगळ्या रंगाच्या काठाच्या साड्या मिळतात. त्याही छान दिसतात. विशेषतः भागलपूर साड्या फार छान दिसतात.

आज मी माझ्या एका टस्सर साडीचाचा फोटो शेअर करणार आहे. ही टस्सर बनारसी आहे. साधारणपणे बनारसी टस्सरमध्ये फार कमीदा बघायला मिळते. मला स्वतःला दक्षिणेकडच्या साड्यांचं सिल्क आवडतं कारण ते छान घट्ट आणि जाड असतं. बनारसी साड्यांचं सिल्क अतिशय पातळ असतं त्यामुळे मला ते फारसं आवडत नाही. पण मला ही टस्सरमधली बनारसी दिसली आणि मी तिच्या प्रेमातच पडले. खरं तर ही अतिशय ब्राइट अशी निळ्या-जांभळ्या रंगाची साडी आहे. हे दोन्ही रंग मी फारसे वापरत नाही. किंबहुना या रंगांमध्ये फारसं काही विकतच घेत नाही. पण ही बनारसी पाहताक्षणी आवडली.  एक तर या साडीला चंदेरी रंगाचे काठ आहेत. त्यामुळे त्याचा जांभळा रंग थोडा सौम्य होतो. शिवाय काठावरची एम्ब्रॉयडरीही अतिशय नाजुक आहे. गंमतीची गोष्ट अशी की ही साडी नेसल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि या रंगाच्या जवळ जाणारी अजून एक भागलपूर साडी मी विकत घेतली.

या साडीला चंदेरी काठ असल्यामुळे यावर दागिनेही चांदीचेच चांगले दिसतात. म्हणून परवा मी जेव्हा एका लग्नासाठी मी ती नेसली तेव्हा मी त्यावर पारंपरिक कानातलं, पारंपरिक डमरू मण्यांची माळ आणि बांगड्या चांदीच्या घातल्या. नाकातली मोरणी ही माझी अत्यंत आवडती आहे. माझी मैत्रीण गीतांजली गोंधळे ही चांदीचे दागिने बनवते. तिचं मोहा हे फेसबुक पेजही आहे. तर ही मोरणी तिच्याकडची आहे. मी गळ्यात जी बारीक जोंधळी पोत घातली आहे ती मी एका लहानशा प्रदर्शनात अत्यंत स्वस्तात म्हणजे २०० रूपयांना घेतलेली आहे. ती चांदीची नाही. या साडीबरोबर मी जे क्लच घेतलेलं आहे ते फॅब इंडियाचं आहे. खरं तर ते आयपॅड कव्हर आहे. पण एक तर ते सिल्कचं आहे आणि दुसरं म्हणजे त्यात चार ब्राइट रंगांचा वापर केलेला आहे. त्यामुळे ते अनेक साड्यांवर क्लचसारखं वापरता येतं. मी ज्या लग्नाला गेले होते ते आपलं महाराष्ट्रीय पद्धतीचं सकाळचं, पारंपरिक लग्न होतं. म्हणून मी साडीवर पारंपरिक दागिने घातले. पण जर मी ही साडी संध्याकाळी एखाद्या रिसेप्शनला नेसली तर मी त्यावर फक्त मोठे चांदीचे झुमके आणि नाकात मोरणी घालेन.

शेवटी काय तर आपल्याला काय घालावंसं वाटतं हे महत्वाचं. आणि आपण कशात कम्फर्टेबल आहोत हेही. एखादी गोष्ट दुस-याच्या अंगावर चांगली दिसली म्हणजे ती आपल्यालाही चांगली दिसेलच असं नाही. आणि एखादी गोष्ट फॅशनमध्ये आहे म्हणून आपण ती केलीच पाहिजे असं तर मुळीच नाही. आपण वेगवेगळे प्रयोग करून बघावेत. मिक्स अँड मॅच करावं, कधी कधी अजिबात मॅचिंग करू नये. विश्वास ठेवा, बरेचदा मी असं करते, आणि ते चांगलं दिसतं.

तुम्हीही काय काय करता त्याचे अनुभव नक्की शेअर करा. सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष