साडीची कहाणी – १

मला पूर्वी जरीच्या साड्याही विकत घ्यायला आवडायच्या. पण आता जसंजसं वय वाढलंय तसंतसं मला रेशमी पण जर नसलेल्या साड्या अधिक आवडायला लागल्या आहेत. कारण या साड्या कधीही, कुठेही नेसता येतात. अगदी कुणाकडे जेवायला जाताना असेल, एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाताना असेल किंवा एखाद्या पुस्तक प्रकाशनाला. किंवा अगदी सहज एखाद्या मित्रमैत्रिणीकडे जातानाही असेल, अशा साड्या सहज नेसता येतात. शिवाय त्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अक्सेसरीज वापरून वेगवेगळे प्रयोगही करू शकता. जरीच्या साड्यांबरोबर सोनं, मोती, हिरे यासारखे दागिने जास्त चांगले जातात.

माझ्या आतापर्यंत कधी हे लक्षात आलं नव्हतं. पण परवा मी जेव्हा माझ्या साड्या आवरायला काढल्या, तेव्हा त्यांचं सॉर्टिंग करताना मला हे प्रकर्षानं जाणवलं. ते असं की, मी बहुतेकदा सॉलिड रंगांमध्ये प्लेन सिल्कच्या साड्या अधिक आवडीनं घेते. म्हणजे वेगवेगळ्या सिल्क प्रकारांच्या साड्या ओव्हरऑल वेगवेगळ्या प्लेन रंगांमध्ये तर फक्त काठ वेगळ्या रंगांचे. अशा किती तरी साड्या माझ्याकडे आहेत हे मला त्यादिवशी जाणवलं. अंगावर फारसं डिझाइन असलेल्या किंवा फार रेशीमवर्क केलेल्या साड्या माझ्याकडे जवळपास नाहीतच (म्हणजे आता नवीन साड्या घेताना हे लक्षात ठेवायला हवं!)

परवा एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जाताना मी एक प्लेन मस्टर्ड रॉ सिल्क विथ मरून बॉर्डर नेसली होती. हे रॉ सिल्क अगदी मस्त रॉ आहे. जरासं खरखरीत, ज्याचा पोत मला फार आवडतो. ही साडी मी पारंपरिक कारीगर नावाच्या प्रदर्शनात बिहारच्या स्टॉलवरून घेतलेली आहे. या साडीत मरून रंगाचं प्लेन ब्लाऊजपीस होतं. त्याचं मी स्लीव्हलेस ब्लाऊज शिवलंच आहे. पण परवा मी त्यावर एक विटकरी रंगाचं खणाचं ब्लाऊज घातलं होतं. हे ब्लाऊजही मी पारंपरिक कारीगरमध्येच घेतलं होतं. बेळगावच्या स्टॉलवरून घेतलेलं हे ब्लाऊजपीस फार सुंदर आहे. त्यावर पाठीला अगदी गडद निळ्या खणाचा पॅच लावलेला आहे आणि त्यावर कशिदाकाम केलेलं आहे.

या साडीवर मी अर्थातच माझे आवडते चांदीचे दागिने घातले होते. गळ्यातलं माझ्या नेहमीच्या सिल्व्हर स्ट्रीक या दुकानातून घेतलेलं आहे. या गळ्यातल्याचा बाज लफ्फ्यासारखा आहे. कानातल्या ज्या कुड्या आहेत त्या मी १२-१३ वर्षांपूर्वी बंगलोरला एका दुकानात घेतलेल्या आहेत. तर मोरणी परवाच झालेल्या फनेबिलिटी या प्रदर्शनात मंजिरी ओककडून घेतलेली आहे. मला साड्यांवर मोठी टिकली लावायला आवडते. त्यामुळे मी बहुतेकदा साडी नेसली की टिकली लावतेच लावते. त्याचं कारण असं आहे की ज्यांचं नाक फारसं चांगलं नसतं, त्यांनी मोठी टिकली लावली की नाकाकडे लक्ष जात नाही असं मला वाटतं!

ही पोस्ट सोशल नेटवर्कवर शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

Screenshot_2016-02-22-20-20-52-1

सायली राजाध्यक्ष