साडीची कहाणी – ५

ही जी साडी आहे, ती तयार करण्यासाठी तीन प्रकारच्या कापडाचा वापर केलेला आहे. साडीचं अंग, तिचे काठ आणि पदर अशा तीन गोष्टींसाठी वेगवेगळं कापड वापरलं गेलेलं आहे. साडीचे जे काठ दिसताहेत ते मी फार आधी एका प्रदर्शनात घेतले होते. हे काठ अस्सल बनारसी आहेत. काठांवर नाजूक अशी वेलबुट्टी आहे. अगदी फिक्या निळ्या आणि केशरी रंगाशिवाय यात डल सोनेरी जरीचा वापर केलेला आहे.

तर माझ्याकडे हे काठ होतेच. त्यासाठी मला पदर आणि अंगासाठीचं कापड घ्यायचं होतं. मी हे काठ घेऊन दुकानात गेले. मला स्वतःला सिल्क फार आवडतं. त्यामुळे अंगासाठी रॉ सिल्क घ्यायचं हे मनात नक्की होतं. कारण रॉ सिल्कचा फॉलही फार सुरेख येतो. नि-या अगदी चापूनचोपून बसतात. साडीसाठी कापड निवडताना कापडाचा फॉल कसा आहे हे बघणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे रॉ सिल्क घेणं नक्की केलंच होतं. काठांच्या रंगाला शोभेल असं कापड घ्यायचं होतं. म्हणून रॉ सिल्कमध्ये बरेच रंग बघितले. शेवटी हे निळसर हिरव्या फिरत्या रंगाचं कापड नक्की केलं कारण त्यावर काठ सुरेख दिसत होते.

मला लांबलचक पदर आवडतात. आणि ज्या साड्या आपण रेडीमेड घेतो त्याला नेहमी हातभर लांबीचे लहान पदर असतात. त्यामुळे पदरासाठी जास्त कापड घ्यायचं होतं. म्हणून हे केशरी लाल रंगाचं, सोनेरी बुट्टी असलेलं अस्सल बनारसी कापड पदरासाठी निवडलं. काठांबरोबर ही दोन्ही कापडं लावून बघितली. तेव्हा एकूण बरं दिसत होतं. ब्लाऊज मला अगदी कॉन्ट्रास्ट आवडतात. म्हणून मी गुलबक्षी रंगाचं बनारसी ब्रोकेडचं कापड त्यासाठी घेतलं.

सगळी कापड खरेदी झाल्यावर माझ्या टेलरकडे ती कापडं नेऊन दिली. तिला मला काय आणि कसं हवं आहे ते समजावून सांगितलं. तिच्याकडे उत्तम कारागीर आहेत. त्यामुळे ती काम छानच करणार याची मला खात्री असते. तसं तिनं ते केलं. आणि माझी साडी तयार झाली.

ही साडी एका कार्यक्रमाला मी नेसले होते. त्यावर दागिने सोन्याचे चांगले दिसतील असं वाटत होतं. कारण काठात आणि पदरात सोनेरी बुट्टी होती. त्यामुळे माझ्याकडचं सोन्याचं, नथीचं पेंडंट असलेलं गळ्यातलं आणि माझे चांदीचे पण सोनेरी पॉलिश असलेले झुमके मी या साडीवर घातले. ते चांगले दिसत होते. मला मोठी टिकली आवडते. आणि पारंपरिक पोशाखावर मोठी टिकली चांगलीच दिसते. त्यामुळे ती होतीच.

हे जे गळ्यातलं आहे ते मी लागू बंधूंकडून तयार करून घेतलेलं आहे. त्यांच्याकडे हे डिझाइन मोत्यात होतं. पण मला मोती फारसे आवडत नाहीत म्हणून मी त्यांना मला हे सोन्यात करून द्यायला सांगितलं. तसं त्यांनी ते करून दिलं.

मला नेहमी असं वाटतं की दुस-यांना जे चांगलं दिसतं ते आपल्याला दिसेलच असं नाही. म्हणून आपल्या आवडीनुसार आणि आपल्याला काय चांगलं दिसेल याचा अनुभव घेऊन मगच आपली राहणी ठरवावी. शेवटी काय तर आपण करू ती फॅशन!

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष