साडीची कहाणी – ४

धारवाडी खण हा कपड्याचा एक अतिशय सुरेख आणि खूप आवडता प्रकार. लहान मुलींना धारवाडी खणाची परकर पोलकी किती छान दिसतात. खणाचा ब्लाऊज तर सुरेखच दिसतो, शिवाय तो ब-याच साड्यांवर मिक्स मॅच करता येतो. आजकाल तर खणाच्या सुंदर पर्सेस, बॅग्जही मिळतात. शिवाय फाइल होल्डरसारख्या किती तरी गोष्टी खणाचा वापर करून केल्या जातात.

मी लहान असताना बहुतेकदा खेड्यातल्या बायका खणाची चोळी घालायच्या. तेव्हा सरसकट सगळ्या बायका खणाचा वापर ब्लाऊजसाठी करत नसत. तेव्हा ब्लाऊज शिवायला टू बाय टू आणि बिझीलेझी अशी दोन अत्यंत पातळ आणि वाईट दिसणारी कापडं वापरली जायची. पण गेल्या काही वर्षांत मात्र वेगवेगळ्या कपड्यांचे सुरेख ब्लाऊज बघायला मिळतात. खणाचे ब्लाऊज तर फारच अफलातून दिसतात कारण त्याचा हवा तसा वापर करता येतो. म्हणजे काठ लावून काही डिझाइन करता येतं किंवा काही साड्यांवर काठ न वापरताही शिवलेले ब्लाऊज सुरेख दिसतात.

माझ्या मनात अनेक वर्षं खणाची साडी करण्याचं फार घोळत होतं. मला खणाचं रेशमी डिझाइन फार आवडतं. त्यामुळे या डिझाइनची अख्खी साडी केली तर फार मस्त दिसेल असं वाटत होतं. ४ वर्षांपूर्वी बेळगावला गेले असताना अर्थातच साडीच्या दुकानात गेले होते. तिथे मला साड्या काही फारशा आवडल्या नाहीत पण खणाचे तागे मात्र सुंदर दिसले. मग लगेचच डोक्यात साडी करण्याचं परत एकदा आलंच. लगोलग ६ मीटर खण घेऊन टाकला. बरोबर माझी बहिण मेघन होती, तिनंही वेगळ्या रंगाचा खण घेतला.

परत आल्यावर माझ्या टेलरकडे गेले आणि साडीसाठी किती कपडा लागेल याची चौकशी केली. खण हा साडी पन्ह्याचा नसतो. त्यामुळे साडीची उंची करायला त्याला कपडा जोडणं गरजेचं होतं. मग साधारण किती कपडा लागेल याचा अंदाज घेऊन रॉ सिल्क खरेदी केलं. रमादा ग्रीन रंगाचा खण होता. म्हणून त्याला जोडण्यासाठी जांभळा आणि राणी पिंक कपडा घेतला. बहिणीचा खण गुलबक्षी होता. त्याला जोडायला केशरी आणि चिंतामणी रंगाचं रॉ सिल्क घेतलं. साडीचं डिझाइन मला साधं हवं होतं कारण तो खण आहे हे मला दिसायला हवं होतं. म्हणून फक्त उंची वाढवण्यासाठी दोन्ही रॉ सिल्कचे ४ इंचांचे काठ दोन्ही बाजूंनी लावले. मला पदरही मोठा हवा होता. म्हणून खणाचे सगळे काठ कापून काढले. काठांना रॉ सिल्कची पायपिंग लावून मग थोड्या थोड्या अंतरावर काठ लावून लांब पदर तयार केला. रॉ सिल्क टिकावं म्हणून त्याला आतून पातळ कपडा लावला.

ही साडी तयार झाल्यावर खूपच देखणी दिसायला लागली. मी ती बरेचदा नेसलीही. पण परवा एका लग्नाच्या रिसेप्शनला जाताना ती बरेच दिवसांनी नेसली. त्यावर चांदीचे दागिने चांगले दिसतात म्हणून ते घातले. जे गळ्यातलं आहे ते मी फार वर्षांपूर्वी एका प्रदर्शनात घेतलेलं आहे. तर कानातलं आणि नाकातलं माझी मैत्रीण गीतांजली हिच्या मोहाचं आहे. बांगड्या मी १० वर्षांपूर्वी बंगलोरला घेतलेल्या आहेत.

सध्या मी अजून २-३ वेगळ्या साड्या करते आहे. झाल्या की त्याबद्दल लिहीनच.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष