साडीची कहाणी – २

मी परवाच मी डिझाइन केलेल्या साडीचा एक फोटो शेअर केला होता. मी डिझाइन केलेली म्हणजे नेमकं काय? असं एका मैत्रिणीनं विचारलंय. म्हणजे तिला असं विचारायचं होतं की मी ती साडी तशी हातमागावर विणून घेतली का? तर ही त्या साडीची गोष्ट.

मुंबईत दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत नॅशनल हँडलूम एक्स्पो लागतं. या प्रदर्शनात देशभरातले हातमाग विणकर भाग घेतात. सरकारी अनुदानामुळे त्यांना या प्रदर्शनात फार स्वस्त भाड्यात स्टॉल्स लावता येतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या किंमती अगदी वाजवी असतात. या प्रदर्शनांमध्ये फार उत्तम साड्या, कपडे, चादरी मिळतात. तर या प्रदर्शनात यावर्षी मी ५ साड्या घेतल्याच. शिवाय दोन साड्या तयार करण्यासाठी काही कापडं घेतली. म्हणजे दोन दुप्पटे घेतले त्यांची साडी अजून तयार व्हायची आहे. पण ही जी काळी साडी आहे तिचा कपडाही मी तिथेच घेतला.

आंध्रच्या स्टॉलवर साधा काळा कॉटनचा कपडा बघितला आणि मग पोचमपल्ली कपडा बघितला तेव्हाच ही साडी जणू माझ्या डोळ्यासमोरच उभी राहिली. मला साधी साडी करायची होती जी मला कुठेही, कधीही नेसता येईल अशी. साडीला साधारण साडेपाच मीटर कपडा लागतो आणि ब्लाऊजला ८० सेंटिमीटर ते १ मीटर कापड लागतं. मला लांब पदरांच्या साड्या आवडतात. म्हणजे पदरावर अगदी खांद्याच्याही थोडं आधीपासून डिझाइन असलेल्या साड्या. म्हणजे पदरच जवळपास सव्वा ते दीड मीटरचा होतो. त्यामुळे पदरासाठी मी दीड मीटर कापड घेतलं. आणि बाकी साडीसाठी साडेचार मीटर.

म्हटलं तसं कपडा बघितला आणि साडीचं डिझाइन मनात उभं राहिलं. प्लेन अंग आणि प्रिंटेड पदर असं. म्हणून साऊथ कॉटनचं प्लेन काळं कापड घेतलं. आणि पदरासाठी पोचमपल्ली प्रिंटेड कापड घेतलं. फक्त काळं-काळं काँबिनेशन केलं असतं तर तितकंसं बरं दिसलं नसतं कारण काळ्यावर अगदी फिकं पांढरं आणि पिवळं प्रिंट होतं. म्हणून मग १ मीटर अगदी ब्राईट लाल प्रिंटेड पोचमपल्ली कापड घेतलं. त्याचं काहीतरी डिझाइन करू असा विचार केला. ब्लाऊजला जरा मरूनीश लाल प्रिंटेड पोचमपल्ली कापड घेतलं. ब्लाऊज स्लीव्हलेस करायचा असंच ठरवलं होतं. त्यामुळे तितकंच कापड घेतलं. बॉर्डरसाठी १ मीटर प्लेन लाल कापड घेतलं.

साडी शिवताना आधी पदर तयार करून घेतला. म्हणजे प्रिंटेड काळ्या कपड्यावर लाल प्रिंटेड कपड्याच्या आडव्या पट्ट्या शिवून घेतल्या. त्यामुळे पदराला एकदम उठाव आला. नंतर काळ्या कपड्याला तयार पदर जोडला.  आणि संपूर्ण साडीला प्लेन लाल कपडाची बॉर्डर जोडली. साडी तयार झाली! प्रिंटेड मरून कपड्याचं स्लीव्हलेस ब्लाऊज शिवून घेतलं. खरं तर या साडीला मला गोंडे लावायचे होते पण ते आणणं झालं नाही म्हणून राहिलं.

जेव्हा परवा मी ही साडी पहिल्यांदा नेसली तेव्हा त्यावर मी माझी आवडती चांदीची जुलरी घातली. कॉटन कपडा आणि काळा-लाल रंग म्हणजे चांदी हमखास चांगलीच दिसणार. गळ्यात मी चांदीची दुहेरी जाड साखळी घातली आणि कानात माझे व्हिक्टोरियन स्टाइलचे मोती आणि लाल खडे लावलेले चांदीचे अँटिक कानातले घातले. मला मोठ्या टिकल्या खूप आवडतात. त्यामुळे अर्थातच मोठी मरून टिकली लावली.

तुम्हीही असे प्रयोग करू शकता. आपली आवडती काँबिनेशन्स वापरून साड्या, दुप्पटे, स्टोल्स तयार करू शकता. शेवटी काय आपण करू ती फॅशन! ही पोस्ट कशी वाटली ते जरूर कळवा.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष