वजनाचं व्यवस्थापन

मी आता ४५ वर्षांची आहे आणि गेली निदान २५ वर्षं मी नेमानं चालते आहे. मला रमतगमत चालायला खूप आवडायचं कॉलेजमध्ये. युनिव्हर्सिटीत एमए करत असताना तर खूपदा चालत घरी यायचे. साधारणपणे ६ किलोमीटर होतं विद्यापीठ. मी आणि माझी मैत्रीण सोनाली रोज फिरायला जायचो. अर्थात त्यात फार काही व्यायाम वगैरे करावा असं मनात नव्हतं. टाइमपासच जास्त होता.

पुढे लग्न झाल्यावर मुंबईत आले. लग्नानंतर नव-याला चालायला न्यायला लागले. पुढच्या काही वर्षातच त्याला high cholesterol निघालं. त्यामुळे मग तोही नियमित चालायला लागला. आणि १४ वर्षांपूर्वी त्याची angioplasty झाली. स्मोकिंग करत नसतानाही किंवा डायबेटिस नसतानाही. त्यानंतर मात्र आमच्या संपूर्ण घराची जीवनपद्धतीच बदलून गेली. खाण्यापिण्यावर नियंत्रण आलं. अधिक पौष्टिकतेचा विचार व्हायला लागला आणि मुख्य म्हणजे व्यायाम हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.

गेली निदान १५ वर्षं मी किमान ४०-४५ मिनिटं मध्यम गतीला चालते (साधारण ३ ते ३.५ किलोमीटर) आणि आठवड्यातून तीनदा योगासनं करते. योगासनांच्या क्लासलाच जाते कारण घरी तितक्या शांतपणे होत नाही. वॉकमुळे एरोबिक व्यायाम होतो आणि योगासनांमुळे स्ट्रेचिंग-बेंडिंग होतं. गेली ४ वर्षं सकाळी फिरायला जाते. पण त्याआधी जेव्हा मी संध्याकाळी फिरायला जात असे तेव्हा जर कुठे बाहेर जायचं असेल तर अर्ध्या वाटेवर गाडी किंवा रिक्षा-टॅक्सी सोडून देऊन वॉक पूर्ण करत असे. आजही मी जिथे शक्य आहे तिथे चालत जाणं, जिने चढणं-उतरणं हे करतेच.

मला व्यायामाची आवड आहे असं कुणाला वाटत असेल तर तसं अजिबातच नाही. मला व्यायामाचा प्रचंड कंटाळा आहे. म्हणूनच मी कधीही जिमला जाऊ शकले नाही. पण व्यायाम हा केलाच पाहिजे हे मला मनोमन पटलेलं आहे त्यामुळे मी व्यायामाला आयुष्याचा एक भाग बनवून टाकलेलं आहे. आठवड्यातून सहादा चालण्याचा मी प्रयत्न करते. रविवारी मस्त सुटी घेते.

वाढत्या वयाचा परिणाम म्हणून हे सगळं करत असूनही गेल्या वर्षात ४-५ किलो वजन वाढलेलं आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. मुळात बारीक चण असल्याची जेनेटिक देणगी आहे. तिचा फायदा घेऊन आतापर्यंत काहीही आणि कसंही खाल्लेलं चालत होतं. पण आता तसं चालणार नाही हे गेल्या वर्षात लक्षात आलेलं आहे. त्यामुळे सध्या संध्याकाळी ७ च्या आत जेवायला सुरूवात केली आहे. बघू या काय फरक पडतो ते.

(ही जुनी पोस्ट)

आता त्याचा पुढचा भाग –

गेले ४ महिने रोज संध्याकाळी ७ च्या आत जेवायला सुरूवात केली आहे. सध्या प्रवास खूप होतोय, म्हणून योगा क्लास बंद केलाय. पण रोज ४५ मिनिटं चालणं आणि त्याबरोबर १५ किलोमीटर स्टेशनरी सायकल करणं सुरू केलं आहे. दिवसभरात निदान ३ फळं खाते आहे. जेवणात जास्तीत जास्त भाज्या आणि प्रथिनांचा वापर करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी रोज बेसन लाडू खाते आहे. बरोबर ग्रीन टी घ्यायला सुरूवात केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून २ किलो वजन कमी झालं आहे. अजून फार कमी करायचंच नाहीये. त्यामुळे आता फक्त मेंटेनन्सवर भर देते आहे.

सायली राजाध्यक्ष