रेखा ओ रेखा!

साडी हा पोशाख उत्तम त-हेनं कॅरी करू शकणा-या किती तरी अभिनेत्री आहेत. मागच्या पोस्टमध्ये मी पन्नास-साठच्या दशकातल्या साड्यांमध्ये अभिजात दिसणा-या अभिनेत्रींबद्दल लिहिलं होतं. आज त्याच पोस्टचा पुढचा भाग. या भागात मी लिहिणार आहे, माझी अत्यंत आवडती अभिनेत्री रेखा हिच्याबद्दल. लावण्याचं आणि अभिजाततेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रेखा असं माझं मत आहे.

साडी ही केवळ जिच्यासाठीच बनली आहे असं वाटावं अशी अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा आणि तिची राहणी याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. सोलवा सावन, रामपूर का लक्ष्मण या चित्रपटांमधली कपड्यांचा अजिबात सेन्स नसलेली, भद्दी दिसणारी रेखा आणि उत्सव, इजाजत या चित्रपटांमधली अभिजात रेखा हे तिचं रूपांतर खरोखर विलक्षण आहे. तिनं आपल्या राहणीवर किती मेहनत घेतली आहे हे तिच्या या प्रवासावरून कळून येतं. चित्रपटसृष्टीत ती आली तेव्हा ती केवळ सोळा वर्षांची होती. मस्त जाडीजुडी, पोट सुटलेलं, डोक्यावर कृत्रिम केसांचे टोप, डोळ्यांच्या बाहेर ओसंडून वाहणारं काजळ, भडक लिपस्टिक, भयानक दागिने अशी दिसणारी रेखा अजिबात बघवत नाही.

पण रेखानं प्रचंड मेहनत घेतली आणि नुसतीच उत्तम दिसायला लागली नाही तर तितकीच उत्तम अभिनेत्रीही झाली. थोड्या काळानंतर आलेल्या तिच्या जीवनधारा, खूबसूरत अशा चित्रपटांमधून तिनं प्रिंटेड सिल्कच्या साड्या आणि पुढे घेतलेल्या दोन वेण्या असा अनोखा ट्रेंड लोकप्रिय केला.

नंतरच्या काळात आलेल्या घर या चित्रपटातून रेखाचा अभिनय अजूनच ठळकपणे डोळ्यात भरायला लागला. या चित्रपटात तर साध्या सिंथेटीक साड्यांमध्ये आहे. पण तिचे खूप काही बोलणारे डोळे, कपाळावरचं मोठं कुंकू, अंबाडा अशी ती किती सुरेख दिसली आहे.

वय वाढत गेलं तसं रेखा अजूनच देखणी दिसायला लागली. तिच्यात प्रगल्भता आली. मग विजेतामधली साध्या कॉटन नारायणपेठी साड्या नेसलेली, मानेवर रूळणारा अंबाडा घालणारी रेखा असो की उत्सवमधली दागिन्यांनी लगडलेली नगरवधू असो, रेखाला पदडद्यावर बघत राहावंसं वाटतं. सिलसिलामधली भूमिकेला थोड्या ग्रे शेड्स असलेली रेखा आठवा. गझी सिल्कच्या प्लेन साड्यांमध्ये, मोकळ्या केसांमध्ये, हि-यांच्या नाजूक दागिन्यांमध्ये, ब्राइट पण अतिशय शोभणा-या लिपस्टिकमध्ये रेखा काय सुंदर दिसली आहे!

विजेतामधली आतल्याआत घुसमट होणारी नायिका रेखानं काय सुंदर वठवली आहे. या चित्रपटात तिनं फारसा मेकअप केलेला नाही. फक्त काजळ, मोठी टिकली, मानेवर रूळणारा अंबाडा, गळ्यात मराठी पद्धतीचं लांब मंगळसूत्र, डोळ्यांभोवती काहीसं काळं आहे. पण सकाळी सकाळी ती जेव्हा मन आनंद आनंद छायो म्हणते तेव्हा किती प्रसन्न दिसते.

पुढे संसार नावाच्या तद्दन मद्रासी सिनेमात रेखानं आपल्या वाढत्या वयानुसार मोठ्या जावेची भूमिका केली. त्यातही ती दाक्षिणात्य पद्धतीच्या वेशभूषेत किती शोभून दिसते. काठापदराच्या साड्या, लांब बाह्यांचे ब्लाऊज, नाकात मोरणी, गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात कुंकू. बघत राहावं अशी दिसते. इजाजतमध्ये तर रेखा तिच्या कारकीर्दीत सगळ्यात सुंदर दिसली आहे असं माझं मत आहे. इजाजतमधल्या रेखाच्या रेशमी नारायणपेठी साड्या, काठांचा सुरेख वापर करून शिवलेले ब्लाऊज, प्रत्येक साडीवर वेगळं मंगळसूत्र, त्याला मॅचिंग गळ्यातलं, कानातलं आणि मोरणी, लांब वेणी. अहाहा! एखाद्या बाईनं किती रूपवान दिसावं!

वाढत्या वयानुसार रेखानं भूमिकाही तशाच निवडल्या. झुबेदा चित्रपटात सहायक भूमिकेतही रेखा लक्षात राहाते. यात तिनं राजाहून वयानं मोठी असलेल्या राणीची भूमिका केली होती. त्यासाठी खास राजघराण्याच्या ब्रँड असलेल्या शिफॉनच्या साड्या, गळ्यात मोत्यांचा सर, डोळ्यांना अगदी कमी मेकअप तिनं केला होता. यात तिच्या रूपापेक्षा तिचा अभिनय लक्षात राहिला. पुढे आला परिणीता. या खास बंगाली क्लासिकमध्ये रेखानं पाहुणी भूमिका केली होती. एका क्लब डान्सरच्या भूमिकेत त्या वयातली रेखा काय ग्लॅमरस दिसली आहे!

पण वाढत्या वयाचं हे भान रेखानं जसं भूमिकांमध्ये ठेवलं तसं तिला प्रत्यक्ष आयुष्यात ते ठेवता आलं नाही. म्हणूनच आजही रेखा कुठल्याही कार्यक्रमाला भरजरी कांजीवरम साड्या, वयाला न शोभणारा मेकअप आणि दागिने, भडक लाल लिपस्टिक अशा वेशात दिसते. खरं सांगू, मला इतक्या प्रिय असलेल्या रेखानं आता कसं राहावं असं मला वाटतं: रेखानं आता छान रॉ सिल्कच्या भारदस्त साड्या नेसाव्यात, त्यावर शोभतील असे लहानसे दागिने घालावेत, तशी केशरचना करावी, कमी मेकअप करावा. पण मला वाटून काय उपयोग आहे!

पण रेखाचं हिंदी चित्रपटसृष्टीतलं देखणेपणाबद्दलचं, मेकअपच्या समजाबद्दलचं, अभिजात सौंदर्याबद्दलचं स्थान कायम अबाधित राहणार आहे हे मात्र निश्चित.

जाता जाता तिची भूमिका असलेल्या उत्सवमधल्या तिच्या रूपाचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही. खरं तर ती उत्सवमध्ये साड्यांमध्ये नाहीये. पण तिची त्यातली जी काही वेशभूषा आणि रंगभूषा आहे त्यात ती अवर्णनीय सुंदर दिसते.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष