माझं घर

आमचं जे घर आहे ते आम्ही २००२ मध्ये विकत घेतलं. घर साहित्य सहवासातच हवं असं आम्हा दोघांनाही वाटत होतं. त्यामुळे हे घर थोडंसं लहान असलं तरी आम्ही ते ताबडतोब घेण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा घर घेतलं म्हणून बरं नाही तर आता घरांचे जे भाव झाले आहेत ते बघता आम्हाला बांद्र्यात घर घेणं अशक्यच झालं असतं. आमचं हे घर ६४० स्क्वेअर फुटांचं आहे. आता मुंबईतल्या माणसांना हे घर मोठं वाटेलही. पण माझं माहेरचं म्हणजे औरंगाबादचं घर ४००० स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर बांधलेलं आहे. घराच्या समोर अंगण, झाडं, बाहेर व-हांड्यात झोका असं सगळं आहे. आमचं बीडचं घर तर २० हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर होतं. मागेपुढे प्रचंड मोठं अंगण, खूप मोठी बाग असं होतं. तर माझा प्रवास उलटा झाला आहे. खूप मोठ्या घराकडून लहानशा घराकडे. पण तरीही माझं हे घर मला अतिशय प्रिय आहे, कारण ते मी मला हवं तसं सजवलेलं आहे. त्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.

आपण ज्या घरात राहतो तिथली मुख्य आवश्यक गोष्ट म्हणजे आपली सोय. आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या कुठल्याही अडचणीशिवाय पूर्ण झाल्या पाहिजेत. प्रत्येक घराच्या सवयी वेगळ्या असतात, येणा-या माणसांची संख्या, प्रकार आणि पद्धती वेगळ्या असतात. त्यांना अनुसरून घराची रचना हवी. माझ्या कुटुंबापुरतं बोलायचं तर आम्ही घरात चारच माणसं असलो तरी माझ्याकडे सतत माणसांचा राबता असतो. आम्हा चौघांनाही घरी माणसं आलेली आवडतात. मला लोकांना घरी बोलवायला, जेवायला बोलवायला खूप आवडतं. गप्पा मारायला आवडतात. माझी ही आवड माझ्या मुलींनीही उचलली आहे. त्या दोघींनाही मैत्रिणींना घरी बोलवायला आवडतं. त्यामुळे आमच्याकडे सतत चहलपहल असते. माझ्या घरी राहायला येणारे पाहुणेही खूप असतात. हे सगळं लक्षात घेऊन मी आमच्या घराची रचना केली आहे.

सतत बाहेरची माणसं येणार हे लक्षात घेऊन आम्ही आमचा लिव्हिंग एरिया मोठा ठेवला आहे. माझं स्वयंपाकघर आणि दोन्ही बेडरूम्स लहान आहेत. आमचा हॉल सगळ्यात मोठा आहे. तोच आमचा डायनिंग एरिया, आमचा एंटरटेनमेंट एरिया, आमची स्टडी रूम आणि गेस्ट रूमही आहे. आम्ही आमच्या हॉलमधला शंभर स्क्वेअर फुटांचा भाग दहा इंच उंच केलेला आहे. त्या भागात आम्ही लाकडी प्लॅटफॉर्म केलेला आहे. त्यावर वूडन फ्लोअरिंग आहे. एका कोप-यात निरंजनच्या कामासाठी लहानसं टेबल ठेवलं आहे. खरं तर हे टेबल कन्सोल टेबल आहे. पण मी त्याचा वापर स्टडी टेबलासारखा केलेला आहे. शिवाय दोन मोठ्या आरामशीर खुर्च्या आणि एक बेड या भागात आहे. जो आम्ही एरवी बसण्यासाठी आणि पाहुणे आले की त्यांच्या झोपण्यासाठी वापरतो. या स्टडी एरियाची जी बाल्कनी आहे ती आम्ही आत घेतली आहे. आणि बसण्यासाठी समोरासमोर दोन कट्टे केलेले आहेत. आमच्या घरी येणा-या सगळ्यांची ती अतिशय आवडती जागा आहे. या स्टडी एरियाला मी स्लायडिंग दारं करून घेतली आहेत. म्हणजे या भागाला प्रायव्हसी तर होतेच. पण पाहुणे आले तर ती गेस्ट रूम होते.

हॉलमध्ये एका भिंतीला मोठा टीव्ही आहे. त्याच्या समोर एक तिघांना बसता येईल असा कापडी सोफा आहे. एका कोप-यात लहानसं डायनिंग टेबल आणि जुन्या बाजारातून घेतलेलं एक चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे. माझ्याकडे एक फोल्डिंग टेबलही आहे. जेव्हा लोक जेवायला असतात तेव्हा मी ते काढते. माझ्याकडे कधीकधी एका वेळेला ४० माणसंही जेवायला असतात.

माझं स्वयंपाकघर अत्यंत लहानसं आहे. समोरासमोर दोन ओटे आहेत. एका ओट्यावर सिंक आहे. तर दुस-यावर गॅसची शेगडी आणि मायक्रोवेव्ह. पण माझ्या इतक्या लहानशा स्वयंपाकघरात फ्रीज आणि वॉशिंग मशीनही सामावलेलं आहे. दोन्ही बेडरूम्समध्ये डबल बेड्स आणि वॉर्डरोब वगळता काहीही फर्निचर नाहीये.

आम्ही २००३ मध्ये जेव्हा राहायला आलो तेव्हा घर घेतल्यानं सगळे पैसे संपलेले होते. त्यामुळे इतर गोष्टी करणं शक्यच नव्हतं. आम्ही त्यावेळी फक्त स्वयंपाकघरातले ड्रॉवर्स आणि स्टडी एरियातली एक बुककेस केली होती. नंतर हळूहळू आम्ही घरात बदल करत गेलो. दर काही वर्षांनी आपल्या गरजा बदलत असतात त्यामुळे घरातही तसे बदल करावे लागतात असं माझं मत आहे. आम्ही राहायला आलो तेव्हा आम्ही जुनी स्टीलची कपाटं वापरत होतो. मुलींच्या खोलीतल्या कपाटाला आम्ही वॉलपेपर लावून घेतला होता. दोन्ही बेडरूम्समध्ये आणि हॉलमध्ये बसायलाही खाली गाद्या घातलेल्या होत्या. तेव्हा मुली लहान होत्या त्यामुळे स्विच बोर्डस् त्यांच्या हाताला लागतील असे लावले होते. शिवाय डायनिंग टेबलही कमी उंचीचं आणि लहानसं घेतलं होतं. मुली जसजशा मोठ्या होत गेल्या, थोडे पैसे येत गेले तसे आम्ही घरात बदल करत गेलो.

आम्ही चौघेही भरपूर वाचतो. त्यामुळे पुस्तकं हा आमच्या घराचा आविभाज्य भाग आहे. आमच्या घराच्या प्रत्येक खोलीत पुस्तकंच पुस्तकं आहेत. सुदैवानं मी आणि माझ्या सासुबाई ब-यापैकी सारखं वाचन करतो. त्यामुळे मी जी पुस्तकं वाचते ती कॉलनीतल्याच त्यांच्या घरी असतात. पण तरीही मीही दर महिन्याला पुस्तकं घेतच असते. तर सतत येणारी पुस्तकं कुठे ठेवायची हा एक गहन प्रश्न आहे. जो अजूनही सुटलेला नाही.

माझं स्वयंपाकघर लहानसं असलं तरी ते तितकं पुरतं असं मला वाटतं. मी तिथे ४०-५० माणसांचा स्वयंपाक आरामात करू शकते. तितके लोक जेवतील इतक्या प्लेट्स, कटलरी माझ्याकडे आहे. पण मी सामान फारसं स्टोअर करत नाही. मी पंधरा दिवसांचं सामान एका वेळी मागवते. कारण आता आपल्याला फोनवर मागवलं की सामान येतं. शिवाय मी पारंपरिक पद्धतींचा वापर करते. म्हणजे मी फारसं बेकिंग करत नाही. मी फार आधुनिक उपकरणांचा वापर करत नाही. यात कुठलाही आव नसून कंटाळा हे त्याचं मुख्य कारण आहे. मला स्वतःला झटपट होणारा स्वयंपाक आवडतो. शिवाय फार गुंतागुंतीच्या पाककृती करायला आवडत नाहीत. त्यामुळे त्यासाठी लागणारी सगळी आयुधं माझ्या स्वयंपाकघरात नाहीत. पण बहुतेक मला लवकरच ती घ्यावी लागणार आहेत कारण माझ्या मुली आता स्वयंपाक करतात आणि त्यांना तेच सगळं हवं असतं.

तर अशी एकूण आमच्या घराची पद्धत आहे. मी या पोस्टबरोबर आमच्या घरात कसकसे बदल होत गेले याचे फोटो शेअर करते आहे.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s